पिस्तुल बिघडली; अन् वेळेचे गणित कोलमडले!

पिस्तुल बिघडली; अन् वेळेचे गणित कोलमडले!

महिलांच्या १० मीटर्स एअर पिस्तुल स्पर्धेत मनू भाकरच्या पिस्तुलचे गिअर तुटले. ते पिस्तुल पूर्ववत करण्यासाठी तब्बल ६ मिनिटे लागली. या ६ मिनिटांची किंमत भारताला मोठ्या प्रमाणात मोजावी लागली.

पारदर्शकता व उत्तरदायित्वाच्या प्रवासातील अस्थिरता
मार्च २०२३ मधील महागाईची झळ सोसण्यासाठी आपण सज्ज आहोत का?
राजस्थानः बलात्कार प्रकरणी काँग्रेस आमदाराच्या मुलाविरोधात गुन्हा

वेळेचे महत्त्व सगळीकडे आहे. ऑलिम्पिकसारख्या खेळांमध्ये तर वेळेचे बंधन पाळावेच लागते. मात्र कधी कधी वेळेच्या बंधनाचा मुद्दा खेळाडूच्या मुळावर येऊ शकतो. परीक्षेत जसा वेळ कमी उरतो आणि प्रश्न जास्त उरलेले असतात; अशा वेळी दडपण पेपर लिहिताना अधिक येते. रविवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची पदकाची आशास्थान असलेल्या मनू भाकरच्या बाबतीत अगदी तसेच घडले. महिलांच्या १० मीटर्स एअर पिस्तुल स्पर्धेत मनू भाकरच्या पिस्तुलचे गिअर तुटले. ते पिस्तुल पूर्ववत करण्यासाठी तब्बल मिनिटे लागली. या मिनिटांची किंमत भारताला मोठ्या प्रमाणात मोजावी लागली. ७५ मिनिटांमध्ये ६० वेळा लक्ष्य साधायचे असते. त्या ७५ मिनिटांचा वापर तुम्हाला योजनाबद्ध रितीने करावा लागतो. प्रारंभी सावध करून चांगली सुरुवात करायची असते. कारण शूटिंग या खेळात ‘‘वेल बिगिनींग इज हाफ द बॅटल’’ असं म्हणतात. त्यामुळे नेमबाज सुरुवातीला लक्ष्य साधताना घाई करीत नाहीत. स्थिरावण्यासाठी बराच वेळ घेतात. पण एकदा का लक्ष्य अचूक लागायला लागले की मग वेग वाढवितात. मनू भाकरने पहिल्या राऊंडमध्ये ९८ गुण घेऊन चांगली सुरुवात केली होती. सीरिजमध्ये १६व्या लक्षाला तीची गुणसंख्या १५६ होती.

ही पोझिशन उत्तम होती. पदकाकडे नेणारी होती. पण त्याचवेळी तिच्या पिस्तुलमध्ये बिघाड झाला. तिच्या पिस्तुलचा लिव्हर तुटला. ज्यामध्ये ‘पॅलेट’ टाकायचे असतात. जेव्हा तेच तुटले तेव्हा मनू भाकरने प्रशिक्षक रौनक पंडित यांना ही बाब सांगितली. दोघांनी मग ज्युरींच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली. ज्युरींनी पिस्तुल तपासले. त्यांनी निर्णय दिला की तुम्ही क्रीडासाहित्य ठेवण्याची जागा आहे तेथे जाऊन नवीन पिस्तुल तपासणी करून वापरू शकता किंवा तुटलेल्या लिव्हरच्या जागी दुसरा भाग (लिव्हर) लावू शकता. त्यात २ मिनिटे वाया गेली. त्यानंतर प्रशिक्षक रौनक पंडित, मनू भाकर आणि ज्युरी इन्स्पेक्शन रूममध्ये गेले, त्यांच्या सोबत पाहणी करून लिव्हर बदलण्याचा निर्णय घेतला. त्या प्रक्रियेला सुमारे ६ मिनिटे लागली. म्हणजे तुमच्या वाट्याला आलेल्या वेळेपैकी जवळजवळ १० टक्के हा वेळ वाया गेला. जो एकाग्रता, डावपेच आखण्यासाठी, मन:शांतीसाठी, नेमबाज वापरत असतात.

