चंद्र (अजूनही) आहे साक्षीला … नव्या शीतयुद्धाच्या !

चंद्र (अजूनही) आहे साक्षीला … नव्या शीतयुद्धाच्या !

पृथ्वीच्या जवळचा शेजारी असलेला चंद्र हा जगातील विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती केलेल्या देशांच्या नवीन स्पर्धेचे आणि खरे तर एका नव्या शीतयुद्धाचे प्रतीक ठरत आहे. सध्या जगभरातील अनेक देश चंद्रावर संशोधन किंवा संसाधनांचा शोध या दोन कारणांसाठी जाण्यासाठी केवळ उत्सुकच नाही तर आक्रमक झाले आहेत.

युघुर प्रश्न : चीनच्या महत्वाकांक्षेतून निर्माण झालेली समस्या
पाकिस्तान चीनच्या ‘विषारी वायूं’मुळे हवेचे प्रदूषण: भाजप नेता
आमार कोलकाता – भाग ७ – कोलकात्यातील चीनी

१९६९मध्ये नासाच्या ‘अपोलो-११’ मोहिमेमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले पाऊल ठेवल्यानंतर पहिल्यांदा संबंध मानवजातीमध्ये चंद्र या उपग्रहाबद्दल प्रचंड उत्सुकता आणि आकांक्षा निर्माण होण्याचे हे दिवस आहेत. खरं तर अमेरिकेने चंद्र मोहीम थांबवण्याला आता ४६ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांनी ‘अपोलो-१७’च्या माध्यमातून डिसेंबर १९७२मध्ये शेवटचे यान चंद्रावर पाठवले होते. अपोलो प्रकल्प साखळीने (१९६७-१९७२) मानवी अंतराळ उड्डाणाची अनेक उत्तुंग शिखरे गाठून ऐतिहासिक कामगिरी केली. पृथ्वीच्या कक्षेपासून ‘अपोलो-८’ मानवी यान पाठवणारा तसेच उपग्रहाचे परिभ्रमण करणारा पहिला प्रकल्प होता. १९७२ मध्ये ‘अपोलो-१७’ यानामधून शेवटचे मानवी यान चंद्रावर उतरले होते. संपूर्ण अपोलो प्रकल्पाने एकूण ३८२ किलो वजनाचे चंद्रावरचे दगड पृथ्वीवर संशोधनासाठी आणले गेले आणि आजही या दगडांवर संशोधन चालू आहे असे नासाने अलीकडे केलेल्या घोषणेवरून समजते. पृथ्वीपासून २००० किमीपर्यंत स्थिती असलेले “लो अर्थ ऑर्बिट’ (कक्षा)च्या पलीकडे गेलेले ते शेवटचे मानवी यान होते.

अपोलो यान प्रकल्पाची सुरुवात जागतिक राजकारणातील शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर झाली. नोव्हेंबर १९६० मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जॉन एफ. केनेडी यांची निवड झाली. त्या वेळी झालेल्या निवडणूक प्रचारामध्ये आंतरखंडीय क्षेपणास्त्रे (ICBM) व त्याबद्दलच्या तंत्रज्ञानामध्ये रशियाला आपण मागे टाकू असे आश्वासन केनेडी यांनी दिले होते. पण अमेरिकेला पहिला धक्का बसला तो १२ एप्रिल १९६१ रोजी जेव्हा रशियाच्या युरी गागारीन अवकाशात भरारी घेणारा पहिला मानव बनला तेव्हा… अवकाशात गेलेल्या पहिल्या मानवापूर्वी म्हणजे युरी गागारिनपूर्वी अवकाशात माशी, उंदीर, माकड, कुत्री, मांजरी, चिंपांझी या प्राण्यांना पाठवण्यात आले होते. मात्र पहिला अंतराळवीर आणि तोही शीतयुद्धातील शत्रूराष्ट्राचा, हे समजल्यावर अमेरिकेमध्ये अभूतपूर्व खळबळ उडाली. असा धक्का ४ ऑक्टोबर १९५७ रोजी स्पुटनिक हा मानवी इतिहासातील कृत्रिम उपग्रह रशियाने सोडला तेव्हाही अमेरिकेला बसला होता. त्यानंतर सोव्हिएत युनियननेच बनवलेले ‘ल्यूना-२’ (Luna 2) हे संपूर्ण मानवजातीचे पहिले मानवरहित यान १३ सप्टेंबर १९५९ रोजी चांद्रभूमीवर पोचले. परंतु अंतराळवीर असलेले यान अवकाशात जाण्याने त्याला एक युद्ध आणि स्पर्धा याच्या पलीकडे अमेरिकन जनतेच्या स्वप्नांना साद घातली.

