अमेरिकेला सामाईक स्वातंत्र्य दिनाची आवश्यकता

अमेरिकेला सामाईक स्वातंत्र्य दिनाची आवश्यकता

४ जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याने स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली. या जाहीरनाम्याचे अमेरिकी नागरिकांच्या मनात अनोखे स्थान आहे. जाहीरनाम्याने काही वैश्विक आणि उदात्त मूल्ये मांडली असली तरी ४ जुलै हा समाजातील सर्व घटकांना स्वातंत्र्य दिवस वाटत नाही. कृष्णवर्णीय, मूलनिवासी, स्त्रिया यांचे स्वातंत्र्य उत्क्रांत झाले आहे. आता एका सामाईक स्वातंत्र्य दिनाची आवश्यकता आहे.

तैवानी तिढा
गर्भपात कायद्याबाबत आंतरराष्ट्रीय संघटनांची टीका
अमेरिका-इराण संघर्षात भारताचा बळी

मुख्यतः ब्रिटिश आणि काही प्रमाणात फ़्रेंच स्थलांतरित लोकांच्या १३ वसाहती (कॉलनी) ब्रिटिश राजापासून विभक्त होण्यासाठी १७७५-१७८३ काळात एकत्र सशस्त्र युद्ध लढल्या. या लढ्याला अमेरिकन राज्यक्रांती म्हणतात. या काळात आम्ही ब्रिटनच्या राजापासून स्वतंत्र आहोत हे या १३ वसाहतींनी अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याच्या (Declaration of Independence) मार्फत ४ जुलै १७७६ला जाहीर केले. या जाहीरनाम्याने या १३ वसाहती अमेरिकेतील पहिली १३ राज्ये (states)  बनली आणि आपण अमेरिकन आहोत ही भावना निर्माण झाली. अमेरिकेच्या जाहीरनाम्यात काय आहे ते पुढे बघू.

हा ऐतिहासिक दिवस, ४ जुलै किंवा फोर्थ ऑफ जुलै, केंद्र शासनाचा (federal) सुट्टीचा दिवस झाला आहे. सर्व लोकं घराच्या मागे बार्बेक्यू करतात. पार्ट्या करतात. नातेवाईक आणि मित्र कुटुंबे एकत्र येतात. बिअर वाहत असते. माझा शेजारी घरी बिअर तयार करतो. मला नेहमीच देऊ करतो. गावात परेड असतात. देशाभिमानाची गाणी असतात. कॉन्सर्स्ट असतात. संध्याकाळी अंधार पडल्यावर गावात फायरवर्क असतात. ते अत्यंत सुंदर आणि नयनरम्य असते. तिथे लोक जागा पटकवून, खुर्च्या टाकून, बिअर पीत अंधार पडायची वाट पाहात असतात. अमेरिकेत राष्ट्रध्वज सर्वत्र नेहमी असतात. राष्ट्रगीत नेहमी सर्व छोट्या मोठ्या कार्यक्रमात गातात. त्यामुळे ध्वजारोहणाचा कार्यक्रम नसतो. या वर्षी कोव्हिडमुळे फायरवर्क सर्वत्र रद्द झाले होते. याचा काही लोकांना संताप आला होता. “आम्ही स्वतंत्र आहोत. आम्ही काय करावे हे शासनाने का ठरवायचे?” असा युक्तिवाद केला गेला. सर्वसाधारण नागरिक कोव्हिडमुळे मास्क लावतात. मात्र काहीजण मास्क लावण्यावरून हाच युक्तिवाद करत आहेत. ही  मग्रुरी कशी आली ते पुढे पाहू.

या उत्सवातील फायरवर्क हे युद्धातील तोफा, बंदुका, रॉकेट्स यांचा सिम्बॉल आहे. अमेरिकेचे राष्ट्रगीत हे युद्धात स्फुरलेले आहे. ब्रिटनबरोबरच्या १८८२ सालच्या एक युद्धात ब्रिटिशांनी रात्री केलेल्या तोफगोळे, रॉकेट वर्षावानंतर सुद्धा गीतकाराला पहाटेच्या प्रकाशात अमेरिकेचा विजयी झेंडा दिसतो तेव्हा त्याने जे गीत लिहिले ते नंतर राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले.

