महान चित्रकार पाब्लो पिकासो

महान चित्रकार पाब्लो पिकासो

८ एप्रिल २०२२ रोजी महान चित्रकार ,शिल्पकार पाब्लो पिकासो यांचे पन्नासाव स्मृतीवर्ष सुरू होत आहे.

खेळ खेळत राहतो उंबरा: कवितेची आतली लय
महाराष्ट्राची ‘कला’ का नाही?
रेषाकोश

पाब्लो पिकासो हे विसाव्या शतकातील महान चित्रकार होत. “चित्र रंगवणे म्हणजे एखाद्याच आत्मचरित्र लिहिण्यासारखं होय”, असं म्हणणारा हा महान चित्रकार एका अफलातून व्यक्तिमत्व होतं. २५ ऑक्टोबर १८८१ रोजी स्पेन मधील मलागा गावी जन्मलेले पाब्लो पिकासो ८ एप्रिल १९७३ रोजी कालवश झाले. चित्रकार म्हणून अमर्याद सत्ता व वैभव त्यांनी उपभोगलं. विसाव्या शतकामध्ये कलाक्षेत्रावर सर्वाधिक प्रभाव पडणारा आणि जिवंतपणीच दंतकथा बनलेला हा थोर चित्रकार होता. त्यांच्या हयातीतच त्यांची कला व व्यक्तिगत जीवन यावर असंख्य पुस्तके प्रकाशित झाली होती. विसाव्या शतकात झालेले सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक बदल आणि चढ-उतार, खळबळ, गुंतागुंत आणि परस्पर विरोधी प्रवाह यावर आपल्यात चित्रांद्वारे भाष्य करणारे ते एक महत्त्वाचे चित्रकार होते. अभिनव शैलीच्या या चित्रकाराने ‘क्युबिझम’ ही नवी चित्रशैली विकसित केली.

पाब्लोचे वडील जोसे रुईथ ब्लॉस्को हे चित्रकार होते व चित्रकलेचे शिक्षक होते. यामुळे त्याला चित्रकलेचे बाळकडू घरातूनच मिळाले. वडिलांनी त्याला चित्रकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिलं. याच्या आईचे नाव मारिया पिकासो इ लोपेझ असे होते. १८९५ ते १९०० ही पाच वर्षे तो बार्सिलोना शहरात राहिला. तिथे त्याला विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी भेटली. परिणामी त्याच्यातील कलावंत विकसित होऊ लागला. १९०० साली तो पॅरिसमध्ये आला आणि चित्रकार म्हणून नावारुपालाही आला. त्यांनी जगभर भटकंती केली. १९१८ साली रोममध्ये त्यांनी ओल्गा या बॅले नर्तिकेशी विवाह केला. १९३६ साली स्पेनमध्ये यादवी युद्ध सुरू झाले. तेव्हा पिकासो फ़्रेंकोच्या सैन्याविरुद्ध लढणाऱ्या रिपब्लिकन गटाला पाठिंबा दिला. त्यांना निधीही जमवून दिला. या युद्धातील भयानकतेवर आणि अत्याचारावर त्याने अनेक रेखाटने केली. त्याचे ‘गेरनिका’ हे चित्र प्रसिद्ध आहे. गेरनिका हे एका गावाचे नाव आहे. त्या गावावर फ्रॅंकोने प्रचंड बॉम्ब वर्षाव केला होता. पिकासोचे या चित्रातील भाष्य म्हणजे एका कलावंताच्या मानसिकतेच्या प्रगल्भतेचा, समाजाशी आपले नाते, बांधिलकी व्यक्त करण्याचा अप्रतिम नमुना मानला जातो. पिकासोची ‘टू सिटेड वुमन’, ‘दि कार्ड प्लेयर’, ‘नाईट फिशिंग’, ‘थ्री डान्सर्स’, ‘सिडने वुमन विथ फॅन्स’ आदी अनेक चित्रे विलक्षण गाजली.

पिकासोने लिहिलेली व बोललेली काही वाक्य फार अर्थपूर्ण आहेत. तो म्हणाला, “माझी आई म्हणायची तू शिपाई झालास तर जनरल हो, पाद्री झालास तर पोप हो आणि म्हणूनच मी चित्रकार झालो आणि पिकासो बनलो.” त्याचा हा आत्मविश्वास बरच काही सांगून जातो. तो म्हणतो, मी माझ्या विचाराप्रमाणे वस्तूचित्र रेखाटतो, मला ती दिसते तशी नाही. नको ते काढून टाकणं हीच कला असते. साधे कलाकार नक्कल करतात तर अस्सल कलाकार चोरी करतात असेही तो म्हणायचा.

पिकासो म्हणायचा, उद्यासाठी फक्त तेच काम शिल्लक ठेवा जे केल्याशिवाय तुम्ही मरणाला तयार आहात… प्रत्येक मुलामध्ये एक कलाकार असतो मुद्दा आहे की तो मोठा झाल्यावरही त्याच्यातला कलाकार जिवंत कसा राहू द्यायचा… एकांतातच गंभीर काम होऊ शकतं असं म्हणणारा पिकासो म्हणतो, मी भरपूर पैसे स्वतःजवळ ठेवून एका गरीब माणसासारखं राहू इच्छितो.

या स्पॅनिश चित्रकाराला प्रयोगशीलता, तंत्रशुद्धता आणि मानवतावादी संदेश यामुळे भरपूर प्रसिद्धी आणि यश मिळाले. दुसऱ्या महायुद्धाच्या संपूर्ण काळात पिकासो पॅरिसमध्ये होते. पॅरिसच्या मुक्ततेनंतर त्यांनी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. त्याच्या चित्रांवर व प्रदर्शनावर नाझींनी बंदी घातली होती. त्या काळात त्याने अनेक स्थिर चित्र, निसर्ग चित्रे काढली. तसेच अनेक शिल्पकृती तयार केल्या. सिरॅमिक्स आणि माती कामातूनही त्यांनी काही कलाकृती निर्माण केल्या. अगदी कोरोना काळामध्ये गेल्या वर्षी म्हणजे १३ मे २०२१ रोजी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या चित्राच्या लिलावात त्याचे ‘वुमन सिटी नियर ए विंडो’ हे चित्र तब्बल७५५ कोटी रुपयांना विकले गेले. पाब्लो पिकासोची पाचहून अधिक चित्रे हजारो कोटी रुपयांना विकली गेलेली आहेत. असा हा दीर्घायुष्य आणि अमाप यश, कीर्ती लाभलेला थोर कलावंत वयाच्या ९२ व्या वर्षी फ्रान्समधील मॉगिन्स गावी कालवश झाला. ५०व्या स्मृतीवर्षानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन..!

प्रसाद माधव कुलकर्णी, समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजीच्या वतीने गेली ३३ वर्षे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ मासिकाचे संपादक आहेत.

 

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0