बर्ट्रंड रसेलची लेखनशैली: लोकप्रिय सामाजिक लेखनशैली

बर्ट्रंड रसेलची लेखनशैली: लोकप्रिय सामाजिक लेखनशैली

बर्ट्रंड रसेल दर्शन: भाग २. बर्ट्रंड रसेलने त्याच्या प्रदीर्घ आयुष्यात उदंड लेखन केले. रसेलचे लेखन आणि विचार जाणून घेण्यापूर्वी या लेखात आपण त्याच्या लेखनशैलीची ओळख करून घेऊ. त्याच्या कारकि‍र्दीत त्याने प्रथम तत्त्वज्ञानविषयक लेखन केले आणि नंतर सामाजिक लेखन केले. साहजिकच त्याच्याकडून त्याच्याही नकळत दोन लेखनशैली विकसित झाल्या. आणखी काही काळाने केलेल्या, विशेषतः उत्तरायुष्यातील काही लेखनात दोन्ही शैलींची मिसळण आढळते. ही तिसरी लेखनशैली म्हणता येईल. त्याने सामाजिक लेखन नंतर केले असले तरी या भागात त्याच्या सामाजिक लेखनशैलीची ओळख आधी करून घेऊ आणि दुसऱ्या भागात त्याच्या तत्त्वज्ञानविषयक लेखनविषयक लेखनशैलीची ओळख करून घेऊ.

तत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन
तत्त्वचिंतनाचे शत्रू
“…..चे तत्त्वज्ञान”

साधारणपणे असे घडत जाते की लेखक लिहित जातो, त्यातून त्याची लेखनशैली घडत जाते. तिचे यथार्थ दर्शन त्याच्या समग्र लेखनातून किंवा लेखनाचा आकार आणि लेखनाची संख्या लक्षणीय झाल्यानंतर आकाराला येते. ‘लेखकाच्या लेखनातून त्या लेखकाचे आणि त्याच्या लेखनशैलीचे, दोन्हींचे व्यक्तिमत्व खुलत, अनावृत होत उलगडत जाते’,  असा साधारण अनुभव असतो. लेखक हयात असताना त्याच्या प्रसिद्ध झालेल्या लेखनापर्यंतचेच त्याचे लेखकीय व्यक्तिमत्व वाचकाला समजू शकते.

आज बर्ट्रंड रसेल हयात नाही, आणि त्याचे ‘बहुतेक’ सारे लेखन उपलब्ध झालेले आहे. ‘बहुतेक’ म्हणण्याचे कारण असे की त्याचे लेखन संख्यने खूप आणि विषयांच्या अनुषंगाने अतिव्याप्त आहे. ते सारेच्या सारे हाती लागले आहे, असे अजून-आजही घडलेले नाही. ‘आपण किती, कोणकोणता मुद्द्यांवर-त्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या विषयांवर, अन कुठेकुठे लिहिले आहे’, हे खुद्द रसेलाही माहित नव्हते. त्याच्या चिंतनाचा आवाका प्रचंड होता. त्यामुळे त्याच्या लेखनशैलीच्या किमान ल. सा. वि.चा प्राथमिक शोध घेणे आज शक्य होऊ शकते. म. सा. वि.चा शोध मात्र समग्र लेखनाच्या सूक्ष्म वाचनानंतर आणि त्या लेखनाच्या समग्र व यथार्थ आकलनानंतरच घेता येऊ शकतो. तो स्वतंत्र व खूपच व्यापक प्रकल्प आहे. शिवाय हा म. सा. वि. पुन्हा दोन प्रकारचा ठरतो. 

लेखनशैलीचे प्रकार 

रसेलची लेखनशैली दोन प्रकारे विकसित झाली. ‘तत्त्ववेत्ता आणि व्यावसायिक तत्त्ववेत्ता’ या भूमिकेतून त्याने स्वीकारलेली तांत्रिकदृष्ट्या जे लेखन केले त्यातून ‘तत्त्वज्ञानाची पारिभाषिक लेखनशैली’ निर्माण झाली, ही पहिली शैली. ‘सामाजिक समस्यांविषयी’ लिहिताना त्याने विकसित केलेली ‘लोकप्रिय लेखनशैली’ निर्माण झाली, ही दुसरी शैली.

