अहंमन्य लोकांची कथा : आप अँड डाऊन

अहंमन्य लोकांची कथा : आप अँड डाऊन

गांधी यांची मुख्य नाराजी आहे ती केजरीवाल आणि हजारे यांच्या एक प्रकारच्या हुकूमशाही वर्तनाबद्दल. दोघेही माणसांचा उपयोग करून घेतात, उपयोग संपला की माणसांना फेकून देतात.

झारखंडनंतर आता दिल्लीचा कौल कुणाला?
कोविड उद्रेक: काँग्रेस, सपाकडून प्रचारसभा रद्द
‘आप’चाच भाजपला करंट

अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल ही दोन माणसं गेली वीसेक वर्षं सतत बातम्यांमधे असतात. कधी ते लोकप्रियतेच्या शिखरावर असतात तर कधी टीकेचे बळी ठरलेले असतात. ते मधे मधे झाकोळल्यासारखे वाटतात, पण मावळत नाहीत, चमकू लागतात.

भारतातलं राजकीय वातावरण गरगर ढवळून काढणाऱ्या या दोन व्यक्तींच्या अंतरंगाची काहीशी कल्पना आप अँड डाऊन हे प्रस्तुत पुस्तक देतं. पुस्तक २०१८ साली प्रसिद्ध झालंय

लेखक आहेत, मयंक गांधी. गांधीची दोन प्रमुख वैशिष्ट्यं. ते अर्बन प्लानर आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहे. व्यवस्थापन कौशल्याचं शिक्षण घेतलेले गांधी आर्किटेक्ट्स, इमारती बांधणार इंजिनियर आणि शहरांचं व्यवस्थापन करणारे नोकरशहा यांचं संयोजन करत, घरबांधणीच्या सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेत. त्या निमित्तानं त्याना नोकरशाही, भ्रष्टाचार, लालफीत, जनसामान्यांना होणारा त्रास या गोष्टींचा परिचय झाला. त्यातूनच ते सामाजिक कार्यकर्ते झाले.

गांधींचे काका बिल्डर होते. काही काळ त्यांनी आपल्या काकांकडं काम केलं, त्यांच्यावर बिल्डर असा शिक्का बसला.

देशातली राजकीय व्यवस्था, सरकार, जनसामान्यांचं कल्याण करत नाही या मताचे झाल्यावर गांधी संघटना बांधून सामाजिक कार्य करू लागले. माणसांशी ते फार झटकन जोडले जातात. ते संघटना उत्तम बांधतात. मुंबईत नागरिकाना संघटित करून स्वतंत्र स्वच्छ उमेदवार त्यांनी निवडून आणले. माहितीचं, माहितीच्या अधिकाराचं महत्व लोकांच्या लक्षात आणून देऊन माहितीच्या अधिकाराचं आंदोलन त्यांनी संघटित केलं. ते संघटीत करत असतानाच ते अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्या संपर्कात आले.

माहितीचा अधिकार आंदोलन, भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलन आणि लोकपाल आंदोलन या तीन आंदोलनात गांधी सक्रीय होते, राष्ट्रीय संयोजक होते. श्रीश्री, बाबा रामदेव, अग्नीवेश, मेधा पाटकर, योगेंद्र यादव, प्रशांत किशोर या माणसांना त्यांच्या संघटनांसह आंदोलनात आणण्यात गांधींचा हात मोठा होता. केजरीवाल आणि हजारे यांच्याशी त्यांचा अगदी समोरा समोर, हृदयसंवाद होता. त्या दोघांबरोबरच्या बैठक संवादाची अनेक चित्रं या पुस्तकात पहायला मिळतात.

केजरीवाल यानी आम आदमी पक्ष स्थापन केला त्याला गांधींचा पाठिंबा होता, निवडणूक आणि सरकार स्थापना यातही गांधी सक्रीय होते.

यथावकाश गांधी नाराज झाले, त्यांनी केजरीवाल, हजारे यांच्यापासून, त्यांच्या संघटनांपासून स्वतःला दूर केलं. पुस्तक लिहितांना ते मराठवाडा विभागातल्या दुष्काळी बीड जिल्ह्यात ग्रामीण विकासाच्या कामात गुंतलेले आहेत.

