आपण स्मृतिभ्रंशाच्या काळात जगत आहोत – विसपुते

आपण स्मृतिभ्रंशाच्या काळात जगत आहोत – विसपुते

उदगीर येथे होत असलेल्या १६ व्या विद्रोही साहित्य संमेलनात संमेलनाचे अध्यक्ष कवी गणेश विसपुते यांनी केलेले अध्यक्षीय भाषण.

शेतकरी आंदोलन आणि नवउदारमतवाद
निषेधाचा अधिकार घटनात्मक; २ यूएपीए आरोपींना जामीन
कोविडमध्ये दिसलेली असमानता दूर करण्याची बजेटला संधी

मित्रांनो आणि मैत्रिणींनो,

गेल्या दोन दशकांहूनही अधिक काळ कार्यरत असलेल्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं त्यांच्या यंदाच्या १६व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मला निवडून इथं बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे. दरम्यानच्या या दोन दशकात झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनांचे मातब्बर अध्यक्ष बाबुराव बागुल, वाहरु सोनवणे, तुळसी परब, यशवंत मनोहर, संजय पवार, जयंत पवार, प्रल्हाद लुलेकर यांच्यासह सर्व पूर्वाध्यक्षांचा मी आदरपूर्वक उल्लेख करतो. या सर्व संमेलनांमध्ये त्या त्या काळात समाजाला आणि लेखकाला

विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी गणेश विसपुते.

विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी गणेश विसपुते.

पडणाऱ्या प्रश्नांची अर्थपूर्ण चर्चा झालेली आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ ही गेली २३ वर्षं चालू आहे. त्यांच्या बोधचिन्हातच समतेला होकार, विषमतेला नकार हे सूत्र असल्याचं आपल्याला दिसेल.

वर्चस्ववाद, पुरुषसत्ताकवाद, भांडवली मूल्यं यांच्या विरोधात ही सांस्कृतिक चळवळ आहे. म. फुल्यांनी साहित्य संमेलनाबाबत “त्यात अखिल मानवाचे हित सापडत नाही,” असं म्हटलं होतं, त्यात त्यांना त्याकाळात जी सबळ कारणं दिसली होती, तीच आताही मौजुद आहेत असं मला वाटतं. समाजातल्या विविध स्तरांना, भाषा-बोलींना, जाती-जमातींना व्यापकपणे सामावून घेतलं गेलं पाहिजे. दुही आणि बेकीला विरोध करणं, एकसूरी अभिव्यक्तीला नाकारणं यासाठी दलित, भटके विमुक्त, आदिवासी, कष्टकरी, स्त्रिया आणि निराश झालेला तरुणवर्ग या सगळ्यांचे आवाज उमटवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध समांतरपणे प्रयत्न व्हायला हवेत. म्हणून अशी वेगवेगळी बहुआवाजांना सामावून घेणारी संमेलनं होत राहाणं गरजेचं आहे.

आजचा काळ पाहाता मूलभूत मानवी मूल्यं, लोकशाहीची पायाभूत तत्त्वं आणि कल्याणकारी राज्याची कल्पना यांनी निगुतीनं विणलेल्या वस्त्राची वीण केवळ उसवलेलीच नाही तर त्याच्या चिंध्या-धांदोट्या होतांना आपण पाहात आहोत. हे सगळं बोलण्याचा अवकाशही उघडपणे आज संकोचत जात असतांना ती संधी मला मिळत आहे. म्हणून इथं येण्याचा आनंद अनेक पातळ्यांवरचा आहे.

ज्या मराठवाड्यात हे संमेलन होत आहे तिथल्या भूमीशी माझी जन्मानं नाळ बांधलेली आहे. ज्या बहुरंगी संस्कृतीतलं इथलं वैविध्य पाहात आम्ही वाढत होतो त्यात मराठी गद्याला नवा चेहरा देणारे चक्रधरांसारखे महानुभाव होते, हिंदू-तुर्क संवाद लिहिणारे एकनाथ होते, ज्ञानेश्वर, जनाबाई, बहेणाबाई, नामदेव असे वारकरी परंपरेतले संत होते, मराठीच्या कवितेची अभिमानास्पद ओळख सांगता येईल असे शेख महंमद होते. सूफी संप्रदायातले थोर शायर आणि ज्यांनी दकनी उर्दूचा पाया घातला त्या वली औरंगाबादी यांच्याबद्दल तर आवर्जून सांगायलाच पाहिजे. ज्ञानेश्वरांनी संस्कृतविरुद्ध जसं बंड केलं तसंच वलीसाहेबांनीही दरबारी फारसी न वापरता आपली स्वतःची भाषा गढ़ली. त्यांच्या काव्यात मराठी, उर्दू, संस्कृत हिंदीचं मिश्रण होतं. दखनी उर्दूचा आणि भारतातल्या गझलचा पाया त्यांनी घातला असं म्हटलं जातं. त्यांना वली सूरती किंवा वली गुजराती या नावांनीही ओळखलं जातं. कारण नंतर ते गुजरातेत स्थायिक झाले होते. सर्व धर्मांनी परस्परांना आदर आणि प्रेम देण्याची तिथली पद्धत त्यांना इतकी भावली की ते गुजरातेच्या प्रेमात पडले. त्यांना एकदा दिल्लीला जावं लागलं होतं, तेव्हा आपल्या लाडक्या भूमीच्या विरहानं ते दुःखी झाले होते. ते त्यांनी “गुजरात के फ़िराक़ सूं है ख़ार ख़ार दिल । बेताब है सिने मिनी आतिश बहार दिल।” अशा शब्दांत मांडलं होतं. अर्थात ही वेगळ्या काळातल्या गुजरातची कथा आहे. २००२मध्ये या महान कवीची अहमदाबादेतली मज़ार एके रात्री गुपचूप उद्ध्वस्त करून रातोरात त्यावर सिमेंटचा रस्ता बांधला गेला. हा मला वलींशी गुजरातेशीला, आताच्या हिंसक असहिष्णू काळाशी जोडणारा दुवा आहे. आणि  त्याचप्रमाणे सिराज औरंगाबादी हे सुद्धा वलींनंतरचे १८व्या शतकातले श्रेष्ठ सूफी कवी होते. त्यांच्या ग़झ़लमधला हा शेर म्हणजे आजच्या काळातल्या उन्मादात बधिर झालेल्या आणि दृष्टी गमावून बसलेल्या लोकांसाठीच लिहिलेला आहे की काय असं वाटतं. त्या दोन ओळी अशा आहेतः