लेखन करताना “कोणत्या वाचक वर्गासाठी आपले लेखन आहे?” याचे रसेलने पूर्ण भान ठेवले होते. त्यानुसारच रसेलने त्याची लेखनशैली विकसित केली. सर्वसाधारणपणे त्याची लेखनशैली सुबोध, प्रसन्न आणि उपरोध, नर्मविनोद यांनी नटलेली होती, पण हे वर्णन त्याच्या बिगरगणिती व बिगर तत्त्वज्ञानात्मक लेखनालाच लागू पडते, याचे भान ठेवले पाहिजे.

‘तत्त्वज्ञानाची पारिभाषिक लेखनशैली’ आणि ‘लोकप्रिय सामाजिक लेखनशैली’ या दोन प्रकारांमध्ये आपण शैलीलेखनतंत्रानुसार ‘फरक’ करू शकतो, पण त्यांना काटेकोरपणे ‘अलग’ (distinguishable but not separable) करू शकू असे नाही. म्हणूनच तर रसेलच्या उत्तरायुष्यातील काही लेखनात दोन्ही शैलींची मिसळण आढळते.

रसेलने त्याने तात्त्विक लेखन कसे केले याचे स्पष्टीकरण त्याच्या लेखनाच्या ओघात काही ठिकाणी केले आहे; तर सामाजिक लेखन कसे केले याचे स्पष्टीकरण दिलेले नाही. पण ‘लेखन कसे करावे?’ याचे स्पष्टीकरण तो काही ठिकाणी स्पष्टपणे देतो. तथापि त्या स्पष्टीकरणाच्या स्वरूपाच्या वर्णनावरून ते बहुधा ‘सामाजिक लेखन कसे करावे?’ या संबंधीचे आहे, असे अनुमान करता येते. त्यातून त्याच्या लेखनशैलीच्या ल. सा. वि. चा शोध घेण्याचा प्रयत्न करू. अर्थात त्याच्याकडून ‘तात्त्विक लेखन कसे केले’ याचे वर्णन रसेल काही ठिकाणी देतो, त्याची माहिती दुसऱ्या भागात येईलच.

लेखनशैलीचे वैशिष्ट्य

रसेलने लेखनाच्या प्रक्रियेविषयी फार थोडे लिहिले आहे. त्याच्या पत्रलेखनातून, त्याच्या मुद्रिते तपासण्याच्या सवयीतून, त्यातून त्याने सतत नव्याने केलेल्या दुरुस्त्यांमधून त्याच्या लेखनशैलीबद्दल काही स्फुल्लिंगे लाभू शकतात. लेखनशैलीसंदर्भात त्याची तीन स्फुट लेखने उपलब्ध आहेत.

रसेलचे लेखनशैलीबद्दलचे पहिले लेखन १९२५ दरम्यानचे आहे. ‘जोसेफिन के. पिअर्सी’ (Josephine K. Piercy) या इंडियाना युनिव्हर्सिटीतील पहिल्या फुल प्रोफेसर संशोधिकेने रसेलला एक पत्र लिहिले होते. त्या पत्राच्या उत्तरादाखल रसेलने तिला १९२५ दरम्यान एक पत्र गद्यलेखनाच्या शैलीबद्दल लिहिले. पिअर्सीने ते पत्र तिच्या Modern Writers at Work (प्रकाशन १९३०, १९३२, १९४०) या निबंधसंग्रहात समाविष्ट केले. त्यात रसेलने ‘जेरेमी टेलर’ आणि ‘जॉन मिल्टन’ ची उदाहरणे दिली आहेत.