मयंक गांधी केजरीवाल आणि अण्णा हजारे यांच्या प्रेमातच होते, आजही प्रेमात आहेत. त्या दोघांपासून दूर झाले असले तरी त्या दूर होण्यात कटुता नाही. केजरीवाल, हजारे यांच्याबरोरचे दिवस आनंदाचेच होते पण मतभेद असल्यानं आपण दूर होतोय असा गांधींचा पवित्रा आहे. पुस्तकात ते सतत जाणवतं.

पुढारी, त्यांचे आपसातले संबंध, संघटना निर्मिती आणि आंदोलनं या घटनामधले अनेक बारकावे गांधींच्या कथनातून कळतात.

गांधी यांची मुख्य नाराजी आहे ती केजरीवाल आणि हजारे यांच्या एक प्रकारच्या हुकूमशाही वर्तनाबद्दल. दोघेही माणसांचा उपयोग करून घेतात, उपयोग संपला की माणसांना फेकून देतात. सत्तेच्या शिडीतल्या पायऱ्यांसारखी ते माणसं वापरतात, वरच्या पायरीवर गेलं की खालची पायरी कामाची उरत नाही.

गांधी जोवर त्या दोघांच्या होला हो म्हणत होते, गांधींची मतं जोवर त्यांच्या बाजूची होती तोवर गांधी त्यांना प्रिय होते. जेव्हां मतं पटली नाहीत तेव्हां दोघानी खुबीनं गांधींना दूर केलं.

गांधींवर ते बिल्डर असल्यानं श्रीमंतांचे धार्जिणे असल्याचा आरोप झाला. आरोप करणारी माणसं कोण होती ते गांधींनी लिहिलेलं नाही. पण ती कोणीही असू शकतात. गांधीनी आपण बिल्डर होतो म्हणजे काय याचा नीट खुलासा केला होता. केजरीवाल किंवा हजारे यांनी तो खुलासा ग्राह्य मानून गांधींवरचे आरोप पुसले नाहीत. दोघानीही गुळणी धरली. मेधा पाटकर म्हणाल्या – गांधी बिल्डर आहेत असं लोकं म्हणतात, मीही ऐकलं आहे. आंदोलनात बिल्डर असणं मला योग्य वाटत नाही. गांधी बिल्डर आहेत की नाहीत याची शहानिशा त्यांनी केली नाही, हा सूर्य हा जयद्रथ असा तुकडा पाडला नाही, गुळणी धरली.

तिघांनीही गांधींच्या बदनामीला निमूट मान्यता दिली.

गांधींवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. गांधीनी पुराव्यासह उत्तरं दिली. केजरीवाल, हजारे यांनी चौकशी निकाली काढली नाही, ना गांधीना आरोपमुक्त केलं, ना दोषी ठरवलं. शेवटी गांधींना एकतर्फी पद्धतीनं राजीनामा देऊन बाहेर पडावं लागलं. त्यांना केजरीवाल, हजारेंनी थांबवलं नाही.

केजरीवाल म्हणत की आम आदमी पार्टी ही चळवळ आहे. ती संसदेतही असेल आणि रस्त्यावरही असेल. ते म्हणत की आम आदमीचे पदाधिकारी, उमेदवार लोकांमधूनच निवडले जातील, कारभार पारदर्शी असेल.

प्रत्यक्षात केजरीवाल काय किवा हजारे काय, दोघांचंही त्या बाबतीतलं वागणं नेमकं विरोधात होतं. केजरीवाल आणि हजारे यांना सोयीची असलेली माणसं पदाधिकारी होत, निर्णय प्रक्रियेत भाग घेत. जे कोणी अशा निवडीबद्दल संशय किंवा विरोध प्रकट करत त्याना हाकलून दिलं जाई.

पक्ष, संघटना, ध्येय धोरणं ठरवणं या बाबत योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांचे केजरीवालशी मतभेद होते. मतभेद गंभीर होते. केजरीवालनी त्या दोघाना एकतर्फी रीतीनं काढून टाकलं. एकतर्फी आरोप, एकतर्फी चौकशी, एकतर्फी निर्णय. आरोपीना उत्तर द्यायलाही वाव ठेवला नव्हता. बैठकीतून हुसकावून लावण्यात आलं, बाऊन्सर वापरण्यात आले. खुद्द गांधी यांच्याभोवतीही बाऊन्सर ठेवण्यात आले होते.

गांधी लिहितात की केजरीवाल आणि हजारे दोघंही प्रसिद्धी लोलूप होते.

एकीकडं आम आदमी पार्टी मोठी होणं, त्या पार्टीनं दोन वेळा भरघोस मतानी दिल्लीची सत्ता मिळवणं. दुसरीकडं अण्णांच्या आंदोलनांचा प्रसार भारतभर होणं आणि त्यातून सत्ता कोसळणं. आणि आतल्या बाजूला तर हे असे अहंमन्य पुढारी.

गंमत अशी की बाबा रामदेव आणि श्रीश्री हे सुद्धा तितकेच अहंमन्य. मेधा पाटकरही तशाच. या सर्वांनी आपापली कुरणं राखली होती. केजरीवालांचं कुरण, हजारेंचं कुरण, तसंच या लोकांची कुरणं. वरील पुढारी आणि त्यांच्या संघटना त्यांचे स्वतंत्र अजेंडे घेऊन चळवळीत उतरल्या होत्या. अण्णा आंदोलन ही छत्री, त्या छत्रीखाली स्वतःच्या छत्र्या खाकेत ठेऊन सामिल झालेली ही माणसं.

इतकं स्वच्छ गांधी यांनी लिहिलेलं नाही पण त्यांच्या लिखाणातून ते नीटपणे दिसतं. साहित्यामधे जसे अनेक पदर, लेयर्स असतात, तसे लेयर्स गांधींच्या लिखाणातही आहेत.

किरण बेदी आंदोलनात होत्या. त्या भाजपचा अजेंडा तिथं चालवत. अग्नीवेश काँग्रेसचा अजेंडा चालवत.

सर्वाना वाटे की आपण अण्णांना मामा बनवून आपापली भाकरी भाजून घेणार आहोत. अण्णा महा बेरकी. बाकीच्यांच्या भाकऱ्या भाजून झाल्या की नाहीत माहीत नाही, अण्णांची हौस मात्र भागली. अण्णांच्या प्रसिद्धीच्या भाकऱ्या मात्र छान भाजल्या गेल्या.

विद्यमान राजकारणाचं, समाजकारणाचं एक चित्र गांधींच्या पुस्तकातून उभं राहतं.

प्रत्येक माणूस हे एक पॅकेज असतं. गुणावगुणांचं. अशी अनेक माणसं एकत्र येऊन संघटना तयार होते तेही एक अनेक परस्परांशी विसंगत असणाऱ्या गोष्टींचं पॅकेज असतं. अशा अनेक संघटना एकत्र येऊन आंदोलन तयार होतं तेही एक पॅकेजच असतं. पुढारी, कार्यकर्ते, संघटना, चळवळ हे सारं अनेक पॅकेजेसचं एक पॅकेज असतं.

उद्या केजरीवाल आणि हजारे यांनी अशीच पुस्तकं लिहिली तर त्यात गांधीच्या खाचाखोचा लिहिल्या जातील, असलेल्या किंवा नसलेल्या खाचाखोचा. काय माहित.

प्रत्येक माणूस, अशा माणसांच्या मिळून घडणाऱ्या घटना हे एक कधीच पुर्णतया न उलगडणारं कोडं असतं.

शेवटी उरतं काय? तर या लोकांच्या खटपटीतून निघणारे परिणाम.

आम आदमी पार्टी तयार झाली, त्यानी दिल्लीतलं सरकार चांगलं चालवलं, दिल्लीकर जनतेचं जीवन अधिक सुखकर केलं.

माहिती अधिकार, भ्रष्टाचार विरोध, लोकपाल ही आंदोलनं अण्णांनी केली. त्यातून खूपच जनजागृती झाली, लोकांना समाजवास्तव कळलं, त्यांना आपल्या अधिकाराची जाणीव झाली.ही सुद्धा खूपच मोठी गोष्ट घडली.

खूप खूप गोष्टी कळतात मयंक गांधी यांच्या पुस्तकातून.

निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0