अहमदाबाद पिंक बॉल कसोटी काही गोष्टीसाठी सदैव लक्षात राहील. कसोटी क्रिकेटची खेळपट्टी ५ दिवस टिकणारी असावी. टी ट्वेण्टी आणि एक दिवसीय सामन्यांमुळे फलंदाजीच्या तंत्रात खूप फरक झाला आहे. संयम कमी होतो आहे. कसोटीत एका दिवसात धावा काढण्याचा वेग वाढतो आहे. अर्थात अहमदाबाद कसोटी त्याला अपवाद होती. इंग्लिश खेळाडूंनी जरी त्यांचे मत प्रदर्शित केले नसले तरी त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती.
अहमदाबादच्या जुन्या मोटेरा स्टेडियमचे नूतनीकरण झाल्यावर त्याचे नामकरण नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम करण्यात आले आणि मैदानावर इंग्लंड-भारत मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळला गेला. ही कसोटी अनपेक्षित अशी झाली.
भारताने सुंदरला कुलदीपच्या जागी संधी दिली. इंग्लंडने संघात चार बदल केले. अँडरसन, आर्चर, बेस्ट्रो आणि क्रॉली यांना संधी देण्यात आली. इंग्लंडने द्रुतगती आक्रमणावर विश्वास दाखविला तर भारताने फिरकीवर.
रुटने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. अहमदाबादची खेळपट्टी काय रंग दाखवील याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. इशांतने सिबलीला शून्यावर बाद करून आपली शंभरावी कसोटी साजरी केली. खेळपट्टी द्रुतगती गोलंदाजीला साथ देईल असे वाटते न वाटते तोच अक्षरने पहिल्याच चेंडूवर बेस्ट्रोला शून्यावर पायचीत करून धमाल उडवून दिली. त्यानंतर पहिला दिवस गाजविला तो अक्षर आणि आश्विनने. सुंदरला गोलंदाजी टाकण्याची संधीही मिळाली नाही. इंग्लंडचा पहिला डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. अक्षरने ३८ धावात ६ गडी बाद केले. आश्विनने ३ गडी बाद केले. दोन भारतीय फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडचा पहिला डाव केवळ ११२ धावात गुंडाळला. क्राॅलीचे अर्धशतक आणि रुटचा बचाव जर सोडला तर इंग्लंडचा कोणीही फलंदाज अक्षर आणि आश्विन समोर टिकू शकला नाही. आश्चर्य म्हणजे अहमदाबादची खेळपट्टी पहिल्या दिवशी कसोटीच्या चौथ्या पाचव्या दिवसासारखी फिरत घेऊ लागली. त्यामुळे कसोटी लवकर संपणार असे लक्षण दिसू लागले. भारत पहिल्या डावात कशी फलंदाजी करतो आणि इंग्लंडवर जास्तीत जास्त आघाडी घेऊ शकेल काय? हा महत्त्वाचा प्रश्न होता. रोहितने डावाची सुरुवात चांगली केली. गिलचा अवसानघातकी फटका, पुजारा शून्यावर बाद होणे यामुळे भारताचा डाव इंग्लंड सारखाच कोसळतो की काय, असे वाटू लागताच रोहितने विराट सोबत अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरला. दिवसअखेर कोहलीला गमावून भारताने ३ गडी बाद ९९ धावा केल्या. भारताकडे ९ फलंदाज असल्यामुळे भारताला बऱ्यापैकी आघाडी मिळेल असे वाटत होते. पण रूट आणि लिचच्या मनांत वेगळेच विचार होते. रोहितने ६६ धावा केल्या. पण तो बाद झाल्यावर रूट (८ धावात ५ गडी) आणि लिच (५४ धावात ४ गडी) यांनी भारताचा डाव १४५ धावात गुंडाळला. खेळपट्टी अधिकच खराब होत होती. केवळ ३३ धावांची आघाडी मिळाल्याने इंग्लंडचा डाव लवकर संपुष्टात येणे जरुरी होते.
