कस्तुरबा गांधी रुग्णालयाने मुंबईच्या इतिहासात व आता वर्तमानात आघाडीवर राहून काम केलं आहे. प्रत्येक आजारात आणि साथीमध्ये या रूग्णालयाने आणि इथल्या डॉक्टरांनी हात आखडता न घेता रूग्णांचं निदान आणि उपचार केले आहेत.
चिंचपोकळी स्थानकावरून जेकब सर्कल किंवा सातरस्त्याकडे जायला निघालो की डिलाइल रोड (ना. म. जोशी मार्ग)चा सिग्नल ओलांडून पुढे जावं लागतं. उजवीकडे लगेचच जगप्रसिद्ध आर्थर रोड तुरूंग दिसतो. तिथल्या मोठ्याल्या दगडी भिंती न्याहाळत असताना आणि अबू सालेमला ठेवलेला अंडा सेल कसा असेल बरं याचा विचार करत पुढे कधी येतो तेच कळत नाही. पुढे आल्यावर उजवीकडे ओझरती पांढरी भिंत दिसते आणि त्या भिंतीवरलगतच्या प्रवेशद्वारावर कमान दिसते- कस्तुरबा गांधी रूग्णालय. एरवी सहजासहजी दिसून न येणारी ही कमान.
पण देशात कुठलाही नवीन संसर्गजन्य रोग आला की वृत्तपत्रांमधून गाजणारं, सर्वप्रथम दखल घेतली जाणारं आणि रोगावर उपचार करणारं हे रूग्णालय. हे देशातलं सर्वांत पहिलं फक्त संसर्गजन्य रोगांच्या उपचारासाठी असलेलं रूग्णालय आहे. तेही ब्रिटिशांच्या काळातलं. १८९२ साली ब्रिटिशांनी ब्युबॉनिक प्लेगच्या साथीच्या रूग्णांना उपचारांसाठी बांधलेलं हे रूग्णालय आज कोविड-१९ सारख्या आजारातही महत्त्वाची भूमिका बजावतं आहे.
महापालिका रूग्णालयांमधून उत्तीर्ण होणाऱ्या सर्व नवीन डॉक्टरांना या रूग्णालयात संसर्गजन्य रोगांबाबत शिकवण्यासाठी काही काळ राहावं लागतं. भल्यामोठ्या आणि गर्दी असलेल्या रूग्णालयांच्या तुलनेत हे हिरवंगार आणि शांतता असलेलं रूग्णालय आहे. इथल्या ब्रिटिशकालीन इमारतींमध्ये ‘कांजिण्या वॉर्ड’, ‘कावीळ वॉर्ड’ असे कानाला विचित्र वाटणारे वॉर्ड आहेत. ते भारतातल्या संसर्गजन्य रोगांच्या आणि या रूग्णालयाच्या इतिहासाची साक्ष देतात. आजूबाजूला हिरवाई आणि शांतता यांमुळे हे रूग्णालय खूपच वेगळं वाटतं.
१९ व्या शतकात मुंबई प्रांतात अनेक मोठी रूग्णालयं बांधली गेली. जे.जे. हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, गोकुळदास तेजपाल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल या सर्व रूग्णालयांचं बांधकाम त्या काळातलं आहे. त्या काळात ब्रिटनमधील मोठ्या शहरांमध्ये सर्वसाधारण रूग्णालयांमध्ये आणि त्यांच्या आवारात संसर्गजन्य रूग्णांना दाखल करू नये असा संकेत होता. जे.जे.सारख्या मोठ्या रूग्णालयांमध्ये अत्यंत गंभीर आजाराच्या रूग्णांनाच दाखल केलं जात होतं. १८८८ ते १८९१ या काळात बीएमसीने ग्रँट रोड येथे एक संसर्गजन्य रोगांसाठीचं रूग्णालय चालवलं. परंतु बॉम्बे प्रांताच्या सरकारसोबत हे रूग्णालय कोण चालवणार यावरून वाद झाल्यामुळे ते बंद करण्यात आलं. सरकारच्या मते हे रूग्णालय चालवण्याचा खर्च ३ लाख रूपये होता आणि तो त्या काळच्या जमिनीच्या वार्षिक महसुलाच्या कितीतरी पट अधिक होता. शिवाय त्यांच्या मते ते रूग्णालय चालवण्याची जबाबदारी महापालिकेची होती. १८९२ साली देवी किंवा स्मॉलपॉक्सचा उद्रेक झाल्यावर ते रूग्णालय पुन्हा सुरू करण्यात आलं. परंतु तिथे जागा कमी पडत असल्यामुळे त्याची एक शाखा म्हणून आर्थर रोड हॉस्पिटल सुरू करण्यात आलं, असे उल्लेख मृदुला रामण्णा यांच्या ‘हेल्थ केअर इन बॉम्बे प्रेसिडेन्सी- १८९६-१९३०’ या पुस्तकात आढळतात.
