विजयात मोदींच्या प्रतिमेचे मोठे स्थान आहेच. मात्र केवळ प्रतिमेच्या बळावर एवढा मोठा विजय मिळविला असे मानणे फारच भाबडेपणाचे होईल. भाजप आणि मोदी सरकारने गेल्या ५ वर्षात यशस्वीपणे कोणते काम केले असेल तर २०१९च्या विजयाचे नियोजन केले! काँग्रेससह विरोधी पक्षांनी मात आणि माती खाल्ली ती इथेच! मोदींच्या निवडणूक यशाचे आकडे भव्य आहेतच पण आकड्या पलिकडचे हे यश त्यापेक्षा मोठे आहे. त्यांचे आकड्या पलिकडचे यश हाच खरा चिंतेचा विषय आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह सर्वच विरोधीपक्षांना जोरदार तडाखा देत लोकसभा निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला नेत्रदीपक विजय मिळवून दिला. या विजयाचे भाकीत मतदानोत्तर चाचण्यातून समोर आले होते तेव्हा त्यावर अनेकांचा विश्वास बसला नव्हता. सर्वच विरोधी पक्ष ते खोटे ठरतील अशी आशा लावून बसले होते. निकालाने त्यांची घोर निराशा केली. मतदानोत्तर चाचण्यानी वर्तविलेल्या विजयापेक्षाही मोठा विजय भाजप व मित्र पक्षांना मिळाला.
२०१४मध्ये भाजपने विजयाचे सर्वोच्च शिखर गाठले आणि आता फक्त घसरणच शक्य आहे असे सर्वसाधारण अनुमान होते. हे अनुमान खोटे ठरले. भाजपच्या मित्रपक्षांच्या जागांत किंचित घसरण पाहायला मिळाली तरी भाजपच्या जागात लक्षणीय वाढ होऊन पक्षाने यशाचे पुढचे शिखर गाठले. असे घडायला मागच्या ५ वर्षात मोदी सरकारने कुठल्या क्षेत्रात चमत्कार घडवून आणला हे त्या सरकारलाच सांगता येणार नाही अशी परिस्थिती असताना अचंबित करणारा विजय मिळाला आहे.
एखादा चमत्कार वाटावा असा हा विजय असल्याने वर वर विचार केला तर याचे कारण ‘मोदी है तो मुमकिन हैं’ असे देण्याचा मोह भाजप आणि भाजपा बाहेरच्या मोदी समर्थकांना झाल्याशिवाय राहणार नाही. मोदीजींची जी प्रतिमा जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे त्यांच्यामुळेच एवढा मोठा विजय मिळाला ही सर्वसाधारण जनतेची भावना होणे स्वाभाविक आहे. विजयात मोदींच्या प्रतिमेचे मोठे स्थान आहेच. मात्र केवळ प्रतिमेच्या बळावर एवढा मोठा विजय मिळविला असे मानणे फारच भाबडेपणाचे होईल. भाजप आणि मोदी सरकारने गेल्या ५ वर्षात यशस्वीपणे कोणते काम केले असेल तर २०१९च्या विजयाचे नियोजन केले! काँग्रेससह विरोधी पक्षांनी मात आणि माती खाल्ली ती इथेच!
विजय मिळविण्यासाठी कशाची गरज आहे हे हेरून नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष शाह, अरुण जेटली आणि प्रशासनातील विश्वासू व्यक्ती यांचा गट पक्ष आणि सरकारातील महत्त्वाचे निर्णय घेतात हे सर्वश्रूत आहे. या गटाने रणनीती आखून पाच वर्षे काम केले. प्रतिमा, प्रचार आणि साधनांचे नियोजन हा त्याचाच भाग होता. यांनी मोदी यांची आगळे वेगळे, खंबीर, आक्रमक आणि कट्टर राष्ट्रवादी प्रतिमेच्या आड हिंदू हिताचे रक्षण करणारा पंतप्रधान असा संदेश लोकांपर्यंत जाईल याची काळजी घेतली. अल्पसंख्याकांना जमावाकडून मारण्याचे प्रयत्न जेव्हा जेव्हा झाले तेव्हा तेव्हा मोदी मौन राहिले किंवा उशिरा बोलले. लोकांसमोर कशी प्रतिमा उभी करायची याच्या नियोजनाचा हा भाग होता. विरोधकांनी हे लक्षात न घेता बोलले नाहीत किंवा उशीरा बोललेत म्हणून त्यांच्यावर टीकेची झोड उठविली. अशा टीकेने सर्वसाधारण जनतेत त्यांना हवी असलेली प्रतिमा रुजविण्यास मदतच झाली.
