नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेतील ४० व त्याहून अधिक टक्के मुस्लिम मतदार असलेले सर्व म्हणजे ५ विधानसभा मतदारसंघ आपने आपल्याकडे खेचले आहेत. २०१५मध्ये या प
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेतील ४० व त्याहून अधिक टक्के मुस्लिम मतदार असलेले सर्व म्हणजे ५ विधानसभा मतदारसंघ आपने आपल्याकडे खेचले आहेत. २०१५मध्ये या पाचपैंकी एक जागा भाजपकडे होती.
आप या पक्षाचा सर्वात नेत्रदीपक विजय होता तो ओखला येथील आपचे उमेदवार अमानुल्ला खान यांचा. या अमानुल्ला खान यांना भाजपने लक्ष्य केले होते. ओखला मतदारसंघात शाहीन बाग येत असल्याने तेथील आंदोलनाचा पक्षाला फटका बसू नये म्हणून केजरीवाल व आपचे अनेक ज्येष्ठ नेते तेथे प्रचाराला आले नव्हते. पण पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह यांनी शाहीन बागला भेट दिली होती. शाहीन बागच्या आंदोलनात पक्षाचे नेते गेल्यास भाजपला धुव्रीकरणाचा फायदा होऊ शकतो ही भीती शेवटपर्यंत आपच्या नेत्यांमध्ये होती. तरीही अमानुल्ला खान यांनी भाजपचे उमेदवार ब्राहम सिंग यांना ७० हजारहून अधिक मतांनी हरवले. मतफेरीच्या पहिल्या टप्प्यात ब्राहम सिंग २ हजार मतांनी पुढे होते पण नंतर सर्वच फेऱ्यांमध्ये अमानुल्ला खान यांनी बाजी मारली. काँग्रेसचे उमेदवार व राज्यसभेचे खासदार परवेझ हाश्मी यांनी २.५ टक्के मते मिळवली.
ओखला मतदारसंघ मुस्लिम बहुसंख्य आहे. आपच्या यशात मुस्लिम मतदारांचा मोठा सहभाग आहे. या मतदाराने काँग्रेसपेक्षा आपला जवळ केले.
बल्लीमारन मतदारसंघात आपचे उमेदवार इम्रान हुसेन यांनी भाजपच्या उमेदवार लता सोधी यांचा ३६,१७२ मतांनी पराभव केला. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार हारून युसूफ ४,७९७ मते मिळवून तिसऱ्या क्रमाकांवर आले. त्यांना ४.७ टक्के मिळाली.
मातिया महल मतदारसंघात आपचे उमेदवार शोएब इक्बाल यांनी भाजपचे उमेदवार रवींदर गुप्ता यांचा ५०,२४१ मतांनी पराभव केला. शोएब इक्बाल हे या अगोदर पाचवेळा दिल्ली विधानसभेचे आमदार राहिले आहेत. त्यांचा पहिला पक्ष जनता दल होता, नंतर लोक जनशक्ती, काँग्रेस असा प्रवास करत यावेळी त्यांनी आपचे तिकीट मिळवले होते. या मतदारसंघात काँग्रेसच्या मिर्झा जावेद अली यांना केवळ ३,४०३ मते मिळाली व ते तिसरे आले.
मुस्तफाबाद मतदारसंघात हाजी युनुस यांनी भाजपचे नेते जगदीश प्रधान यांचा २०,७०४ मतांनी पराभव केला. युनुस यांना ९८,८५० मते मिळाली. एक वेळ अशी होती की प्रधान यांनी युनुस यांच्यावर २९ हजार मतांनी आघाडी घेतली होती. पण नंतरच्या सर्व फेऱ्यांमध्ये युनुस यांनी मुसुंडी मारत विजय प्राप्त केला.
सीलमपूर या मतदारसंघात आपने अखेरच्या क्षणी विद्यमान आमदार मोहम्मद इश्राक यांना डावलून अब्दुल रेहमान यांना तिकिट दिले. अब्दुल रेहमान यांनी भाजपचे उमेदवार कौशल कुमार यांच्यावर ३६,९२० मतांनी विजय मिळवला. या मतदारसंघात काँग्रेसचे पाच वेळा निवडून आलेले आमदार मतीन अहमद यांना २०,२०७ मते मिळाली. मतीन अहमद हे हिंदू मतदारांमध्येही लोकप्रिय होते पण त्यांना पराभव चाखावा लागला.
मूळ बातमी
COMMENTS