आलम-ए-दीवानगी क्या ख़ूब है
बे-कसी का वहाँ किसी कूँ ग़म नहीं

तर संस्कृतीच्या या महाप्रवाहात या सगळ्यांतून वाहात आलेल्या खनिजांच्या आणि मूलद्रव्यांच्या पाण्यावर आम्ही वाढत गेलो. अंबाजोगाईच्याच दासोपंतांनी संस्कृतच्या तुलनेत मराठी कशी विस्तारशील आहे हे सांगतांना, ‘संस्कृतें ‘घटु’ म्हणती । आता तया घटांचे भेद किती।’ असं म्हणत एका ‘घट’ या शब्दासाठी मराठीत हारा, डेरा, रांजणु, मुढा, पगडा, आनु, सुगड, तौली, सुजाणु, घडी, घागरी, घडौली, आळंदे, वाचिकें, बौळी, चिटकी, मोरवा, पातली असे अनेक शब्द आहेत हे सांगत-‘एके संस्कृतें सर्व कळे । ऐसे कैसेन ?’ असा प्रश्न विचारलेला आहे. १९२५सालानंतर भाषाशुद्धीवाल्यांना हे कळते तर मराठीचेही अधिक भले झाले असते.

मराठवाडा हा विविध संप्रदायांचा समन्वय झालेला प्रदेश आहे. महानुभाव संप्रदाय, वारकऱ्यांचा भक्तिसंप्रदाय, सुफी संप्रदाय, वैष्णव, जैन आणि बौद्ध तसंच वचन साहित्याची धाराही तिथे नांदलेली आहे. इतिहासानं या भूमीला अनेक भाषा, धर्म, पंथ आणि विविध दर्शनांचं एकजीवीकरण करण्यासाठी निवडलं होतं. हा या सगळ्या गोष्टींचा मेल्टिंग पॉट होता. भक्ती आणि सूफी संप्रदायांतील विचारांचा इथं मनोरम समन्वय झालेला दिसतो. संत एकनाथांचे गुरु जनार्दनस्वामीं हे शेख महंमदाचे गुरुबंधू होते. हे सूफी संत चांद बोधले यांचे शिष्य होते.  सूफी दर्शनाचा प्रभाव त्यांच्यावर झाला असणार. एकनाथांनी धर्मातील  कर्मकांड, विषमता यावर कोरडे ओढलेले आहेत. त्यांनी ‘हिंदू-तुर्क संवाद’ या स्फुटात ते अखेरीला हिंदू-मुस्लीम ऐक्याचं सूत्रच सांगतात. “ऐक्यवाक्य विवाद । विवादीं जाहला अनुवाद । एका जनार्दनीं निजबोध । परमानंद दोहींसी ॥” असं म्हणून ते कबीरवाणीशी आपलं नातं सांगतात. बीड जिल्ह्यातल्या धारूर येथे  जन्मलेले शेख महंमद मराठी संतकाव्यपरंपरेतले महत्त्वाचे कवी आहेत. त्यांचे वडील म्हणजे जालन्याचे राज महंमद. त्यांचे शिष्य मलंग चांद बोधले. त्यांचं मूळ नाव चंद्रभट बोधले असं होतं. त्यांनी सूफी संप्रदायाची दीक्षा घेतली होती. शेख महंमद त्यांचे शिष्य. त्यांचे आणखी एक शिष्य होते जनार्दनस्वामी. संत एकनाथांचे गुरु म्हणजे हेच ते जनार्दन स्वामी. दौलताबादच्या किल्ल्यावर त्यांची समाधी आहे.

