आपकी याद आती रही!

आपकी याद आती रही!

जयदेव (वर्मा) : १९१८- १९८७ गीत, गझल, भजन, कव्वाली, रागदारी, लोकसंगीत अशा सर्व संगीत प्रकारांचा योग्य वापर जयदेव यांनी आपल्या संगीतात केला. आवश्यक व कमीत कमी वाद्यवृंद घेऊन संगीत देणे ही त्यांची खासियत.

‘ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यावर एकमत’
साथींच्या रोगात मुंबईचा साथी- कस्तुरबा रूग्णालय
‘जलयुक्त शिवार योजने’चा फज्जा

हिंदी चित्रपटसृष्टी हजारो लोकांच्या स्वप्नपूर्तीचे माहेरघर. कितीतरी रसिक मनाशी पडद्यावर झळकण्याची इच्छा उराशी बाळगून मुंबईला आपले नशीब आजमावण्यासाठी येतात. फार थोडे यशस्वी होतात. काही इच्छुकांचे मार्ग बदलतात. नायक बनण्यासाठी आलेले मुकेश, जयकिशन, किशोरकुमार शेवटी वेगळ्याच क्षेत्रात चमकले. गुरुदत्त उत्तम नर्तक पण यश मिळाले नायक-दिग्दर्शक म्हणून. चित्रपटसृष्टीमध्ये प्रामाणिक प्रयत्न उपजीविकेसाठी काही न् काही नक्कीच देऊन जातात.

पूर्व आफ्रिकेतील नैरोबी (केनिया) मध्ये जन्मलेला जयदेव मुंबईमध्ये स्थिरावतो काय, १९३२मध्ये ‘अलीबाबा’ नावाचा चित्रपट पाहून त्याला हिंदी चित्रपटसृष्टीचे आकर्षण निर्माण होते काय, लुधियाना, जोधपूर, लाहोर असा प्रवास करत प्रसिद्ध सरोदवादक अली अकबर खान यांचा सहाय्यक म्हणून काम करावयास लागतो काय, सगळेच अकल्पनीय. सुरूवातीच्या काळात चारपाच बी ग्रेड फिल्ममध्ये दुय्यम भूमिका करत लुधियानाला घेतलेल्या संगीताच्या धड्याच्या आधारे जयदेवला अली अकबर खान यांचा सहाय्यक म्हणून संधी मिळाली. चेतन आनंद निर्मित ‘आंधिया’ व ‘हमसफर’ चित्रपटाने जयदेवची सांगीतिक सफर सुरू झाली. चित्रपट यशस्वी न झाल्याने अली अकबर खान यांनी संगीत दिग्दर्शनाकडे पाठ फिरवली. जयदेव मात्र मुंबईमध्ये राहीले. पुढे सचिनदेव बर्मन यांचे सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले.

१९५५मध्ये चेतन आनंद यांनी ‘जोरुका भाई’ चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी जयदेव यांच्यावर टाकली. ‘जाये तो जाये कहां’च्या तुफान लोकप्रियतेमुळे जयदेव यांनी तलतच्या आवाजात ‘तेरी जुल्फोसे प्यार कौन करे’ हे अप्रतिम गीत रसिकांना दिले. याच गीताचं फिमेल व्हर्जन ‘सुबहका इंतजार कौन करे’ सुद्धा तितकेच लोकप्रिय झाले. लतादीदींच्या आवाजातील ‘तू सच बतला मुझे जोगी’, आशाचे ‘नैना काहेको लगाये’, ‘चली गोरी नाजो पली बन ठन’ सारखी गीते अप्रतिम होती. चित्रपटात लता, आशा, तलतशिवाय किशोर, शमशाद, एस. बलबीरसारख्या गायक- गायिकांच्या आवाजाचा वापर जयदेव यांनी कल्पकतेने केला होता. एका संगीतकाराकडून अपेक्षित असलेल्या सर्व गोष्टी ‘जोरूका भाई’ चित्रपटाच्या संगीतात होत्या. परंतु चित्रपटसृष्टी यश व व्यवसाय बघते. त्यामुळे जयदेव यांचे योगदान किंचितसे दुर्लक्षित राहिले. १९५६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘समंदरी डाकु’ चित्रपटात जयदेव यांनी ‘दिल जवां है आरजू जवां’ हे तलत आशाच्या आवाजातील नितांतसुंदर युगुलगीत दिले. पुढे १९५७मध्ये चेतन आनंद निर्मित ‘अंजली’ चित्रपटात जयदेव यांना संधी मिळाली. या चित्रपटाचे संगीत अप्रतिम होते. लताने गायलेले ‘किस किस को दीपक प्यार करे’, आशाने गायलेली ‘दीपक से दीपक जल गये’, ‘रोऊं मै गिन गिन तारे’ इत्यादी गीते लोकप्रिय झाली. चेतन आनंद आणि सचिन देव बर्मन यांच्याशी असलेल्या संपर्कामुळे जयदेव यांचे ‘नवकेतन’ बॅनरशी असलेले संबंध टिकून होते. जयदेव हे नाव संगीतकार म्हणून सर्वतोमुखी झाले नसले तरी सिनेउद्योगाने त्यांची दखल नक्कीच घेतली होती. पण तिकीटबारीवर वरील चित्रपटांना फारसे यश न मिळाल्याने मोठे बॅनर त्यांना मिळत नव्हते.

