‘आज जेवढे भय आहे ते पूर्वीही नव्हतं’

‘आज जेवढे भय आहे ते पूर्वीही नव्हतं’

३७० कलम रद्द करण्याचा निर्णय सामान्य काश्मीरी सहज घेणार नाही. माझे काका मला म्हणाले, ईदच्या कुर्बानीसाठी बकरा आणू का? मी म्हणाले, आपणच कुर्बान झालोय आता पुढे काय करायचेय?

जामिया प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
विना सहकार नाही सरकार
राज्यसभेत ३७० कलम रद्द, जम्मू आणि काश्मीर व लडाख नवे केंद्रशासित प्रदेश

दोन आठवड्यापासून माझे व्हॉट्सअप अकाउंट अफवाच्या बातम्यांनी भरलेले होते. त्यानंतर आमचे फोन व नंतर इंटरनेट बंद झाले. काही तरी भयंकर घडणार आहे, कदाचित युद्धाच्या भीतीपोटी आम्ही अनेक दिवस पुरेल इतके अन्नधान्य साठवून ठेवले. नंतर अमरनाथ यात्रेकरूंना काश्मीर सोडण्याचे आदेशही मिळाले हेही लक्षात आले.

गेल्या सोमवारी सकाळी जाग आली तेव्हा मला काश्मीरचे वातावरण नेहमीसारखे वाटले नाही. सगळ्या वातावरणात कमालीची भीती, संशय, तणाव, रक्तपात असं वाटतं होतं. मी अतिशोयक्ती करत नाही. पण जर तुम्ही काश्मीरमध्ये अनेक वर्षे राहिले असाल तर तुम्हाला इथल्या वातावरणाचा अंदाज बांधता येईल. आमचे फोन बंद, मेसेजही जात नव्हते. इंटरनेट बंद झाल्याने आम्ही कुणाशीच संपर्क साधू शकत नव्हतो.

हे २१ वे शतक आहे आणि आपले सरकार काश्मीर हा आपलाच भाग असल्याचे सांगत या राज्यातल्या नागरिकांना अनेक दिवस भयाच्या व अस्थिरतेच्या वातावरणात राहण्याची जबरदस्ती करताना दिसत होते. नंतर आम्हाला हळू हळू केंद्र सरकारने ३७० कलम रद्द केल्याचे कळले. हा निर्णय सर्वनाशाचा आहे. सरकारची तयारी युद्धाची नव्हती ते असतं तर चांगले झाले असते. पण केंद्र सरकारने आमच्यावर थेट नियंत्रण मिळवले. पण असे नियंत्रण ते लष्कराच्या मार्फत पूर्वीही मिळवत आले आहेत.

पण ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय सामान्य काश्मीरी सहज घेणार नाही. माझे काका मला म्हणाले, ईदच्या कुर्बानीसाठी बकरा आणू का? मी म्हणाले, आपणच कुर्बान झालोय आता पुढे काय करायचेय?

आम्ही कर्फ्युमध्ये आहोत. एक प्रकारची भयाण शांतता सगळीकडे पसरलेली आहे. एकही दुकाने उघडे नाही. अत्यावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधेही घेता येत नाहीत. हा आठवडा ईद-उल-अधाचा आहे. हा आठवडा आशेचा असतो. मी माझ्या कुटुंबाला म्हटले, या दिवसात कर्फ्यु शिथिल करतील! तर मला त्यांनी असं उत्तर दिले, ‘जर ते जनतेचा विचार करत नाहीत तर त्या जनतेच्या आनंदाचा काय विचार करणार?’

मी आशा करते की हेच सत्य होऊ नये.

माझ्या घरातील मदतनीस फराझ (नाव बदलले आहे) हा दहशतवादग्रस्त जिल्हा कुपवारा येथे राहणारा आहे. त्याने एक आठवडा आपल्या कुटुंबाला पाहिलेले नाहीत. त्याचा संपर्क होऊ शकलेला नाही. तो मला सांगत होता, त्याच्या बायकोकडे पैसे नाहीत. माझी बायको माझ्या तीन मुलांना जेवण कसे देईल?

