हिंदू आणि हिंदुत्व: रामदेवबाबांचा हास्यास्पद ‘विनोद’!

हिंदू आणि हिंदुत्व: रामदेवबाबांचा हास्यास्पद ‘विनोद’!

अलीकडेच योगशिक्षक आणि उद्योजक रामदेवबाबांचा एक व्हिडिओ बघण्यात आला. यात रामदेवबाबा व्याकरणाच्या छोट्या धड्यातून, त्यांच्या दृष्टीने, 'हिंदुत्वा'च्या शक्तीचे दर्शन घडवतात. ते म्हणतात: हिंदू आणि हिंदुत्व वेगवेगळे आहेत? आता तुम्ही व्यक्ती आणि व्यक्तित्वही वेगवेगळे म्हणाला. थोडा तरी अभ्यास करावा.

जगणं शिकवून गेलेला माणूस
मोदींची फसवी ‘ब्रँड’रणनीती
‘आध्यात्मिक’ वाहिन्यांचे अर्थकारण : भाग १

अलीकडेच योगशिक्षक आणि उद्योजक रामदेवबाबांचा एक व्हिडिओ बघण्यात आला. यात रामदेवबाबा व्याकरणाच्या छोट्या धड्यातून, त्यांच्या दृष्टीने, ‘हिंदुत्वा’च्या शक्तीचे दर्शन घडवतात. ते म्हणतात: हिंदू आणि हिंदुत्व वेगवेगळे आहेत? आता तुम्ही व्यक्ती आणि व्यक्तित्वही वेगवेगळे म्हणाला. थोडा तरी अभ्यास करावा.

राहुल गांधी यांनी हिंदू व हिंदुत्ववादी यातील फरक दाखवण्याचा जो प्रयत्न केला त्यांची खिल्ली उडवणे हा अर्थातच रामदेवबाबांचा उद्देश होता.

रामदेवबाबांच्या मते हिंदुत्व आणि हिंदू या शब्दांमधील संबंध व्यक्तित्व आणि व्यक्ती या दोन शब्दांमधील संबंधांइतकाच सहज आहे. राहुल यांना हा एवढा साधा संबंध कळत नाही हे त्यांना मजेशीर वाटते. अनेक हिंदुत्ववाद्यांनाही हे मजेशीर वाटू शकते. कारण, संस्कृत शब्दांच्या रचनेचे नियम त्यांनाही रामदेवबाबांना कळतात तितपतच कळत असतात. हे एवढेच नाही. खरे तर विनोद रामदेवबाबा करत आहेत, राहुल नाही. हा विनोद खरे तर हिंदुत्व नावाच्या भरकटलेल्या विश्वाच्या दारिद्र्यावर आणि कृत्रिमतेवर आहे.

प्रत्यक्षात राहुल नव्हे, तर रामदेवबाब कसे हास्यास्पद आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला शब्दभांडार/व्युत्पत्ती/व्याकरणाच्या क्षेत्रात फेरफटका मारावा लागेल. तर वाचा.

संस्कृतमध्ये ‘त्व’ हा प्रत्यय कोणत्याही शब्दांचे रूपांतर नपुंसकलिंगी भाववाचक नामात करतो. तद शब्दाला त्व प्रत्यय लागला की तत्त्व शब्द तयार होतो तो याच पद्धतीने. अस्तित्व आणि महत्त्व ही याचीच आणखी दोन उदाहरणे. रामदेवबाबांनी जे व्यक्ती व व्यक्तित्व हे उदाहरण दिले, तो शब्द याच वर्गात मोडतो. हे शब्द आधुनिक भारतीय भाषांमध्ये संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले आहेत. जे शब्द संस्कृत भाषेतून आलेले नाहीत त्यांना ‘त्व’ प्रत्यय त्या नियमाने लागत नाही. तो कृत्रिम पद्धतीने लावला जातो. म्हणजे आपण इष्कत्व किंवा दीनत्व असे शब्द वापरत नाहीत. कारण इष्क किंवा दीन हे शब्द फारशी भाषेतून आलेले आहेत. हाच नियम हिंदू शब्दालाही लागू आहे. कारण, हा शब्दही मुळात अरेबिक किंवा पर्शियन शब्दभांडारातून आधुनिक भारतीय भाषांमध्ये आलेला आहे. हिंदू हा शब्दच मुळात उसना आहे हे बऱ्याच जणांना माहीत नाही. त्यामुळे त्याला त्व प्रत्यय लावणे हे इष्कत्व शब्दाइतकेच मजेशीर आहे.