नवकेतन निर्मित ‘हम दोनो’ १९६१मध्ये प्रदर्शित झाला आणि त्याचे संगीत खूपच गाजले. जयदेव पूर्णार्थाने स्वतंत्र संगीतकार म्हणून स्थापित झाले. ‘अल्ला तेरो नाम’, ‘प्रभू तेरो नाम’ ही दोन चिरकालीन भजने, ‘अभी न जाओ छोडकर’ हे अजरामर प्रेमगीत, ‘कभी खुदपे कभी हालातपे रोना आया’ ही रफीच्या आवाजातील गझल, ‘मै जिंदगी का साथ’ हे रफीच्याच गायकीने नटलेले जीवनाकडे बघण्याचा बेफिकीर दृष्टिकोन दर्शविणारे गीत, सगळंच अफलातून. देव आनंद, साधना, नंदा यांची बेमालूम अदाकारी, कथानकातील ट्विस्ट, जयदेवचे संगीत सगळंच अप्रतिम. जयदेव यांचे सिनेउद्योगातील पहिले यश.

पण साहिर, सचिनदेव बर्मन आणि आता जयदेव यांच्यातील जुना वाद परत उफाळून आला. स्वर श्रेष्ठ की शब्द. दुर्दैवाने जयदेव ‘नवकेतन’ बॅनरमध्ये परत दिसले नाही. ‘किनारे किनारे’ चित्रपटात जयदेवने लता, रफी, मन्ना डे, तलत, मुकेशसारख्या प्रचलित गायकांच्या आवाजात पाच सोलो गाणी दिलीत. सर्वच गीते एकाहून एक. ‘आज अचानक टुटे देखे मन बीनाके तार’, ‘हर आंस अश्कबार है’ (लता), ‘चले जा रहे हैं मोहब्बत के मारे’ (मन्ना डे), ‘जब गमे इश्क सताता है’ (मुकेश), ‘तेरी तस्वीर भी तुझ सी हसीन है’ (रफी), दर्दी रसिकांसाठी मेजवानीच.

१९६३मध्ये ‘मुझे जीने दो’, एक सर्वांगसुंदर गीतांचा अल्बम. लोकसंगीताची लयलूट. मुळात एक डाकू व गणिकेची कथा. चित्रपटाच्या पार्श्वभूमीला साजेसे संगीत जयदेव यांनी दिले. लताने गायलेली ‘रातभी है कुछ भीगी भीगी’ हे मुजऱ्याच्या अंगाने जाणारे गीत तसेच ‘तेरे बचपन को जवानी की दुवा देती हुं’ हे ममतेचा स्पर्श असलेले व अपत्याच्या भविष्याबद्दल वाटणारी अनामिक भीती दर्शविणारे गीत. दोन्ही गीते लतादीदी व जयदेव यांच्या संगीत सफरीतील मैलाचे दगड. याच चित्रपटात वहिदा रेहमान व चित्रपटातील वातावरणाला साजेसा आशाताईंचा आवाज इतर गीतांसाठी वापरणे ही कल्पकता जयदेव यांचीच.