परवा मी माझ्या आजीकडे टीव्हीवरच्या बातम्या पाहण्यासाठी गेले. देशातले एक प्रमुख न्यूज चॅनेल काश्मीरमधील परिस्थिती अत्यंत शांत असून तेथे शुक्रवारी प्रार्थना म्हटल्या गेल्या असं खुशाल खोटं सांगत होते. मला संताप आला. मी मोहल्ल्यात ‘हम क्या चाहते है? आझादी!’, ‘नारा एक तकबीर, अल्लाह हू अकबर’, अशा घोषणा ऐकल्या आहेत. मला तो विरोध , ते बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज आठवतात. पण न्यूज चॅनेल वेगळेच चित्र सांगतात.

शुक्रवारी संध्याकाळी पेलेट गन्समुळे अनेक तरुण जखमी झाल्याचे मला कळाले. माझे काही नातेवाईक व शेजारी रस्त्यावर निदर्शने होत असताना ती घराबाहेर येऊन पाहात होते, त्यांनी त्यात भागही घेतला नव्हता पण त्यांना पेलेट गन्सचा तडाखा बसला. लष्कराचे जवान लोकांच्या घरात घुसून पेलेट गन्स वापरत होते. माझ्या शेजारच्या मुलाच्या डोळ्यावर आघात झाले त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे.

ही घटना कोणतीही मीडिया सांगणार नाही कारण त्यांनी ती पाहिलेलीच नाही. हा मीडिया जेथे शांतता आहे तेथे जाऊन लोकांचे इंटरव्ह्यू घेतो व उर्वरित देशाच्या जनतेला वाटते की काश्मीरमध्ये किती व्यवस्थित चालले आहे. काश्मीरमध्ये नेमके काय घडतेय आणि उर्वरित देशातील जनतेला काय वाटतेय हा वेगळाच विषय आहे.

रविवारी संध्याकाळी फराझ ईद साजरी करण्यासाठी मटण आणायला गेला होता. तो खाटकाच्या दुकानापाशी गेला. तेथे त्याला सांगण्यात आलं की, खाटकाच्या दुकानावरं काही तरुणांनी हल्ला करून खाटकाला दुकान चालू करू दिलं नाही.

मी विचारलं असा का हल्ला केला? आपण एक दिवस तरी सण साजरा करू शकत नाही का?

फराझ म्हणाला, दुकानावर जमलेली मुलं खाटकाला प्रश्न विचारत होती, की, हुतात्म्यांचे रक्त तू का विकतोयस?

फराझने सांगितलेला हा प्रसंग ऐकून आम्ही सगळे स्तब्ध झालो. या प्रदेशात रक्त सांडत असताना, जेथे मरणं हेच जगणं आहे त्या प्रदेशात आपण सुखाने राहू नाही शकणार!

लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. ते रस्त्यावर उतरून आता काश्मीर मागतील. जेव्हा मरणाची भीतीही संपेल तेव्हा या जगात दुसऱ्या क्रमाकांच्या लष्कराचा उपयोग काय?

दर ईदच्या आदल्या रात्री आम्ही सणाची तयारी करत असतो. यावेळी आम्हाला संचारबंदी उठवल्याचे सांगण्यात आले पण नंतर बातमी आली की पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. का लागू केली आहे याचे काहीही कारण सांगितले गेले नाही.

गेली २४ वर्षे मी ईद मनापासून आनंदात साजरी करत आहे. पण यंदा सगळेच जण असमाधानी, अस्वस्थ आहेत. फोन सुरू होतील तेव्हा तरी आपण एक कॉल आपल्या आप्तांना करू शकू व त्यांचा आनंद पाहू शकू असे वाटते.

आता अशीही अफवा पसरली आहे की, ईदनंतर खोऱ्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर होत जाणार आहे. १५ ऑगस्ट हा अनेक वर्षे काश्मीरमध्ये तणावपूर्ण असतो. आता तर तो कसा असेल याची मी कल्पना करू शकत नाही. मी कल्पनाही करून शकत नाही की आमच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलं असेल. मला माहितेय की काश्मीरी मुसलमानांना या जगात कुठेही जागा नाही.

कुरात अल अमिन यांनी क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले असून त्या काश्मीरमध्ये फिजिओथेरपीची प्रॅक्टिस चालवतात. त्यांनी एसएमएसद्वारे आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0