खुशियों के गुप्तचर : गीत चतुर्वेदी यांची कविता

खुशियों के गुप्तचर : गीत चतुर्वेदी यांची कविता

गीत चतुर्वेदी यांच्या कवितेत अनुराग, सौंदर्य, सर्जन, संगीत, मौन आणि प्रार्थना पुरेपूर भरून राहिले आहेत. तसेच त्यांच्या काव्यात स्फोटक वर्तमानाचा तणावही साचलेला आहे.

टोनी मॉरिसन : वेदनेचं महाकाव्य लिहिणारी लेखिका
वाचनसंस्कृती आणि आपण सारे
सर्व जिल्ह्यांत ‘पुस्तकांचे गाव’

गीत चतुर्वेदी हे समकालीन हिंदी साहित्यातील महत्त्वाचे कवी आहेत. समकालीन हिंदी साहित्यात सर्वाधिक वाचले जाणारे साहित्यिक अशीही त्यांची ओळख आहे. कथा, निबंध, अनुवाद, सिनेसमीक्षा अशा विविध प्रांतात त्यांनी लेखन केले असले तरी त्यांना मुख्यतः कवी म्हणून ओळखले जाते. २०१७ साली प्रकाशित झालेला गीत यांचा काव्य संग्रह ‘न्यूनतम मैं’ जवळपास दोन वर्षे हिंदी साहित्य विश्वात बेस्ट सेलर लिस्टवर होता. या संग्रहाने गीत चतुर्वेदी यांची कवी म्हणून सर्वदूर ओळख निर्माण झाली. जगभरच्या १९ विविध भाषांत गीत यांच्या कवितांची भाषांतरे झाली. अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. ‘सिमसिम’ या कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाला बहुप्रतिष्ठित ‘पेन – हॅम ट्रान्सलेशन ग्रांट’ हा पुरस्कार लाभला आहे.

सरत्या वर्षाच्या अखेरीस त्यांचा तिसरा कविता संग्रह ‘खुशीयों के गुप्तचर’ प्रकाशित झाला आहे. संग्रह प्रकाशित होताच हिंदी आणि अन्य भारतीय भाषिक वाचकांनी त्यावर अक्षरशः उड्या घेतल्या. केवळ साहित्यात रस असणारे वाचकच नव्हेत तर मुश्किलीनेच साहित्यविश्वाकडे वळणारे लोकही गीत यांच्या कवितांचे चाहते आहेत. भारतीय साहित्यविश्वात अशी अभूतपूर्व किमया गीत यांच्या कवितेने साध्य केली आहे. गीत चतुर्वेदी एकाच वेळी गंभीर समीक्षक आणि सामान्य वाचक दोघांना प्रिय वाटणारे असे कवी आहेत.

‘खुशियों के गुप्तचर’ या संग्रहाने गीत चतुर्वेदी हे श्रेष्ठ भारतीय कवी आहेत हे अधोरेखित केले आहे. मात्र असे विधान करत असतानाच श्रेष्ठ कवी म्हणजे कशा प्रकारचा कवी? आणि त्यांच्या काव्यात नेमकी कुठली वैशिष्ट्ये अनुस्यूत असतात? या प्रश्नांकडेही आपण पाहायला हवे.

जगभरच्या श्रेष्ठ गणल्या गेलेल्या कवींच्या साहित्याचे तुलनात्मक दृष्ट्या आस्वादन केले की, त्यांच्या काव्यातील आणि काव्य विषयातील वैविध्यता गृहीत धरूनही काही समान गोष्टी शोधणे अगदीच शक्य आहे.