माझा एक आवडता ग्रंथ आहे बृहत्कथासरित्सागर. त्याची गोष्ट आपणांस माहीतच आहे की महादेवानं पार्वतीच्या हट्टाखातर अनंत काळपर्यंत चाललेली एक प्रदीर्घ गोष्ट एकांतात ऐकवली होती. कुतूहलापोटी ती गोष्ट महादेवाचा लाडका गण पुष्पदंतानं मायावी रूप घेऊन, चोरून ऐकली. हे पार्वतीला कळल्यावर तिचा कोप झाला आणि त्याचवेळी माल्यवान हा दुसरा गण पुष्पदंताची रदबदली करू लागला म्हणून तिने दोघांनाही पृथ्वीवर मनुष्यरूपात जाण्याची शिक्षा दिली. ही कथा पहिल्या लंबकात येते. पुढे पुष्पदंतानं कौशांबीत वररूचीच्या (कात्यायनाच्या) रूपाने जन्म घेतला तर माल्यवान हा गुणाढ्य बनून प्रत्यस्थानी (प्रतिष्ठानी) म्हणजेच इथल्या, मराठवाड्यातल्या पैठण या नगरात सातवाहनाच्या दरबारात प्रिय झाला होता. राजाला संस्कृत येत नाही म्हणून राणीनं हिणवल्यावर त्या राजानं संस्कृत शिकायचं ठरवलं. हे शिकण्यासाठी सहा वर्षं लागतील असं गुणाढ्यानं सांगताच दरबारातल्याच शर्ववर्मा या पंडितानं त्याला आव्हान देत हे काम सहा महिन्यात होऊ शकतं असं म्हटल्यावर गुणाढ्यानं म्हटलं की असं झालं तर मी संस्कृत, प्राकृत वा देशी भाषेतून अवाक्षरही बाहेर काढणार नाही. तिकडं शर्ववर्मानं चंडिकेला माझं म्हणणं खरं होवो अन्यथा मी जीव देतो असं म्हटल्यावर त्याच्या मनासारखं झालं, पण गुणाढ्याला पुढे मौन पाळणं भाग होतं. पैठण सोडून विंध्याचलात फिरतांना त्याला लक्षात आलं, तिथं यक्ष, भूत पिशाच्चं त्यांच्या पैशाची भाषेत बोलताहेत तेव्हा त्यानं ती भाषा शिकून बृहत्कथासरित्सागर लिहिला. तो त्यानं रक्तानं लिहिला. त्याच्या शिष्यांनी तो पैठणला नेऊन सातवाहनाला दाखवल्यावर त्यानं तो एकतर पैशाची भाषेत लिहिलेला म्हणून आणि तोही रक्तानं लिहिलेला म्हणून परत भिरकावल्यावर गुणाढ्यानं त्याचं एकेक पान वाचत आगीत जाळायला सुरुवात केली. जंगलातले पशू-पक्षी खाणं-पिणं विसरून ते स्तब्धपणे ऐकत होते. इकडे सातवाहनाला लक्षात आलं की भोजनात मिळणारं मांस हे सुकलेलं येतंय तेव्हा त्यानं चौकशी केल्यावर त्याला हा प्रकार कळला की रानातले प्राणीमात्र ग्रंथश्रवण करीत आहेत. त्यानं रानात येऊन गुणाढ्याची क्षमा मागितली. तोवर गुणाढ्यानं साठ लाख श्लोकांपैकी पन्नास लाख श्लोकांची पानं गुणाढ्यानं जाळून टाकली होती. नंतर आपल्याला उपलब्ध झालेला सोमदेवानं रचलेला बृहत्कथासरित्सागर हा ग्रंथ त्या उरलेल्या दहा लाख श्लोकांवरचा ग्रंथ आहे. या संपूर्ण कहाणीशी संबंधित असलेला पूर्वायुष्यातला महादेवाचा लाडका गण माल्यवान उर्फ या मौलिक ग्रंथाचा कर्ता असलेल्या गुणाढ्याची ही कथा आपल्या या मराठवाड्याच्या भागाच्या नेपथ्यात घडलेली आहे याचा मला आनंद झालेला आहे. त्याहूनही हा बृहत्ग्रंथाचा लेखक संस्कृत, प्राकृत आणि देशी भाषा नाकारून वेगळ्याच पैशाची भाषेत आपली कालजयी कृती निर्माण करतो हे मला त्याच्या बंडखोरीचं उदाहरणच वाटतं. पण त्याचबरोबर प्रस्थापितांच्या भाषाव्यवस्थेला लाथ मारून आपण आपलं कर्तृत्व घडवण्यासाठी लेखकाला मार्गदर्शक असं रूपकही वाटलेलं आहे. ह्याच कथासरित्सागरात आपल्याला गोष्टीवेल्हाळ अशा बहुजनांच्या ज्ञानपरंपरेचं मूळ सापडतं.

विसाव्या शतकात महाराष्ट्रातील इतर बरेचसे प्रांत जसे ब्रिटिश अंमलाखाली होते, आणि त्यामुळे का असेना शिक्षण आणि इतर साधन सुविधा तिकडं उपलब्ध होऊ शकल्या तशा मराठवाड्यात होऊ शकल्या नाहीत. मराठवाडा हा १९४८ पर्यंत निजामीतला भाग होता. पण विसाव्या शतकाच्या मध्यापासून औरंगाबादला डॉ.आंबेडकरांनी उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय सुरु केलं. त्यांनी रुजवलेल्या शिक्षणाच्या विचारानं मराठवाड्यात हजारोंना प्रेरणा मिळाली. दलित कवितेचा आद्यस्वर असलेले नांदेडचे हरिहर सोनुले यांच्या कवितांनी विसाव्या शतकाच्या तिसऱ्या-चौथ्या दशकापासून मराठवाड्याच्या कवितेत खऱ्या अर्थानं आधुनिक कविता आणली असं म्हणता येतं. उर्वरित महाराष्ट्रात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात तेव्हा साहित्यव्यवहार रुळायला लागून अर्धशतक झालेलं होतं.

आजचा काळ आणि आपण

भारतात गेली शेकडो वर्षं इथल्या संस्कृतीतल्या या वैविध्यानं आपल्याला संपन्न आणि समृद्ध केलेलं आहे. आपल्याला एकरंगी होऊन गरीब होणं चालणार नाही. त्यासाठी आज बोलणं आणि विचार करणं या मूलभूत मानवी लक्षणांचा आपल्याला विसर पडता कामा नये. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आजच्या काळाइतका हिंसेचा, द्वेषाचा, क्रौर्याचा, दहशतीचा आणि दमनाचा दुसरा काळ नाही. गेल्या काही वर्षांमध्ये माणसांच्या मरणांच्या इतक्या बातम्या आपण नियमितपणे ऐकतोय की आता बधीर होऊन त्या अक्षरांपलीकडचं क्रौर्य समजायची संवेदनाच नष्ट होऊन जाईल की काय असं वाटतं. ग़ालिब म्हणतो तसं, मुश्किलें इतनी पड़ी मुझपर की आसां हो गई असं म्हणण्याची आपल्यावर वेळ न येवो.