पुढे चारपाच वर्षापर्यंत जयदेव यांना बी ग्रेड चित्रपट मिळाले. त्यात ‘हमारे गमसे मत खेलो’, ‘जियो और जीने दो’, ‘सपना’ वगैरे. १९७१ला के. ए. अब्बास यांचा ‘दो बूँद पानी’ आला आणि जयदेवच्या संगीताने परत कात टाकली. ‘पितलकी मेरी गागरी’ (मिनू पुरुषोत्तम, परवीन सुलताना), ‘जारी पवनिया पियाके देस जा’ (आशा), ‘बनी तेरी बिंदिया की लेलो रे बल्लैया’ (लक्ष्मी शंकर) सारखी राजस्थानी लोकसंगीतावर आधारित लोकप्रिय गीते चित्रपट न चालल्याने रसिकांपर्यंत तितकीशी पोहचू शकली नाहीत.

‘एक थी रिटा’ चित्रपटात जयदेवने वर्तमान काळातील संगीतासारखे संगीत देण्याचा प्रयत्न करून पाहिला. ‘ये शोर है गली गली’ (रफी) हे उडत्या चालीचे गीत कधीमधी ऐकू येते. ‘मै किसे अपना कहूं’ (लता मुकेश), ‘कही हाथ हमसे छुडा तो न लोगे’ (आशा) ही गीते चांगली जमली होती. १९७१च्या ‘रेशमा और शेरा’ने जयदेवचे श्रेष्ठत्व परत एकदा सिद्ध केले. जयदेवच्या कारकिर्दीतील पहिला राष्ट्रीय पुरस्कार ‘रेशमा और शेरा’ने मिळवून दिला. ‘तू चंदा मै चांदनी’, ‘इक मिठीसी चुभन’ ही लताने गायलेली गीते राजस्थानी मांड या लोकगीत प्रकारावर आधारित होती.
‘भावना’, ‘मान जाईए’, ‘आलिंगन’, ‘परिचय’, ‘फासला’, ‘एक हंसका जोडा’, ‘आंदोलन’ इत्यादी चित्रपटात जयदेवने काही गाणी शास्त्रीय संगीताचा आधार घेऊन दिली. पण चित्रपट कधी आलेत व कधी गेलेत हे कळलेच नाही. त्यामुळे बरीचशी गीते चांगली असूनही लोकांपर्यंत पोहचू शकली नाहीत. ‘प्रेम पर्बत’ चित्रपटाच्या संगीताने जयदेवची प्रतिभा रसिकांपर्यंत फिरून एकदा पोहचली. राग पहाडीवर आधारित गीत ‘ये दिल और उनकी निगाहोके साये’ खूप लोकप्रिय झाले. ‘ये नीर कहांसे बरसे’, ‘मेरा छोटासा संसार’ ही लतादीदींनी गायलेली गाणी ‘रेशमा और शेरा’ तसेच ‘मुझे जिने दो’ची आठवण करून देणारी ठरली.

‘प्रेम पर्वत’ (१९७३) व ‘आलाप’ (१९७७) चित्रपटांनी जयदेवचे संगीत पुनर्जीवित केले. अमिताभ, रेखासारखी स्टारकास्ट, संगीताला पोषक अशी कथावस्तू असल्याने जयदेव यांनी शास्त्रीय संगीताचा वापर करत सुमधुर संगीत दिले. जयदेव यांनी लता, येसूदास, फैय्याज, भूपिंदरसारख्या गायकांच्या आवाजाचा वापर करत प्रत्येक गीत लोकप्रिय केले. घर मिळविण्यासाठी करावी लागणारी धडपड व तडजोड ही कथावस्तू घेऊन ‘घरोंदा’ नामक चित्रपटाची निर्मिती झाली. अमोल पालेकर, श्रीराम लागू, झरीना वहाबसारख्या दिग्गज कलाकारांसोबत गुलजारची गीते व जयदेवचे संगीत. छान भट्टी जमली. ‘एक अकेला इस शहरमे’, ‘तुम्हे हो ना हो’, ‘दो दिवाने शहरमें’ ही गीते खूप गाजली. रूना लैलाचा आवाज रसिकांना खूप आवडला. जयदेवने भूपिंदर व रुना लैलाचा आवाज मोठ्या धाडसाने वापरला व हा प्रयोग यशस्वी राहिला. पुनर्जन्मावर आधारित ‘तुम्हारे लिए’ चित्रपटातील गीते खूप गाजली. ‘गोविंदम भज मेरे मना’, ‘तुम्हे देखती हूं’, ‘बांसुरिया मन हर ले गयी’ ही गीते अप्रतिमच होती. ‘दूरियां’, ‘वोही बात’, ‘सोलवा सावन’, ‘आयी तेरी याद’, ‘एक गुनाह और सही’सारखे चित्रपट आले व गेलेत. संगीत चांगलं असूनही जनमानसापर्यंत पोहचू शकले नाही.