अफाट सृष्टीविषयी आणि तिच्या निर्मितीविषयी विस्मय असणे, छोट्या छोट्या गोष्टींपासून ते विक्राळ मृत्यूपर्यंत कवीचे कुतूहल, जीवनावर आणि त्याच्या पावित्र्यावर असणारी कवीची श्रद्धा, अदृष्टाचे आकर्षण आणि मानवता ही अभिजात कवींची सारी वैशिष्ट्ये गीत यांच्या काव्यात गवसतात. या परंपरेचे गीत यांना सजग असे भान आहे. मात्र त्यांची बांधिलकी केवळ अभिजात साहित्यापुरती मर्यादित नाही. समकालीन वैश्विक साहित्य त्यांनी सूक्ष्मपणे अभ्यासले आहे. वास्तवाबद्दल सतत संशय व्यक्त करणे, श्रद्धेची चिकित्सा करणे, निर्मात्याच्या अस्तित्वाविषयी साशंक असणे, जीवनाच्या हेतूवरच प्रश्न उभे करणे अशी परस्परविरोधी उत्तर आधुनिक वैशिष्ट्येही त्यांच्या काव्यात आढळतात. या परस्परविरोधी गोष्टींनी त्यांची कविता गोंधळून मात्र गेली नाही. उलट सतत प्रश्न उभे करणाऱ्या, अस्तित्वाच्या खरेपणावर संशय व्यक्त करणाऱ्या आणि वास्तवाचा फोलपणा तपासून पाहणाऱ्या चिकित्सक आधुनिक मानवी जाणिवांचा त्या सशक्त आविष्कार ठरल्या आहेत. त्यांच्या कवितेत विश्वसाहित्यातील थोर प्रभूती दांते, होमर पासून ते थेट मराठीतील अरुण कोलटकर, नामदेव ढसाळ येथवर संदर्भ पाहता गीत यांचे विस्तृत वाचन आणि त्या वाचनाची रेंज थक्क करणारी आहे.

त्याबरोबरच गीत चतुर्वेदी सर्जन, त्याची प्रेरणा, सर्जनाचे स्फुरण, ते व्यक्त करण्याची कवीची असमर्थता आणि कुंठा यांकडेही अत्यंत कुतूहलाने तर कधी संशयाने पाहतात. ‘खुशियों के गुप्तचर’ या संग्रहाच्या भूमिकेत ते म्हणतात, “लेखकाचा प्रवास हा बहुत करून कोलंबससारखा असतो. तो जोमाने प्रवासाची तयारी करतो आणि भारताच्या शोधात प्रस्थान करतो. ज्या स्थळी तो पोहोचतो त्यालाच भारत समजतो. नंतर त्याला ठाऊक होतं, हा प्रदेश म्हणजे भारत नव्हे. कोलंबस कधीच भारतापर्यंत पोहचू शकला नाही. लेखकसुद्धा आपल्या साहित्यातून त्या प्रदेशापर्यंत बहुधा कधीच पोहोचू शकत नाहीत ज्याविषयी ते विचार करत, बोलत असतात.’

मात्र नेमके ते व्यक्त करण्याची कवीची असमर्थताच त्याला सातत्याने रचना करण्याची प्रेरणा देते. त्या रचनेतूनच तो ‘जे सांगायचे’ त्याच्या अधिकाधिक निकट जाण्याचा प्रयत्न करत असतो. त्यादृष्टीने पाहिले तर हरेक कवीची प्रत्येक कविता कवीला गवसलेल्या सत्याच्या मांडणीचा एक अयशस्वी प्रयत्न असते. मात्र ती फोल नसते. सत्याच्या दिशेने केलेली ती एक सूचक रचना असते. कविता निर्देश करते त्या दिशेने नेमके काही गवसणे तेव्हाच शक्य होते.

‘खुशियों के गुप्तचर’ या संग्रहातील गीत यांची ‘कवितेची रात्र’ ही कविता पाहू.

 प्रत्येक वर्षी अशी एक रात्र येते

जेव्हा एक कविता

पुस्तकाच्या पानांवरून उठते

आणि काजवा बनून जंगलाकडे निघून जाते.

 जेव्हा सूर्याला मोठं ग्रहण लागेल

आणि चंद्र रुसून निघून जाईल

हेच काजवे जंगलातून परत येतील

आणि काळोखाचं भय वाटणाऱ्यांना

उजेडाचा रस्ता दाखवतील.

*

चांगल्या मृत्यू ची परिभाषा :

दिवसभर काम करून इतके थकून जा

की रात्री गाढ निद्रा येईल.

*

विलक्षण शांतपणे हा दगाबाज देह

मृत्यूसोबत मिलनाची तयारी करतो.

मन आणि आत्म्याला चाहुलही लागत नाही.

*

मला माझ्या चेहऱ्यावर चिमणीचे पंख

आणि तुझी चुंबनं ठेऊन मारायचं आहे

 मला मरायचंय त्या आघातांनी

जे हृदयाच्या अशा भागावर होत राहिले

ज्याचा नकाशा माझ्या देहाच्या कागदाने फाटून गेला होता.

*

गीत चतुर्वेदी यांच्या काव्यात आधुनिक कवितेतून हरवत चाललेली गेयता आहे. शब्दा-शब्दांत आणि ओळींच्या मांडणीत लय आहे. या लयीतून एक अदृश्य संगीत निनादत राहते. स्वतः गीत म्हणतात तसे, “संगीत अत्यंत आवश्यक आहे. बाहेरचं संगीत नसलं तरी आंतरिक संगीत असावं लागतं.’ गीत यांच्या काव्यात या आंतरिक संगीताचं अस्तित्व प्रकर्षाने जाणवतं. “माझं सारं लेखन वस्तुतः एक ऐकू न येणारं संगीत शब्दांत पकडण्याचा यत्न आहे. मी असा एकही चांगला लेखक पाहिलेला नाही जो उत्तम तर आहे मात्र ज्याच्या लिखाणात संगीत ऐकू येत नाही.’

मुश्किल समय

जब मुश्किल समय आए,

सबकुछ बेकाबू हो जाए,

उससे थोडा और प्रेम करना

जिससे अब तक तुम करते आए।

या ओळींतील नादमयता विलक्षण आहे. भाषा आणि कवितेच्या सौंदर्याचे त्यांना भान आहे. आपल्या साहित्यकृतीतून गीत केवळ कविताच नव्हे तर सौंदर्याची निर्मिती करत आहेत अशी त्यांची धारणा आहे. अत्यंत विनम्रपणे त्यांनी ही धारणा विशदही केली आहे. सौंदर्याचे स्मरण आणि सौंदर्याची कल्पना यांच्या मदतीने एका सुंदर वास्तवाची निर्मिती करता यावी अशी प्रार्थना ते आपल्या कवितेतून करतात.

गीत चतुर्वेदी यांच्या कवितेत अनुराग, सौंदर्य, सर्जन, संगीत, मौन आणि प्रार्थना पुरेपूर भरून राहिले आहेत. तसेच त्यांच्या काव्यात स्फोटक वर्तमानाचा तणावही साचलेला आहे. क्रोध, बेईमानी, तिरस्कार, धोका किती झपाट्याने फोफावत चालले आहेत, प्रेम, करुणा आणि अनुराग गवसणे या विस्फोटक काळात किती मुश्किलीने झाले आहे. अनेक प्रकारची विविधता असूनही मानवतेच्या समान बंधाने आपण बांधले गेलो आहोत. मात्र केवळ क्षुल्लक मतभेदांचे कारण होऊन वाढीस लागलेला संहार आणि त्यामुळे हीनदीन पातळीवर उतरत चाललेली मानवता त्यांना अस्वस्थ करते.

पूल पडल्याने मेलेल्या माणसाच्या घरात

गरम तव्यावर पडलेल्या थेंबासारखे

चर्र करून गेलेले जीवन ही

वाया जात नाही,

तव्याला वाद्ययंत्रासारखे ते वाजवून जाते.

मग हा तर एक पूर्ण मनुष्य होता

ज्याचं हसू

 काळोखाशी ताऱ्यासारखं झुंजत होतं.

मरणकळा लागलेल्या त्या खोलीत

केवळ दोनच गोष्टी आता हसत होत्या:

एक मरणाऱ्याचा फोटो.

आणि रडणाऱ्या स्त्रीच्या कडेवरलं दोन  महिन्याचं मूल.

 या कवितेतील गीत यांचा मानवतावादी दृष्टिकोन थक्क करणारा आणि समकालीन कवितेत दुर्लभ असा आहे. कुंवर नारायण ते अशोक वाजपेयी या परंपरेतील गीत चतुर्वेदी एक महत्त्वाचे कवी आहेत हे त्यांच्या ‘खुशियों के गुप्तचर’ या संग्रहाने अधोरेखित केले आहे. पाब्लो नेरुदा या श्रेष्ठ स्पॅनिश कवीने सुरवातीच्या काळात ज्या अत्यंत सुंदर प्रेम कविता लिहिल्या त्याची आठवण करून देणाऱ्या गीत यांच्या कविता वाचणे हा विलक्षण सुखद आणि सौंदर्यपूर्ण असा अनुभव आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0