गेली काही वर्षं आपण किती विचारकांच्या हत्या पाहिल्या, पत्रकारांना मारलं गेलेलं पाहिलं, वस्त्या जाळल्या जाण्याच्या बातम्या वाचल्या, आदिवासी कार्यकर्त्यांच्या, माहिती अधिकाराची कामं करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हत्या झालेल्या वाचलं, खून बलात्कार, झुंडीनं एकेकाला गाठून मारल्याच्या बातम्या वाचल्या. निडरपणे प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना-विद्यार्थिनींना, निरपराधांना तुरुंगात डांबलं जाण्याच्या बातम्यांचे ओघ संपत नाहीत. गेल्या सहा-सात वर्षांत पुस्तकांवरची बंदी, विखारी प्रॉपोगंडा असलेली पुस्तकं शाळेत सक्तीची करणं, पेरुमल मुरुगन असेल किंवा बशीर अहमद अशा कितीतरी लेखकांवर दडपणं आणणं, सेन्सॉरशिप, गिरीश कार्नाड, यु आर अनंतमूर्ती, विजय तेंडूलकर अशा आवाज उठवणाऱ्या ज्येष्ठ बुद्धिमान लेखकांची किंवा अमर्त्य सेन यांच्यासारख्या विद्वानांची हेटाळणी आणि गुंड-माफिया-लुटारूंना संरक्षण आणि समर्थन मिळणं, निरपराध्यांच्या हत्येच्या आरोपात तुरुंगात असलेल्यांना शौर्य पुरस्कार जाहीर करणं, हिंदू स्त्रियांनी किमान चार मुलं उत्पन्न करावीत असं म्हणणं, विज्ञानाच्या बाबतीत अतोनात हास्यास्पद विधानं करत राहाणं, जनविरोधी कायद्यांचा धाक दाखवत राहाणं अशा घटना घडत आलेल्या आहेत. एरवी न ऐकलेली झज्जर, दादरी, उधमपूर, मुझफ्फरपूर, उन्नाव, कठुआ, लखीमपूर, बुलंदशहर अशा गावांची नावं तिथल्या हत्याकांडांमुळे आपल्या स्मृतीत जाऊन बसली आहेत. कश्मिरमधल्या भटका धनगर असलेल्या बकरवाल समाजातल्या लहान मुलीवर अनेक जण मंदिरात नृशंसरित्या बलात्कार करून तिला मारून टाकतात. तिला न्याय मिळतो की नाही, कळत नाही पण ती जिवानिशी जातेच. लखीमपूर सारख्या गावातल्या मुलीवरच्या बलात्कारांच्या घटना, शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्याच्या गावातच त्याचा पक्ष विजयी होणं आणि गुन्हेगार मोकळे सुटणं हे पाहून असा प्रश्न पडतो, की- केवळ अराजकाचं टोक गाठलेल्या फाशीवादातच हे खरं तर होऊ शकतं ना. परंतु ते इथलं वास्तव बनलेलं आहे. रोहित वेमुलासारखे संवेदनशील तरुण आत्महत्या करतात. नजीबसारखा तरुण विद्यार्थी अदृश्य होतो, पत्रकारांच्या तर किती हत्या गेल्या काही वर्षांत झाल्या याची आकडेवारी पाहायची असेल तर ती युनेस्कोच्या वेबसाईटवर सहजी उपलब्ध आहे. त्यावरून आपण पत्रकारांना मिळणाऱ्या स्वातंत्र्याच्या निर्देशांकांत जगातल्या देशांच्या यादीत कुठे पोहोचलो आहोत हे कळेल. ऑक्सिजनअभावी लहान लहान ७० मुलं मेली, अकराशे गर्भवती स्त्रियांना केवळ दवाखान्याची सुविधा मिळाली नाही, जीव गमवावे लागले. मदत करू पाहात होते ते डॉक्टर केवळ अन्यधर्मीय आहेत म्हणून त्यांना दीर्घकाळ तुरुंगात डांबले गेले. शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देऊन थंडी-पावसात-उन्हात वर्षभर रस्त्यावर ठेवलं गेलं. त्यांच्या वाटेत खिळे ठोकले आणि त्यांना देशद्रोही म्हटलं गेलं. जे हत्यारे आहेत, जे अत्याचार करताहेत त्यांचा सन्मान होत आहे, त्यांची तुरुंगातून लगेचच सुटका होते. ‘मारेंगे काटेंगे’ अशी उघड धमकी देणारे, ‘शस्त्रं बाळगा आणि मारा’ असं धर्मसंसदेत मग्रुरीनं म्हणणाऱ्यांची महिनाभरात तुरुंगातून सुटका होते तर ‘द्वेषाचा मुकाबला आम्ही प्रेमानं करू’ असं म्हणणाऱ्या तरूण मुलाला वर्ष-दोन वर्ष कोठडीत अडकवलं जात आहे. लोकशाहीची पायाभूत मूल्यं आणि संविधानातले निर्देश दिवसाढवळ्या पायदळी तुडवले जाताहेत. दडपशाही आणि सेन्सॉरशिपचं भय इतकं वाढवलं गेलं आहे की सार्वजनिक शैक्षणिक संस्थांमधील अधिकारीवर्ग स्वतःहूनच रांगायला तयार झाला आहे. सगळ्या देशातली संपत्ती केवळ दोन-चार लोकांच्याच हातात असावी असे प्रयत्न होत आहेत की काय असा संशय घ्यायला भरपूर जागा आहे. भडकावू, भाडोत्री आणि भाटगिरी करणाऱ्या पत्रकारांना पूर्ण स्वातंत्र्य तर आहेच, शिवाय त्यांना सत्ता वर्तुळातल्या आतल्या दालनापर्यंत मुक्त प्रवेश आहे. बॅंका लुटा, देशाबाहेर पलायन करा आणि अभय मिळवा असा भ्रष्टाचाऱ्यांना संदेश मिळत आहे. भूक, बेरोजगारी, महागाई या प्रश्नांकडे आडदांडपणे दुर्लक्ष केलं जात आहे. शिक्षणाचा पूर्ण विध्वंस करण्याचं व्रत घेतल्यासारखं वागणं दिसत आहे. जगभरच्या भुकेच्या निर्देशकांच्या तालिकेतल्या ११६ देशांत भारत कधी नव्हे तो १०१वा क्रमांकावर आला आहे. दरवर्षी देशातल्या लोकांच्या सरासरी आनंदाचं मापन करणारी अशीच एक तालिका प्रसिद्ध होत असते. १४६ देशांच्या यादीत आपण १३६व्या क्रमांकावर फेकले गेलेलो आहोत. महामारीनं लक्षावधी माणसं मेली त्याहूनही अधिक मेली ब्रेकिंग न्यूजच्या फवाऱ्यानं, तुगलकी फर्मानांनी, टाळं लावून ठेवलेल्या गोदामांमुळे आणि अडवून ठेवलेल्या उपचारांमुळे. रांगांमध्ये, रस्त्यांवर आपल्याच देशात मूलभूत अधिकारांपासून बेदखल होत. आजचा काळ म्हणजे मुठभर लोकांच्याकडे अपरंपार संपत्ती आणि असीम शक्ती तर दुसरीकडे बहुसंख्य असे आहेत की विकलता आणि शबलता हेच त्यांचं आयुष्य झालेलं आहे.

आपण स्मृतिभ्रंशाच्या काळात जगत आहोत.

‘माणसाचा वेळच संपून गेलाय’ अशी दिलीप चित्र्यांच्या कवितेतली एक ओळ आहे.

