नवी दिल्लीः उ. प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या कारखाली दोन शेतकरी चिरडून मरण पावण्याची घटना रविव
नवी दिल्लीः उ. प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या कारखाली दोन शेतकरी चिरडून मरण पावण्याची घटना रविवारी घडली. या नंतर झालेल्या हिंसाचारात ८ जण ठार तर शेकडो जखमी झाले. संतप्त जमावाने काही गाड्या पेटवून दिल्या. मृतांमध्ये ४ शेतकरी असल्याचे उ. प्रदेश सरकारने सांगितले. अजय मिश्रा यांनी मात्र आपला मुलगा गाडीत नसल्याचा दावा केला.
रविवारी लखीमपूर खेरी जिल्ह्यातील तिकुनिया येथे मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्याचा विरोध म्हणून शेतकर्यांचे आंदोलन सुरू होते. या गावात उ. प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य व केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या उपस्थितीत एका सरकारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिकुनिया हे मिश्रा यांच्या वडिलांचे गाव व त्यांचा लोकसभा मतदार संघ आहे.
केशव प्रसाद मौर्य यांच्या मोटारींचा ताफा रस्त्यावरून निघाला तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला आंदोलकांनी निदर्शने सुरू केली. ताफा थांबवण्याचा काहींचा प्रयत्न होता. आंदोलकांच्या हाती काळे झेंडेही होते. या दरम्यान मौर्य यांच्या ताफ्यातल्या तीन गाड्या आंदोलकांच्या अंगावर गेल्या. त्यातील एक गाडी मिश्रा यांच्या मुलाची आशिष मिश्रा यांची व नातेवाइकांची होती. या दुर्घटनेत एका शेतकर्याचा जागीच मृत्यू झाला व तर अन्य एकाचा इस्पितळात मृत्यू झाला. ८ जखमींना तातडीने इस्पितळात नेण्यात आले. जखमींमध्ये संयुक्त किसान मोर्चाचे एक नेते तेजिंदर एस. विरक होते.
मंत्र्याच्या मुलाच्या गाडीखाली चिरडून शेतकरी मरण पावल्याची बातमी कळल्यानंतर शेतकरी संतप्त झाले आणि त्यांच्याकडून व काही गाड्यांना आगी लावण्यात आल्या.
दरम्यान, दोषींना जोपर्यंत पोलिस पकडत नाही तोपर्यंत मृत शेतकर्यांवर अंत्यसंस्कार केले जाणार नाही, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. तर सोमवारी दुपारी १ वाजता देशातल्या सर्व जिल्हाधिकारी कचेर्यांसमोर शेतकर्यांनी आंदोलन करावे असे शेतकरी नेते राकेश टिकैट यांनी आवाहन केले आहे.
काही दिवसांपूर्वी अजय मिश्रा यांनी शेतकरी आंदोलनावर टीका करताना शेती कायद्याला १०-१५ शेतकर्यांचा विरोध असून त्यांना ठिकाणावर आणण्यास दोन मिनिटे पुरेसे असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे शेतकर्यांमध्ये राग होता.
दरम्यान, या घटनेचे तीव्र पडसाद उ. प्रदेशच्या राजकारणात उमटले असून राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर टीका केली आहे.
COMMENTS