अर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी

अर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी

अर्नेस्तो कार्देनाल यांच्या शैलीसाठी ‘exteriorismo’ ही स्पॅनिश भाषेतील संज्ञा वापरण्यात येते. या संज्ञेचा अर्थ; “आपल्या सभोवतालच्या विश्वातील प्रतिमांमधून कवितेची निर्मिती करणं”, असा आहे. ‘exteriorismo’ ही संज्ञा कार्देनाल यांच्या कवितेचं अचूक मर्म उलगडणारी आहे.

युघुर प्रश्न : चीनच्या महत्वाकांक्षेतून निर्माण झालेली समस्या
बुरखा/हिजाब कालबाह्य की कालसुसंगत?
सरसंघचालकांनी मान्य केली चीनची घुसखोरी

एकविसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट समकालीन कवी कोण? या प्रश्नाचं उत्तर अर्थातच निकारागुआचे कवी अर्नेस्तो कार्देनाल असं आहे. जवळपास गेली सात दशकं कार्देनाल यांनी आपल्या कवितेतून जगभरच्या वाचकांना मुग्ध केले आहे; आणि आपल्या कवितेच्या वैविध्यपूर्ण विषयांनी विस्मयचकितही केले आहे.

सुरवातीच्या काळात निखळ प्रेमकविता लिहिणाऱ्या या कवीचा नंतरचा प्रवास पाहता, त्याला कुठल्याही एकाच मापाने मोजणं कदापि शक्य नाही जे स्पष्ट होतं. त्याला तरल अभिव्यक्तीतून सुंदर प्रेमकविता लिहिणारा कवी म्हणावं? की सामाजिक भानातून सामान्यांच्या जीवनातील संघर्ष टिपणारा अवलिया? आपल्या राष्ट्राच्या दमनाचा आणि संघर्षाचा इतिहास दीर्घ कवितेतून मांडणारा राष्ट्रकवी की अत्याधुनिक विज्ञान कवितेतून मांडत जीवनाचा अर्थ उलगडून दाखविणारा तत्वज्ञानी म्हणावं? या प्रश्नाचं उत्तर देणं फारच कठीण आहे. कारण अर्नेस्तो कार्देनाल एकाचवेळी हे सारं आणि त्याहून खूप काही होते.

मनुष्याला आपल्या जीवितकार्याची ओळख पटणं हा त्याच्या जीवनातील सर्वात निर्णायक क्षण असतो. मात्र ते समजून येण्यासाठी कुणाला आयुष्यातला बराच काल खर्ची घालावा लागतो; तर कुणाला ते आयुष्यभर समजतही नाही. त्यामुळे सर्वस्वी अज्ञात कारणांनी परिस्थितीवश मनुष्य नाही नाही ते कार्य करत जीवन व्यतीत करतो. कविता म्हणजे काय? हे न समजलेले असे किती Walt Whitman आपली सुप्त ताकद न ओळखताच मातीआड गेले असतील, याची गणती नाही.

अर्नेस्तो कार्देनालच्या बाबतीत सुदैवाने असं झालं नाही. एका मुलाखतीत, “तुम्ही कविता कधीपासून लिहायला लागला?” या प्रश्नाचं उत्तर कार्देनाल यांनी “वयाच्या चौथ्या वर्षापासून” असं दिलं, यावरून हे स्पष्ट नाही का?

अर्नेस्तो कार्देनाल यांच्या कवितालेखनाचा काल त्यांच्या पंधराव्या वर्षापासून काढता येतो. सुरवातीच्या काळात त्यांनी लिहिलेल्या कवितांवर पाब्लो नेरुदांच्या कवितांचा मोठा प्रभाव आहे. त्या प्रभावातून त्यांनी अनेक प्रेमकविता लिहिल्या. आजही या कविता वाचकाला विलक्षण सुंदर अशी अनुभूती देतात.

कोस्टा रिकाच्या या गुलाबांचा

स्वीकार कर मरिअम,

या प्रेमकवितांसोबत:

या कविता तुला आठवण करून देतील;

की गुलाबाचे चेहरे तुझ्या चेहऱ्यासारखे आहेत.

हे गुलाब तुला आठवण करून देतील,

की प्रेमाला तुटायलाच हवं,

आणि तुझ्या चेहऱ्याचं, रोम आणि ग्रीस सारखंच पतन होईल.

जेव्हा नसेल प्रेम आणि नसतील कोस्टा रिकाचे गुलाब,

मरिअम, तेव्हा आठवेल तुला हे उदास गीत.

तरुण कार्देनाल जेव्हा नुकताच कविता लिहू लागला होता तेव्हा आणि त्याही आधीपासून निकारागुवावर सोमोझाचं नियंत्रण होतं. सोमोझाच्या जुलमी राजवटीखाली दबून गेलेली जनता तो पाहत होता. त्याच्या संवेदनशील कविमनाला हे सारं अतिशय त्रस्त करणारं असं होतं. विशुद्ध प्रेमकविता लिहिणाऱ्या अर्नेस्तोला आपल्या प्रेमकविता आता अपुऱ्या वाटत होत्या. सभोवतालच्या भयकारी वास्तवाकडे डोळेझाक करून प्रेमकवितांमध्ये गुंतून पडणं म्हणजे कलावंत म्हणून अटळपणे आत्महत्या करण्यासारखं होतं. आणि अस्सल कलावंत असणाऱ्या कार्देनालला ते नामंजूर होतं.