सामूहिक स्मृतीचं मेमरी कार्ड कालबाह्य झालंय. इतक्या वेगानं, भराभर दृश्यं बदलताहेत की आपल्याला विचलित करून गेलेलं आदलं दृश्य कोणतं होतं हेही सामूहिक स्मृतीच्या मेमरीकार्डात उमटत नाही. अगदी अलीकडे आपण पाहिलेले शेतकऱ्यांच्या अनवाणी आणि जखमी पायांनी भरून गेलेले राजधान्यांपर्यंतचे रस्ते निर्मनुष्य झालेले आहेत. वसतिगृहात जिथं विद्यार्थ्यांचं रक्त सांडलं होतं, ती वसतिगृहं, ते परिसर- सगळीकडे शुकशुकाट आहे. ज्या वस्त्यांमधली घरं जाळली गेली, तिथली राख थंड झाली असेल, तिथं कधीतरी राहिलेली, जगण्यासाठी किडूक मिडूक कामं करीत जगणारी माणसं कधीच कबरीत जाऊन निजली, त्यांची माती झाली. मुंग्या-किटकांनी खाऊन टाकलं त्यांना. निवारा नाही आणि अन्नाची शक्यता नाही म्हणून हजारो मैल पायी निघालेल्या कामगारांच्या हजारोंच्या दिंड्या आपल्याच विठोबा नसलेल्या पंढरपूराकडे निघालेल्या दिसल्या.

दोन-दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून आपल्या गावात परतलेला एक दमून भागलेला माणूस आपल्या घराच्या गंजलेल्या दाराची कडी काढतांनाचं एकही दृश्य दिसलं नाही. अन्नछत्रांसमोर चूपचाप, अंतर राखून उभे राहिलेल्यांकडे पाहातांना असं वाटत होतं की वाटतं, की ते जगाच्या अंतापर्यंत तिथं रांगेत राहावं लागण्याच्या स्थितप्रज्ञतेनं तिथं उभे आहेत. धूसर झालेल्या आशांमध्ये स्थितप्रज्ञता बधिर होऊन थिजून जाते. परवा परवापर्यंत सतत आपल्या डोळ्यांसमोर दिसणारी ही सगळी दृश्यं कुणाच्याही लक्षात न येता हळूहळू अदृश्य होत गेली.

सामान्यांची माहिती-बोटांचे ठसे, डोळ्यांची छबी आणि इतर सगळी माहिती- विकून गब्बर होणाऱ्या अवाढव्य बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हातचलाखीच्या खेळाचा हा काळ आहे. वेगवान तंत्रज्ञानानं मानवी मेंदूचा कब्जा घेतल्यावर करूणा, शील, प्रज्ञा, मैत्त यांचं महत्वच लक्षात येईनासं होतं. कोणालाही खतम करून टाकण्याचे डिजिटल खेळ खेळणं हेच व्यसन लागलेले सत्ताधारी आणि तोच खेळ आपापल्या सेलफोनवर खेळणारे आबालवृद्ध असा सारीपाट जगभर सज्ज आहे. ह्या विरूप नेपथ्यात आपण सगळे अंताक्षरी खेळू, इ. बाष्कळ उपदेश गंभीरपणे केले जातात. आणि त्या अंताक्षरीच्या एका आवर्तनात काही नद्या, काही पर्वत-त्यातल्या खनिजांसकट आणि लाखो एकर जमीन धरणं, महामार्ग, अधिक वेगवान महामार्ग ह्यासाठी परस्पर विकली जाते. चर्चेशिवाय कामगार कायदे रद्द होतात आणि तरूण मुलं आपल्या सुरक्षित भविष्याच्या चिंतेऐवजी धार्मिक चिन्हांच्या मारामारीत गुंतून जातात. असुरक्षित भविष्य असणारे संपूर्ण जगणंच अनिश्चित असणारे करोडो लोक हेच आजच्या श्रमिकांचं रूप आहे. आता ते रोज त्याच ठिकाणी कामावर जाणारे कामगार नाहीत-तर ते प्रिकॅरियट बनले आहेत- त्यांच्या आर्थिक  वास्तवाची भरपूर चर्चा दिसते. परंतु, ही अस्थिरता, असुरक्षितता जगभर एक असुरक्षित, अस्थिर मन निर्माण करते, हे लक्षात घ्या.

माणसांना मारणं आणि सुटून उजळमाथ्यानं अभिमानानं मिरवणं ही रीत झाली आहे. भारतात ट्रिलिअन डॉलर्सचे मालक आहेत हे सांगितलं जातं आणि त्याचं दुसरं टोक अंधारात हरवलेलं आहे हे कुणाला लक्षात येत नाही.

हंगर नावाची एक शॉर्टफिल्म आहे. त्यात एक ओंगळ ढेरपोट्या दाखवला आहे. तो सतत वस्तू खात सुटलेला आहे. तो पाशवी रीतीनं समोरच्या टेबलावरचे खाद्यपदार्थ खातो, टेबल खातो, अन्न देणाऱ्या मुलीला खातो. तो सतत खात आहे. तसेच आता खा-खा सुटलेले प्राणी जमिनी खाताहेत, सामान्यांच्या बचती खाताहेत, शेतकऱ्यांच्या विम्याचे पैसे खाताहेत, जंगलं खाताहेत, आदिवासींना लुटून खाताहेत, पैसे तर खात आहेतच, माणसं खाताहेत, निसर्ग ओरबाडून अधाशासारखा खाताहेत. जे जे दिसेल ते ओरबाडत खात राहाणं हीच एक अमानुष क्रिया फक्त करण्यासाठी आपण जन्मलो आहोत असं समजून हे चाललेलं आहे. अडीचेक हजार शेतकरी वर्षाला आत्महत्या का करतात ही साधी गोष्ट कुणाला जाणवतही नाही यावर कोणाचा विश्वास बसेल? विशेष म्हणजे काहीही केलं तरी आपलं काहीही वाकडं होत नाही याची उद्दाम मग्रुरी आहे.