दुसरे लेखन १९२८ दरम्यानचे आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ईलिनोईसच्या (University of Illinois) लेखक होऊ इच्छिणार्‍या काही विद्यार्थ्यांना उद्देशून त्याने त्यावेळी पत्र लिहिले. ते त्यांनी नंतर त्यांच्या भित्तीपत्रकात प्रसिद्ध केले. त्यात तो म्हणतो, “उत्तम लेखनाचा काहीएक भरीव आणि उल्लेखनीय पण थेट परिचय असणे… हे विस्तृत वाचनापेक्षा निश्चितच अधिक चांगले असते.” त्यात तो लेखकांना अठराव्या व एकोणिसाव्या शतकातील इंग्लिश गद्यलेखनाची शिफारस करतोच, पण एडवर्ड गिबनचे  लेखन किमान दोनदा वाचावे, असेही स्पष्ट करतो.

लेखनशैलीबद्दलचा तिसरा लेखन संदर्भ, रसेलने ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीचा आहे. “मी कसा लिहितो” (How I Write)  यावर १६ जानेवारी १९५१ रोजी मुलाखत दिली. ती १० मे १९५१ ला छापील स्वरुपात प्रसिद्ध झाली. ती पुन्हा आणखी छोट्या आकारात १९५४ मध्ये प्रसिद्ध झाली. १९५६ मध्ये ती Portraits from Memory या ग्रंथात पुनरावृत्त करण्यात आली. यावेळी रसेल ६४ वर्षांचा होता व त्याची ६० पुस्तके आणि जवळपास १३०० लेख प्रकाशित झालेले होते. १९५६ मध्ये त्याची दोन पुस्तके प्रकाशित झाली, Portraits from Memory हे  दुसरे पुस्तक होते. 

‘मी कसा लिहितो? (How I Write) या निबंधात तो लिहितो की, “लेखन कसे केले जाते, हे मला माहीत आहे, असे मी म्हणू शकत नाही. मी जास्तीत जास्त जे करू शकतो, ते हे की, माझ्या प्रयत्नातून मला लाभलेल्या गोष्टीशी मी माझ्या लेखनाचा संबंध जोडू शकतो. ‘थोडे-फार तरी जॉन स्टुअर्ट मिलच्या शैलीत आपण लिहावे’ असे मला एकवीस वर्षांचा होईपर्यंत वाटत होते. मिलची वाक्यरचनेची शैली आणि विषय विकसित करण्याची शैली मला पसंत होती. पण माझ्या मनात आधीच एक वेगळी कल्पना होती. ती गणिती होती. जे काही सांगायचे आहे ते अतिशय स्पष्टपणे सांगितले गेले आहे, अशा तर्‍हेच्या संख्येने कमीत कमी शब्दात आपण सारे काही सांगावे, असे मला वाटत होते… निःसंदिग्धपणे स्पष्ट करता येईल, असा लघुत्तम मार्ग शोधण्यात मी बराच काळ घालवला आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी सौंदर्यात्मक सर्वोत्तमता अंगी बाणवण्याच्या सर्व प्रयत्नांचा मी त्याग करण्यास तयार होतो.” 

गणिती मूल्यांना प्राधान्य

‘लेखनात साहित्यिक लेखनमूल्ये रुजवण्यापेक्षा रसेलला गणिती मूल्ये रुजावीत’, असे रसेलला वाटत होते. त्यामागे विशेष कारण आहे. ते असे की, प्राथमिक काळात तरी रसेल तत्त्ववेत्ता असण्यापेक्षा गणिती जास्त होता, हे येथे नमूद करणे मला महत्वाचे वाटते. “The Study of Mathematics” या निबंधात तो अतिशय उत्तेजित अवस्थेत लिहितो, मला गणित आवडते, कारण ते मानवी नाही. गणित केवळ सत्यच धारण करते, असे नाही; ते स्वतःच एक सर्वोच्च सौंदर्य आहेअसे सौंदर्य की जे थंड (Cold) आहे आणि अतिशय साधे आहे, एखाद्या शिल्पासारखेआपल्या स्वरूपाच्या कोणत्याही भागाला साद घालणारे, उदात्त निखळ शुद्ध आणि एक तीव्र परिपूर्ण क्षमता धारण करणारे, असे (सौंदर्य) की ज्याचे दर्शन एखादी थोर कलाच घडवू शकते! 