भारतीय भाषांच्या शब्दसंग्रहांमध्ये ‘हिंदू’ शब्दाचा प्रवेश बराच उशिरा झाला हे सत्य लपवण्यासाठी हिंदू मूलतत्त्ववादी संस्कृत भाषेच्या प्राचिनतेचा आधार घेतात आणि यासाठी २०व्या शतकात होऊन गेलेल्या स्वामी कर्पत्री महाराजांना हटकून उद्धृत करतात. हिंदू शब्दाला संस्कृत भाषेत अधिष्ठान मिळवून देण्यासाठी केलेला हा प्रयत्न निष्फळच आहे. कारण, संस्कृत भाषेतील ‘हिंदू’ शब्दाच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून कर्पत्री महाराज वृद्धस्मृती हा मजकूर उद्धृत करतात. माझ्या मते वृद्धस्मृती हा भाषिक अलंकार आहे, तो प्रत्यक्षात मजकूर नाहीच.

‘हिंदू’ हा शब्द वैदिक साहित्यात, रामायण किंवा महाभारतात, पुराणात कुठेच आढळत नाही. भगवद्गीतेत किंवा उपनिषदांत हा शब्द नाही. संस्कृत काव्य, नाटके किंवा व्याकरणात तो नाही. शंकराचार्य, रामानुज किंवा मध्वांच्या साहित्यात हा शब्द नाही. बौद्ध व जैन ग्रंथांमध्येही हिंदू शब्द नाही. १६व्या शतकातील ‘श्री चैतन्य चरितमित्र’ या बंगाली ग्रंथात अधूनमधून हा शब्द आला आहे. १५व्या शतकात गुरूनानकांनी ‘कोणी हिंदू नाही, कोणी मुसलमान नाही’ अशा संदर्भात हा शब्द वापरला आहे. दोन भाषिक जगांमध्ये पूल बांधण्यासाठी जाणीवपूर्वक शब्द उसने घेतले जातात, तोच प्रकार हिंदू शब्दाबाबत असावा. मात्र, गोंधळ असा आहे की, संस्कृत शब्दांची इनसायक्लोपीडियाच्या स्वरूपातील डिक्शनरी त्या मानाने अलीकडील काळात म्हणजे १८८५ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे त्यातील शब्दांच्या प्राचीनतेबाबत खात्रीने काही सांगणे कठीण आहे. कर्नाटक व आंध्रप्रदेशात सापडलेल्या १४व्या शतकांतील काही शीलालेखांमध्ये ‘हिंदू’ या शब्दाचा वापर आहे. यात ‘हिंदू-राया-सुरत्राण’ अर्थात हिंदूंमधील सुलतान म्हणजे राया अशी संकल्पना स्पष्ट करण्यासाठी हा शब्द वापरण्यात आला आहे. येथेही हिंदू हा शब्द सुलतान या अरेबिक शब्दाच्या जोडीने वापरला गेला आहे हा निव्वळ योगायोग नसावा.

हिंदू शब्दाचा संस्कृत भाषेतील सर्वांत जुना वापर १३४७ सालात केला गेला, असा दावा ऑड्रे ट्रश्कने त्याच्या लेखनात केला आहे. यात विजयनगर साम्राज्याचा एक संस्थापक मारप्पा स्वत:ला सर्व छोट्या हिंदू सत्ताधाऱ्यांच्या वरील सुरत्राण म्हणवून घेतो असा उल्लेख आहे. पाच वर्षानंतर १३५२ मध्ये त्याचा भाऊ बुक्क याने हाच शब्दप्रयोग केला आहे.

हिंदू-पद-पादशाही हा वाक्प्रचारालाही थोरल्या बाजीराव पेशव्याच्या काळात अर्थात १८व्या शतकाच्या सुरुवातीला वजन प्राप्त झाले. येथेही हिंदू हा शब्द पादशाही शब्दाप्रमाणेच पर्शियन भाषेतून आला असावा, असे समजण्यास जागा आहे.

हिंदू हा शब्द ज्या ‘हिंदू’ किंवा ‘गेंतू’ या शब्दांतून आला असावा असे समजले जाते, ते शब्द १८व्या शतकातील साहित्यात दिसून येतात.

हे झाले दक्षिण आशियातील हिंदू शब्दाच्या उपयोजनाच्या परंपरेविषयी.

