प्रेरक डेस्मंड टूटू

प्रेरक डेस्मंड टूटू

डेस्मंड टूटू वयाच्या नव्वदाव्या वर्षी वारले. टूटूंना १९८४ साली शांततेचं नोबेल पारितोषिक मिळालं होतं. द.आफ्रिकेत वर्णद्वेषी-वर्णभेदी सरकार हटवून त्या ठिकाणी लोकशाही सरकार स्थापण्यात त्यांनी केलेली मदत (नेल्सन मंडेलांना) हे नोबेल पारितोषिकासाठी निमित्त, उल्लेखनीय कारण होतं.

टूटू होसा या जमातीत जन्मले. (मंडेलाही त्याच जमातीचे) कॉलेज पार पडल्यावर ते धर्मशिक्षणाकडं वळले. इंग्लंडमध्ये त्यांनी अँग्लिकन चर्चमधे शिक्षण घेतलं आणि बिशप झाले. जोहान्सबर्गच्या उपनगरातल्या आपल्या वस्तीत त्यांनी कामाला सुरवात केली. पण नंतर कित्येक वर्षं ऊच्च शिक्षण व चर्चच्या कामासाठी ते इंग्लंडमधेच वास्तव्य करून होते. या काळात द.आफ्रिकेत गोऱ्यांचं सरकार होतं, वर्णभेद केला जात असे. काळ्यांना सर्व प्रकारच्या संधींपासून दूर ठेवलं जात होतं, त्यांच्यावर घोर अन्याय होत असे. टुटू यांचा वर्णभेद विरोधी भावना किंवा चळवळीशी संबंध आला नाही. ते चर्च एके चर्च एव्हढंच करत असत. चर्च म्हणजे धर्म एव्हढंच त्यांच्या डोक्यात होतं.

सक्रीय चर्चकामासाठी ते द.आफ्रिकेत परतले तेव्हां विविध पंथांच्या चर्चेसचं संयोजन करणाऱ्या संघटनेचे अधिकारी झाले. तेव्हां त्यांना वर्णभेदाची जाणीव झाली. तेव्हां त्यांना राजकारण समजलं. वर्णभेद चर्चच्या तत्वात बसत नाही, धर्माचा त्याला आधार नाही असं त्यांना कळलं. वर्णभेदाविरोधात लढणं हे चर्चचंच काम आहे हे त्यांना पटलं. त्यातून ते वर्णभेदविरोधी राजकीय चळवळीत उतरले.

द.आफ्रिकेच्या वर्णभेदी सरकारवर निर्बंध घालावेत अशी मागणी टूटूंनी पश्चिमेतल्या देशांकडं, युनोकडं केली. अशी मागणी करणारे ते बहुदा पहिलेच ख्रिश्चन धर्मकर्मी होते. इंग्लंडमधलं आणि युरोपातल्या अनेक देशातली चर्चं त्यांच्यावर खवळली. द.आफ्रिकेच्या सरकारला इंग्लंड,अमेरिका, फ्रान्स इत्यादी देशांचा पाठिंबा होता, त्या देशांचे द.आफ्रिकेशी आर्थिक संबंध होते, व्यापार होता. त्यांना टुटू यांचा राग आला. अमेरिकेनं तर टूटू यांच्यावर दहशतवादाचा शिक्का मारला.

टुटू डगमगले नाहीत. स्पष्टवक्ते असल्यानं ते अमेरिकेत आणि युरोपात जाहीरपणे द.आफ्रिकेच्या स्वातंत्र्याची मागणी करत. अमेरिकेच्या काँग्रेसमधेही त्यांनी भाषण केलं तेव्हां अध्यक्ष रेगन खवळले. तिकडं मार्गारेट थॅचरही भडकल्या. त्यांना राग येण्याचं आणखी एक कारण म्हणजे टुटू हे अँग्लिकन चर्च या इंग्लंडच्या चर्चचे बिशप, नंतर आर्चबिशप होते.

चर्चची ही गंमत आहे. चर्च पारमार्थिक असतं, अद्यात्मिक असतं पण तरीही ते एका मर्यादेत ऐहिकात, लौकिकात रस घेतं. चर्चचं साम्राज्य कोसळल्यानंतर, जगभर सेक्युलर राज्याची कल्पना मान्य झाल्यानंतर चर्च फक्त व्हॅटिकन आणि चर्च यामधेच शिल्लक राहिलं, चर्च राज्यकर्ता नाही राहिलं. तरीही वंचित, अन्यायग्रस्त यांच्या पाठी उभं रहाणं ही ख्रिस्ताची शिकवण असल्यानं चर्चनं द.आफ्रिका, द.अमेरिका, पूर्व युरोपात वेळोवेळी तिथल्या सरकारांविरोधात भूमिका घेतली, सरकारविरोधी आंदोलनाना नाना प्रकारे मदत केली. राजकारण आणि धर्म यात चर्चनं एक तोल साधला. चर्चनं ज्यांना विरोध केला ती ती सरकारनं चर्चला धार्मिक न मानता राजकारणी आहेत असा शिक्का मारून चर्चच्या विरोधात प्रचार करत राहिली. तरीही चिली, पोलंड, द.आफ्रिका इत्यादी देशांत चर्च कणखरपणे सरकारच्या दडपशाहीविरोधात उभं राहिलं.

