बंगळुरूः राज्यातल्या हिंदू मंदिरांच्या परिसरात मुसलमान व्यापाऱ्यांना व दुकानदारांना धंदा करण्यास बंदी घालणाऱ्या कर्नाटकातील भाजपा सरकारच्या वादग्रस्त
बंगळुरूः राज्यातल्या हिंदू मंदिरांच्या परिसरात मुसलमान व्यापाऱ्यांना व दुकानदारांना धंदा करण्यास बंदी घालणाऱ्या कर्नाटकातील भाजपा सरकारच्या वादग्रस्त निर्णयावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजप सरकारच्या अशा मनमानी निर्णयावर व्यापारी वर्तुळातून विरोध व्यक्त होत आहेच पण कर्नाटक विधीमंडळातील भाजपचे दोन विधान परिषद आमदार अदागुर एच. विश्वनाथ व अनिल बेणके यांनी सरकारचा निर्णय मूर्खपणाचा असल्याचे म्हटले आहे.
विश्वनाथ यांनी आपल्याच सरकारच्या निर्णयावर टीका करताना सरकारचा हा निर्णय अत्यंत मूर्खपणाचा व दबावातून घेतलेला असून कोणताही परमेश्वर वा धर्म अशा प्रकारची विचारसरणी शिकवत नाही. सर्व धर्म मानवजातीला सामावून घेणारे असतात ते भेदभाव करत नाहीत, असे मत व्यक्त केले आहे. सरकारचा हा निर्णय लोकशाहीविरोधी असल्याचेही ते म्हणाले.
विश्वनाथ हे जनता दल (सेक्युलर)चे माजी अध्यक्ष होते. ते यापूर्वी तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते मागासवर्गीय जातींचे एक प्रभावशाली नेते व लोकप्रिय लेखक म्हणून परिचित आहेत. २०१९मध्ये त्यांनी कुमार स्वामी सरकार पडण्याअगोदर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना भाजपने विधान परिषद आमदारकी दिली होती.
जगभरात जेवढे काही मुस्लिम देश आहेत, त्यांनी उद्या आपल्याविरोधात जायचे ठरवल्यास याचा शेवट काय होणार असा सवालही विश्वनाथ यांनी उपस्थित केला आहे. फाळणीनंतर मुस्लिमांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला, ते जिन्नांसोबत गेले नाहीत. ते भारतीय आहेत व ते भारतीयच राहणार आहेत. मुस्लिम अन्य कोणत्या देशाचे नागरिक नाहीत. असे असताना मुस्लिमांना सतत का लक्ष्य केले जात आहे, याबद्दल विश्वनाथ यांनी आश्चर्य व्यक्त केले आहेत. सरकारने या संदर्भात लोकभावना चिघळण्याअगोदर विचार केला पाहिजे, अशीही त्यांनी विनंती केली आहे.
विश्वनाथ यांच्या व्यतिरिक्त बेळगावी उत्तर मतदारसंघाचे भाजप आमदार अनिल बेणके यांनी घटनेत सर्वांना समान अधिकार असल्याचे सांगत कोणत्या दुकानातून कोणी काय खरेदी करायचे हे सांगण्याचा अधिकार कोणालाच नाही, असे मत व्यक्त केले.
मूळ बातमी
COMMENTS