कल्पेश रत्ना यांच्या ‘रूम ०००’ या पुस्तकात या रूग्णालयाचं बांधकाम १८८९ साली देवीच्या रूग्णांसाठी ३९,००० रूपयांच्या अनुदानावर झाल्याचा उल्लेख आहे. इथे संसर्गजन्य रूग्णांच्या उपचारांसाठी छोट्या-छोट्या कॉटेजेस होत्या. त्यामुळे नंतर प्लेगची साथ आल्यावर महापालिका आयुक्त स्नो याचं हे रूग्णालय प्लेगसाठी आदर्श असल्याचं मत झालं. हे जेकब सर्कलपासून जवळ आहे. हे रूग्णालय तुलनेने खूप साधं होतं. इथे ना जे.जे.सारखी भरपूर जागा, ना सेंट जॉर्जसारखी वास्तुरचना, ना गोकुळदास तेजपालसारखे भलेमोठे वॉर्ड्स. बांबूच्या फ्रेमवर पामच्या झावळ्यांनी बनवलेल्या भिंती आणि त्याने तयार केलेल्या शेड्स. हे असं बांधलेलं होतं कारण संसर्गजन्य रोगासाठी वापरण्यात आल्यावर ज्या गोष्टींनी संसर्ग होईल अशा गोष्टी काढून टाकता येतील आणि पुन्हा नवीन छपरं लावता येतील. उन्हाळ्यात त्या थंडावा द्यायच्या. आत ५० रूग्णांची सोय होईल अशी प्रचंड मोठी जागा होती. प्लेगच्या साथीमध्ये तर त्यात कितीतरी जास्त प्रमाणात रूग्णांची सोय केली गेली, असा उल्लेख या पुस्तकात दिसतो. आजही हे रूग्णालय मंगलोरी कौलांनी आच्छादलेलं आहे. इथे मोठ्या मोठ्या झडपा असल्यामुळे खूप हवा खेळती राहते.
डॉ. नसेरवानजी चोक्सी हे तरूण डॉक्टर अत्यंत शांत आणि हसतखेळत काम कऱणारे होते. त्यामुळे स्नोला त्यांच्यासोबत काम करणं सोप्पं झालं. त्यांनी प्रचंड मेहनत करून मुंबईत प्लेगच्या साथीत खूप मोठं योगदान दिलं. त्यांनी त्या काळात अनेक रूग्ण तपासले आणि आपल्या नोंदी विविध ठिकाणी नोंदवून ठेवल्या. त्यांनी या काळात जवळपास ४००० पेक्षा अधिक प्लेगच्या रूग्णांवर उपचार केले होते. या रोगाचा शरीरावर आणि शरीरातल्या अवयवांवर कमीत कमी कसा परिणाम होईल याची काळजी घेण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला.
२४ सप्टेंबर १८९६ रोजी या रूग्णालयात प्लेगचा पहिला रूग्ण दाखल झाला. इथे दगडाचा चौथरा ओलांडून गेलं की हवेशीर वातावरणात रूग्ण राहू शकत असे. आपोआप फ्लश होणारी शौचकूपं इथे होती आणि विहार तलावातून या रूग्णालयाला पाणी पुरवठा होत होता. अरबी समुद्राचा खारा वारा इथपर्यंत जाणवत होता. तेव्हा मुंबई अस्ताव्यस्त पसरलेली नव्हती. जॉन अँड्र्यू टर्नर १९०१ ते १९०६ या काळात महापालिकेचे आरोग्य अधिकारी होते. त्यांना जाणवलं की लोक या रूग्णालयाला आदर्श प्लेग रूग्णालय नसल्याबद्दल नावं ठेवत आहेत. त्या वेळी चोक्सी यांनी त्यांना दिलासा दिला. विविध प्लेग असोसिएशन्सच्या सदस्यांनी या रूग्णालयांना भेटी दिल्या होत्या आणि मुंबईत इतकं सुंदर रूग्णालय असल्याबद्दल हेवाही व्यक्त केला होता.
