किटकांचे रंजक विश्व

किटकांचे रंजक विश्व

सध्याचे ऊन-पावसाचे वातावरण फुलपाखरे, चतुर आणि इतर किटकांच्या वाढीसाठी आणि त्यांच्या जीवनचक्राचे विविध पैलू पाहायला खूप अनुकूल आहे.

मोदींच्या कार्यालयाची ‘ओएलएक्स’वर जाहिरात
३००० पेक्षा जास्त होंडा कामगारांचा मानेसरमध्ये डेरा
मध्य प्रदेशात हिंसक गोरक्षकांना रोखणारा कायदा; ६ वर्षांच्या शिक्षेची तरतूद

मागील वर्षीच्या सुरूवातीला ‘जैवविविधता आणि आपले मानसिक आरोग्य’ यावर आधारित एक सुंदर लेख वाचनात आला. यात एकूणच आपले आरोग्य त्यातल्या त्यात शहरी जीवनातील आरोग्यावर निसर्गाचा कसा प्रभाव पडतो याचे चांगल्या पद्धतीने विश्लेषण केले होते. त्यानंतर लगेचच कोरोना संसर्गाने घातलेल्या थैमानामुळे निसर्गाचं महत्त्व अजून एकदा अधोरेखित झालं. टाळेबंदी (Lockdown) सुरू झाल्यावर तर आपल्या वैयक्तिक जीवनाचं संतुलन आपल्या आजूबाजूच्या परिसराशी किती जास्त प्रमाणात निगडीत आहे, हा विचार सतत मनात डोकावू लागला आणि मग मी माझ्या घराच्या आसपासचा परिसर आणखी काळजीपूर्वक पाहू लागले.

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणारे पु. ल. देशपांडे यांनी म्हटले आहे-  ‘पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.’

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे उपजीविकेसाठी करत असलेल्या कामाव्यतिरिक्त जोपासलेले विविध छंद हे खऱ्या अर्थाने आपल्याला जगण्याचा आनंद देऊन जातात. कोणाला जगातल्या दुर्मिळ ऐतिहासिक वस्तू बाळगण्याचा छंद असतो. कोणाचे मन किल्ले-गडांवर भटकण्यात रमते, कोणी एखाद्या भाषेच्या अभ्यासात मग्न होतो तर पुस्तके आणि कविता कोणाच्या जीवनाचा आधार असतात. मला वाटतं निसर्गवाचन ही सुद्धा एक कला आहे. लहानपणापासून आपण निसर्गाच्या सानिध्यात वाढत असतो पण आपलं लक्ष्य क्वचितच चिमणी-कावळ्याच्या गोष्टीपलिकडे जातं.

शालेय जीवनापासूनच मला पर्यावरण आणि वन्यजीवांविषयी माहिती जाणून घेण्याची ओढ होती. त्यासाठी विविध जंगलांना भेट देण्याची संधी मिळाली परंतु नंतरच्या काळात हळूहळू हे लक्षात येत गेलं की आपल्या आजूबाजूला शहरात असलेले कितीतरी जीव तितकेच विस्मयकारी आहेत; आणि त्यातही कीटक हा असा एक वर्ग आहे जे पाहायला आपल्याला प्रत्येकवेळी जंगलाला भेट देण्याची गरज नाही. सुरूवातीला पुण्यात शिकायला असताना केलेल्या फुलपाखरांवरच्या अभ्यासादरम्यान इतर अनेक किटकांच्या अनोख्या विश्वाची जवळून ओळख झाली. अनेक वेळा फुलपाखरे बघायला आम्ही वेताळ टेकडी, सिंहगड व्हॅली, ताम्हिणी अशा अनेक ठिकाणी जायचो. तेव्हा खासकरून पावसाळ्यात निरीक्षणे करणं सर्वात जास्त आनंददायी असायचं कारण पाणी आणि वनस्पती दोन्ही मुबलक असल्याने अनेक किटकांची रेलचेल असे. शेतांचे बांध, ओढे अशा पाण्याच्या स्त्रोतांजवळ हमखास चतुर व टाचण्या दिसत. पानांच्या टोकावर फुलपाखरे पंख पसरून ऊन खात बसलेली असत. अशा वेळी इतरवेळेला सहज न दिसणारे त्यांच्या पंखांच्या वरच्या बाजूस असणारे रंग आणि रचना कॅमेराने टिपण्याची संधी मिळे. मध्येच कुठेतरी पायवाटेच्या बाजूला किंचित उतारावर बांधलेलं हार्वेस्टर मुंग्यांचं घरटं दिसे आणि त्याबाजूला त्यांनी जमा केलेल्या वेगवेगळ्या बियांचा ढीग.