फिरून एकदा भारताच्या गोलंदाजांनी कमाल केली. इंग्लंडचा डाव नाममात्र ८१ धावात संपवून जिंकण्यासाठी केवळ ४९ धावांचे लक्ष मिळविले. अक्षरने परत एकदा इंग्लंडचे ५ गडी बाद केले. आश्विनने ४ गडी बाद करत ७७ कसोटीत ४०० बळीचा विक्रम प्रस्थापित केला. दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्राच्या २ षटके आधी भारताचा दुसरा डाव सुरू झाला. रोहित आणि गिलने औपचारिकता पूर्ण करत भारताने १० विकेटने सामना जिंकला आणि मालिकेत २/१ ने आघाडी मिळवली.
खरंतर अहमदाबादची पिंक बॉल कसोटी बऱ्याच गोष्टीमुळे गाजली.
१. भारतातील दुसरी पिंक बॉल टेस्ट. दोन्हीत भारत विजयी.
२. दोन दिवसात संपलेली क्रिकेट जगतातील २२ कसोटी. भारताची दुसरी.
३. भारतीय द्रुतगती गोलंदाज इशांतची १०० वी कसोटी. कपिल देव नंतर इशांत दुसरा द्रुतगती गोलंदाज ज्याने १०० कसोटी खेळल्या.
४. पहिल्या २ कसोटीत ३ डावात ५ किंवा ५ पेक्षा जास्त गडी बाद करणारा अक्षर भारताचा तिसरा गोलंदाज. पहिले २ गोलंदाज मोहम्मद निसार आणि नरेंद्र हिरवाणी.
५. इंग्लंडचा डावातील ८१ धावा हा भारताविरुद्धचा नीचांक.
कसोटी क्रिकेटमध्ये दिवसागणिक विक्रम होत असतात आणि होतही राहतील. पण अहमदाबाद पिंक बॉल कसोटी काही गोष्टीसाठी सदैव लक्षात राहील. सर्वप्रथम अहमदाबादची खेळपट्टी. कसोटी क्रिकेटची खेळपट्टी ५ दिवस टिकणारी असावी. टी ट्वेण्टी आणि एक दिवसीय सामन्यांमुळे फलंदाजीच्या तंत्रात खूप फरक झाला आहे. संयम कमी होतो आहे. कसोटीत एका दिवसात धावा काढण्याचा वेग वाढतो आहे. अर्थात अहमदाबाद कसोटी त्याला अपवाद होती. इंग्लिश खेळाडूंनी जरी त्यांचे मत प्रदर्शित केले नसले तरी त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. भारत जिंकल्यामुळे रसिकांना आनंद होणे साहजिक आहे. पण क्रिकेटसाठी अशी खेळपट्टी योग्य नक्कीच नाही. दुर्दैवाने क्रॉली, रोहित आणि काही अंशी रूट आणि विराट सोडले तर कोणीही खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत. अशा खेळपट्टीवर खेळण्याचे तंत्र, संयम आणि आक्रमकता दिसून आली नाही. Aggression is the best form of defence. कुठल्याही फलंदाजाने या उक्तीचा उपयोग केला नाही. सर्वच फलंदाज आपल्या क्रिजमध्ये राहूनच खेळले. दोन्हीही चमू मोठ्या खेळी करू शकल्या नाहीत. भारताची फिरकी गोलंदाजी निश्चितच उजवी होती. इंग्लंडने एकच फिरकी गोलंदाज घेऊन खेळणे आत्मघातकी ठरले. रूट सारखा कधीतरी गोलंदाजी करणारा गोलंदाज ५ गडी बाद करू शकला. आणखी एखादा नियमित फिरकी गोलंदाज जर असता तर त्याने भारताचा पहिला डाव लवकर संपुष्टात आणला असता. दोन्ही चमूचे पाचही द्रुतगती गोलंदाज केवळ बघ्याची भूमिका निभावत होते. यावर निश्चित विचार व्हायला हवा. खेळपट्टीने फलंदाजी, द्रुतगती आणि फिरकी गोलंदाजीला समसमान संधी द्यायला हवी. अन्यथा कसोटी सामने एकतर्फी आणि निरस होतील.
जागतिक क्रिकेट कसोटी स्पर्धेत पोहचण्यासाठी भारताला चौथी कसोटी जिंकावी लागेल किंवा अनिर्णित राखावी लागेल. अन्यथा भारताचे आव्हान संपुष्टात येईल.
COMMENTS