नवी दिल्ली : कोरोना विषाणू तपासणीसाठी चीनच्या गुआंग्झू वोंडफो बायोटेक व झुहाई लिवझोन डायग्नोस्टिक्स या कंपन्यांकडून खरेदी केलेले रॅपिड अँटिबॉडी टेस्ट
नवी दिल्ली : कोरोना विषाणू तपासणीसाठी चीनच्या गुआंग्झू वोंडफो बायोटेक व झुहाई लिवझोन डायग्नोस्टिक्स या कंपन्यांकडून खरेदी केलेले रॅपिड अँटिबॉडी टेस्ट कीट कोणत्याही राज्यांनी वापरू नयेत असे स्पष्ट निर्देश इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने जारी केले आहेत. हे सर्व कीट दोन्ही चिनी कंपन्यांना परत पाठवून द्यावेत असेही आयसीएमआरने आपल्या पत्रकात म्हटले आहे. चिनी कंपन्यांच्या कीटमधून आलेल्या चाचण्या दोषपूर्ण होत्या असे आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे देखरेखीखाली असलेले व हॉटस्पॉट जाहीर केलेले कोरोना बाधित भागांमध्ये आता या चिनी कीटचा वापर केला जाणार नाही. त्यामुळे आता केवळ आरटी-पीसीआर चाचणीच शिल्लक राहिली असून त्याद्वारे कोरोना विषाणू बाधित कळणार आहेत.
दरम्यान, आयसीएमआरच्या निर्देशानंतर चीनने हा मुद्दा भारत सरकार योग्य रितीने हाताळेल असे म्हटले आहे. चीनचे भारतातील प्रवक्ते जी रोंग यांनी चीनकडून निर्यात केल्या जाणार्या सर्व उपकरणांची गुणवत्ता तपासली जाते व सरकार त्याला महत्त्व देते अशी प्रतिक्रिया दिली आहे. चीनच्या उत्पादनांना वाईट म्हणणे व हा पूर्वग्रह पसरवणे हा बेजबाबदारपणा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दोन आठवड्यापूर्वीच भारताने या दोन चिनी कंपन्यांकडून सुमारे ५ लाख अँटिबॉडी कीट घाईघाईने मागवले होते व त्यांचे राज्यांना वाटप केले होते. त्या दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रॅपिड टेस्ट कीटच्या आयातीत काही लोकांनी मध्यस्थ म्हणून आर्थिक लाभ मिळवल्याचा आरोप केला होता.
COMMENTS