‘गमन’ (१९७९) आणि ‘अनकही’ (१९८४) चित्रपटाच्या संगीताने जयदेवचा आत्मसन्मान परत एकदा उंचावर नेऊन ठेवला. दोन्ही चित्रपटाच्या संगीताला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. जयदेव, रेहमान व इलाई राजा हे तिघे संगीतकार तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे ठरले. ‘आपकी याद अाती रही’ या गीतासाठी छाया गांगुलीला सर्वोत्कृष्ट गायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. जयदेवने ‘गमन’ चित्रपटात छाया गांगुली सोबत सुरेश वाडकर, हरिहरन, हिरादेवी मिश्रासारखे नवीन आवाज वापरले. गझल, लोकगीत, शास्त्रीय संगीत वापरून ‘गमन’ने जयदेवला उत्कृष्ट संगीतकार म्हणून कायम स्वरुपी ओळख दिली.

भविष्यशास्त्र व विज्ञान यांच्यातील संघर्ष म्हणजे ‘अनकही’ची कथा. कसदार अभिनय आणि कथेला साजेसे संगीत. भीमसेन जोशी यांनी गायलेली भजने, आशाची दोन गीते म्हणजे चित्रपटाचा प्राण ठरला. जयदेवला तिसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘चांद ग्रहण’ हा जयदेवचा शेवटचा चित्रपट ठरला. ४०-४२ चित्रपट करून तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळविणे ही कुठल्याही संगीतकारासाठी अभिमानाची गोष्ट. यातले पाच-सहा चित्रपट प्रदर्शित सुद्धा होऊ शकले नाहीत.

जयदेवने सिनेसंगीताइतकेच योगदान गैरफिल्मी संगीतात दिले. लता, आशा बरोबरच छाया गांगुली, शैला गुलवाडी, सीमा सैगल, पिनाझ मसानी, हरिहरन, भूपिंदरसारख्या गायकांना त्यांच्या उमेदवारीच्या काळात संधी देण्याचे श्रेय जयदेव यांना निश्चितच जाते.

मदन मोहनच्या जाण्याने अपूर्ण राहिलेल्या ‘लैला मजनू’ चित्रपटाचे संगीत जयदेव यांनीच पूर्ण केले. टीव्ही मालिका ‘रामायण’मधील रागमालिका रवींद्र जैन यांच्या सोबत जयदेव यांनीच स्वरबद्ध केली होती.

अशा गुणी संगीतकाराला वैयक्तिक आयुष्यात नेहमीच संघर्ष करावा लागला. त्यांच्या जीवनाचा उत्तरार्ध खडतर राहिला. त्यांच्या सांगीतिक जीवनात संघर्ष पाचवीलाच पुजलेला होता. ६ जानेवारी १९८७ला मुंबईत जयदेव यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झाले. गीत, गझल, भजन, कव्वाली, रागदारी, लोकसंगीत अशा सर्व संगीत प्रकारांचा योग्य वापर जयदेव यांनी आपल्या संगीतात केला. आवश्यक व कमीत कमी वाद्यवृंद घेऊन संगीत देणे ही त्यांची खासियत. मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर करून सुद्धा अपेक्षित यश त्यांना नेहमीच हुलकावणी देत राहिले. तीन दशकांहून जास्त काळ लोटल्यावर सुद्धा त्यांचे संगीत सतत ऐकावेसे वाटते. अशा गुणवंत संगीतकाराला भावपूर्ण आदरांजली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: