काँग्रेसला बूस्टर डोस

काँग्रेसला बूस्टर डोस

सध्याच्या काँग्रेस पक्षात वैचारिक ठामपणा असलेले नेते अभावाने आढळतात, त्याला कन्हैय्या आणि जिग्नेश अपवाद ठरताना दिसले. या दोघांनी एकत्रित काँग्रेसप्रवेश करण्याचा एक अर्थ असा की, राहुल यांना ज्या पद्धतीने काँग्रेसचे राजकारण करायचे आहे, त्या प्रवासात हे दोघे जण यापुढे त्यांचे सहाध्यायी म्हणून कार्यरत राहतील.

जेएनयूतील सर्व्हरची तोडफोड मुलांनी केलीच नव्हती
आसाममधील भाजप नेत्यावरही फेसबुकची कृपा
मोफत लसीकरणाचा गोंधळात गोंधळ

२०१९च्या लोकसभा निवडणुकांत दारुण पराभव पत्करल्यानंतर पराभवाची जबाबदारी स्वीकारत तत्कालिन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. राहुल गांधी यांचा राजीनामा अशा काळात आला ज्यावेळी काँग्रेसमधील ज्येष्ठ धुरिणांना पक्षाच्या पराभवाचे गांभीर्य कळालेले नव्हते. देशातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, प्रादेशिक पातळीवरील बड्या नेत्यांना आपल्या पायाखालची वाळू सरकली असल्याची जाणीवही झालेली दिसत नव्हती. पक्षात पराभवाची मीमांसा व्हावी, स्पष्ट चर्चा व्हाव्यात असा आग्रहही दिसत नव्हता. ही पार्श्वभूमी पाहत राहुल गांधी यांनी आपल्या राजीनाम्याच्या पत्रात अत्यंत निराशेने पक्षातील ज्येष्ठांनी पराभवाचे अवलोकन करावे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मत्सरयुक्त, विखारयुक्त विचारधारा ज्या वेगाने समाजाच्या सर्व थरात मुरली आहे, त्याचा अंदाज घ्यावा असे सुनावले. मोदींचा भ्रष्टाचार, त्यांचे अर्थव्यवस्थेला पूर्ण डबघाईला आणणारे निर्णय, देशातील न्यायालयांपासून सर्व सरकारी यंत्रणांवर संघ परिवार व पीएमओचे असलेले नियंत्रण आदी घटना समजून घ्याव्या अशी कळकळीची त्यांची विनंती होती. आपल्या देशातील लोकशाही संस्था व राज्यघटनेच्या मूलभूत ढाच्यावर संघ परिवार, मोदी सरकारकडून सततचे होणारे हल्ले याने देशाची एकात्मता, सलोखा, सामंजस्य, परंपरा, इतिहास यांचा विध्वंस होत चालल्याची खंत राहुल गांधी यांच्या पत्रात स्पष्ट दिसत होती. थोडक्यात काँग्रेस राजकीय व संघटनात्मकदृष्ट्या विकलांग झाल्यानंतर देशाची वाटचाल विध्वंसाकडे जात असल्याचा त्यांचा इशारा होता.

गेल्या मंगळवारी कन्हैय्या कुमार व जिन्गेश मेवानी यांनी काँग्रेस प्रवेशावेळी व्यक्त केलेल्या मनोगतात राहुल गांधी यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी व्यक्त केलेलेच मुद्दे होते. हे दोघे काँग्रेसेतर नेते आहेत. पण या दोघांनी पत्रकार परिषदेत व नंतर प्रसार माध्यमांना मुलाखती देत आपल्या काँग्रेस प्रवेशाबद्दल थेट भूमिका प्रकट करत आपली राजकीय परिपक्वता दाखवून दिली. या दोन युवा नेत्यांचा काँग्रेस प्रवेश हा पक्षासाठी यासाठी महत्त्वाचा ठरतोय की, सध्या काँग्रेसचे बडे, मुरलेले नेते पक्षात कुरघोडीचे राजकारण करण्यात मश्गुल आहेत. राजकारणात समोरचा शत्रू स्पष्ट दिसत असताना काही नेते भाजपशी सबुरीने घेताना दिसत आहेत. भाजपच्या कडव्या हिंदुत्ववादी प्रचाराला, सेक्युलरवादाला कायमस्वरुपी गाडण्याच्या प्रयत्नाला थोडासाही विरोध करण्याची हिंमत या नेत्यांकडून दिसत नसताना कन्हैय्या व जिग्नेश यांनी मात्र पदार्पणातच आपला संघर्ष संघपरिवार, मोदी-शहा जोडगोळीच्या विरोधात असल्याचे स्पष्ट करून ढुढ्ढाचार्य काँग्रेसजनांची जिरवली.