राष्ट्रध्वज कायम सर्वत्र असतात. येता जाता राष्ट्रगीत वाजवले, गायले जाते. राष्ट्रगीतात ही स्वातंत्र्याची भूमी आहे अशा प्रकारची ओळ आहे. त्याचा अमेरिकन लोकांना अभिमान आहे. चांगली गोष्ट आहे. मात्र त्याबरोबर स्वातंत्र्याच्या मुळापाशी असलेली नैतिकता, समाजाशी असलेली नाळ, कशासाठी स्वातंत्र्य हे बिंबवले जात नाही. स्वातंत्र्य ही अमूर्त संकल्पना राहिली आहे. स्वातंत्र्याच्या अभिमानाचे गर्वात (मराठी शब्दार्थाने) रूपांतर झाले आहे.

अमेरिकेच्या संविधानात शस्त्रे धारण करण्याचे स्वातंत्र्य आहे. ट्रम्पला मतदान करणारे काही गोरे वर्चस्ववादी लोक आहेत. गेल्या काही वर्षांत जगभर लोकांमध्ये जहाल विलगीकरण झाले आहे. भारतातसुद्धा ते जाणवते. ही गोरी वर्चस्ववादी लोकं बऱ्याचवेळा अंगात राष्ट्रध्वज असलेले कपडे, टोप्या घालून, हातात बंदुका झळकवत यूएसए यूएसए, फ्रीडम, फ्रीडम असं कर्णकर्कश ओरडत निदर्शने करत असतात. न्याय मागण्यांच्यासाठी होत असलेल्या मोर्चाला प्रतिनिदर्शने करत असतात. पोलिस या लोकांना झुकतं माप देतात. ट्रम्प सूचक समर्थन देतो. अशा तऱ्हेने अमेरिकन राष्ट्रवाद हा युद्धांवरून आणि त्यातील विजयांवरून बेतला गेला आहे. ‘राष्ट्रीय हितसंबंधांच्या संरक्षणासाठी आणि सुरक्षितेसाठी’, ‘लोकशाहीच्या स्थापनेसाठी’ म्हणजे कॉर्पोरेशन्सच्या हितसंबंधासाठी अमेरिका बिनदिक्कतपणे युद्ध करते. यामध्ये, इतर कारणांबरोबर, त्यांचा युद्धखोर राष्ट्रवाद हे सुद्धा कारण आहे. ही मानसिकता आहे.

विरोधाभास म्हणजे अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा हा इतिहासाच्या त्या काळातील एक क्रांतिकारी दस्तऐवज आहे. प्राचीन काळानंतर प्रथमच सामान्य माणसाला राज्यसंस्थेत केंद्रस्थानी ठेवण्यात आले. उभारत्या देशाच्या जडणघडणीबरोबरच काही वैश्विक मूल्ये मांडण्यात आली. अमेरिकेचे संस्थापक पितामह (Founding Fathers) म्हणतात की, “आम्ही खालील सत्ये स्वयंसिद्ध मानतो – प्रत्येक माणूस हा जन्मतः सारखा आहे; [विश्व] निर्मात्याने त्यांना काही हक्क दिले आहेत की जे हिरावता येणार नाहीत; त्या हक्कांत जगणे, स्वातंत्र्य आणि सुखाचा पाठपुरावा येतात; हे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाची नियुक्ती झाली असते. शासनाला न्याय अधिकार हे शासितांच्या संमतीने मिळतात.’ या जाहीरनाम्याचा नंतर लगेचच झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीवर प्रभाव पडला. हा स्वातंत्र्याचा जाहीरनामा, संविधान आणि हक्कांची यादी (बिल ऑफ राईट्स) ही अमेरिकेच्या लोकशाहीची बैठक आहे.

