नियतीने वयाच्या ५७ व्या वर्षी अब्दुला अल-रशिदीचे स्वप्न साकार केले. रिओलाही त्याने कांस्य पदक पटकाविले होते. पण आजच्या कांस्य पदकाचे समाधान वेगळेच होते. चार वर्षांपूर्वी त्याचा कोणताही देश नव्हता ना गणवेश.
पाच वर्षांपूर्वी, रिओ ऑलिम्पिकला तो आला होता. त्याला त्यावेळी देशच नव्हता. ना देशाचा युनिफॉर्म. कारण तो ज्या देशाच्या रहिवासी होता त्या कुवैतला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) बाद केले होते. आता तो टोकियोत दाखल झाला. वय वर्षे ५७. पाच वर्षांपूर्वी पन्नाशी ओलांडलेला. कुणी देश देता का देश. कुणी ऑलिम्पिक सहभागासाठी आधार देता का आधार! असं आवाहन करीत रिओमध्ये भटकत होता. आयत्यावेळी सारं काही मिळेल; देश कसा मिळणार? त्याची विनवणी आयओसीने ऐकली. त्याला वैयक्तीक खेळाडू म्हणून रिओ ऑलिम्पिकला सहभागाची परवानगी मिळाली. त्याने मग रिओ ऑलिम्पिक पुरुषांच्या स्कीट शूटिंगमध्ये भाग घेतला.
खरं तर तो १९९६ (अटलांटा) पासून ऑलिम्पिक स्पर्धेत उतरत होता. २०००, २००४, २००८, २०१२ या स्पर्धांचा अनुभव होताच. रिओचे सहावे ऑलिम्पिक होते. पण यावेळी त्याच्या पाठीवर देशाचे नावच नव्हते. त्याच्या झुपकेदार मिशांनी ब्राझिलवासियांना भुरळ घातली होती. देशवासियांनी आवाहन केले की त्याला ब्राझिलने आपल्या चमूतून उतरावे. तांत्रिकदृष्ट्या तसे करता येत नव्हते.
पण तो हिंमत हरला नाही. त्याने स्वतंत्र, खेळाडू म्हणून उतरविण्याची तयारी केली. कोणत्याही देशाची जर्सी त्याच्याकडे नव्हती. पण ब्राझिलवासियांची मने त्याने जिंकली होती. तमाम ब्राझिल त्याच्यापाठी उभा राहीला होता. आणि आश्चर्य घडले. त्या आधीच्या पाचही ऑलिम्पिकमध्ये त्याला एकही पदक मिळाले नव्हते. रिओला त्याने चक्क ऑलिम्पिक स्कीट शूटिंगमध्ये कांस्य पदक पटकाविले.
त्याच्या कुवैती नागरिकांना त्याच्या या पराक्रमाची गंधवार्ताही नव्हती. त्यालाही त्यांची पर्वा नव्हती. ब्राझिलच्या नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे तो एवढा प्रेरित झाला होता की त्याने हूलकावणी देत असलेले ऑलिम्पिक पदक पटकाविले होते.
त्यांच्या झुपकेदार मिशांमुळे ब्राझीलवासियांना त्याला “बाय गोडे” असे संबोधण्यास सुरुवात केली होती. रिओमधून त्याला ब्राझिलच्या नागरिकांनी परत जाऊ दिले नाही. त्याला ब्राझिलचे नागरिकत्व मिळाले. बायगोडे… बायगोडे… नावाचा सतत घोष होत होता.
आता तो ५७ वर्षांचा आहे. टोकियोला अभिमानाने ब्राझिलचा गणवेष घालून आला. ब्राझिलने त्याला प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली.
सोमवारी टोकियोमध्ये त्याला चीअर करायला कुणीही नव्हतं. प्रेक्षकांना टोकियोत येण्याची परवानगी नव्हती. पण त्याच्या कानात ब्राझिलवासियांचा रिओमधला तो आवाज सतत गुंजत होता. आज आपल्या नव्या देशासाठी त्याला ऑलिम्पिक पदक जिंकायचे होते. नियतीने वयाच्या ५७ व्या वर्षी त्याचे म्हणजे अब्दुला अल-रशिदीचे स्वप्न साकार केले. रिओलाही त्याने कांस्य पदक पटकाविले होते. पण आजच्या कांस्य पदकाचे समाधान वेगळेच होते. चार वर्षांपूर्वी कोणताही देश नव्हता ना गणवेश. ‘अर्सनेल’ हा इंग्लंडमधील एका फुटबॉल क्लबचा “टी-शर्ट” घालून तो स्पर्धेत उतरला होता. त्याच्या मुलाचा तो टी-शर्ट होता. अर्सनेलला “द गनर्स” या टोपण नावाने ओळखलं जातं हे देखील त्याला ठाऊक नव्हतं.
कुवैतच्या वाळवंटात, १९७०च्या सुमारास तो वडिलांसोबत शिकारीला जायचा. त्यावेळी त्याचे वय जेमतेम १२ असेल. त्यावेळी कुवैतमध्ये शूटिंग रेंजही नव्हती. हा खेळ करणारे सर्वजण वाळवंटातच सराव करायचे. पण अल-रशिदीने स्पर्धात्मक शूटिंगला वयाच्या २५ व्या वर्षी सुरुवात केली. साठीकडे झुकल्यानंतरही त्याचे या खेळावरचे प्रेम तसेच आहे. यावेळच्या यशाची चव अधिक चांगली आहे. देशवासियांचे प्रेम, पाठिंबा काय असतो याचा त्याने अनुभव घेतला आहे. चव अनुभवली आहे. त्याच ब्राझिलवासियांनी पाच वर्षांपूर्वी त्याला हुलकावणी देत असलेल्या ऑलिम्पिक पदकापर्यंत नेले होते. आज पुन्हा एकदा तो ऑलिम्पिक पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर चढला. कांस्यपद मिळण्याअगोदरच त्याने आपल्या खिशात ठेवलेला कुवैतचा ध्वज काढला आणि खांद्यावर ठेवला. ऑलिम्पिकच्या नियमानुसार पदक मिळवण्याअगोदर विजेता खेळाडूने आपल्या देशाचा ध्वज घेऊ नये असा दंडक आहे. पण अल-रशिदीने हा नियम धुडकावून लावला.
त्याच्या कांस्य पदकाला सोनेरी झळाळी दिसत आहे. एखादा खेळच हे चमत्कार करू शकतो. ऑलिम्पिक चळवळीचा तो महत्त्वाचा भाग आहे. वाळवंटातील तो म्हणूनच ब्राझिलसाठी मैदानात उतरला. पदक मिळविण्याचा जिद्दीने. वयाच्या मर्यादांनाही त्याने मागे टाकले.
विनायक दळवी, हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार असून अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे त्यांनी वार्तांकन केले आहे.
COMMENTS