राजकीय करिष्मा : निर्मिती आणि परिणाम

राजकीय करिष्मा : निर्मिती आणि परिणाम

हां हां म्हणता डोनल्ड ट्रंप हा एक वलयांकित महापुरुष झाला. २०१६ साली अध्यक्ष होईपर्यंत ट्रंप यांची प्रतिमा एक प्रसिद्धी लोलूप उठवळ माणूस अशी होती. ट

गांधी, थोरो आणि सविनय प्रतिकार
जॉन ल कॅरी – रहस्यमय आणि पतित जगाचा लेखक
वानरदेवाच्या लुप्त शहराच्या शोधात…..

हां हां म्हणता डोनल्ड ट्रंप हा एक वलयांकित महापुरुष झाला.

२०१६ साली अध्यक्ष होईपर्यंत ट्रंप यांची प्रतिमा एक प्रसिद्धी लोलूप उठवळ माणूस अशी होती. ट्रंप टीव्हीवर लोकांचं मनोरंजन करत. रिअँलिटी शोचा माणूस म्हणूनच ट्रंप ओळखले जात.

२०२० ची निवडणूक आली आणि ट्रंपचं रुपांतर एक थोर अमेरिकन अशा रुपात झालं. ते बोलतील तो देवाचा शब्द असं लोक खरोखर म्हणू लागले. अमेरिकेत आणि जगभर कोविडनं हाहाकार माजवला होता, दररोज हज्जारो माणसं मरत होती. पण अमेरिकेतले लाखो ट्रंप समर्थक म्हणत होते की कोविड हे डेमॉक्रॅटिक पक्षानं तयार केलेले थोतांड आहे. ट्रंप यांचे सहकारी कोविडचा बळी ठरले तरीही लोकांचं मत बदललं नाही.

ट्रंप म्हणाले, की निवडणुक बोगस आहे. लोकांनी विश्वास ठेवला. कोणतेही पुरावे ट्रंपनी दाखवले नाहीत,कोर्टानं त्यांचं म्हणणं धुडकावून लावलं. तरीही आजही लाखो लोक म्हणतात की निवडणुक बोगसच होती.

डेविड बेल

डेविड बेल

अमेरिकेत ट्रंप यांचे पुतळे उभारणं तेवढं बाकी आहे. अमेरिकेत तामिळनाडू असतं तर येव्हांना ट्रंपची मंदिरंही दिसू  लागली असती.

ट्रंप यांचा एक करिष्मा तयार झालाय. ट्रंप यांच्या डोक्याभोवती ख्रिस्ताभोवती असतं तसं एक वलय तयार झालंय. ट्रंप आता एक वलयी माणूस झालाय.

वलयी माणसं तयार होणं ही काय घटना आहे याचा तपास Men on Horseback: The Power of Charisma in the Age of Revolution या पुस्तकात लेखक डेविड बेल यांनी केलाय. लेखक प्रिन्सटन विश्वशाळेत इतिहास हा विषय शिकवतात.

जॉर्ज वॉशिंग्टन, नेपोलियन बोनापार्ट, सायमन बोलिवार (कोलंबिया), पास्केल पाओली (कॉर्सिका), तुसां वेरतुर (हैती) या गाजलेल्या वलयी व्यक्तींचा अभ्यास डेविड बेल यानी केलाय.

वॉशिंग्टन, नेपोलियन, बोलिवार ही माणसं लढवय्यी होती, त्यांनी लढाया केल्या. लढाया म्हणजे शौर्य. लढाया म्हणजे मरणाचा धोका पत्करणं. त्यातून लढाईचं नेतृत्व म्हणजे आणखी वरच्या पातळीवरचं कसब.

सामान्यतः सैन्यातल्या माणसाच्या गुणदोषांची चर्चा केली जात नाही. लढाईतल्या कित्येक कथांना तर वास्तवाचा आधारही नसतो. सैनिकानं केलेलं कर्तृत्व पाहिलेली माणसं जिवंत नसतात, जी काही माणसं असतात ती भारलेली असतात. त्यामुळं गोष्टी गूढ होतात.

अशा माणसांच्या कथा पसरवतात, ती लढाईत न गेलेली माणसं, आणि गोष्ट घडून गेल्यानंतर वर्णनं करणारी माणसं. ही माणसं आपापली कल्पनाशक्ती पणाला लावून वर्णनं करतात, पोवाडे रचतात. हे वाङमय रंजक असतं, स्फूर्ती आणि प्रेरणा देणारं असतं. त्यामुळं त्याच्या खऱ्या खोट्याची शहानिशा कधी होत नसते.

सायमन बोलीव्हर

सायमन बोलीव्हर

वॉशिंग्टन बद्दल त्यांचे समकालीन सांगत की वॉशिंग्टन हा अगदी सर्वसाधारण माणूस होता. लोकांनी त्यांना देवपण बहाल केलं. ती लोकांची गरज होती. माणसं गाजणं, ती देव होणं, ती महान होणं ही इतरांची गरज असते मग तो माणूस कसाही असो.