‘गणित जे सत्य कथन करते, तसे सत्य लेखनात व लेखकाच्या अंतःकरणात प्रकट व्हावे’, अशी त्याची इच्छा होती. हे मत त्याने अनेक ठिकाणी व्यक्त केले आहेच. How I Write मध्ये रसेल त्याच्या लेखनशैलीच्या विकास क्रमातील अनेक अनुभव, त्याने केलेले प्रयत्न, आलेली निराशा, ‘दिसलेले’ विचार पण ते शब्दात गुंफता येत नसल्याने होणारी जीवाची तगमग या लेखात शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करतो आणि सरतेशेवटी स्पष्ट करतो, की लेखकाची लेखनशैली जोपर्यंत लेखकाशी अंतस्थ नाते राखत नाही आणि जवळपास लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा ती उत्स्फूर्त आविष्कार बनत नाही, तो पर्यंत लेखकाची लेखनशैली कधीही चांगली नसतेच; आणि हे तेव्हाच घडते, जेव्हा लेखकाचे मूलभूत व्यक्तिमत्वच मूलतः ऐच्छिक आत्माविष्करणाच्या पात्रतेचे असते! कोणाच्याही लेखनाचे थेट अनुकरण स्पृहणीय नाहीच, पण काहीवेळेस चांगले गद्य अंगी मुरवणे बरेच लाभदायक ठरू शकते, विशेषतः गद्य लय कशी साधावी, या कसबाचा विकास करताना उत्तम गद्य परिचय आवश्यक ठरू शकतो.’

रसेलकृत लेखन सूत्रे

रसेल म्हणतो, “लेखन करताना काही साधी सूत्रे सांगता येतील, जी मला वाटते जास्तच खुलासेवार गद्यलेखन करणार्‍या लेखकांना उपयोगी पडतील.”

(१) पहिले सूत्र : एखाद्या छोट्या शब्दाने काम होत असेल तर मोठा शब्द कधीही वापरू नका.

(२) दुसरे सूत्र : एखादे भरदार विधान करताना जर त्या विधानाच्या समर्थनार्थ तुम्हाला अनेक संदर्भ, पुरावे द्यायचे असतील तर ते सारे संदर्भ वेगळ्या, स्वतंत्र वाक्यांमध्ये मांडा.

(३) तिसरे सूत्र : तुमच्या वाक्याची सुरुवात अशी करू नका की, वाक्याच्या आरंभी तुम्ही जे काही म्हटले असेल, नेमक्या त्याविरोधी गोष्टीला तुमच्या वाचकाला वाक्याच्या शेवटी अनपेक्षितपणे तोंड द्यावे लागेल.”

पण हे साधे नियमही अनेक वेळा पाळले जात नाहीत, असे आजही आपल्याला अनुभवाला येते. त्यामुळे अनेक प्रकारचे गोंधळ होतात. असा गोंधळ कसा केला जातो किंवा घातला जातो, त्याचे एक मासलेवाईक उदाहरण रसेल देतो, ते समाजशास्त्रातील (Sociology) आहे. या क्षेत्रातील संशोधनाचे काम करताना गोंधळ निर्माण करणारे आणि विरोध निर्माण करणारे वाक्य कसे रचले जाते, त्याचे पुढीलप्रमाणे उदाहरण रसेल देतो. त्याचे मराठीत भाषांतर करून घेण्यात काही मजा नाही; त्यापेक्षा रसेलच्या मूळ इंग्रजी रचनेतून पाहाणे ते योग्य ठरेल. तो लिहितो की,

“Human beings are completely exempt from undesirable behaviour-patterns only when certain prerequisites, not satisfied except in a small percentage of actual cases, have, through some fortuitous concourse of favourable circumstances, whether congenital or environmental, chanced to combine in producing an individual in whom many factors deviate from the norm in a socially advantageous manner.’

इथे रसेल म्हणतो, “Let us see if we can translate this sentence into English. I suggest the following: “All men are scoundrels, or at any rate almost all. The men who are not must have had unusual luck, both in their birth and in their upbringing.”

उदाहरणादाखल घेतलेले मूळ वाक्य इंग्रजीतच असूनही Let us see if we can translate this sentence into English. असे म्हणताना रसेलची उपरोधक आणि बोचरी शैली लक्षात यावी! पुढे तो ते सारे वाक्य त्याच्या उपरोधक सुरात व्यक्त करतो!!

‘ही अतिशय थोडक्या शब्दात व्यक्त केलेली आणि सर्वाधिक समर्थनीय वाक्यरचना आहे, आणि ती तीच गोष्ट सांगते जे आधीचे वाक्य सांगते’, असे रसेल मिश्किलीने म्हणतो. पुढे तो म्हणतो, “पण मला काहीशी भीती वाटते की जे प्राध्यापक पहिल्या वाक्याच्या ऐवजी दुसरे वाक्य वापरतील त्यांची हकालपट्टी होईल! प्राध्यापकांच्या बाबतीत जे काही घडू शकेल, ते माझ्या वाचकांच्या बाबतीतही शक्य होईल म्हणून इथे मी वाचकांना एक सल्ला देऊ इच्छितो. मी आता साधे इंग्लिश वापरतोय, कारण प्रत्येकाला माहीत आहे, की मी ठरवले तर माझ्या लेखनात गणिती तर्कशास्त्र उपयोजनात आणू शकतो. मी ते असे मांडू शकतो.एक विधान घ्या: ‘काही माणसे त्यांच्या मृत पत्नीच्या बहिणीशी विवाह करतात’ (‘Some people marry their deceased wives’ sisters.’) मी हे (आज) साध्या भाषेत व्यक्त करू शकतो, जी भाषा मला अनेक वर्षांच्या अध्ययनाने बुद्धिगम्य झालेली आहे आणि ती मला व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य बहाल करते.”

“मी तरुण प्राध्यापकांना सुचवतो की त्यांचे पहिले लेखन अशाच जडजंबाळ, शब्दबंबाळ भाषेत लिहा, की जे केवळ विद्वतजड लोकांसाठी आहे, ते त्यांनाच समजू शकेल. पण त्यांची पाठ फिरली की या तरुण प्राध्यापकांना जे काही म्हणायचे आहे ते त्यांनी ‘लोकांना समजेल’ अशाच भाषेत मांडावे. हल्ली आपले सारे जगणेच जर प्राध्यापक लोकांच्या हातात असेल तर त्यांनी माझा सल्ला मानलाच तर आपल्या कृतज्ञतेला ते पात्र ठरतील, यापेक्षा वेगळे मी काही म्हणू शकत नाही.”

रसेलची पत्रे.

रसेलची पत्रे.

अर्थात रसेलने हे सारे नियम त्याच्या लेखनात उपयोगात आणले, असे नाही, त्याने ते त्याच्या केवळ सामाजिकदृष्ट्या फलवादी लेखनासाठीच फक्त वापरले. त्याच्या तत्त्वज्ञानात्मक ग्रंथात त्याने ही शैली टाळलेली आहे. किंबहुना असे म्हणणे योग्य आहे की प्राथमिक काळातील Principia Mathematica, Introduction to Mathematical Philosophy आणि इतर काही ग्रंथात, विविध निबंधात त्याने शैलीचा फारसा विचारच केला नव्हता. 

Principia Mathematica त्याचा हा ग्रंथ न्यूटनच्या १६८७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या Mathematical Principles of Natural Philosophy (मूळ लॅटिन भाषेतील) ग्रंथासारखाच रचला गेला आहे.

हा ग्रंथ सामान्य वाचकांच्या किंवा जनसामान्यातील जनविवेकवादी बुद्धीवेत्त्यालाही वाचणे शक्य नाही. आइनस्टाइन, स्टीफन हॉकिंग, कार्ल सेगन, रॉजर पेनरोज, जयंत नारळीकर, नरेश दधीच, श्रीराम अभ्यंकर यांच्यासारख्या तज्ज्ञ गणितींनाच तो समजला आहे, असे साधार म्हणता येते. (मला असा फाजील आत्मविश्वास आणि अहंकार आहे की हा ग्रंथ समजू शकेल असा भारत राष्ट्रातील किंवा हिंदूराष्ट्रातील आणि अपुल्या प्रिय महाराष्ट्रातील गणिताच्या आणि तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांमध्येदेखील कोणीतरी लवकरच उदयास येईल!)