आपल्या सभोवतालच्या छिन्न-विच्छिन्न जगाची मूळं राजकीय आहेत, सोमोझाच्या राजवटीत आहेत याची पक्की जाण त्याला होती. सोमोझावर त्याने टीकेची झोड उठवली; आणि एप्रिल क्रांती नावाने ओळखल्या जाणाऱ्या सोमोझा विरुद्ध झालेल्या प्रसिद्ध उठावात सशस्त्र भाग घेतला. या बंडात सहभागी झालेल्या अनेकांना सोमोझाने पकडून फासावर लटकावलं. अर्नेस्तो मात्र कसाबसा त्यातून बचावला. पण त्यानंतरची दोन वर्षे त्याने अटकेच्या भीतीत घालवली. या काळात त्याने अनुभवलेला हिंसाचार आणि पाशवी वृत्ती यांनी भयंकर एकटेपणाने त्याला घेरल्यासारखे झाले. अर्नेस्तोच्या भावविश्वात या साऱ्यांमुळे विलक्षण उलथापालथ झाली. आणि त्याची कविताही त्यानंतर बदलून गेली. त्यानंतर लिहिलेल्या कविता अधिकाधिक राजकीय होऊ लागल्या.

काल रात्री दफनभूमी बाहेर,

बंदुकांच्या फैरी ऐकू येत होत्या.

कुणालाच ठाऊक नाही; कोण मारलं गेलंय,

कितीजण मारले गेलेत,

कुणालाच काही ठाऊक नाही,

रात्री दफनभूमी बाहेर,

केवळ बंदुकांच्या फैरी ऐकू आल्या,

एवढंच.

कार्देनालच्या या राजकीय कविता केवळ त्याच्या विचारांचा शुष्क असा अाविष्कार नाहीत. त्याच्या राजकीय कवितांमध्येही एक प्रकारचं सौदर्य आहे. आपल्या व्यक्तिगत जीवनातील दाखले देत, राजकीय उलथापालथीमुळे सामान्यांचे जीवन कसे दुभंगत गेले हेही त्याने प्रभावीपणे कवितेतून मांडले. या कठीण काळात कवितेनेच त्याला विखरून जाण्यापासून बचावलं. त्याचा आशावाद जागता ठेवला. आणि महत्त्वाचं म्हणजे, त्याची संवेदनशीलता आणि कवितेतील हळूवारपणा यांची जपणूक केली.

रस्त्याच्या मधोमध उभं राहून

मी वाटली आहेत भूमिगत पत्रकं

शस्त्रधारी सैनिकांना बधीर करत

क्रांती चिरायू होवोचे दिले नारे

मी सहभागी झालो, एप्रिलच्या बंडातही

पण फिका पडतो आजही तुझ्या घरासमोरून जाताना,

थरकाप उडवते माझा तुझी एक नजरही.

मात्र या कविता लिहित असताना त्याला दुसरा एक निराळाच पण गूढ असा आवाज साद घालत होता. हा आवाज दुसरा तिसरा कुठलाही नसून प्रत्यक्ष निर्मात्याचा आहे, देवाचा आहे असं त्याला वाटत होतं. त्याच्यावर भुरळ पाडणाऱ्या शारीरप्रेमाचा प्रभाव एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला त्याच्या आत्म्याला साद घालणारा दैवी आवाज अशा विचित्र कात्रीत अर्नेस्तो सापडला होता. दुहेरी आयुष्य जगणं त्याला नामंजूर होतं. आणि कुणा एकाची निवड करायची तर दुसऱ्याला कायमचा निरोप देण्यासारखं होतं.

अखेर अर्नेस्तोने निर्मात्याच्या हाकेला प्रतिसाद द्यायचं ठरविलं; आणि त्याचा परिणाम म्हणून पुढच्या आयुष्यातला मोठा कालावधी तो पाद्री बनला होता. पण केवळ बायबल वाचून दाखविणारा आणि यांत्रिकपणे धार्मिक विधी करणारा असा तो पाद्री नव्हता. विश्वनिर्मितीच्या वैज्ञानिक इतिहासातून तो परमेश्वराच्या जवळ जाऊ पाहत होता. आपली श्रद्धा जागृत ठेवण्यासाठी धार्मिक ग्रंथांवर त्याला विसंबून राहावं लागत नव्हतं; पुंजयांत्रिकीसारख्या अत्याधुनिक वैज्ञानिक संकल्पनांतून आपल्या श्रद्धेची मूळं तो तपासून पाहत होता. विशेष म्हणजे या साऱ्या प्रवासात त्याचा मार्क्सवादी दृष्टीकोन अधिकाधिक मानवी रूप घेत होता. एकाच वेळी पाद्री आणि कम्युनिस्ट असं जगावेगळं रूप केवळ  अर्नेस्तो कार्देनालच्या रूपात पाहायला मिळतं.

अर्नेस्तो कार्देनाल यांची काव्यशैली

अर्नेस्तो कार्देनाल यांच्या शैलीसाठी ‘exteriorismo’ ही स्पॅनिश भाषेतील संज्ञा वापरण्यात येते.  या संज्ञेचा अर्थ; “आपल्या सभोवतालच्या विश्वातील प्रतिमांमधून कवितेची निर्मिती करणं”, असा आहे.  ‘exteriorismo’ ही संज्ञा कार्देनाल यांच्या कवितेचं अचूक मर्म उलगडणारी आहे. वरील संज्ञेच्या व्याखेप्रमाणे, त्यांनी आपल्या कवितेतून खऱ्याखुऱ्या घटनांचे दाखले दिले, काल्पनिक पात्रांना चेहरे न देता, वास्तवातील व्यक्तींनाच कवितेत स्थान दिले, अनेक व्यक्ति, घटना आणि स्थळांची अचूक आणि तपशीलवार नोंद करून महाकाव्यसदृश्य ऐतिहासिक आणि विज्ञान कवितांची निर्मिती केली.

उदाहरणार्थ, विश्वाच्या निर्मितीवरील एका कवितेत कार्देनाल ‘black holes’ अर्थात कृष्णविवरांसंबंधी लिहिताना, तिचा केवळ प्रतिमा अथवा मिथकासारखा उल्लेख न करता कृष्णविवरांसंबंधी अचूक तपशिलाची मांडणी करतात.

……ताऱ्यांचं इंधन संपून गेलंय

मी पाहतोय एक एक तारा

मरून जाताना,

सिगारेटचं जळकं थोटूक

विझून बंद झाल्यासारखं.

न्यूट्रॉन तारे, जे अजूनही

दिसले नाहीत ताकदवान दुर्बिणींना,

शास्त्रज्ञांना मात्र कल्पनेतून दिसतायत;

आणि त्याहून जड तारे

म्हणजे कृष्णविवरं आहेत.

वैश्विक व्हॅक्युम क्लीनरसारखी

कृष्णविवरांची पोकळी,

जिथं गुरुत्वाकर्षण इतकं तीव्र असतं

आणि वक्रता एवढी प्रचंड; की

गिळंकृत होतो प्रकाशही….

वरील कवितेत आलेले कृष्णविवरांसंबंधी अचूक तपशील विज्ञानविषयक लिहिणाऱ्या लेखकालाही लाजवेल असे आहे. विशेष म्हणजे, अर्नेस्तो कार्देनाल यांनी विज्ञान क्षेत्रातील कसलेही औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. असे असताना त्यांचे अत्याधुनिक संशोधनाविषयी असलेले अद्ययावत ज्ञान आणि त्याची अचूक आणि तपशिलवार मांडणी करण्याची हातोटी थक्क करणारी अशी आहे.

जगाच्या कवितेच्या इतिहासात अशा कविता लिहू शकणारे कार्देनाल बहुधा एकमेव कवी असावेत. विज्ञानविषयक लिहिताना त्यांची कविता केवळ अचूक तपशिलापुरती मर्यादित राहणारी नव्हती. तर त्यातून मानवी जीवनाचा अर्थ उलगडून दाखवून देणारी विलक्षण काव्यमय अशी अभिव्यक्ती होती. वानगीदाखल, ताऱ्यांचं जीवन आणि आपलं जीवन यांतील साम्ये शोधत आपणही या विराट सृष्टीचे एक अभिन्न असे अंग आहोत हे विशद करणारी कविता पाहा.

ताऱ्यांची धूळ

ताऱ्यांच्या आत काय आहे? आपण आहोत.

आपल्या देहातील सारी मूलतत्वं

आणि या धरेची मूलतत्वं

कधी ताऱ्याच्या पोटात होती.

आपणही ताऱ्यांची धूळच आहोत मुळी.

१५,०००,०००,००० वर्षांपूर्वी, आपण अवकाशात विहरणाऱ्या

हायड्रोजन वायूचा एक ढग होतो.

वायू अधिकाधिक आकुंचन पावत सघन बनत गेला

आणि तारा बनून प्रकाशू लागला.

या ताऱ्याला, गुरुत्वकार्षणाने बहाल केली

प्रकाश आणि उष्णता;

म्हणजेच बहाल केलं प्रेम.

तारे जन्माला आले, विकसित झाले आणि मरून गेले.

आणि आकाशगंगेला येऊ लागला

एका फुलाचा आकार

जशी दिसते आकाशगंगा नक्षत्रांकित रात्री.

आपली हाडे आणि आपलं मांस,

हेही दुसऱ्याच ताऱ्यांची देणगी आहेत,

कदाचित दुसऱ्या आकाशगंगेची.

आपण वैश्विक आहोत.

आपल्या मृत्यूनंतरही, आपण बनवू दुसरे तारे,

आणि दुसऱ्या आकाशगंगा.

आपण ताऱ्यांमधूनच आलो आहोत;

आणि ताऱ्यांकडेच आपण जाऊ परतूनही.

(छायाचित्र -सौजन्य पेन इंटरनॅशनल)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1