नवी दिल्ली : देशात सोमवारी कोरोना विषाणूने बाधीत झालेल्या रुग्णांची संख्या ११४ झाल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे. यात लडाख, ओदिशा, जम्मू व का
नवी दिल्ली : देशात सोमवारी कोरोना विषाणूने बाधीत झालेल्या रुग्णांची संख्या ११४ झाल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे. यात लडाख, ओदिशा, जम्मू व काश्मीर, केरळ या राज्यात सोमवारी प्रत्येकी एक रुग्ण आढळला. आतापर्यंत कोरोनाबाधित १३ रुग्ण तंदुरुस्त झाले असून खबरदारीचे उपाय म्हणून सरकारने देशातील सर्व शाळा, जलतरण तलाव, मॉल ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या आस्थापनात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी दिली जावी, यामुळे सार्वजनिक परिवहन सेवेचा भार आणि धोकाही कमी होईल, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
कोरोना रुग्णांचा खर्च महाराष्ट्र सरकार उचलणार
देशात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची अधिक संख्या (३७) पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना बाधित रुग्ण वा संशयितांना हॉटेलमध्ये ठेवल्यास त्याचा खर्च राज्य सरकार उचलेल असे जाहीर केले आहे. येणारे १५-२० दिवस राज्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यातून आपण बाहेर पडलो तर मोठे संकट टळेल असे ते म्हणाले.
राज्य सरकारने केंद्राच्या धर्तीवर राज्यातील सर्व भागांतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेल संदर्भात अद्याप निर्णय घेतला गेलेला नाही. सर्व नागरिकांनी शिस्त पाळावी, प्रार्थना स्थळांमध्ये गर्दी करून नये. रेल्वे, बसमधून अनावश्यक प्रवास टाळावा व स्वत:वर बंधन पाळावीत. जत्रा, धार्मिक यात्रा, लग्न समारंभ व राजकीय कार्यक्रम करू नयेत असे आवाहनही ठाकरे यांनी केले आहे.
दरम्यान, सरकारने ग्रामपंचायत व नगर परिषदांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या आहेत.
युरोपियन संघातील देशांतील नागरिकांना प्रवेशबंदी
युरोपीयन संघातील देश, युरोपियन व्यापारी संघातील सर्व देश, तुर्कस्तान व ब्रिटन या देशातील प्रवाशांना १८ मार्चपर्यंत भारतात प्रवेश बंदी घातली आहे.
COMMENTS