सध्याच्या काँग्रेस पक्षात वैचारिक ठामपणा असलेले नेते अभावाने आढळतात, त्याला हे दोघे अपवाद ठरताना दिसले. काँग्रेसच्या अशा कठीण परिस्थितीत या दोघांनी एकत्रित काँग्रेसप्रवेश करण्याचा एक अर्थ असा की, राहुल गांधी यांना ज्या पद्धतीने काँग्रेसचे राजकारण करायचे आहे, त्या प्रवासात हे दोघे जण यापुढे त्यांचे सहाध्यायी म्हणून कार्यरत राहतील.

‘काँग्रेस वाचली नाही तर देश वाचणार नाही. देशामध्ये वैचारिक संघर्ष केवळ काँग्रेसचे नेतृत्वच देऊ शकते’, असे कन्हैय्याने पत्रकार परिषदेत म्हटले. देशातील सत्तेतील लोकांकडून देशाची चिंतन परंपरा, संस्कृती, मूल्ये, इतिहास व वर्तमान नष्ट केला जात असून काँग्रेस देशातील सर्वात जुना व लोकशाही पक्ष आहे आहे. हा पक्ष वाचला नाही तर देश वाचणार नाही. आज देशाला भगत सिंग यांचे साहस, आंबेडकरांची समता व गांधींची एकता गरजेची आहे’, असे विधान त्याने केले. राजकीय प्रतिकांची लढाई ज्या पद्धतीने भाजप खेळत आली आहे, त्याला प्रत्युत्तर देण्याचा कन्हैयाचा प्रयत्न दिसून आला.

जिग्नेशने देशापुढची परिस्थिती मांडताना नेमक्या वर्मावर बोट ठेवले. मोदींचे थेट नाव न घेता गुजरातमधून हा सगळा प्रवास सुरू झाला आणि गेली ६-७ वर्षे त्याने देशात उत्पात माजवल्याचा आरोप जिग्नेशचा होता. देश अभूतपूर्व अशा संकटामध्ये सापडला असून आपल्या राज्यघटनेवर हल्ले केले जात आहेत. दिल्लीच्या रस्त्यांवर राज्यघटनेची होळी केली जात आहे. एक भाऊ दुसर्याचा शत्रू झाला इतके विष देशात ओतले गेले. हा सर्व सुनियोजित कट असून दिल्ली व नागपूरकडून तो पसरवला जात असल्याची जिग्नेशची थेट भूमिका काँग्रेससाठी आवश्यक होती. ती या निमित्ताने दिसून आली.

अनेक वर्षांनंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करताना एखाद्या नेत्याकडून देशात नेमके काय चाललंय याचं आकलन मांडले गेले आहे. हा स्वतःला काँग्रेसी म्हणवणार्यांना धक्काच आहे. तसेही काँग्रेसची परंपरा प्रतिस्पर्ध्यावर थेट शरसंधान करण्याची नाही की दुसर्याची प्रतिमा मलिन करण्याची नाही. आक्रमक राजकारणापासून काँग्रेसने स्वतःला कायम दूर ठेवले आहे. या पक्षातील महत्त्वाकांक्षी नेत्यांनी सत्ता गेल्यानंतर भाजपशी आतून, बाहेरून हातमिळवणी केली. ईडी, प्राप्तीकर खात्याच्या कारवाईला घाबरून भाजपमध्ये लगेच उड्या मारल्या. एवढेच नव्हे जनतेने निवडून दिलेले सरकारही पाडण्याच्या भाजपच्या कटकारस्थानात ते सामील होताना दिसले. अशा काँग्रेस पक्षाची निवड केवळ विचारधारेचे राजकारण करता यावे म्हणून कन्हैय्या व जिन्गेशने करणे हा धाडसाचा निर्णय म्हटला पाहिजे. अशा वेळी व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा नेत्यामध्ये असावी की नको या मुद्द्यावर चर्चा करण्यापेक्षा एखाद्या नेत्याने कोणत्या विचारधारेचे राजकारण कोणत्या काळात, कोणत्या सत्तेविरोधात करणे अपेक्षित आहे, याची चर्चा या घडीला सर्वात महत्त्वाची ठरते.

कन्हैयाच्या काँग्रेस प्रवेशावर डाव्यांकडून जी टीका सुरू आहे तीही विचित्र म्हटली पाहिजे. याच डाव्यांनी २००४मध्ये भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेस प्रणित यूपीए आघाडीला बाहेरून पाठिंबा दिला होता. नंतर याच डाव्या आघाडीचे नेते २०१०-११मध्ये ‘काँग्रेस हटाओ’ या (लोकपाल आंदोलन हा बनाव होता) संघ पुरस्कृत अण्णा हजारेंच्या आंदोलनात जंतर मंतरवर भाजपसोबत हातात हात घालून सामील झाले होते. हेच डावे प. बंगालमध्ये ममतांचा पराभव व्हावा म्हणून भाजपला मदत करत होते. डाव्यांना काळ व वेळेचे भान नाही. त्यांना सत्ता आकांक्षा नाही पण सत्तेशिवाय व्यवस्था बदलता येत नाही, याचेही भान नाही. त्यामुळे त्यांची कन्हैय्यावरील टीका ही हास्यास्पद ठरते.