या स्वप्नांचा म्हणा किंवा सोव्हिएत युनियनप्रति जपलेल्या शत्रुत्वाचा भावनात्मक प्रतिक्रियेचा रेटा एवढा जबरदस्त होता की गागारीन अवकाशात गेल्यानंतर महिन्याभरातच म्हणजे २५ मे १९६१ रोजी अमेरिकेच्या संसदेमध्ये म्हणजेच काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्राध्यक्ष केनेडी यांनी १९६०-७० हे दशक संपण्याअगोदर अमेरिकेचे अंतराळवीर चंद्रावर जाऊन सुखरूप परत येतील या आशयाची महत्त्वाकांक्षी घोषणा केली. पुढे जसं म्हणतात “Rest is History’, तसंच घडलं !

आता या २० जुलैला त्या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली. संपूर्ण जगभरात चंद्रावर उतरलेले दोघे नील आर्मस्ट्राँग, बझ आल्ड्रिन आणि त्याच वेळी चंद्राभोवती यानाने प्रदक्षिणा घातलेला अंतराळवीर मायकेल कॉलिन्स यांच्या आठवणी जागवल्या गेल्या. त्या ऐतिहासिक घटनांचा इतिहास पुन्हा या निमित्ताने सर्वाना आणि विशेषतः २१ व्या शतकातील नव्या पिढीसमोर, बालकांसमोर, युवकांसमोर मांडला जात आहे. त्या रोमांचक इतिहासाची उजळणी सुद्धा आपल्या सर्वांमध्ये विज्ञानप्रेमाची उत्तुंग शीतल भावना निर्माण करते ज्याने संपूर्ण मानवजातीचे भले करण्यासाठी या चंद्राला शेकडो वर्षे श्रद्धेच्या सीमेवरची साद घातली होती. तसेच या ‘अपोलो-११’ यानाचे चंद्राच्या भूमीला स्पर्श करणे हे आपल्या संपूर्ण मानवजातीसाठी आपल्या या अथांग विश्वाला समजून घेण्याची एक सखोल उर्मी देते हे खरे तर त्या मोहिमेचे अद्वितीय यश होते. परंतु आज या उर्मीला एक स्पर्धात्मक वळण मिळाले आहे ते आपल्याला कोणत्या दिशेने घेऊन जाणार आहे, त्याचे संकेत मिळायला सुरुवात झाली आहे.

भारताने सोडलेले ‘चांद्रयान-२’ हे अवकाशयान हे या दिशेने सुरू झालेल्या प्रवासातील एक महत्त्वाची घटना म्हणता येईल. पृथ्वीच्या जवळचा शेजारी असलेला चंद्र हा जगातील विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती केलेल्या देशांच्या नवीन स्पर्धेचे आणि खरे तर एका नव्या शीतयुद्धाचे प्रतीक ठरत आहे. सध्या जगभरातील अनेक देश चंद्रावर संशोधन किंवा संसाधनांचा शोध या दोन कारणांसाठी जाण्यासाठी केवळ उत्सुकच नाही तर आक्रमक झाले आहेत.

नासाने हे जाहीर केले आहे की २०२८ पर्यंत नवीन शास्त्रीय शोध लावण्यासाठी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे पथदर्शी प्रकल्प साकार करण्यासाठी चंद्रावर सातत्यपूर्ण वावर व प्रवास वाढवणार आहे. त्यासाठी “Forward to the moon’ या महत्त्वाकांक्षी अभियानाची घोषणा केली आहे. “Forward to the moon’ या कार्यक्रमासाठी अमेरिकेने जाहीर केलेली उद्दिष्टे अशी :

१) मंगळ ग्रहावर जाण्यासाठी वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षमता सिद्ध करणे. 

२) अंतराळामध्ये अमेरिकेचे नेतृत्त्व पुनर्स्थापित करणे आणि सामरिक शक्ती प्रदर्शन करणे.

३) नवीन पिढीमध्ये विज्ञान तंत्रज्ञानाची आवड निर्माण करणे.

४) मानवजातीला अभूतपूर्व परिवर्तनासाठी लागणाऱ्रे विज्ञान-तंत्रज्ञान विकसित करण्यात आघाडी घेणे.