या अशा काळाच्या पुढे गेलेल्या क्रांतिकारी आदर्श, उदात्त संकल्पना वैश्विक म्हणून मांडल्या गेल्या तरी त्यांना अमेरिकेत त्या काळात खूप मर्यादा होत्या. यात अमेरिकेचे मूलनिवासी, गुलाम आणि स्त्रिया नव्हत्या. काही संस्थापक पितामहांकडे गुलाम होते. त्या काळातील वैचारिक मर्यादेबरोबर स्वातंत्र्य लढ्याचे स्वरूपही परिणामकारक ठरले. या लढ्यात सर्व सामान्य जनता सामील नव्हती. हा लढा सशस्त्र होता. हा लढ्यातील दोन्ही बाजू युरोपिअन गोरे होते. दोन्ही गुलामांच्या व्यापारात होते, एक विक्रेता आणि दुसरा ग्राहक. त्यामुळे गुलाम या ‘स्वातंत्र्य’ लढ्यात नव्हते. दोन्ही बाजू  वसाहतवादी होत्या. त्यामुळे अमेरिकेचे मूलनिवासी नव्हते. दोन्ही देशात काय सर्वत्र स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हते. स्त्रियांना समानतेने वागवले जात नसायचे. त्यामुळे या लढ्यात स्त्रियांचा सहभाग नव्हता. या गोष्टींचे प्रतिबिंब जाहीरनाम्यावर पडले होते.

जगभरात ठिकठिकाणी चाललेली ब्लॅक लाईव्हज मॅटर’ निदर्शने.

आधीपासून गुलाम आणि मूलनिवासी यांनी हा स्वातंत्र्यदिन फारशा उत्साहाने स्वीकारलेला नाहीये. पुढे उत्तरेकडची राज्ये (युनियन) आणि दक्षिणीकडची राज्ये (कॉन्फेडरेट) यात १८६१-१८६५ दरम्यान यादवी युद्ध झाले. राज्याध्यक्ष अब्राहम लिंकन हा युनियनचा प्रमुख होता. बाकी इतर गोष्टींबरोबर, गुलामीचा विषय हा ऐरणीवर होता. यादवी युद्धात युनियन राज्ये जिंकली. लिंकनने गुलाम स्वतंत्र झाले असे घोषित झाले. परंतु मोठी अंतरे आणि मर्यादित माहिती प्रसाराने यामुळे गुलाम स्वतंत्र झाले हे सर्वत्र एकाच वेळेस प्रसारित झाले नव्हते.

११ जून १८६५ रोजी युनियनचा जनरल गॉर्डन ग्रँगेर याने टेक्सास राज्यात गुलाम स्वतंत्र झाले हे जाहीर केले. अधिकृतरित्या गुलामी नंतर संपली आणि ते अमेरिकेचे स्वतंत्र नागरिक बनले, म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्यानंतर तब्बल ८९ वर्षांनंतर. पण बिनशर्त मतदानाचा हक्क त्यांना १९६६ ला मिळाला, म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्यानंतर तब्बल १९० वर्षांनंतर.  तरीसुद्धा ११ जून किंवा जूनटीन्थ (Juneteenth) हा दिवस कृष्णवर्णीय जनतेचा स्वातंत्र्य दिन बनला आहे. (June Ninteenth या तारखेचे एकत्रीकरण करून Juneteenth हा शब्द बनला आहे.)

या दिवसाची लोकप्रियता इतिहासात कमी जास्त झाली आहे. सध्याच्या काळात जनता (जास्त करून कृष्णवर्णीय) हा दिवस उत्साहाने साजरा करते. जवळपास ‘फोर्थ ऑफ जुलै’चे वातावरण असते. रस्त्यांवर मेळे असतात, जेवणावळी, कुटुंबांचे एकत्र भेट, गुलामीच्या स्वातंत्र्य जाहीरनाम्याचे वाचन इत्यादी कार्यक्रम असतात.

कृष्णवर्णियांच्या प्रश्नांबद्दल ब्लॅक लाईव्हस मॅटर (BLM) ही चळवळ बऱ्याच वर्षांपासून चालू आहे. पोलिसांचे कृष्णवर्णियांवर अत्याचार नेहमीचे आहेत. मधून-मधून स्थानिक पातळीवर निषेध होतात. परंतु देशपातळीवर मोठे काही होत नाही. अन्यायाची खदखद जॉर्ज फ्लॉइडच्या कुप्रसिद्ध केसमधून बाहेर पडली. नंतर या निषेधार्थ होणाऱ्या चळवळीने देशभर काय आंतरराष्ट्रीय पातळीवर पकड घेतली. सिव्हिल राईट्स चळ्वळीनंतर प्रथमच गोरे आणि इतर लोकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला. विविध स्थानिक आणि राज्य शासनांनी बदल घडवले. हीच घटना नव्हे तर सार्वत्रिक वंशवाद, अन्याय ऐरणीवर आले. BLM चळवळ बळकट झाली. या पार्श्वभूमीवर या वर्षीचा ‘जूनटीन्थ’ दणक्यात साजरा झाला. कम्युनिटी नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी ‘फोर्थ ऑफ जुलै’ बद्दल नाराजी व्यक्त केली. हा दिवस खरोखरचा स्वातंत्र्य दिन नाही तर त्यांच्यासाठी ‘जूनटीन्थ’ हा स्वातंत्र्य दिवस आहे अशी विधाने केली गेली.