ढालकिडे (Beetles) हा कीटक जगतातला सर्वात मोठा वर्ग. कासवाच्या पाठीसारखे संपूर्ण शरीर झाकले जाईल अशा मोठ्या गोल पंखांचा (Tortoise-shell) ढालकिडा खूप आकर्षक दिसतो. पावसाळ्याच्या सुरूवातीच्या काही महिन्यापुरते दिसणारे काजवे, ज्यांना काही वेळा ‘Fireflies’ नावामुळे माशीच्या प्रकारातले समजले जाते, ते देखील एक प्रकारचे ढालकिडेच आहेत. दिवसा आपल्या घराच्या आसपासच्या मोठ्या झाडांवरून आपल्याला फक्त एक नियमितपपणे होणारा किर्रर्र आवाज ऐकू येतो पण कीडा दिसत नाही, तो असतो ‘Cicada’, ढेकणाचा भाऊबंध. प्रौढावस्थेत आलेले हे किडे मोठ्या संख्येने झाडांच्या आसपास जमतात. यांचे वैशिष्ट्य म्हणजे आवाज करणारे हे सर्व किडे नर असतात जे मादीला आकर्षित करण्यासाठी त्यांच्या शरीरावरील टिंबल (Tymbal) या अवयावतून विशिष्ट आवाज काढतात.

टाळेबंदीमध्ये फिरणं बंद झालं तेव्हा बाहेर पडण्याचं महत्त्व लक्षात आलं. पण या निराशेच्या वेळीदेखील उत्साह देण्यासाठी कीटक होतेच! या काळात मी फुलपाखरे आणि चतुरांवर काही व्याख्याने आणि माहितीपर कार्यशाळा सादर केल्या. त्यांच्या जीवनशैलीविषयी बोलायची चांगली संधी मिळाली आणि इतर तज्ज्ञांच्या व्याख्यानातून स्वतः शिकलेही. मुंबईमध्ये घरात राहून पहिला लॉकडाउन काढल्यानंतर कोकणात जाण्याचा आणि त्यानंतर लातूरला माहेरी जाण्याचा आनंद वेगळाच होता. रोज सकाळी घरच्या बागेत जाऊन लिंबू, कडीपत्ता, केळी या झाडांच्या पानावर आदल्या दिवशी पाहिलेली फुलपाखराची अळी आहे ना, तिने कात टाकली आहे का, अजून कुठली नवीन अंडी दिसतात का हे निरीक्षण करण्याची सवयच लागली. अळी दिसल्यावर एक वेगळंच समाधान वाटायचं. मग बच्चेकंपनीपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ती दाखवायची. काळात-नकळत या निसर्गातील छोट्या छोट्या घटकांनी या अवघड काळात जगायला खूप मदत केली. गंमत म्हणजे आता घरातली मंडळी स्वतःहून या छोट्या जीवांचं कौतुकाने निरीक्षण करतात आणि मला सांगतात किंवा फोटो पाठवतात. अशा वेळी आपण शिकलेल्या गोष्टींची माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवल्याचा आनंद काही औरच असतो. काही दिवसांपूर्वी असच आम्हाला घरच्या अंगणात Red Pierrot या फुलपाखराची मिलन करणारी जोडी (mating pair) तर एकदा घराच्या भिंतीवर अंडी देणारी पतंगाची (Handmaiden Moth) मादी दिसली. पतंगांच्या बऱ्याचशा रात्री सक्रिय असलेल्या प्रजाती गच्चीतल्या दिव्याकडे आकर्षित होतात आणि त्यांना खाण्यासाठी शेजारी पाली किंवा कधी कधी खंडोबाचा घोडा (Praying mantis) असे भक्षक बसलेले दिसतात. एकदा या दिव्याजवळ Blue Darner नावाचा मोठा चतुर रात्रीच्या मुक्कामाला येऊन बसलेलाही मी पाहिला आहे.

