प्रसिद्ध स्तंभलेखक, पत्रकार-संपादक आकार पटेल यांनी भारत सोडून जाऊ नये असे आदेश दिल्लीतील सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी दिले. आकार पटेल यांना अमेरिकेला
प्रसिद्ध स्तंभलेखक, पत्रकार-संपादक आकार पटेल यांनी भारत सोडून जाऊ नये असे आदेश दिल्लीतील सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी दिले. आकार पटेल यांना अमेरिकेला जाण्यापासून गुरुवारी पुन्हा रोखण्यात आले त्यावर पटेल यांनी सीबीआयने न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल केली होती. या याचिकेवर दिल्लीतील सीबीआय न्यायालयाने पटेल यांना परदेशात जाण्याची परवानगी नाकारली व त्यांच्या याचिकेवरची सुनावणी १२ एप्रिलला होईल असे सांगितले.
सीबीआय न्यायालयाचा हा आदेश आकार पटेल यांना गुरुवारी रात्री अमेरिकेला जाण्यावाचून पुन्हा रोखण्यात आल्याच्या घटनेनंतर आला. दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील न्यायालयाने आकार पटेल यांना अमेरिकेस जाऊ द्यावे असे निर्देश सीबीआयला दिले होते व त्यांची माफीही मागावी असे सीबीआयला सांगितले होते. पण गुरुवारी रात्री आकार पटेल अमेरिकेला जाण्यासाठी बंगळुरू विमानतळावर आले असता त्यांना इमिग्रेशन विभागाने पुन्हा रोखले. आपल्याला का रोखले याचे उत्तर त्यांना संबंधित खात्याकडून मिळाले नाही. आकार पटेल यांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता एकाचाही मोबाइल क्रमांक त्यांना लागला नाही. यावरून शुक्रवारी आकार पटेल यांनी सीबीआयवर न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप करणारी याचिका दाखल केली. न्यायालयाने आपल्याला विदेशात जाण्याची परवानगी दिली असताना आपल्याला पुन्हा रोखण्यात आले व आपल्याला का रोखण्यात आले याची माहितीही संबंधित यंत्रणांकडून दिली जात नव्हती. सीबीआय सारखी तपास यंत्रणा चोवीस तास सुरू असते पण या खात्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क मिळत नव्हता. ही तपास यंत्रणा सोयीस्कर रित्या झोपेचे सोंग कशी आणू शकते अशी तक्रार आकार पटेल यांनी आपल्या याचिकेत केली आहे.
गेल्या बुधवारी अमेरिकेला एका कार्यक्रमाला जाण्यासाठी निघाले असताना आकार पटेल यांना विमानतळावर कोणतीही लूक आउट नोटीस न देता रोखण्यात आले होते. या संदर्भात त्यांनी न्यायालयात दाद मागितली असताना न्यायालयाने सीबीआयला फटकारले व त्यांची माफी मागावी असे निर्देश दिले होते.
द वायरने या संदर्भात आकार पटेल यांची मुलाखत घेतली असता त्यांनी सांगितले की, आपण द प्राइस ऑफ द मोदी इअर्स हे पुस्तक लिहिले होते, या पुस्तकात मोदींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीचा लेखाजोखा मांडल्याने त्यांच्यावर सरकार नाराज असावे. त्यामुळे त्यांना बाहेर जाण्यापासून रोखले.
आकार पटेल हे पूर्वी अमनेस्टी इंटरनॅशनल या संघटनेचे भारतातील संचालक म्हणून काम पाहात होते. या संघटनेला देशातून हद्दपार करण्यात आले असून या संघटनेच्या कार्यकाळात आकार पटेल यांच्याकडून २६ कोटी रु.च्या आर्थिक घोटाळा झाला आहे. हा घोटाळा झाला असल्याने ते पळून जाऊ शकतात असा सीबीआयचा आरोप आहे.
सीबीआयच्या या आरोपावर न्यायालयाने सांगितले की, आकार पटेल खरोखरीच पळून जात असतील तर त्यांना सीबीआयने अटक केली पाहिजे. सीबीआयने अशी कोणतीही पावले न उचलल्याने त्यांनी पटेल यांची माफी मागावी असे न्यायालयाने म्हटले होते.
पटेल हे अमेरिकेतल्या अनेक विद्यापीठांमध्ये भाषण देणार असून त्यांचा दौरा १० मे पर्यंत आहे. त्यांची भाषणे ९ एप्रिलपासून सुरू होणार होती पण आता न्यायलयीन लढ्यामुळे आपण १२ एप्रिलपर्यंत वाट पाहू शकतो व माझ्याबाजूने काही निर्णय लागेल अशी आशा असल्याची पटेल यांनी प्रतिक्रिया दिली.
मूळ वृत्त
COMMENTS