अमेरिकन मूळनिवासींची (नेटिव्ह अमेरिकन) कथासुद्धा करुण आहे. युरोपियन्स बरोबरच्या युद्धात आणि युरोपियन्सनी आणलेल्या युरोपातील रोग यामुळे त्यांची लोकसंख्या प्रचंड कमी झाली. युद्धामधील पराभवाने  त्यांचे प्रदेश आकसत गेले. जरी ते अमेरिकेचे मूळ रहिवासी असले तरी त्यांना अमेरिकेचे नागरित्व मिळायला १९२४ साल उजाडायला लागले, म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्यानंतर तब्बल १४८ वर्षांनंतर. तर सर्व राज्यात विनाअट मतदानाचा हक्क मिळवायला १९६२ उजाडायला लागले, म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्यानंतर तब्बल १८६ वर्षांनंतर.

अमेरिका खंडावर युरोपियन वसाहतीची सुरुवात ही जेव्हा कोलंबस अमेरिकन खंडावर पोचला, १२ ऑक्टोबर १४९२ या दिवसापासून धरतात. त्यामुळे अमेरिका खंडावरील देशात १२ ऑक्टोबर हा ‘कोलंबस दिन’ म्हणून साजरा होतो. गोऱ्यांना कोलंबसने केलेले अत्याचाराबद्दल, कत्तलीबद्दल संवेदनशीलता नव्हती. कारण ते स्वतः वसाहतवादी होते आणि त्यांनी सुद्धा मूळनिवासींच्या कत्तली केल्या होत्या. त्यामुळे ‘कोलंबस दिना’च्या उत्सवाची आयरनी जाणवली नाही. परंतु नंतर विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात एतद्देशीयांचा सन्मान म्हणून ‘कोलंबस दिना’चे माहात्म्य कमी झाले. मग १२ ऑक्टोबरला जास्त करून नेटिव्ह अमेरिकन दिन किंवा मूलनिवासी दिन म्हणायला सुरुवात झाली आहे. BLMच्या चळवळीचा परिणाम येत्या १२ ऑक्टोबरच्या उत्सवावर नक्कीच पडेल.

स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात स्त्रियांना स्थान नव्हते. विस्तार भयाने इथे स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रियांचा लढा, LGBTQ चे प्रश्न हे विषय घेतलेले नाहीत. स्त्री समतेच्या चळवळी या आंतरराष्ट्रीय पातळीवर झाल्या. अमेरिकेतील स्त्री चळवळींच्या विजयाचे श्रेय जास्त करून आंतरराष्ट्रीय चळवळींकडे जाते. सोव्हिएत रशियात ८ मे १९१७ ला स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला. अमेरिकेत स्त्रियांना मतदानाचा हक्क १९१९ला मिळाला. अमेरिकेत आंतरराष्ट्रीय स्त्री दिन, ८ मे, सोडून इतर काही स्त्री दिन मोठ्या प्रमाणावर साजरे होत नाही.

भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा इतिहास भारताच्या मागे होता. त्यामुळे भारतातील सर्व घटकांना एकदम स्वातंत्र्य मिळाले. अमेरिकेत ही प्रक्रिया उत्क्रांत होत गेली. ‘फोर्थ ऑफ जुलै’ ही सुरुवात होती. आता असाही एक कॉमन दिवस येवो, की सर्व प्रकारच्या लोकांना तो स्वातंत्र्याचा दिवस वाटो.

डॉ. प्रमोद चाफळकर, हे अमेरिकेतील मिशिगन स्टेटमध्ये राहतात आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये कन्सल्टन्सी करतात.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0