तशी प्रतिमा आणि सोबत ‘काँग्रेसमुक्त भारता’चा संदेश देत मोदीजी फिरत राहिले. त्यांना प्रचारमंत्री म्हणून हिणवले गेले तरी त्यांनी आपला प्रयत्न सोडला नाही. २०१४च्या निवडणुकीत काँग्रेसला पूर्णपणे झोपवले असतांना आणि त्यातून सावरून काँग्रेस काही करण्याच्या स्थितीत नसतांना मोदीजी सतत काँग्रेसवर टीका करत राहिले. याचे कारण ना काँग्रेसने लक्षात घेतले ना इतरांनी. काँग्रेसची सर्वसमावेशकतेची, ‘आयडिया ऑफ इंडिया‘ची कल्पना मोडीत काढून आपली कल्पना रुजविण्याचा हा प्रयत्न होता. काँग्रेसची सर्वसमावेशक नीती, ज्यात बहुसंख्याक-अल्पसंख्याक समान असतील, नेहरूंच्यानंतर काँग्रेस नेतृत्वाकडून मांडली गेली नसल्याने त्याचा विसर जनतेला तर पडलाच, पण काँग्रेसजनांनाही पडला! काँग्रेसजनांपुढे सत्ताप्राप्तीशिवाय दुसरे उद्देशच न राहिल्याने काँग्रेस एक सत्तापिपासू , स्वार्थी आणि भ्रष्टाचारी जमात आहे आणि या जमातीने स्वत:ची घरे भरण्यापलीकडे देशासाठी काही केले नाही अशी प्रतिमा बिंबविणे आज सोपे जात आहे. काँग्रेसची ‘आयडिया ऑफ इंडिया‘ लोकांच्या मनातून पुसून भ्रष्ट प्रतिमा ठसविण्याचे काम मोदीजींनी सातत्याने आणि जोमाने केले. ही प्रतिमा पुसून टाकण्याचा प्रयत्न सोडा या प्रतिमेचा प्रतिवाददेखील निवडणूक प्रचारात किंवा अन्य वेळी काँग्रेसजन करत नाहीत. काँग्रेसजनांना जनतेसमोर उजागिरीने उभा राहता येवू नये आणि उभे राहिले तरी त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवू नये यासाठी त्यांना भ्रष्टाचारी ठरविण्यावर मोदींचा कटाक्ष राहिला आहे. काँग्रेस संपविण्यापेक्षा काँग्रेसची विश्वासार्हता त्यांना संपवायची आहे. काँग्रेसच्या भारताच्या संकल्पनेच्या विरोधात मोदीजींची म्हणजे संघपरिवाराची संकल्पना असल्याने त्यांचा काँग्रेसविरोध प्रखर आणि द्वेषयुक्त आहे.
संकल्पनांची लढाई बहुसंख्य काँग्रेसजनांच्या गांवीही नाही. एवढा मोठा आणि जुना पक्ष असा कसा संपेल हा भ्रम काँग्रेसजन जोपासत राहिले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणतात की संघ-भाजपशी आमची लढाई ही विचाराची लढाई आहे. त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यानाच नव्हे तर नेत्यांना विचारून पाहावे काँग्रेसची विचारधारा काय आहे? १०० पैकी ९९ जणांना सांगता येणार नाही. इंदिराजींच्या काळापासून काँग्रेसला सत्तेच्या यंत्राचे स्वरूप आले आहे. सत्तेचे हे यंत्र काम करत नसेल तर काँग्रेसमध्ये राहून उपयोग काय म्हणत काँग्रेसवाले त्यांच्या ‘विचारधारेचा शत्रू’ असलेल्या भाजपा गोटात आनंदाने सामील होतात. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप काँग्रेसची सतत भ्रष्ट प्रतिमा लोकांसमोर ठेवते आणि काँग्रेसमधील भ्रष्टोत्तमाना आपल्या पक्षात बिनदिक्कत सामील करून घेते. काँग्रेसला उभेच राहता येऊ नये ही यामागची रणनीती आहे. आत्ताचा निवडणूक निकाल मोदी-शाह यांच्या रणनीतीला यश येत असल्याची पावती आहे. मोदींच्या निवडणूक यशाचे आकडे भव्य आहेतच पण आकड्या पलिकडचे हे यश त्यापेक्षा मोठे आहे. त्यांचे आकड्या पलिकडचे यश हाच खरा चिंतेचा विषय आहे.
