आजची गुरू-शनिची युती चुकवू नका

आजची गुरू-शनिची युती चुकवू नका

१६ जुलै १६२३ रोजी गुरू आणि शनी हे दोन ग्रह जवळ आले होते. त्यानंतर २१ डिसेंबर २०२० रोजी म्हणजे आज हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या खूप जवळ येत आहेत.

उन्हाळी सुट्यानंतर ‘३७० कलम’ याचिकांची सुनावणी
काश्मीरात ‘फोर जी’साठी सर्वोच्च न्यायालयाचा नकार
बहुसंख्यावादी हिंदुत्वाची वाटचाल

गुरू आणि शनी हे दोन ग्रह २१ डिसेंबर २०२० रोजी एकमेकांच्या खूप जवळ येत आहेत. याला युती म्हणतात. ही महायुतीही म्हणता येईल. या महायुतीसंदर्भात महत्त्वाची बाब म्हणजे दुर्बिणीच्या शोधानंतर दुसर्यांदा हे दोन ग्रह एकमेकांच्या जवळ येत आहेत.

२१ डिसेंबरला हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून फक्त ०.१ अंश कोनीय (अर्थात ६ कला आणि ६ विकला) अंतरावर असतील. तुलनेने चंद्राचा सरासरी कोनीय व्यास हा ०.५ अंश आहे.

या पूर्वी १६ जुलै १६२३ रोजी हे ग्रह जेव्हा जवळ आले तेव्हा त्यांच्यातील अंतर ०.०८६ अंश होतं.

या दोघांची युती बघणं आपल्यासाठी एक अविस्मरणीय क्षण असेल. तुलना करायची झाली तर नुसत्या डोळ्यांनी बघताना सप्तर्षी तारका समूहातील ६ वा तारा वशिष्ठ हा एक तारा नसून दोन तारे आहेत –  वशिष्ठ आणि अरूंधती. हे तारे एकमेकांपासून ०.२ अंश दूर आहेत. आणि या दोन्ही ताऱ्यांना वेग वेगळं बघता येणं हे दृष्टी चांगली असल्याच लक्षण मानण्यात येत.

या युतीच्या काळात आम्ही एक सर्वेक्षण घेत आहोत.

या पूर्वी २४ ऑक्टोबर १६८२ आणि त्यानंतर लगेच ९ फेब्रुवारी १६८३ रोजी यांच्यातील अंतर वशिष्ठ आणि अरूंधती यांच्या अंतरापेक्षा कमी होतं. त्या वेळी हे दोन्ही ग्रहांचे वक्रीभवन चालू होते. आता ३३८ वर्षांनी पहिल्यांदाच हे ग्रह इतके जवळ दिसणार आहेत.

या नंतर हे दोन्ही ग्रह पुन्हा १५ मार्च २०८० रोजी जवळ येतील.

खरे तर मानवी डोळ्याची क्षमता ०.०२५ अंश दूर असलेल्या दोन बिंदूंना वेगवेगळं बघण्याइतकी आहे. पण कधी शारीरिक व्याधीमुळे तर कधी वयोमानामुळे ही क्षमता नसते.

डिसेंबर महिन्याच्या ३ऱ्या आठवड्यात सध्या आकाशात सूर्यास्तानंतर गुरू आणि शनि आपल्याला दिसत आहेत.१५ डिसेंबर रोजी संध्याकाळी सूर्यास्तानंतर सुमारे ३० मिनिटांनी आपल्याला पश्चिम क्षितिजावर बारीक चंद्र कोर दिसला होता. दुसऱ्या दिवशी चंद्राची कोर आपल्याला या दोन्ही ग्रहांच्या बरोबर खाली दिसली. आणि नंतर १७ तारखेला चंद्राची कोर गुरू आणि शनिच्यावर दिसली होती.

पुढे दोन दिवस म्हणजे १९ तारखेपर्यंत हे दोन्ही ग्रह आपल्याला सहज वेगळे दिसले होते. आता २० ते २३ डिसेंबरपर्यंत या दोन ग्रहांच्यातील कोनीय अंतर वशिष्ठ आणि अरूंधती यांच्या कोनीय अंतरापेक्षा कमी असेल.

या युती मधे शुभ-अशुभ असे काहीही नाही. या दोघांच्या जवळ येण्याने जो गुरूत्वीय प्रभाव पडेल तो तुमच्या शेजारी १०० किलो वजनाच्या व्यक्तीच्या गुरुत्वीय प्रभावापेक्षा कमीच असेल.

जर याचा काही प्रभाव पडेल तर तो इतकाच की या ऐतिहासिक युतीचे साक्षीदार होण्याचा आनंद आपणा सर्वांना मिळणार आहे.

गुरू हा सूर्याची एक परिक्रमा ११.८७ वर्षांनी पूर्ण करतो तर शनिला २९.५ वर्ष लागतात. या दोन्हीचा परिणाम असा की सुमारे १९ वर्ष आणि ७ महिन्यांनी या ग्रहांची महायुती होती. पण प्रत्येक महायुतीच्या वेळी यांच्यातील अंतरे वेगवेगळी असतात.

अरविंद परांजपे, नेहरू तारांगण, मुंबई

(लेखाचे छायाचित्र – रॉचेस्टर विद्यापीठाच्या वेबसाईटवरुन साभार )

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0