चर्चमधे मार्क्सवादी, सेक्युलर असेही उपपंथ आहेत.

चर्चमधे असलेल्या या शक्यतांच्या स्पेसमधे टुटु वाढले.

म्हणूनच इस्रायल पॅलेस्टिनीवर अन्याय करू लागलं तेव्हां टूटूंनी आवाज उठवला. ते निर्भय होते. इस्रायलमधे जाऊन त्यांनी सरकारला खडे बोल सुनावले. ज्यूंवर ख्रिस्ती लोकांनी केलेल्या अन्यायाबद्दल त्यांनी ज्यूंची जाहीर माफी मागितली. पण इस्रायल पॅलेस्टिनींची जमीन बळकावतं, त्यांना हुसकावून लावून त्यांच्या जागी आपल्या वस्त्या करतं यावर टूटू यानी इस्रायलमधे जाऊन टीका केली.

गोऱ्यांनी द.आफ्रिका व्यापणं आणि ज्यूनी पॅलेस्टाईन व्यापणं या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत असं टुटू बोलत राहिले. त्यामुळंच इस्रायल आणि इस्रायलचे पक्षपाती देश टुटू यांच्यावर ते अँटी सेमेटिक, ज्यू विरोधी आहेत असा आरोप करत राहिले.

वर्णभेदाला विरोध करत असताना टुटू यांची भूमिका विधायक होती. वर्णभेदी सरकार म्हणजे पंतप्रधान बोथा यांच्याशी चर्चा केली पाहिजे,संवाद राखला पाहिजे आणि त्यांनी सत्ता सोडून वर्णभेद अमान्य असणारं सरकार स्थापन केलं पाहिजे असं टुटू म्हणत. वर्णभेद विरोधी चळवळ ऐन भरात असताना, सरकार काळ्यांवर घोर अत्याचार करत असतांनाही टुटू आपल्या सहकारी बिशपांना घेऊन बोथा यांना भेटायला गेले. चळवळीतल्या लोकांना ते आवडलं नाही, टुटू यांच्यावर चळवळ फोडणारे असा आरोप झाला.

अन्याय करणाऱ्या माणसाला त्याच्या वर्तणुकीची जाणीव करून द्यावी, त्याला क्षमा करावी या ख्रिस्ताच्या शिकवणुकीशी टुटू प्रामाणिक होते. गोऱ्यांना कळत नाहीये की ते काय करत आहेत, तेव्हां देवा, त्यांना समजून दे, ते बदलतील असं टूटू म्हणत होते. असा  उपदेश एक बिशप म्हणून चर्चच्या मंचावर म्हणत रहाणं वेगळं आणि चर्चच्या बाहेर येऊन अन्याय करणाऱ्या माणसाला सांगणं वेगळं.

गोरे लोक चळवळ चिरडणार, द.आफ्रिकेला कधीच स्वातंत्र्य मिळणार नाही अशी जगाची खात्री होती तेव्हांच टूटू म्हणाले की लवकरच द.आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळणार आहे. खुद्द मंडेलांचाही टुटू यांच्या भविष्यवाणीवर आणि आशावादावर विश्वास नव्हता, टुटुंच्या शांततावादी प्रयत्नांबद्दल मंडेला यांचे टुटूंशी मतभेद होते.तरीही टुटू प्रयत्नांना चिकटून राहिले.

मंडेला यांची प्रखर चळवळ आणि टुटू यांचे विधायक प्रयत्न अशा दोहो बाजूंच्या रेट्याचा परिणाम झाला आणि द.आफ्रिका स्वतंत्र झाली.

धर्म, राजकारण, पारलौकिक, लौकिक यांना एकमेकापासून वेगळं करणारी सीमा तेल आणि पाणी यातील सीमारेषेसारखी असते.वेगळ्या गुणधर्माच्या या दोन वस्तू एकमेकासह अस्तित्वात असतात, त्यांच्यात भेद असतात पण त्या भेदांची रेषा पक्की  कधीच ठरत नाही.

टुटू यांचं धार्मिक आणि राजकीय जीवन प्रेरक आहे, त्यांचं इतिहासातलं स्थान पक्कं झालं आहे.

निळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS