दंगलग्रस्त जहांगीरपुरी भागात अतिक्रमण विरोधात बुलडोझर कारवाई

दंगलग्रस्त जहांगीरपुरी भागात अतिक्रमण विरोधात बुलडोझर कारवाई

नवी दिल्लीः हनुमान जयंतीच्या दिवशी शहरातील जहांगीरपुरी येथे दंगल उसळली होती. या भागात बुधवारी मोठ्या पोलिस फौजफाट्याच्या उपस्थितीत अतिक्रमण पथकाने कार

मोफत मेट्रो-बससेवा
अहंमन्य लोकांची कथा : आप अँड डाऊन
दिल्लीत भाजप नेते धार्मिक भावना भडकवण्याच्या प्रयत्नात

नवी दिल्लीः हनुमान जयंतीच्या दिवशी शहरातील जहांगीरपुरी येथे दंगल उसळली होती. या भागात बुधवारी मोठ्या पोलिस फौजफाट्याच्या उपस्थितीत अतिक्रमण पथकाने कारवाई करत अनेक बांधकामे पाडली. महापालिकेच्या या कारवाईने दिल्लीतले राजकारण तापले उचलून उ. प्रदेशातील बुलडोझरचे राजकारण भाजपने दिल्लीत आणल्याचा आरोप आप, काँग्रेस व डाव्या पक्षांनी केला.

जहांगीरपुरी येथे अतिक्रमणाची कारवाई सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने काही तासाने कारवाई रोखण्याचे आदेश महापालिकेला दिले पण त्यानंतरही पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई चालूच ठेवली. यात एक मशिदीचा भाग पाडण्यात आला तर एका अवैध बांधकाम केलेल्या मंदिराला मात्र न्यायालयाचा आदेश आल्याचे सांगत कारवाईतून सूट देण्यात आली. पालिकेने जी बांधकामे पाडली त्या संदर्भातील नोटीस संबंधितांना दिल्या नव्हत्या असेही काही पीडित नागरिकांचे म्हणणे होते. काही बांधकामे ३० वर्षांहून अधिक काळ उभ्या आहेत. त्या संदर्भात पालिकेची कागदपत्रेही पीडितांकडे असताना त्या कागदपत्रांकडे दुर्लक्ष करून पालिकेने ही कारवाई केल्याचे दिसून आले.

पालिकेच्या या कारवाईविरोधात वरिष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत अतिक्रमण पाडण्याचा पालिकेचा आदेशच घटनाबाह्य व अनधिकृत असल्याचा दावा केला. अतिक्रमण पथकाची कारवाई बुधवारी दुपारी २ वाजता सुरू होणार होती पण ती सकाळी ९ वाजताच सुरू केली. ज्यांची बांधकामे पाडली त्यांना नोटीसही दिली नाही असे दवे यांनी न्यायालयात सांगितले. यावर सरन्यायाधीशांनी कारवाईला स्थगिती देत गुरुवारी यावर सुनावणी घेण्यात येईल असे स्पष्ट केले.

पालिकेचे बुलडोझर बांधकामे पाडत असताना माकपच्या ज्येष्ठ नेत्या वृंदा करात सर्वोच्च न्यायालयाचे स्थगितीचे पत्र घेऊन बुलडोझर पुढे उभ्या होत्या आणि त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना कारवाई मागे घेण्यास सांगितले.

दिल्लीची शांतता भंग करण्याचा भाजपचा प्रयत्नः आप

दरम्यान जहांगीरपुरीमध्ये अतिक्रमण कारवाई करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपकडून दिल्लीची शांतता भंग केली जात असल्याचा आरोप आपने केला आहे. आपचे आमदार अमानुल्ला खान यांनी ट्विटरवर पालिकेचे अधिकारी रमझानच्या पवित्र महिन्यात जहांगीरपुरीतील विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दोन दिवसांपूर्वी भाजपचे दिल्ली प्रदेश प्रमुख आदेश गुप्ता यांनी जहांगीरपुरी येथील दंगलखोरांच्या अवैध बांधकामाची माहिती घेऊन त्यावर बुलडोझर चालवले गेले पाहिजेत असे मागणी करणारे पत्र पालिकेला पाठवले होते.

या पत्रानंतर लगेच पालिकेने कारवाई केल्याने बुलडोझर राजकारण हे मुस्लिमांविरोधात सुरू झाल्याचा आरोप भाजपवर केला जाऊ लागला.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही राज्यघटनेच्या सरनाम्याच्या पानावर बुलडोझर चालवला जात असल्याचे छायाचित्र ट्विट केले. भाजप भारताच्या घटनात्मक मुल्यांना उध्वस्त करत असून गरीब अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात आहे. भाजपने आपल्या मनातील मत्सर, विखार दूर केला पाहिजे असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0