परंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार

परंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार

हिंदू-मुस्लिम संवाद - फारसी ही राजव्यवहाराची भाषा झाल्यामुळे आणि इथले लोक खूप मोठ्या संख्येने मुसलमान झाल्याने इथल्या स्थानिक भाषांवर अनुक्रमे अरबी आणि फारसी या भाषांचा प्रभाव पडणे साहजिक होते. अरबीमधून भारतीय भाषांमध्ये आलेले बहुसंख्य शब्द हे जसेच्या तसे या भाषांमध्ये आलेले आहेत.

सरकार ठरवणार दहशतवादी कोण : यूएपीए विधेयक संमत
मंकीपॉक्स: भारत साथ हाताळण्यासाठी सज्ज आहे का?
जगणं शिकवून गेलेला माणूस

भाषांमधील देवाण-घेवाण, या निमित्ताने होणारी सांस्कृतिक देवाण-घेवाणही अनेक गोष्टींवर अवलंबून असते. यामध्ये त्या काळचे राजकारण, समाजकारण आणि धर्मकारण सगळ्यात महत्त्वाचे असते. मुघल इथे त्यांची राजवट स्थिर करण्याआधी दिल्ली परिसरात पाच राजवटी होऊन गेल्या.

संपूर्ण भारतीय उपखंडाच्या इतिहासात सर्वसाधारणपणे इसवी सनाच्या दहाव्या शतकापासून भक्तिमार्गी चळवळ रुजलेली आणि क्रमाने वाढलेली दिसते. या लेखाचा मुख्य विषय भाषिक आदानप्रदान हा असल्याने या चळवळीविषयी स्वतंत्र लिहिणार आहे तेव्हा तिचा स्वतंत्र आढावा घेईनच. हिंदू भक्तिमार्गी चळवळीतील संतांनी आणि कवींनी आपापल्या प्रांतात काम करताना आपापल्या आराध्य दैवतांच्या भक्ती रचना केलेल्या आढळतात. उपलब्ध रचनांमध्ये नाथपंथीय आणि महानुभवीय रचना या सगळ्यात पहिल्या.

बगदादमध्ये इसवी सनाच्या सातव्या शतकाच्या शेवटापासूनच सूफी विचारधारा मूळ धरू लागली होती. या परंपरेतील हसन बसरी आणि राबिया बसरी ही दोन नावे संपूर्ण सूफी पंथाच्या इतिहासात सुप्रसिद्ध आहेत. सूफी पंथ हळूहळू इराकमध्ये आणि नंतर मध्य आशियात सर्वत्र पसरू लागला. या लेखात फक्त भाषिक देवाणघेवाण हा मुद्दा आपण पाहणार आहोत.

गुरु-शिष्य परंपरा जरी अरबस्तानात नवीन नसली तरी सूफी पंथाच्या प्रसारानंतर अशा परंपरा अनेक तऱ्हेचे सामंजस्याचे आणि समन्वयाचे व्यवहार सुरू करणार होत्या. यातून कादरिया, नक्षबंदी, जिलानी, चिश्ती अशा अनेक परंपरा निर्माण झाल्या. या सर्व परंपरांमधले विद्वान आणि संतपुरुष हळूहळू, मुसलमान ज्या भौगोलिक मार्गाने भारतात शिरले त्याच मार्गाने भारतामध्ये आले. भारतात याच सुमारास भक्ती पंथ उदयास येत होते. दहाव्या शतकापासून पुढील काळात नाथपंथीय अशा भक्तीमार्गीय पंथांपैकी पहिले. नाथपंथीयांपैकी एक गोरक्षनाथ यांनी अक्षरशः संपूर्ण भारतात प्रवास करून नाथ पंथाचा प्रचार आणि प्रसार केलेला आढळतो.

यानंतर भारतात सर्वत्र अनेक देवतांना आराध्य दैवत मानून प्रांतोप्रांती अनेक भक्तीचे व उपासनेचे पंथ निर्माण झालेले आढळतात. या पंथांमध्ये आणि मुसलमानी सूफी परंपरांमध्ये सर्व तऱ्हेची देवाणघेवाण होत होती. नाथपंथियांनंतर महाराष्ट्रात आधी महानुभाव आणि किंचित नंतर दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकात बसवेश्वरांचा पंथ निर्माण झालेला दिसतो. ज्ञानेश्वर आणि नामदेव यांच्या काळापासून पुढे महाराष्ट्रात वैष्णव परंपरा असणारा वारकरी पंथ निर्माण झालेला दिसतो.