५) या प्रकल्पातून अमेरिकेचा जागतिक स्तरावर आर्थिक दबदबा वाढवणे.

६) दूरस्थ अंतराळात (Deep Space) मध्ये  अमेरिकन उद्योग आणि आंतरराष्ट्रीय संस्था यांच्यात भागीदारीला प्रोत्साहन देणे.

२०२४ पर्यंत चंद्रावर मानवी यान घेऊन जाणारे ‘आर्टेमिस’ हे यान हे याच दूरगामी मोहिमेचा भाग आहे. २०२४ पर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर दोन अंतराळवीर उतरवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या नासा राबवत आहे. ‘आर्टेमिस’ या यानाच्या साहाय्याने ‘Gateway’ नावाचे चंद्राभोवती भ्रमण करणारे एक स्पेस स्टेशन बांधण्याचे काम नासा २०२२ मध्ये हाती घेणार आहे. यातील यानातून बाहेर पडणारी बग्गी (rover) ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ असलेल्या अनेक विवरांचा अभ्यास करण्यासाठी जाईल जेथे बर्फाचे प्रचंड असे कायमस्वरूपी जमा झालेले थर आहेत. हा बर्फाचा खजिना नासाला अतिशय महत्त्वाचा वाटतो कारण याद्वारे अंतराळवीरांना जिवंत ठेवले जाऊ शकते तसेच बर्फामध्ये असलेल्या ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा यानाच्या इंधनासाठी सुद्धा वापर केला जाऊ शकतो.

२००८मध्ये भारताच्या ‘चांद्रयान-१’ मोहिमेमध्ये चंद्रावर बर्फाचे स्पष्ट पुरावे मिळाले होते त्या दृष्टिकोनातून आपल्याला नासाच्या या मोहिमेचे महत्त्व लक्षात येईल. २००८ मध्ये जेव्हा भारताचे ‘चांद्रयान-१’ चंद्राच्या पृष्ठभागावर पोचले तेव्हा त्यामध्ये एक ऑर्बिटर (परिभ्रमण करणारे छोटे यान) आणि एक इम्पॅक्टरचा समावेश होता. २००८ मध्ये चंद्रावर यानाच्या आगमनानंतर लगेचच त्याला पाण्याचे बर्फ असल्याचे पुरावे मिळाले. ‘चांद्रयान -२’ चे २२ जुलै रोजी यशस्वी उड्डाण झाले आणि ६-७ सप्टेंबर २०१९च्या दरम्यान जेव्हा हे या चंद्रावर उतरेल तेव्हा ते अमेरिका, रशिया आणि चीन नंतर “सॉफ्ट लँडिंग” करणारे चौथे यशस्वी राष्ट्र ठरेल. अलीकडेच एप्रिल २०१९ मध्ये इस्राईलने हा प्रयत्न केला होता परंतु ते एका अपघातामुळे शक्य झाले नाही. SpaceIL आणि Israel Aerospace Industries या उद्योगांनी संयुक्तपणे बांधलेल्या १०० दशलक्ष डॉलरच्या अंतराळयानाचा लँडिंग करण्याआधी  इस्राईलच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि ते चंद्राच्या पृष्ठभागावर आदळून नष्ट झाले.

गेल्या काही वर्षांपासून, युरोपीय स्पेस एजन्सीच्या (ESA) च्या तंत्रज्ञांनी चंद्रावर कायमस्वरुपी मानवी वस्ती स्थापन करण्याची त्यांची इच्छा वारंवार व्यक्त केली आहे. कोरिया एरोस्पेस रिसर्च इन्स्टिटयूट (KARI) ने अलीकडे केलेल्या घोषणेनुसार दक्षिण कोरियाने २०२० पर्यंत चंद्रावर “कोरिया पाथफाईंडर ल्यूनार ऑर्बिटर’ (KPLO) या नावाने मिशन फत्ते करण्याचे आव्हान स्वतःसमोर ठेवले आहे. चीनने सुद्धा आधीपासून Chang’e (चिनी चंद्र देवता) नावाच्या महत्वाकांक्षी रोबोटिक चांद्र-शोध मोहिमेची सुरुवात केली आहे. २००७ आणि २०१० मध्येच चीनकडून या प्रकल्पाद्वारे चंद्राभोवती उपग्रह पाठवले गेले. २०१३ मध्ये आणि अलीकडेच जानेवारी मध्ये Landers and Rovers चांद्रभूमीवर उतरवण्यात चीन यशस्वी झाला. चीनच्या अलीकडच्या Chang’e 4 या प्रकल्पाद्वारे आपण सर्व चंद्राची आजवरची सर्वात रहस्यमय बाजू (Far Side of the Moon) पाहू शकलो. २०२०च्या दशकात, चीनने चंद्रावरील दगडांचे नमुने पृथ्वीवर आणण्याची एक महत्त्वाकांक्षी योजना बनवली आहे. त्याचबरोबर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ एक लहान, रोबोटिक प्रयोगशाळा तयार करण्याची योजना सुद्धा आखली आहे. ही सर्व तयारी खरे तर २०३०च्या दशकाच्या सुरुवातीला चंद्रावर मानवी यान पाठवण्याची पूर्वतयारीच आहे. परंतु नेहमीप्रमाणे चीनच्या कूटनीती धोरणाप्रमाणे या धोरणाला जास्त प्रसिद्धी देण्यात आलेली नाही.

भारतीय सरकारने २०२२पर्यंत देशाच्या पहिल्या मानवी अंतराळ प्रवास प्रकल्पासाठी १.४ अब्ज अमेरिकन डॉलर्स भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेला (इस्त्रो) मंजूर केले आहेत. देशातील सर्वात शक्तिशाली रॉकेट- GSLV Mark III उपग्रह प्रक्षेपक द्वारे हे “गगनयान’ सोडले जाईल. अंतराळ प्रवासाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये मानवांना वजनरहित परिस्थिती आणि विकिरण घातक ठरेल का अशी चिंता होती. त्यासाठी वजनरहित परिस्थितीमध्ये अवकाशात उड्डाण करणे मानवी आरोग्यासाठी सुरक्षित आहे का यासाठी अनेक प्रयोग केले गेले. त्याच्या पुढील टप्प्यातील महत्त्वाचे ठरू शकणारे प्रयोग करणे हे सुद्धा ‘गगनयान’चे एक महत्त्वाचे ध्येय असेल.

अमेरिकेच्या अपोलो मानवी चांद्रमोहिमा १९७२मध्येच बंद झाल्या. तसेच अमेरिकेचे Space Shuttle हे २०११ मध्ये निवृत्त झाल्यानंतर अवकाशात कोणत्याही प्रकारची मानवी अंतराळयात्रा करणारे अमेरिकेचे यान उड्डाण घेऊ शकले नाही. उलट अलीकडे अवकाशात स्थित असलेल्या आंतराष्ट्रीय अवकाश स्थानकावर अंतराळवीरांना पाठवण्यासाठी अमेरिकेने रशियाच्या सोयूझ यानाची मदत घेतली. सोव्हिएत रशियाने सुद्धा १९७०च्या मध्यात जेव्हा ‘Luna-24’ हे शेवटचे यान चंद्रावर पाठवले होते त्यानंतर आता म्हणजे तब्बल ५० वर्षानंतर रशिया आता ‘Luna-25’, ‘Luna-26’, ‘Luna-27’ अशा एकापाठोपाठ एक सर्वेक्षक बग्ग्या पाठवणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर २०२२-२४ या काळात पाठवणार आहे. चीन, रशिया, अमेरिका, भारत आणि अर्थातच युरोपियन युनियन यांच्या सर्व प्रयत्नांतून एक गोष्ट स्पष्ट दिसून येते. पुढील नजीकच्या भविष्यात जर चंद्रावर कुठे रोबोटिक किंवा दूरवरच्या भविष्यात मानवी वस्ती झाली ती चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असेल यात आता तरी शंका वाटत नाही.

२०१४मध्ये नासाने इलोन मस्कच्या ‘SpaceX’ आणि ‘बोईंग’ यांना संयुक्त रित्या स्पर्धात्मक अंतरिक्षयान तयार करण्यासाठी एकत्रित ६.८ अब्ज डॉलर्सचे कंत्राट दिले आहेत. सध्या अमेरिकेत दोन नवीन क्र्यु (अंतराळवीर कक्ष) मॉडेल्स विकसित होत आहेत. एक आहे, इलोन मस्कच्या ‘SpaceX’ चे ‘ड्रॅगन’ मॉडेल आणि दुसरे आहे ‘बोईंग’चे ‘स्टारलाइनर’ मॉडेल. मार्च २०१९ मध्ये ‘SpaceX’ कंपनीने ‘Falcon-9’ रॉकेटच्या माध्यमातून ड्रॅगन क्र्यु अंतराळात पोचवण्यासाठी वापरले. याच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी या यानामध्ये ‘Ripley’ नावाचा एक रोबोटिक-माणूस सुद्धा पाठवण्यात आला आहे. पण या प्रायोगिक उड्डाणांमध्ये एक सुद्धा माणसाचा समावेश नाही.

भारताच्या ‘गगनयान’ प्रकल्पासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था भारतीय हवाई दलाच्या बरोबरीने १० अंतराळवीरांचा एक संघ प्रशिक्षित करेल. अखेरीस अंतराळ उड्डाणासाठी त्यातील तीन जण निवडले जातील. आजपर्यंत स्वदेशी प्रक्षेपक वापरून – रशिया, अमेरिका आणि चीनने अंतराळवीरांना अंतरिक्षामध्ये पाठवले आहे. जर भारत हे प्राप्त करू शकला तर ते पृथ्वीवरील देशांपैकी स्वतःच्या क्षमतेतून विकसित करून ते साध्य करू शकणारा जगातील फक्त चौथा देश ठरेल.

‘चांद्रयान-३’ हा जपानबरोबरील संयुक्त प्रयत्न असेल. अलीकडेच मिळत असलेल्या बातम्यांनुसार जपानची ‘JAXA’ आणि भारताची ‘ISRO’ही चंद्रावर एक अत्याधुनिक रोबोटिक अंतराळयान सोडण्यासाठी सहकार्य करण्यासाठी एकत्र येत आहेत. २०२४ मध्ये चंद्राच्या ध्रुवावर यातून लँडर्स आणि रोव्हर पाठवले जाऊ शकते. अलीकडेच इस्रोचे अध्यक्ष के. सिवान म्हणाले की भारताचा अवकाश कार्यक्रम हा महत्त्वाकांक्षी असेल. ‘चांद्रयान-२’च्या लँडिंग संबंधित संपूर्ण शास्त्रीय कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच सप्टेंबर-ऑक्टोबर २०१९ नंतर याला गती मिळण्याची शक्यता आहे. परंतु याला खऱ्या अर्थाने गती मिळेल ती २०२४ मधील भारताच्या “गगनयान’ यानाच्या यशस्वी उड्डाणानंतर! भारत जपान सहकार्यामागे, चीनच्या वाढत्या प्रभावाला शह देणे तसेच तंत्रज्ञान व जागतिक पातळीवर अमेरिकेच्या एकाधिकारशाहीच्या वर्चस्वातून मुक्त असे प्रकल्प राबवणे असे हेतू असू शकतात.

ही स्पर्धा किती तीव्र आहे याचा अंदाज घायचा असेल तर अमेरिकेची नासा ही अवकाश संस्था खाजगी उद्योगांच्या सहभागाने किंवा त्यांच्यातील भविष्यवेधी योजनांनी पुढे कशी रेटत आहे हे पाहावे लागेल. नासाच्या २०२४ मध्ये अपेक्षित असलेल्या ‘आर्टेमिस’ या अंतराळयानासाठी खाजगी उद्योगाच्या साहाय्याने विकसित केलेले लँडर्स प्रामुख्याने वापरले जातील. या खाजगी उद्योग कंपन्यांमध्ये Astrobotic, Moon Express, Blue Origin and Ispace यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या उद्योगांचे हे सुरुवातीचे प्रकल्प यशस्वी झाले तर यांना जगभरातून ग्राहक मिळतील अशी त्यांची भविष्यकालीन व्यवसाय योजना आहे. Blue Origin ही कंपनी जगातील सर्वात श्रीमंत माणूस व अमेझॉन कंपनीचा मालक जेफ बेझोस याची आहे आणि त्यांचा यातील चंद्रावर जाण्याचा प्रकल्प  Blue Moon हा आहे.

तरीसुद्धा ज्या वेगाने चीन या दिशेने वाटचाल करत आहे, त्या दृष्टीने चंद्रावर पाऊल ठेवणारा पुढील अंतराळवीर चिनी असेल आणि जर त्याने चिनी भाषेतून जगातील सगळ्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या तर आश्चर्य वाटायला नको. यावर सुद्धा विश्वास ठेवा की कोणता ना कोणता देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील प्रयोगशाळेमध्ये २०३० च्या आसपास काहीतरी प्रयोग करत असतील.