नेपोलियन बुटका होता, वीर वगैरे वाटावा असा नव्हता. घोड्यावरून जाताना त्याची तारांबळ उडत असे, तो लडखडत खाली पडत असे. पण त्याची चित्रं मात्र शाब्बास नेपोलियन, मोठ्ठ्या घोड्यावर ऐटीत सवार झालेला सेनानी अशा रुपात भितीवर टांगली गेलीत.

वॉशिंग्टन, नेपोलियन, बोलिवार यांनी कामगिऱ्या तर केल्याच, त्यात शंकाच नाही. पण माणसांना वाटतं की कामगिऱ्या करणारी माणसं थोरच असली पाहिजेत. म्हणजे सर्वसाधारण माणूस मोठी कामं करत असतो हे लोकांना पचनी पडत नाही. जॉन एफ केनेडी हेही अनेक गुण असणारे पण सर्वसाधारण गृहस्थ होते. पण त्यांचं दिसणं, त्यांचं बोलणं या गोष्टी रंगवून त्यांना एक वलयी माणूस रंगवण्यात आलं.

रंगवणं, वर्णन या गोष्टीचा विचार या पुस्तकात आहे.

शेक्सपियरनं ज्युलियस सीझर नाटकात चितारला. सीझरला तो अगदी सामान्य आणि दुर्गुणीही आहे असं  कॅसियस सांगतो. पण कॅसियसचे आरोपही शेक्सपियर अशा भाषेत चितारतो की त्यातून सीझरची एक भव्य प्रतिमा उभी रहाते.

साहित्यिक कसब असणारी, पेपरात रंगकाम करण्याचं कसब असणारी अनेक माणसं  नेपोलियन आणि वॉशिंग्टन यांच्या भोवती होती. त्यांनीच वॉशिंग्टन आणि नेपोलियनची चरित्रं तयार केली.

लेखकाचा एक मुद्दा असा की वॉशिंग्टन इत्यादींच्या काळात जलद छपाई आणि जलद बातम्या पाठवण्याचं तंत्रं तयार झालं होतं, रेल्वेमुळं जगभर पेपर, पत्रकं इत्यादी पसरवण्याची सोय झाली होती. रंगीत चित्रंही छापली जाऊ लागली होती. एके काळी पेंटिंग एवढं एकच दृश्य रूप होतं आणि ते फक्त मोजक्या लोकांच्या घरात असे. पेपर आणि पँफ्लेट्समधे छापली जाणारी रंगीत चित्रं जनसामान्यांना विपुलतेनं उपलब्ध झाली होती. लेखकाचं म्हणणं आहे की माध्यमांमधे झालेल्या सुधारणांमुळं वलयं तयार करणं शक्य झालं.

जॉर्ज वॉशिंग्टन

जॉर्ज वॉशिंग्टन

वॉशिंग्टन, नेपोलियन ही माणसं वलयी झाली तो काळ वैचारिक मंथनाचा होता. लोकशाही आकार घेत होती. लोकसभा आणि निवडून आलेली माणसं देशाचा कारभार हाकू लागली होती. सैन्याच्या हालचालीही एखादा अधिकारी ठरवत नव्हता, एक सरकारच त्यात गुंतलेलं असे. एखाद्या थोर माणसाच्या हातून  देश घडणं ही गोष्ट अठराव्या, एकोणिसाव्या शतकात कालबाह्य होत असतानाच वरील व्यक्ती वलयी झाल्या, हे पहाण्यासारखं आहे.

लेखकाच्या मते ही घटना घडण्याचं एक कारण पक्ष पद्धती तयार होणं ही आहे. वॉशिंग्टन यांनी संघटित राजकीय पक्ष जन्माला घातला होता. त्या आधी लोकसभा असत, लोकसभेत नेते भाषणं करत असत, त्यावर चर्चा-टीका होत असे. पण संघटित राजकीय पक्ष नव्हता.

संघटित राजकीय पक्ष झाल्यावर नेत्याचं व्यक्तिमत्व, त्याचा विचार जोरजोरात मांडणारी माणसं तयार झाली. ही माणसं आणि संघटनेचा कुशलतेनं वापर करण्याचाच काय तो प्रश्न होता. सर्वांनाच ते जमतं अशातला भाग नाही. पण ज्यांना ते जमतं ते लोकशाही वगैरे धाब्यावर बसवून वलयी होतात, राजा होतात.

हिटलर आणि मुसोलिनी प्रसिद्धीचं तंत्र वापरून नेते झाले, सर्व सत्ता त्यांनी हातात घेतली. प्रसिद्धी तंत्रं वापरून त्यांनी जनतेला ध्येयं दिली आणि आणि ती ध्येयं आपणच गाठू शकतो हे त्यांनी लोकांना पटवलं.

अशी अवास्तव मोठी होणारी, मोठी केली जाणारी व्यक्तिमत्व शेवटी लोकशाही आणि समाजाला खड्यात घालत असतात याकडं लेखक लक्ष वेधतो.

पुस्तक वाचत असताना सतत ट्रंप यांची आठवण होत रहाते.

Men on Horseback: The Power of Charisma in the Age of Revolution
David A. Bell
Farrar, Straus and Giroux, 335 pp., $30.00

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0