प्रतिमांचा पूर आणि बधिरीकरण

प्रतिमांचं नवंच युग आहे. सगळीकडे प्रतिमांचे आरसे तुम्हाला टिपायलाही टपलेले आहेत. आरोग्यासाठीचं अॅप, स्विगीसाठीचं, झोमॅटोसाठीचं, अमुकसाठीचं अॅप, तमुकसाठीचं अॅप, तुमचं क्रेडिट कार्ड, तुमचा फोन या सगळ्यांतून एक अदृश्य डोळा पाहातोय तुमच्या इतिहास-वर्तमानाचा, तुमचं जन्म-मरणाचा एक्स रे विनासायास. सामाजिक माध्यमांतलं व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य वगैरे ऐकून सत्ताविसाव्या मजल्यावर राहाणारा गबदूल माणूस हसतो आणि ती माध्यमं विकत घेतल्याचा कागद लॉकरमध्ये ठेऊन देतो. ज्यां बॉद्रिला नावाचा एक फ्रेंच समाजशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ होता, त्यानं आजच्या या मायावी जगाबद्दल लिहितांना असं म्हटलं आहे की, “जे अदृश्य आहे त्याच्या अनिवार आकर्षणाशिवाय आपल्याकडे काहीही उरलेलं नाही. आणि यामुळे आपल्या नजरेसमोर एक खोटी, काल्पनिक स्वायत्तता उभी राहाते. मासमिडिया मालकांनी समाजावर ताबा मिळवला आहे. माध्यमातून जे आभासी वास्तवाचं चित्र आपल्याला दिसतं, खोटे घडवून आणलेले लष्करी हल्ले असतील, धादांत असत्याची चित्रणं असतील, ह्या सगळ्याला विरोध करण्याची शक्यता नष्ट करण्यात येत आहेत. अतिप्रगत तंत्रज्ञानाच्या वास्तवातल्या वापरानं वास्तवाचा अर्थच बदलून जातोय. अनेक गोष्टींमधले अर्थच हरवून टाकण्याची कारस्थानं रोज अंमलात येत आहेत. त्यातून येणाऱ्या अशा विषादानं आपण आज भिजलेलो आहोत.”

‘वन हन्ड्रेड इअर्स ऑव्ह सॉलिट्यूड’ अर्थात् एकांतवासाची शंभर वर्षं ही गॅब्रिअल गार्सिया मार्क्वेझ यांची नोबेल पुरस्कारप्राप्त कादंबरी आहे. त्यातल्या चौदाव्या प्रकरणातला एक भाग अलीकडे मला पुन्हा पुन्हा आठवतो. जुझे अर्काडिओ सेगुन्दो ह्या नावाच्या कामगारानं केळीच्या बागांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना संघटित करून संप करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. सगळ्या म्हणजे तीन हजार कामगारांना वाटाघाटींसाठी मैदानावर बोलावलं जातं. मैदानावरच्या त्या जाहीर सभेत लेफ्टनंट इसाका हा सगळा संपच अवैध असल्याचं सांगून कामगारांनी तो पाच मिनिटात मागं घ्यावा असं सांगितलं जातं. काही मिनिटांतच कामगारांवर मशिनगन्सच्या गोळ्यांचा वर्षाव होतो. तिथं म्हातारी माणसं असतात, लहानगी बाळं असतात, स्त्रिया असतात. लष्करी मशिनगन्स या जित्याजागत्या तीन हजार माणसांची चाळण करून त्यांना निर्जीव प्रेतांमध्ये बदलून टाकतात. अर्थातच मकॅन्डोत मार्शल लॉ जाहीर होतो. या नरसंहारानंतर काही काळानं सेगुन्दो डोळे उघडून पाहातो तेव्हा त्याला कळतं की आपण प्रेतांनी खचाखच भरलेल्या लांबलचक आगगाडीत प्रेतांच्या ढिगाऱ्यावर अस्ताव्यस्त पडलेलो आहोत. त्याच्या लक्षात येतं, सडकी केळी जशी फेकली जातात तशीच आगगाडीतली ही हजारो प्रेतं थोडाच वेळात समुद्रात फेकली जाणार आहेत. जुझे अर्काडिओ कसाबसा ट्रेनवरून अंधारात उडी मारून निसटतो आणि जखमी अवस्थेत तिथून उलटा प्रवास करत पहाटे फटफटतांना मकॅन्डोला पोहोचतो.

एक स्त्री त्याला भेटते. तिच्याशी तो झालेल्या नरसंहाराबद्दल तो बोलू पाहातो. तर असं काही इथं झालेलंच नाही असं ती त्याला ऐकवते. तो लोकांशी बोलतो. प्रत्येक जण तेच सांगतो. मकॅन्डोत प्रत्येकाची स्मृती आणि मती हरवली आहे हे पाहून तो भयभीत होतो. सरकारी निवेदनातूनही हेच सांगितलं जातं की इथं कुणीही मृत्यू पावलेलं नाहीय. सरकारी अधिकारी त्याला वेड्यात काढतात. तू नक्कीच स्वप्न पाहिलं असेल. मकॅन्डोत असं कधी झालेलं नाही आणि कधीही होणार नाही. इथं सगळे आनंदी आहेत. चांगले दिवस आलेले आहेत. मकॅन्डोवर सतत एक कंटाळवाणा पाऊस चिकचिकत पडत असतो. त्या पावसात नरसंहारात वाहिलेलं रक्त धुतलं जातं. मरून पडलेली बायामाणसं जणू अदृश्यच होतात आणि त्यांच्याबद्दल कुणीही काही बोलत नाही.

हे ऐकून तुम्हाला काही ओळखीचं आठवतंय?

मार्केझच्या कादंबरीतला हा भाग अलीकडे मला दुःस्वप्नासारखा सतत आठवतो. नव्हे, ती दुःस्वप्नं प्रत्यक्ष वास्तवात दिसू लागलेली आहेत. आपल्याकडेही, एवढं सगळं होवून मराठीतल्या एक प्रस्थापित लेखिका खुलेआम विचारतात, कुठे आहे या देशात हुकूमशाही? अभिव्यक्तीस्वातंत्र्याची कुठे आहे दडपशाही? तेव्हा माझ्यासारखा माणूस स्तब्ध होतो. लेखकपणाच्या प्राथमिक शर्तीचाच असा भंग झाल्याचं पाहून क्षोभ होतो. माझ्यासारखीच अवस्था सदैव जागा असलेल्या जयंत पवार या लेखक मित्राची झाली होती. मग ही कोणती शाही आहे ते तरी सांगा, असं उद्विग्न होऊन त्यानं विचारलं होतं.

