गोडसे समर्थक कार्यकर्त्याचा काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश

गोडसे समर्थक कार्यकर्त्याचा काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश

नवी दिल्ली: महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे गेली काही वर्षे निष्ठावंत अनुयायी झालेले बाबुलाल चौरसिया यांनी गुरुवारी पुन्हा काँग्रेसम

गेहलोत सरकारला जोशी मदत करतील का?
काँग्रेस-पायलट गटांत तोडगा
वंचितांची काँग्रेस आणि काँग्रेसमधले वंचित

नवी दिल्ली: महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे गेली काही वर्षे निष्ठावंत अनुयायी झालेले बाबुलाल चौरसिया यांनी गुरुवारी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यापूर्वी गोडसेचे “मंदिर” बांधण्यात चौरसिया यांनी सक्रिय सहभाग घेतला होता तसेच गोडसेच्या विचारांचा प्रचारही ते करत होते. माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांच्यासह काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत चौरसिया यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

हिंदू महासभेच्या माजी नेत्याला काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आल्यामुळे भाजप व अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी तर काँग्रेसवर टीकेची झोड उठवलीच आहे, शिवाय, काँग्रेसमध्येही यावरून दोन गट पडले आहेत.

चौरसिया यांनी २०१४ मध्ये महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे काँग्रेस सोडून हिंदू महासभेत प्रवेश केला होता. ते हिंदू महासभेतर्फे निवडणूक लढवून नगरसेवक झाले होते. मात्र, आता आपले हृदयपरिवर्तन झाल्याचा दावा त्यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करताना केला आहे. आपण २२व्या वर्षापासून काँग्रेस कार्यकर्ते असल्याने हे आपल्या “पूर्वीच्या कुटुंबात” परतण्यासारखे आहे असेही ते म्हणाले.

हिंदू महासभेत गेल्यानंतर काही काळातच हृदयात कडवटपणा निर्माण झाल्यामुळे काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय मी घेतला. वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, तर मी काँग्रेसमध्ये का परतू शकत नाही,” असे चौरसिया म्हणाले.

२०१७ मध्ये हिंदू महासभेने गोडसेचे “मंदिर” उभारण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचा चौरसिया भाग होते. प्रशासनाने मंदिरासाठी परवानगी नाकारल्यानंतर गोडसेचा अर्धपुतळा उभारला. काँग्रेसने जोरदार विरोध केल्यानंतर हा पुतळा नंतर हटवण्यात आला.

गोडसेने न्यायालयात केलेले भाषण एक लाख लोकांपर्यंत पोहोचव्याचा निर्धारही चौरसिया यांनी २०१९ मध्ये व्यक्त केला होता.

एखाद्याला चूक उमगली तर त्याचे पक्षात स्वागतच आहे. मोदी यांना उद्या काँग्रेसमध्ये यावेसे वाटले तरी ते येऊ शकतात, अशा शब्दांत कमल नाथ यांनी चौरसियांच्या काँग्रेस प्रवेशाचे समर्थन केले. ज्यांचे आयुष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला शिव्या देण्यात गेले असे अनेक जण आज भाजप सरकारमध्ये आहेत, असेही नाथ म्हणाले. पापाचा द्वेष करा, पाप्याचा नकोया महात्मा गांधींच्या वचनाचा संदर्भ घेत काँग्रेस प्रवक्ते भुपेंद्र गुप्ता यांनीही चौरसिया यांच्या प्रवेशाचे समर्थन केले. राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्यांना राहुल यांनी क्षमा केली ती याच विचारातून असे ते म्हणाले.

अर्थात काँग्रेसच्या काही नेत्यांना हा निर्णय पटलेला नाही व त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

चौरसियांना काँग्रेसने पुन्हा घेतले याचा अर्थ पक्षाला निष्ठावंत कार्यकर्त्यांची खूपच वानवा भासत आहे, अशा शब्दांत हिंदू महासभेचे उपाध्यक्ष जयवीर भारद्वाज यांनी काँग्रेसवर टीका केली. चौरसिया दोन वर्षांपासून नाराज होते हे खरे नसून, गेल्याच महिन्यात झालेल्या हिंदू महासभेच्या कार्यक्रमात ते उत्साहाने सहभागी झाले होते, असेही भारद्वाज म्हणाले.

ग्वाल्हेर-चंबळ भागातून अस्तित्व पुसले गेल्याने काँग्रेस घायकुतीला आली आहे व असे निर्णय घेत आहे, असे मत भाजप प्रवक्ते राहुल कोठारी यांनी व्यक्त केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0