हिंदुत्व हा शब्द मात्र यापैकी कशातही आढळून आलेला नाही. हिंदुत्व हा शब्द म्हणजे संपूर्णपणे कृत्रिम नवव्युत्पत्तीचे उदाहरण आहे. हा शब्द सर्वप्रथम वापरला गेला तो बाबू चंद्रकांत बसू यांच्या बंगाली साहित्यात. हा मजकूर १८९२ मध्ये प्रकाशित झाला. थोडक्यात, हिंदुत्व शब्दाला १९व्या शतकातील आठव्या दशकापूर्वी अस्तित्व नव्हते. याचा अर्थ या शब्दाची व्युत्पत्ती १४० वर्षांपूर्वीचीच आहे. राजकीय हिंदुत्वाचा पाया घालण्यासाठीच या शब्दाची निर्मिती करण्यात आली आहे. हिंदुत्ववादी ज्यांना आपली आद्यप्रेरणा मानतात त्या विवेकानंदांनीही त्यांच्या इंग्रजी व बंगाली भाषेतील प्रचंड लेखनात किंवा भाषणात हिंदुत्व या शब्दाचा वापर केलेला नाही. हिंदू महासभा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विणलेल्या हिंदू राजकारणाच्या विश्वातही या शब्दाला वजन प्राप्त झाले ते, वि. दा. सावरकर यांनी १९२३ साली ‘हिंदुत्व’ नावाने पत्रक प्रसिद्ध केले तेव्हापासून. सावरकरांचे संस्कृत भाषेचे ज्ञानही रामदेवबाबांसारखेच जेमतेम होते. संस्कृतमधील ‘स’ आणि प्राकृतमधील ‘ह’ ध्वनीच्या आदानप्रदानातून हिंदू शब्द उगम पावल्याचा त्यांचा सिद्धांत टिकण्याजोगा नाही. ध्वनीचे हे आदानप्रदान  संस्कृत व अवेस्तान (इराणमधील प्राचीन भाषा) यांच्यात झालेले दिसते. संस्कृतमधील सोम अवेस्तानमध्ये हाओमा होतो आणि नदी सिंधू हिंदू होते आणि या नदीकाठी राहणारे लोकही हिंदू होतात. यावरून अल-हिंद, हिंदोस्तां, हिंदी, हिंदवी आणि हिंदू (या सर्व शब्दांना वेगवेगळ्या छटा आहेत) या शब्दांचे मूळ दक्षिण आशियात (सिंधुच्या पात्रामध्ये) आहे. हा शब्द भारतीय भाषांमध्ये संस्कृत किंवा प्राकृत भाषांतून आलेला नाही, तर अरेबिक आणि पर्शियन बोलणाऱ्यांनी आणला आहे. अरेबिक, टर्की व पर्शियन भाषकही स्वत:ला हिंदू म्हणवतात.  ज्याप्रमाणे युरोपीय वसाहतवाद्यांनी स्थानिक अमेरिकींना ‘इंडियन्स’ संबोधणे सुरू केल्यानंतर, ते स्वत:ही स्वत:ला ‘इंडियन’ म्हणू लागले तसेच. कालांतराने हिंदू हा शब्द श्रद्धा व प्रथांच्या रचनाप्रणालीसाठी वापरला जाऊ लागला. शब्द बदलतात, उच्चार बदलतात, अर्थही बदलतात.

अशाच प्रकारचे अर्थाचे हस्तांतर विरुद्ध दिशेने झालेले असू शकते. ‘परदेशी’ या अर्थाने वापरला जाणारा प्राचीन संस्कृत शब्द यवन (हा ग्रीक शब्द आहे) तसेच तुर्कांसाठी वापरला जाणारा ‘तुरुश्क’ हे शब्द मुस्लिमांसाठी वापरले जाणारे शब्द झाले. प्रत्यक्षात ग्रीक किंवा तुर्क मुस्लिम नव्हतेच. कितीतरी नामे अशी वेगळ्या अर्थाने वापरली जात आहेत. सावरकर ‘स’ आणि ‘ह’ यांच्यातील अदलाबदलीकडे जो निर्देश करतात, त्याची दिशा फक्त चुकीची होती.

आता ‘हिंदुत्व’ आणि ‘हिंदू धर्म’ या दोन निराळ्या संकल्पना आहेत, हे सावरकर यांचे मत रामदेवबाबांना कळले तर ते बुचकळ्यात पडतील हे नक्की. आणि म्हणूनच एक हिंदू म्हणून आपण हिंदुत्ववादाच्या विरोधात आहोत, हे राहुल गांधी यांचे वक्तव्य रामदेवबाबांना वाटते तेवढे भरकटलेले अजिबातच नाही. रामदेवबाबा म्हणतात तो संबंध हिंदू व हिंदुत्व या शब्दांना लागू होत नाही. या बाबतीत तरी सावरकर राहुल यांच्याशी सहमत झाले असते, रामदेवबाबांशी नाही. हिंदुत्व हा विचित्र पशू आहे. तो मासाही नाही किंवा पक्षीही नाही. तो संस्कृत नाही किंवा पर्सो-अरेबिकही नाही. तो एक कृत्रिम व मनमानी स्वरूपाचा शब्द आहे. २०व्या शतकातील फॅशिझमनी दिलेला हा शब्द आहे. रामदेवबाबांच्या औषध कारखान्यात तयार झालेल्या मिश्रणाकडे तुम्ही जेवढ्या श्रद्धेने किंवा संशयाने बघता, तेवढ्याच श्रद्धेने किंवा संशयाने या हिंदुत्व शब्दाकडे बघा.

मूळ लेख: 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0