अमेरिका व सोव्हिएत युनियनमध्ये १९६०च्या दशकात ज्याप्रमाणे अपोलो कार्यक्रमाच्या माध्यमातून शीतयुद्ध भडकले होते त्याचप्रकारचे वातावरण अमेरिका व चीनमधील व्यापार स्पर्धेमुळे निर्माण झालेल्या तणावामुळे तयार झाले आहे. तंत्रज्ञानामधील प्रगती आणि व्यापारयुद्धातील रस्सीखेच यातील प्रमुख अस्त्रे आहेत. अलीकडेच गुगल या कंपनीने अमेरिकेच्या हुवेई (Huwei) या 5G तंत्रज्ञानामध्ये आणि मोबाईल हँडसेट बनवण्यामध्ये जगभरात आघाडीवर असलेल्या कंपनीला अँड्रॉइड तंत्रज्ञान वापरण्याची बंदी घातली. दोन्ही देशातील या स्पर्धेची पुढील खेळी ही सध्या अंतराळात खेळली जाईल याची स्पष्ट चिन्हे आहेत. ट्रम्प प्रशासनाने अलीकडेच ‘Space Force’ नावाची एक अंतराळातील सुरक्षा यंत्रणा उभारण्याची घोषणा केली आहे हा त्याचाच भाग आहे. ‘Space Force’ची घोषणा करतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका कोणत्याही परिस्थितीत २०१४ मध्ये चंद्रावर परतणार याची घोषणा केली होती यावरूनच चंद्रावर परत जाण्यामागील स्पष्ट भू-राजनैतिक आडाखे आणि अंतराळातील शस्त्रास्त्र योजनांचे आखाडे आपल्याला दिसून येतील.

चीनसुद्धा याबाबत कमी महत्त्वाकांक्षी नाही. त्यांची या अंतराळ कार्यक्रमाबद्दलची निष्ठा त्यांच्या राष्ट्रीय अस्मितेशी जोडली गेलेली आहे. विशेषतः चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने त्यांच्या २०४९ मध्ये साजरा होणाऱ्या शताब्दीच्या वेळेस “अंतराळ महासत्ता’ (Space SuperPower) बनण्याचे आपले ध्येय निश्चित केले आहे.

‘SpaceX’ कंपनीचा प्रमुख इलॉन मस्क आणि ‘व्हर्जिन गॅलॅक्टिक’चा मालक रिचर्ड ब्रॅन्सन यांनी पुढे रेटलेली अंतराळ पर्यटनाची रोमँटिक परिकल्पना घेऊन ही यात्रा सुरू झाली आहे. आता फक्त हेच पाहायचे आहे की या यात्रेमध्ये विज्ञानसंशोधनाच्या नव्या क्षितिजांना स्पर्श करतोय का सामरिक शस्त्रस्पर्धेचे धोकादायक भविष्य आपल्यासमोर घेऊन येतोय.

बाकी काहीही असो, ‘चांद्रयान-२’ विजयी भव ! भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) चे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. याच वर्षांमध्ये चंद्रावर मानवाने पाऊल ठेवण्याला ५० वर्षे पूर्ण झाली. या दिवसांमध्ये जेव्हा ६-७ सप्टेंबर २०१९ रोजी आपले ‘चांद्रयान-२’ जेव्हा चांद्रभूमीवर स्पर्श करेल तेव्हा आपल्या सर्व भारतीयांना त्या यानातून चंद्राच्या अभ्यासासाठी “प्रज्ञान’ ही बग्गी कशी काम करते याची क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील सुपर ओव्हरपेक्षा जास्त उत्कंठा असेल. परंतु त्या “प्रज्ञान’ बग्गीला चांद्रभूमीवर सोडणारे प्रक्षेपक (लॅण्डर) चे नाव आहे “विक्रम’! भारतीय अवकाश कार्यक्रम विक्रम साराभाई यांनी सुरू केला आणि आता तो एका नव्या उंचीवर नेण्याचे काम “विक्रम’ करेल यात तिळमात्र शंका वाटत नाही.

राहुल माने, विज्ञान-तंत्रज्ञान विषयावर लिहिणारे पत्रकार असून, ‘इंडियन अॅकॅडेमी ऑफ सायन्सेस’चे ‘एस. रामशेषन विज्ञान लेखन’ फेलो आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1