रसेलची ही लेखनशैलीविषयक मते त्याच्या ६४ व्या वर्षी व्यक्त केलेली आहेत, हे अधोरेखित करतो. रसेलने How I Write मध्ये स्पष्ट केलेले लेखनशैलीविषयक नियम त्याच्या सामाजिक लेखनात उपयोजनात आणले. ती हेतूतः विकसित करूनच त्याने आधुनिक माणसापुढील महत्त्वाच्या नैतिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक प्रश्नांवर चिंतन केले. त्याद्वारे त्याने घडवलेल्या मौलिक आणि अभिनव विचारदर्शनामुळे  जगभरातील इंग्रजी जाणणार्‍या सर्वसामान्य सुशिक्षित वाचकवर्गात त्याची ख्याती पसरली. ‘सुशिक्षित जनमानसात जवळजवळ अद्वितीय’ असे स्थान लाभणारा केवळ रसेल हाच एकमेव दार्शनिक असावा.

रसेलने त्याचे लोकप्रिय झालेले सामाजिक स्वरूपाचे लेखन जवळपास १९१२ साली सुरू केले, तेही तत्त्वज्ञानाचा विद्यापीठीय अभ्यासक्रमाने बंदिस्त असलेला परिचय नसणाऱ्या पण तत्त्वज्ञानात रुचि असणाऱ्या तत्त्वज्ञानेतर सामान्यजनांसाठी पण सुजाण वाचकांसाठी होते. ते म्हणजे The Problems of Philosophy.

तत्त्वज्ञानाची लेखनशैली

पण रसेलचे पहिले तत्त्वज्ञानविषयक लेखन मात्र केवळ गणित आणि तत्त्वज्ञानात प्रशिक्षित विद्वानवर्गासाठी लिहिलेले पारिभाषिक, जडजंबाळ, शब्दबंबाळ भाषेत होते. शिवाय ते इंग्लिशमध्ये लिहिलेले नव्हते, तर जर्मन भाषेत लिहिलेले होते. Die Gesetze und Elemente des wissenschaftlichen Denken (The Laws And Elements Of Scientific Thought: A Textbook Of Epistemology In Basic Features) हे १८९५ सालचे त्याचे पहिले लेखन जर्मन भाषेत पुस्तक परीक्षणरुपात आले होते. German Social Democracy हे १८९६ सालचे त्याचे पहिले इंग्लिश भाषेतील पुस्तकही जर्मन भाषेतच प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्या वर्षभरात त्याने अनेक लेख जर्मन भाषेत आणि तांत्रिकदृष्ट्या किचकट होते, ती त्याची तत्कालिन लेखनशैली होती. त्याचे तात्त्विक सुलभीकरण हळूहळू होत गेले.

रसेलने त्याचे तत्त्वज्ञान मांडण्यासाठी जी लेखनशैली स्वीकारली ती त्याच्या ‘तत्त्वज्ञानाच्या पद्धती’ वर बेतलेली आहे. ‘ओख्यॅमची वस्तरा पद्धती’ आणि  ‘तार्किक विश्लेषण पद्धती’ ह्या दोन पद्धतींनी मिळून रसेलची ‘रसेलची पद्धती’ बनते. यातील ‘ओख्यॅमची वस्तरा पद्धती’ ही तेराव्या शतकातील ओख्यॅम या मध्ययुगीन इंग्लंडमधील धर्मगुरूची आहे. ‘तार्किक विश्लेषण पद्धती’ हे रसेलने विकसित केलेले तत्त्वज्ञान आहे. या दोन्हींची माहिती या लेखमालिकेतील नंतरच्या लेखात येईल.

श्रीनिवास हेमाडे, अनुवादक, व्यावसायिक तत्त्ववेत्ते आहेत. shriniwas.sh@gmail.com

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0