या रूग्णालयात लोक यायला घाबरत होते. अनेक पालक आपापली मुलं इथे ठेवायचे आणि चुकीचे पत्ते द्यायचे. त्या मुलांची अवस्था गंभीर होती. शिवाय कर्मचाऱ्यांची संख्या कायमच अपुरी. कुणीही इथे काम करायला तयार होत नव्हतं. इथे रूग्ण जबरदस्तीने आणले जायचे. त्यांना आपल्या आजाराबाबत कल्पना तर नव्हतीच पण उपचार करून घेण्याची इच्छाही नव्हती. ते इथे येईपर्यंत त्यांचा रोग हाताबाहेर गेलेला असायचा. १८९६-१९१० या काळात डॉ. चोक्सी यांनी केलेल्या निरीक्षणावरून त्यांना हे आढळलं की इथे रूग्ण मरण्याचं प्रमाण ७१.११ टक्के होतं. पुण्याच्या ससूनमध्ये हेच प्रमाण ७४.४ टक्के होतं. कॉलरा, देवी किंवा प्लेग आणि इतर कोणताही आजार असो त्याचा परिणाम सर्वाधिक गरीब, गर्दीच्या ठिकाणी राहणाऱ्या दुर्बलांवर होतो कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. १९१५ मध्ये प्लेगचा संसर्ग गेला. पण मृत्यूदर मात्र कायमच राहिला आणि प्लेगचे दूरगामी परिणाम नंतरही जाणवत राहिले. या रूग्णालयात पूर्व आफ्रिकेतले ‘जिगर’ आणि ‘स्लीपिंग सिकनेस’ या आजारांवरही उपचार करण्यात आले आणि या आजारांना मुंबईबाहेर ठेवण्यात इथल्या डॉक्टरांना यश आलं.
स्थानिक लोकांच्या मते या रूग्णालयातले डॉक्टर्स रूग्णाला ठार करायचे आणि त्याचं हृदय काढून इंग्लंडच्या राणीला भेट द्यायचे. साथ येण्यापूर्वी राणीच्या पुतळ्याची मोडतोड करण्यात आलेली होती. त्यामुळे ती भारतावर रागावलेली आहे आणि तो राग शांत करण्यासाठी तिला ही भेट दिली जात होती असं लोकांना वाटत असे. लोकांचा संताप इतका टोकाला गेला की २९ ऑक्टोबर १८९६ रोजी जवळपास ८०० ते १००० लोकांनी या रूग्णालयावर हल्ला केला. त्यांना रूग्णांना ठार करायचं होतं. पण पोलिसांमुळे ते शक्य झालं नाही. या रूग्णालयात अनेक स्युडो स्पेशालिस्ट यायचे. ते रिक्षा चालक, पोस्टमास्तर, रेल्वे गार्ड असे कुणीही असायचे. पण त्यांना आपल्याला प्लेगबद्दल सर्व ज्ञान आहे आणि आपण लोकांवर उपचार करू शकतो असं वाटत होतं. त्यांचाही त्रास या रूग्णालयाला होत होता. पालकांनी सोडून दिलेल्या मुलांची काळजी ऑल सेंट्स सिस्टर्स या परिचारिकांच्या संघटनेने घेतली होती. १८९२ ते १९१२ या काळात आर्थर रोड रूग्णालयात देवीचे ७,४२१ रूग्ण, विषमज्वराचे ७,४७६ रूग्ण, प्लेगचे ६,५३२ रूग्ण, कॉलराचे १,९५६ रूग्ण, कांजिण्यांचे १,००१ रूग्ण, गोवरचे ७३२ रूग्ण आणि निरीक्षणाखालील ३,८८९ रूग्ण अशा २९,००७ रूग्णांवर उपचार करण्यात आले. या रूग्णालयातल्या खाटांची संख्या १९१७ मध्ये ९५८ होती आणि ती १९१८ मध्ये ३,३२२ वर गेली. त्याचं कारण त्या वर्षात आलेली इन्फ्ल्युएंझाची साथ होती. १९२२ वर्षापर्यंत इथे भारतीयांसाठी ६ वॉर्ड्स आणि १३२ खाटा तर युरोपियन लोकांसाठी ४ वॉर्ड्समध्ये ५६ खाटा होत्या. या काळात चोक्सी यांच्या उपचारांवर आणि पद्धतींवर खूप टीका करण्यात आली. त्यांची उपचार पद्धती मागे पडल्याचं मत व्यक्त करण्यात आलं. प्लेगच्या साथीदरम्यान डॉ. चोक्सी यांनी केलेल्या कामाचा गोरव म्हणून ब्रिटिशांकडून त्यांना खान बहादूर हा किताब बहाल करण्यात आला. ते एकवर्थ म्युनिसिपल लेप्रसी हॉस्पिटल, बॉम्बेच्या स्थापनेपासून त्या रूग्णालयाशी जोडलेले होते. १९००च्या सुरूवातीच्या वर्षात महापालिका, डॉक्टर आणि परोपकारी लोकांच्या सहकार्याने मुंबईत बॉम्बे सॅनिटरी असोसिएशनची १९०३ मध्ये स्थापना झाली. विविध व्याख्याने आणि वैद्यकीय सेवाकर्मींच्या प्रशिक्षणाद्वारे स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट या संस्थेने समोर ठेवले होते. बॉम्बे सॅनिटरी असोसिएशनमध्ये ‘सम कॉमन सेन्स व्ह्यूज ऑन प्लेग’ या विषयावर पहिले भाषण डॉ. चोक्सी यांनी दिले. ते १९१२ साली स्थापन झालेल्या बॉम्बे अँटी-ट्युबरक्युलोसिस लीगचेही सदस्य होते.