मोदी – शहा यांना प्रादेशिक पक्षांची अजिबात चिंता नाही. काँग्रेसपेक्षाही त्यांच्या यशाचा रथ अनेक ठिकाणी प्रादेशिक पक्षांनीच रोखला तरी त्यांना त्याची चिंता नाही. कारण कोणत्याही प्रादेशिक पक्षाकडे विचारधारा नाही की समाज कसा असला पाहिजे याची दृष्टी नाही. प्रादेशिक अस्मितांना किंवा जाती भावनेला थारा आणि हवा देऊन सत्ता मिळविण्यात त्यांना रस आहे. केंद्रातील सत्तेपेक्षा आपापला किल्ला राखण्यात त्यांना अधिक रस आहे. केंद्रातील ज्यांची सत्ता यांचा किल्ला अबाधित राखण्यास मदत करील त्यांच्या मागे उभे राहायला यांना अडचण नाही. आज भाजप स्वबळावर सत्तेत आली आहे. पण एनडीए जरी बहुमतात नसते तरी भाजपला रोखणाऱ्या प्रादेशिक पक्षांची मदत घेऊन सत्तेत परत येणे मोदी – शहा यांचेसाठी कठीण नव्हते. दीर्घकाळ राज्य करून संविधानाला हातही न लावता सगळ्या सरकारी यंत्रणा दिमतीला घेऊन आपली विचारधारा रुजवायच्या व्यापक रणनीतीनुसार मोदी आणि शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची वाटचाल सुरू आहे. प्रादेशिक पक्ष नव्हे तर काँग्रेस, समाजवादी आणि कम्युनिस्ट या वाटचालीतील खरे अडथळे आहेत. समाजवादी संपल्यात जमा आहेत, कम्युनिस्टांना घरघर लागलीच आहे. ढेपाळली असली तरी उठून उभे राहण्याची शक्यता काँग्रेसमध्ये असल्याने काँग्रेस लोकांच्या नजरेतून उतरेल याची एकही संधी मोदीजींनी या ५ वर्षात सोडलेली नाही. २०१९चे लोकसभा निकाल त्यांच्या प्रयत्नांना चांगले यश मिळत असल्याचे निदर्शक आहे.
आत्ताचे यश आणखी ५ वर्षे सत्ता मिळविण्यात आलेले यश नाही तर भाजपसहित संघ परिवाराला आपली ‘आयडिया ऑफ इंडिया’ लोकांच्या गळी उतरविण्यात आलेले यश आहे. काँग्रेसला भाजपाच्या विरोधात उभे राहून भाजपाला रोखायचे असेल तर आपली ‘आयडिया ऑफ इंडिया’ लोकांच्या गळी उतरावी लागेल. अनेकांना भाजपा आणि काँग्रेसच्या स्वप्नातील भारतात नेमका काय फरक आहे असा प्रश्न पडला असेल. भारतात राहणाऱ्या सर्वांचा भारत आहे आणि भारत हा हिंदूंचा आहे या त्या दोन संकल्पना. काँग्रेसची संकल्पना स्वातंत्र्य लढ्याची देणं आहे आणि स्वातंत्र्य लढ्यातूनच ती संविधानात झिरपली आहे. खरे तर काँग्रेसलाच ही संकल्पना पेलली नाही आणि या संकल्पनेला न्याय देता आला नाही. यातून अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण आणि बहुसंख्यांक असलेल्या हिंदूंना डावलल्या गेल्याची भावना निर्माण झाली. ही भावना हेच मोदी आणि भाजपाची शक्ती आहे. याच शक्तीने भाजपाला निवडणुकीत मोठे यश मिळवून दिले आहे. काँग्रेसला पुन्हा उभा राहायचे तर आपली चूक सुधारावी लागेल.
पक्ष म्हणून काँग्रेसमध्ये अनेक दोष असतील नव्हे आहेतच. पण सर्वसमावेशकतेचा झेंडा उंच ठेवण्यासाठी आज तरी त्यापेक्षा दुसरा चांगला पर्याय दिसत नाही. म्हणूनच काँग्रेसच्या आजच्या अवस्थेकडे धोक्याची घंटा म्हणून पाहिले पाहिजे. निवडणूक कौलाचे स्वागत आणि स्वीकार करण्यासोबतच या कौलातील निहित धोके स्पष्ट करण्याची गरज आहे.
सुधाकर जाधव, राजकीय विश्लेषक आहेत.
COMMENTS