अलीकडच्या काळात जैवविविधतेच्या वेगवेगळ्या अधिवासांचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. वाढते शहरीकरण (Urbanisation) आणि त्यासोबत वेगाने होणारे अधिवासातील बदल यांचा जीवसृष्टीवर काय परिणाम होतो आहे यांचा विविध स्तरांवर आज अभ्यास होतो आहे. कीटक हे त्यांच्या विशिष्ट जीवनशैलीमुळे जमिनीवरील तसेच जलिय अधिवासांशी पूर्णपणे निगडीत असतात. त्यामुळे त्यात होणाऱ्या बदलांचेही कीटक अतिशय चांगले सूचक असतात. सध्या त्यांच्या अस्तित्वाचे जनसामान्यांकडून चांगल्या प्रकारे निरीक्षण केले जात आहे, ज्याला आपण ‘Citizen  Science’ म्हणून ओळखतो. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या जैवविविधतेवरील निरीक्षणे आपण फोटोद्वारे iNaturalist (www.inaturalist.org), India Biodiversity Portal (indiabiodiversity.org), DragonflySouthAsia (www.facebook.com/groups/216593478390203) अशा माहितीपर संकेतस्थळांवर नोंदवू शकतो.

शास्त्रीय संशोधन करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्याच्याबद्दल जनजागृती करणे देखील आवश्यक असते. फुलपाखरांवरील जागरूकता वाढवण्याच्या हेतूने सध्या भारतात सप्टेंबर हा महिना Big Butterfly Month म्हणून साजरा केला जात आहे. त्यामधील विविध राज्यांमध्ये होणाऱ्या अनेक तज्ज्ञ लोकांच्या व्याख्यानासोबत फुलपाखरांची फोटोग्राफी, त्यांना ओळखण्याच्या विविध पद्धती आणि त्यावरील स्पर्धा अशा कार्यक्रमांवरील अधिक माहितीसाठी DiversityIndia या संकेतस्थळाला भेट द्या. सध्याचे ऊन-पावसाचे वातावरण फुलपाखरे, चतुर आणि इतर किटकांच्या वाढीसाठी आणि त्यांच्या जीवनचक्राचे विविध पैलू पाहायला खूप अनुकूल आहे. तर तुम्हीही या नाजुक आणि सुंदर जिवांबद्दल जाणून घेण्यास तयार व्हा. तुम्ही तुमची फुलपाखरांवरील निरीक्षणे ifoundbutterflies सारख्या संकेतस्थळांवर देखील नोंदवू शकता. यावर तुम्हाला फुलपाखरांच्या अंडी, अळी, कोश आणि प्रौढ अशा चारही जीवनावस्था प्रजातीनुरूप पाहायला मिळतील. किटकांमुळे मी निसर्गातील विविध प्रक्रिया, जीवसृष्टीचा समतोल या गोष्टी जवळून पाहू शकले. अजूनही खूप जाणून घ्यायचे आहे. मला खात्री आहे की किटकांच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा या धकाधकीच्या जीवनात दिलासा आणि उत्साह मिळेल आणि निसर्गवाचनाच्या कलेशी तुमची मैत्री होईल.

आपण भारतात सप्टेंबरचा महिना “The Big Butterfly Month” म्हणून साजरा करतो. या मधील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी या लिंक ला नक्की भेट द्या. (http://diversityindia.org/bbm/)

नेहा मुजुमदार ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई येथे कंजर्वेशन विभागात शास्त्रज्ञ (कीटकशास्त्र) म्हणून कार्यरत आहेत. फुलपाखरे आणि चतुरांच्या जीवनशैलीचा अभ्यास हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य विषय आहे.

NatureNotes

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0