मुंबई: कोयना धरणाच्या पट्ट्यातील भूस्खलनग्रस्त मीरगाव, आंबेघर, हुम्बराळे गावातील ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन सध्या जलसंपदा विभागाच्या क्वार्टर्समध
मुंबई: कोयना धरणाच्या पट्ट्यातील भूस्खलनग्रस्त मीरगाव, आंबेघर, हुम्बराळे गावातील ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन सध्या जलसंपदा विभागाच्या क्वार्टर्समध्ये करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक प्रशासनाला दिले. मंगळवारी त्यांनी स्वतः जाऊन या जलसंपदा विभागाच्या निवासी वसाहतींची पाहणी केली. त्यानंतर त्यानी या वसाहतींची डागडुजीचे काम वेगाने पूर्ण करून त्यात या १५० कुटुंबांचे स्थलांतर करण्याचे निर्देश दिले.
गेल्या काही दिवसात राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील कोयनानगर परिसराला देखील बसलेला होता. यात या परिसरातील मीरगाव, आंबेघर, हुम्बराळे गावात भूस्खलनात ३० जणांना आपला जीव गमवावा लागला होता. नगरविकास मंत्र्यांनी तातडीने इथे येऊन मीरगाव आणि हुम्बराळे या गावांना भेटी देऊन येथील परिस्थितीची पाहणी केली. या गावकऱ्यांचे एमटीडीसीच्या पर्यटन रिसॉर्ट आणि कोयनानगर जिल्हापरिषद शाळेत तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे.
शिंदे यांनी या ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. या कठीण प्रसंगात शासन पूर्णपणे तुमच्यासोबत असून तुमच्या पुनर्वसनाबाबत लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढू अशी ग्वाही त्यानी यावेळी दिली. त्यासोबतच या ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तू, चादरी, कपडे, सतरंज्या, चटया, छत्र्या अशी मदत दिली. यासोबतच शासनाची मदत देखील तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवली जाईल असेही सांगितले.
यानंतर या ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन जलसंपदा विभागाच्या वसाहतीत करण्याचा पर्याय पुढे आला. कोयनानगर परिसरातील या वसाहती कोयना धरण बांधताना उभारण्यात आल्या होत्या. या वसाहतींची डागडुजी केल्यास तो पुनर्वसनासाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल यावर एकमत झाल्याने त्यांनी तातडीने हे डागडुजीचे काम हाती घेण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच या भूस्खलनग्रस्त गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी बृहद आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याने ते देखील लवकरच करू असे ग्रामस्थांशी बोलताना स्पष्ट केले.
COMMENTS