कन्हैय्या व जिग्नेश हे दोघे अँटी इस्टॅब्लिशमेंटच्या विरोधात शड्डू ठोकत जन्माला आले आहेत. कन्हैय्याचा जेएनयू ते बेगुसराय लोकसभा निवडणुकांपर्यंतचा प्रवास व जिन्गेशचा संघपरिवाराचे हिंदुत्वाचे म्हणून ओळखल्या जाणार्या ‘गुजरात मॉडेल’विरोधातील एकाकी रस्त्यावरचा संघर्ष सर्वश्रृत आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर जेव्हा विरोधी पक्षाचे नेते सरकारविरोधात चिडीचूप होते, त्या काळात कन्हैय्याने जेएनयूत भाषण करून सरकारला शिंगावर घेतले होते. २०१४मध्ये भारतात झालेले सत्ता परिवर्तन हे नुसते एका पक्षाचे सरकार जाऊन दुसर्या सरकारचे आले एवढ्यापुरते मर्यादित नसून देशाची स्वातंत्र्योत्तर उदारमतवादी, सेक्युलरवादी, मानवतावादी, अलिप्ततावादी, पुरोगामी, परिवर्तनशील विचारधारा बदलण्याच्या संघ परिवाराच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना मिळालेले ते पहिले यश असल्याचे ठासून सांगणारा देशातील तो पहिलाच विद्यार्थी नेता होता, हे विसरता कामा नये.

कन्हैय्याची लढाई विद्यार्थी चळवळीशी निगडित होती पण ती पुढे जेएनयूत राजकीय स्वरुपाची झाली. त्या तुलनेत जिन्गेशचा राजकीय संघर्ष हा संपूर्णपणे रस्त्यावरचा आहे. २००२ च्या गुजरात दंगलीनंतर गुजरातमध्ये भाजप मजबूत होत गेली व तिने दोन दशकांहून अधिक काळ राज्यावर वर्चस्व ठेवले. त्या राज्यात जिग्नेशचा ‘एकला चलो रे’चा संघर्ष सुरू होता. राजकारणात कोणाविरोधात लढायचे आहे, याबाबतची स्पष्टता संघ परिवार व व्यक्तीशः मोदी-शहा जोडगोळीची आहे. जिग्नेशमध्येही त्याचा राजकीय संघर्ष कोणत्या विचारधारेविरोधात आहे, याबाबत स्पष्टता आहे. गुजरातमधील दलित संघर्ष यात्रेत जिन्गेशने कथित ‘गुजरात मॉडेल’मध्ये लपलेली सामाजिक विषमता देशापुढे आणली. असे सामाजिक-राजकीय अंतर्विरोध मुळापासून ओळखणारा बेडर नेता काँग्रेसला हवा होता, तो जिन्गेशच्या रुपाने मिळाला आहे, हे काँग्रेसचे यश म्हणावे लागेल.

२०१७च्या गुजरात विधानसभा निवडणुकांत कथित गुजरात मॉडेलची लक्तरे जगापुढे आणून राहुल गांधी यांनी मोदी-शहा जोडगोळीच्या राजकारणाला जबरी धक्का दिला होता. हे आव्हान पुन्हा तेवढ्याच तडफेने देण्याचा काँग्रेसचा जिग्नेशच्या माध्यमातून प्रयत्न आहे. मोदी-शहांच्या गुजरातमधील राजकारणाला खिंडारं पडतील तेवढी या दोन नेत्यांच्या जनमानसातील आभासी प्रतिमेला चिरा पडतील हे काँग्रेसला कळून चुकले आहे. ते पाहता दलित व अन्य मागास समुदायाचे राजकारण करणारा जिग्नेश व पटेल सारख्या अन्य प्रबळ जातींचे राजकारण करणारा हार्दिक पटेल ही काँग्रेसची गुजरातमधील दोन प्रमुख आयुधे असतील.

राहुल गांधी यांच्या राजकीय विचारधारेची ‘लाइन’ कन्हैय्या व जिग्नेशच्या प्रतिपादनात होती, ती महत्त्वाची आहे. राहुल गांधी सध्या काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत. पण भविष्यातही त्यांच्याकडे पक्षाची सूत्रे आली नाहीत तरी त्यांच्या राजकारणाला अव्हेरून काँग्रेस पक्षाला भाजपचा सामना करता येणार नाही, हे स्पष्ट आहे. काँग्रेसच्या इतिहासात कडवे डावे व मध्यममार्गी उजवेही काम करत होते. अजूनही काँग्रेसमध्ये मवाळ हिंदुत्ववादापासून, समाजवादी, साम्यवादी, भांडवलवादी भूमिका घेणारे नेते काम करत आहेत. पण माध्यमे कन्हैय्या व जिग्नेश काँग्रेस संस्कृतीत काम करू शकतील का असा प्रश्न लगेचच उपस्थित करू लागले आहेत.

पूर्वप्रसिद्धीः ३ ऑक्टोबर २०२१, दिव्य मराठी, रसिक पुरवणी.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0