असेच काहीसे भारतातील इतरही प्रांतांमध्ये घडलेले दिसते. अमीर खुसरो यांना उर्दूतील गझल, रुबाया आणि कव्वाली या काव्य प्रकारांचे जनक मानले जाते. तसेच यांनाच उर्दूतील पहिले साहित्यिक म्हणायचा प्रघात आहे.

भारतातील छंदोबद्ध आणि वृत्तबद्ध काव्यरचना जरी वेद काळाइतकी जुनी असली तरी इसवी सनाच्या पहिल्या सहस्त्रकात आज ज्याला संस्कृत अभिजात साहित्य आणि काव्य म्हटले जाते ते आणि प्राकृत भाषांमधले साहित्य निर्माण होत होते. अरबी, फारसी, पंजाबी, सिंधी, संस्कृत अशा अनेक भाषा येणारे बहुभाषाकोविद आणि विद्वान मुसलमानी सल्तनतींच्या काळात निर्माण होत होते.

अमीर खुसरो हे नाव अशा विद्वानांपैकी इतिहासातले सगळ्यात सुप्रसिद्ध आणि पहिले. हे दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन अवलिया यांचे शिष्य. हजरत निजामुद्दीन हे सूफींच्या चिश्ती परंपरेतील सुप्रसिद्ध संत. खुसरोंचे नाव सुप्रसिद्ध असण्याचे प्रमुख कारण म्हणजे यांनी दिल्लीतील बऱ्याच सल्तनती बघितल्या आणि दरबारी म्हणून काम केले. यांचे बरेच लेखन फारसीत असले तरी यांनी अरबी, पंजाबी आणि हिंदवी भाषांमधूनही रचना केल्या आहेत. जरी यांना उर्दूचे पहिले कवी आणि लेखक म्हटले जात असले तरी यांच्या उपलब्ध हिंदी किंवा उर्दू रचना यांचे सर्व संदर्भ अठराव्या शतकानंतरचे आहेत.

अरबी आणि फारसी काव्य प्रकार कसलदा, नात, मर्सिया हे भारतातले कवी लिहू लागले होते. खुसरो हे नाव सुप्रसिद्ध अशासाठी की रुबाई, कव्वाली आणि गज़ल हे सुप्रसिद्ध उर्दू काव्यप्रकार अमीर खुसरो यांनी खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण केले. भारतीय संगीतातही खुसरो यांचे अमूल्य योगदान आहे. तराणा या गानप्रकाराबाबत खुसरो यांच्याशी निगडित असणारी दंतकथा नमूद करायला हवी. देवगिरीचे राज्य जिंकल्यावर अल्लाउद्दीन खिलजीने येथील दरबारी कलाकारही दिल्लीला नेले. गोपाल नायक या देवगिरी दरबाराच्या गायकाला खिलजीने सलग सहा रात्री कदंबक हा राग दरबारात गायला लावला. या संपूर्ण काळात खुसरो सिंहासनामागे लपून बसलेला असे. सातव्या रात्री खुसरोने गोपाल नायकाने सादर केलेला राग जशाच्या तसा हुबेहूब दरबारात सादर केला तेव्हा गोपाल नायकासह सर्व दरबार आश्चर्याने थक्क होता! गोपाल नायकाची भाषा मात्र खुसरोला समजत नसल्याने खुसरोने अर्थहीन अक्षरे स्वतःच्या सादरीकरणात वापरली. अशा अर्थहीन रागदारी रचनेला तराना म्हणजेच तराणा ही संज्ञा मिळाली. जी आजही प्रचलित आहे.