अन्यत्व, असहमती आणि सहिष्णुता

आपण इतका चिरफाळलेला, इतका असहिष्णू झालेला समाज नव्हतो. अलीकडेच रोमिला थापर यांच्या निबंधांचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहेः व्हॉईसेस ऑफ डिसेंट. त्याचं मिलिंद चंपानेरकरांनी केलेलं असहमतीचे आवाज या शीर्षकाचं मराठी भाषांतरही आता उपलब्ध आहे. त्यात थापर असं म्हणतात की, “असहमती ही काही आधुनिक काळातली संकल्पना नाहीये, परंतु,  असहमतीचे विविध आकृतीबंध ओळखणं ही गोष्ट मात्र या काळासाठी नवी आहे. प्राचीन काळापासून असहमतीचं तत्त्व उपस्थित राहात आलेलं आहे. ज्या देशात उदारमतवादी, लोकशाहीवादी समाज असतो, तिथं असहमती व्यक्त करणारे प्रश्न विचारले जातात, तेव्हा भुवया उंचावल्या जात नाहीत. तर चर्चेद्वारे अशा प्रश्नांची तड लावण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आता सार्वजनिक आहे आणि कुणीही नागरिक तो अधिकार बजावू शकतो. पूर्वी हा अधिकार केवळ सामर्थ्यवानांना होता. आता तो सर्व नागरिकांना आहे…लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला समान दर्जा अभिप्रेत असल्याने लोकशाही ही धर्मनिरपेक्ष असू शकते. असहमतीचा अधिकार आणि सामाजिक न्यायाची मागणी या खऱ्या लोकशाही संकल्पनेच्या गाभ्याशी असलेल्या गोष्टी आहेत. कारण त्यात सर्व नागरिकांचा समावेश असतो आणि कायदेशीरदृष्ट्या समान दर्जा प्राप्त झाल्यानं लोकशाही ही धर्मनिरपेक्ष असण्याव्यतिरिक्त अन्य काही असूच शकत नाही.”

इथं नागरिक हा केंद्रस्थानी आहे. त्याचं हित, त्याचे अधिकार आणि कर्तव्यं ही सर्वोपरी आहेत. एकाच समाजात विविध विचार आणि मतं असलेले लोक एकत्र राहात आलेले आहेत. त्याच्यात घर्षणंही झाली असतील, पण परस्परांबद्दलचा आदर मनुष्यत्वाच्या कसोटीवर केला गेलेला आहे. एकाच समाजात आस्तिक, नास्तिक, शाकाहारी-मिश्राहारी, विविध श्रद्धा बाळगणारे असे लोक एकाच वेळी राहात असतात. हा समाजाचा सामूहिक अवकाश असतो. समतेच्या मूल्यात कुणा एकाचं वर्चस्व मान्य केलं जाऊ शकत नाही. आज धार्मिक भावना किंवा अस्मिता दुखावण्याचे बहाणे किंवा निमित्तं करून विरोधी मतांच्या विचारांचे कार्यक्रम बंद पाडले जातात. नाटकं, चित्रपट, पुस्तकं यांच्यावर अवैध सेन्सॉरशिप लादली जाते. उदारमतवादी, लोकशाहीवादी विचारांची दडपणूक होते. राज्यसंस्थेच्या व्यवस्था यात बटीक झालेल्या गुलामांसारख्या कणाहीन वर्तन करतांना दिसतात. आम्ही नागरीक आहोत. आजच्या काळात त्या सर्वसाधारण नागरिकानं काय करायला हवं याचं सुरेख दर्शन मुंबईचे हिंदी कवी फ़रीद खान यांनी केलं आहे. ते म्हणतातः