उलट त्या वाया गेलेल्या वेळेचे दडपण मनू भाकरवर आले. तरीही तिने नंतरच्या चार लक्ष्यांमध्ये १०-१० गुण नोंदविले व फॉर्म परत मिळविला.

समस्या त्यानंतर निर्माण झाली. जसजसा वेळ जात होता तसतसे अधिक दडपण मनू भाकरवर येत होते. शेवटच्या चार लक्ष्यांसाठी तिच्याकडे फक्त मिनिटांचा अवधीच शिल्लक होता. ते दडपण अधिक होतं. तरीही तिने त्यातून मार्ग काढला. अखेरचे लक्ष्य तिचे ८ गुणांचे झाले. अखेरच्या फेरीत मनू भाकरने ८व्या क्रमांकावर असलेल्या स्पर्धकापेक्षा अधिक १० गुण नोंदविले होते. त्यामुळे अंतिम फेरीसाठी पात्र होण्यासाठी मनू भाकरला फक्त १० गुणांचे अंतिम लक्ष्य नोंदवायचे होते.

पण रविवारचा दिवस मनू भाकरचा नव्हता. पिस्तुलाने दगा दिला तो क्षण आणि अंतिम लक्ष्याचा क्षण, दोन्ही तिच्याविरुद्ध गेले. १० ऐवजी ८ गुण नोंदविले गेले. अवघ्या दोन गुणांनी तिची अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी हुकली.

यावेळी आठवण येते अभिनव बिंद्राची. नेमक्या अशाच परिस्थितीत तो बीजिंग ऑलिम्पिक पात्रता फेरीत सापडला होता. अंतिम फेरीसाठी अवघा एक गुण जास्त घेऊन तो पात्र ठरला होता. आणि त्यानंतर अंतिम फेरीत त्याने भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचा पराक्रम केला होता.

मनू भाकरचे खरे तर कौतुक व्हायला पाहिजे. दुर्दैव आड आले नसते तर कदाचित तिनेही बिंद्रासारखा पराक्रम केला असता. पिस्तुल खराब झाल्यानंतरही तिने सलग १०-१० गुण नोंदविले. त्या जिद्दीलाही आपण सलाम केला पाहिजे.

या बाबत माजी नेमबाज आणि प्रशिक्षक यांच्याशी बातचीत केल्यानंतर एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे, शूटिंगच्या या खेळात असे अनपेक्षित अपघात होत असतात. मनू भाकरच्या दुर्दैवाने ऐन ऑलिम्पिकमध्ये हा अपघात घडला. या गोष्टी सर्वच नेमबाजांनी गृहित धरलेल्या असतात. त्यासाठी त्यांची मानसिकदृष्ट्या तयारीही असते. मात्र वेळेचे बंधन हे अधिक दडपण आणणारे असते हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. वेळेचे नियोजन हे सर्वच क्षेत्रात महत्त्वाचे आहे; तसे शूटिंग आणि अन्य खेळातही. दिलेला वेळ जर वाया गेला तर तुमचे मानसिक संतुलन हळुहळू बिघडायला लागते. क्षुल्लक चुका व्हायला लागतात. १० चे हमखास लक्ष्य साधणारेही ऐन मोक्याच्या क्षणी चुकतात. मनू भाकरचेही आज तेच झाले. गुणवत्ता फिकी पडते आणि त्या गुणवत्तेला काळजी पोखरते. ऑलिम्पिकमधील प्रत्येक खेळासाठी वेळेचे बंधन आहे. ते बंधन पाळणारे चुका करत नाही, पदकांपर्यंत पोहोचतात.

विनायक दळवी, हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार असून अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे त्यांनी वार्तांकन केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0