फारसी ही राजव्यवहाराची भाषा झाल्यामुळे आणि इथले लोक खूप मोठ्या संख्येने मुसलमान झाल्याने इथल्या स्थानिक भाषांवर अनुक्रमे अरबी आणि फारसी या भाषांचा प्रभाव पडणे साहजिक होते. अरबीमधून भारतीय भाषांमध्ये आलेले बहुसंख्य शब्द हे जसेच्या तसे या भाषांमध्ये आलेले आहेत. आधुनिक भाषाशास्त्रीय अभ्यास सुरू झाल्यावर या भाषिक आदान-प्रदानाचा शास्त्रीय अभ्यास अनेक जणांनी सातत्याने केला आहे. हज, हाजी, इमान, जन्नत, जहन्नुम, हकीकत, हक (हक्क), हिकमत (युक्ती किंवा शहाणपण), दुनिया, सलाम, सैतान, सदका, जुल्म (जुलूम), अदालत, फसाद, कबर, कलम, कफन, लज्जत, मातम, मुकाम (मुक्काम), मौत, वफा, वादा, यकीन असे अरबी शब्द भारतातील बहुतांश भाषांनी स्वीकारलेले आहेत.

फारसी भाषेची गोष्ट अरबीहून थोडी वेगळी अशासाठी आहे की, मुळात फारसी ही भारोपीय भाषा आहे. त्यामुळे भाषाशास्त्रीय दृष्टीने फारसी आणि भारतीय भाषांमध्ये खूप जास्त फरक नाही. आज एकविसाव्या शतकात भारतात हिंदी आणि उर्दू या दोन स्वतंत्र भाषा मानल्या जातात. वास्तविक या दोन स्वतंत्र भाषा मानण्याची कारणेच भारताच्या विसाव्या शतकातील समाजकारणात आणि राजकारणात दडलेली आहेत. भारतात एकेकाळी या दोन्ही भाषांसाठी हिंदवी असे नाव वापरले जात होते. आजच्या हिंदीतील बहुतेक तत्सम शब्द संस्कृत आहेत आणि उर्दूतील असे शब्द बहुतेक अरबी आणि फारसी आहेत. खरे तर एवढाच फरक या दोन भाषांमध्ये आहे. दोन्ही भाषांचे व्याकरण आणि क्रियापदे बहुतांश समान आहे. कबूल, शक, निगाह, सफर, आसमान, राह, तंग, जहर, आवाज, खत अशा शब्दांकडे जर आपण बघितले तर लक्षात येईल की अशा शब्दांपासून बऱ्याच भारतीय भाषांमध्ये नवीन क्रियापदे, वाक्प्रचार आणि म्हणीही निर्माण झाल्या आहेत.

भारतातील संपूर्ण उपखंडात ज्यावेळी अरबी आणि फारसीचा असा सार्वत्रिक संचार दिसतो तेव्हा इथल्या समाजजीवनातील बहुप्रतलीय व्यवहार नजरेस पडू लागतात. भारतातले मुसलमान जो नमाज़ पढतात तो नमाज़ही अरबी शब्द नाही. नमाज़साठी अरबी शब्द आहे सलात. शिकल्यासवरल्या मुसलमानांना जरी सलात शब्द ठाऊक असला तरी ते नमाज़ हा शब्दच वापरतात. कारण नमाज़ हा शब्द सगळ्यांना समजतो. फक्त धर्म आणि उपासना म्हणजे मानवी आयुष्य नव्हे. माणसाच्या जगण्याशी संबंधित कला, विज्ञान आणि तंत्रशास्त्रे अशा प्रत्येक विषयात भारतीय उपखंडात नेहमीच हिंदू आणि मुसलमानांमध्ये सातत्याने संपर्क झालेला आहे. यापैकी भाषांबाबत काय घडत गेले? ते आपण बघितले.

पुढच्या लेखात बघूयात कंठ आणि वाद्यसंगीत या क्षेत्रामध्ये कशा तऱ्हेचा संवाद झाला. इस्लामने संगीताला प्रोत्साहन दिलेले नाही. हे बहुतेक सर्वांना ठाऊक असते. असे असताना कंठ आणि वाद्यसंगीतात प्रवीण असणारी भारतीय माणसे जितकी हिंदू असतात तेवढीच मुसलमानही असतात. आणि दीडशे वर्षांपूर्वी जे संगीत भारतात होते त्यामध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात तर बहुतेक सर्व कलाकार मुसलमान होते. भारतीय समाजातील अशा अनेक विसंगती समजून घेणे आवश्यक आहे.

राजन साने, हिंदू-मुस्लिम संवादाचे अभ्यासक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0