कस्तुरबा रूग्णालयाच्या इतिहासात आणखी एक नाव गौरवाने घेतलं जातं. ते गोवन ख्रिश्चन डॉ. अकासिओ व्हिएगास होते. मुंबईत प्लेग आला तो मांडवीच्या नवरोजी हिल झोपडपट्टीत. त्यांनी आपल्याकडे साध्या तापासाठी आलेला रूग्ण प्लेगचा असल्याचे निदान एका फटक्यात केलं आणि धोका पत्करून त्याच्यावर उपचार केले. त्यांनी मुंबईतल्या जवळपास १८,००० लोकांना हाफकिनची ब्युबोनिक प्लेग प्रोफायलॅक्टिक सिरमची लस दिली होती. झोपडपट्टी स्वच्छता आणि उंदरांचा नायनाट यांच्याबाबत त्यांनी खूप जागरूकता निर्माण केली होती.
१९२०-३० च्या दशकात स्कार्लेट फीव्हरने धुमाकूळ घातला होता. त्याचं निदान होत नव्हतं. प्रसारमाध्यमांनी त्याला मिस्टरी डिसीज या नावाने संबोधलं होतं. त्या काळात आर्थर रोड रूग्णालयातच या रूग्णांवर उपचार आणि तपासण्या झाल्या होत्या. त्या काळात रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक असलेल्या डॉ. पी. टी. पॅथेक्टे यांनी परिस्थितीचा अभ्यास केला आणि रूग्णांवर उपचार केले. त्यांच्या चाचण्या केल्या गेल्या आणि रोगाचं निदान करण्यात आलं, असा उल्लेख प्रा. प्राजक्त चतुर्वेदी यांच्या ब्लॉगमध्ये दिसून येतो.
नंतरच्या काळात आलेल्या प्रत्येक संसर्गजन्य रोगाच्या साथीदरम्यान या रूग्णालयाने खूप महत्त्वाची भूमिका बजावली. आजही पालिका आणि सरकारकडे असलेलं हे एकमेव संसर्गजन्य रोगासाठीचं रूग्णालय आहे. कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य रोग असला तरी त्यावर सर्वप्रथम उपचार या रूग्णालयात होतात. त्यानंतर इतर रूग्णालयांमध्ये रूग्णांची सोय केली जाते. एच१एन१, सार्स, इबोला, कालाआजार, मार्स, स्वाइन फ्लू आणि आता कोविड १९. या रूग्णालयाचाच पहिला विचार केला जातो.
पूर्वीच्या काळी ही जागा तशी मुंबईच्या गर्दीपासून दूर होती. त्यामुळे विलगीकरण, उपचार, खेळती हवा, जागा या सगळ्या गोष्टींसाठी इथे रूग्णालय बांधण्यात आलं. त्यानंतर प्रत्येक साथीच्या आजारात या रूग्णालयात उपचार करण्यात आले आणि एक वेगळी शाखा तयार झाली, असं कस्तुरबा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत पवार सांगतात.
या रूग्णालयाला कस्तुरबा गांधी रूग्णालय असं नाव कधी आणि का देण्यात आलं याबाबत इतिहासकारांना फारशी कल्पना नाही. त्याचे उल्लेखही कुठे आढळत नाहीत. परंतु मुंबईच्या इतिहासात, वर्तमानात आणि भविष्यातही या रूग्णालयाने आघाडीवर राहून काम केलं आहे. प्रत्येक आजारात आणि साथीमध्ये या रूग्णालयाने आणि इथल्या डॉक्टरांनी हात आखडता न घेता रूग्णांचं निदान आणि उपचार केले आहेत.
COMMENTS