मैं नागरिक हूं

सर्वोच्च पद पर आसीन हूं

मेरा फ़र्ज़ बनता है

कि अपने मातहत काम करनेवाले

राष्ट्रपति, प्रधानमंत्री और

सर्वोच्च न्यायालय की

आलोचना करूं।

हम भारत के लोग

यह वचन लें।

मित्रहो, भारतात पहिल्या शतकातच ख्रिश्चन धर्म पोहचला होता. त्यानंतर जगातल्या बहुतेक धर्मांचे लोक अनेक शतकं इथं राहात आलेले आहेत. इतकं वैविध्य इतरत्र कुठेही सापडत नाही. यातले बरेचसे लोक शतकानुशतकं इथंच राहून इथल्या हवा-पाणी-मातीशी जोडले गेले. त्यांनीही भारत नावाच्या कल्पनेला प्रत्यक्षात मूर्त करण्यात मदत केली. या सगळ्यांसह आपली जी संस्कृती तयार झाली तिची समृद्धी अभिमान वाटावा अशीच आहे. परंतु गेल्या काही वर्षांत मोठ्या योजनेंतर्गत अशा अनेक अल्पसंख्य समूहांना ठरवून अन्यत्वाची (प्रस्थापित स्व पासून अदरिंगची) वागणूक देण्याचे प्रयत्न होत आहेत. फाशिस्ट राज्यात ज्याप्रमाणे आर्य आणि ज्यू अशी विभागणी करून ज्युंचं शिरकाण झालं होतं, तीच मानसिकता इथं स्पष्टपणे दिसते. त्यामुळे एक अन्य हा शत्रु म्हणून चित्र रंगवून उभा केला की मग त्यांना अलग करून कोपऱ्यात ढकलता येतं, त्यांना हुसकावून लावण्यासाठी, हद्दपार करण्यासाठी एक कृतक कारण निर्माण करता येतं. रोमिला थापर असं म्हणतात की, आज जगभरात असे अनेकविध लोक-समूह नागरिकत्व नाकारले गेल्यानं किंवा हद्दपार केले गेल्यानं निराश्रित झालेले आहेत. मित्रहो, अशा निर्वासितांच्या करूण कहाण्या अलीकडे गेली काही वर्षं आपण वाचत आहोत. तुर्कस्तानच्या समुद्रकाठावर वाळूत तोंड खुपसून पडलेल्या तीन वर्षांच्या मृत अॅलनचं चित्र आपल्या मनात थिजून बसलेलं आहे. महामारीच्या लाटेआधी आपण नागरिकत्व कायदा (एनआरसी) आणि नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (सीएए) विषयीच्या बातम्या, त्याविरोधातली देशभरातली आंदोलनं, शाहीन बागेतलं ऐतिहासिक आंदोलन आणि त्याविषयी गोंधळ निर्माण होईल अशा सत्यालाप करणाऱ्या बातम्या असं पाहिलं. असममध्ये निर्वासित होऊन तीन पिढ्या इथं राहिलेल्या लोकांपुढे नागरिकत्वाचा प्रश्न उभा ठाकल्यावर ते सैरभैर झाले. त्याआधीपासूनच त्यांना मियां म्हणून कशाप्रकारे हिणवलं जात होतं, त्यातून सत्तरच्या दशकात असमी कवितेत सशक्त असं मिया पोएट्रीचं आंदोलन कसं उभं राहिलं हे आपल्याला माहीत असेल. असममधल्या बंगाली मुसलमानांनी आपल्या अस्मितेवर स्वतः पुन्हा या कवितेच्या आंदोलनाद्वारे दावा केला. मियां हा उर्दुमधला सभ्यगृहस्थ या शब्दासाठी वापरला जाणारा आदरार्थी प्रतिशब्द आहे. पण तो हिणवण्यासाठी आणि अपमान करण्यासाठी वापरला जाऊ लागला तेव्हा तिथल्या कवींनी ‘होय, आम्ही मिया आहोत,’ असं म्हणत ठामपणे कवितेतून उत्तरं देत त्या शब्दाच्या अर्थाला पुन्हा सार्थ केलं. दमन आणि दडपशाहीविरुद्ध आवाज उठवणारं कवितेचं हे आंदोलन होतं. मिया कवितेत या समूहाला एनआरसीतून वगळले जाण्याचे, आणि त्यातल्या भयाचे प्रतिध्वनी ऐकू येतात. या कवींवर खटले भरले गेले. मिया कविता आंदोलनानं अनेक प्रश्न उभे केलेले आहेत. ते विस्थापनाचे आहेत, भाषिकतेचे आहेत, भौगोलिकतेचे, राष्ट्रीयत्त्वाचे, मानवीयतेचे आहेत. नागरिक आहोत की नाही आहोत या संभ्रमाचे ते प्रश्न आहेत. या आंदोलनानं राष्ट्रवादाच्या रेट्यात दाबल्या गेलेल्या भाषेचा प्रश्न पुढे आणला. त्या भाषेच्या दुःखाचा उद्गार उच्चारित केला. जोरकसपणे ते म्हणू लागले की, ‘लिहा. लिहून घ्या/ मी एक मिया आहे / लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताकाचा नागरिक/ ज्याच्याजवळ कोणताही अधिकार उरलेला नाही.’

त्यातल्या अलीकडच्या काही कवितांचे मासले मी आपल्यापुढे वाचून दाखवतो.

रिजवान हुसेन नावाचा कवी (हिंदी भाषांतर) आपल्या कवितेत म्हणतोः

तुम्ही आम्हाला शिव्या द्या

हातातून नांगर ओढून काठ्यांनी मारा

पण आम्ही शांतपणे तुमच्यासाठी

महाल, रस्ते, घरं बनवत राहू

तुमच्या अस्वस्थ, घामानं भिजलेल्या चरबीयुक्त शरीरांना

रिक्षावर ओढतच राहू.

हा सगळा तळातला, श्रमिक वर्ग आहे. त्याच्या अस्तित्वावरच सवाल उभा राहिलेला असल्यानं तो हतबल झालेला आहे. त्याच दरम्यान ठिकठिकाणी डिटेन्शन कॅम्प्स उभारले गेल्याच्या बातम्या आलेल्या होत्या. तिथं गेल्यावर त्यांचं पुढे काय होणार कोणालाच कळणार नाही अशी फाशिस्ट काळातल्या कॅम्प्सची आठवण करून देणाऱ्या या गोष्टी आहेत. सान मियां नावाच्या कवीनं याबाबतीत आपली व्यथा व्यक्त करताना म्हटलं आहे की,

यावेळी डिटेन्शन कॅम्पमध्ये बसल्या बसल्या आठवलं

अरे देवा, आपणच तर ही इमारत बांधली होती

आता आमच्याकडे काहीही नाही

केवळ एक जोडी जुनाट लुंगी, अर्धवट पिकलेली दाढी

आणि आमच्या आजोबांच्या नावासोबत

शेवटच्या मतदार सूचीच्या अफेडिविटची प्रत.

बस्स.

त्यांच्या मागण्या काहीही नाहीत. ते फक्त माणूस म्हणून आम्हाला जगू द्या, ज्या मातीत त्यांच्या पिढ्या श्रमल्या आणि मिसळल्या त्या मातीत काम करू द्या एवढंच मागताहेत. आज दुर्दैवानं हे घटित जगभरातल्या बहुतांश भागातलं वास्तव बनलं आहे. मरम अल-मसरी, नाजवान दरविश यांच्यासारखे आपला देशच न उरलेले कितीतरी पॅलेस्टिनी, अरबी, सीरिअन कवी हीच व्यथा मांडतांना आपल्याला दिसताहेत. सध्या फ्रान्समध्ये आसरा घेतलेली अनेक पुरस्कारप्राप्त सिरिअन कवयित्री मरम-अल-मसरीचे अनुभव वाचतांना आपण हादरून जातोः

मिल्ट्रीतल्या दोन सैनिकांनी / आणि पुरुषांच्या जत्थ्यानं लॉराला मारून टाकलं

आधी तिच्यावर अत्याचार करून / कुणी तरी तिला पाहिलं

तेव्हा ती जिवंत होती अद्याप / ज्यानं व्हिडिओ रेकॉर्ड केला

आणि पोस्ट केला तो युट्युबवर / दिङ्मूढ झालेल्या लॉराचा

आणि दिसत नाही / तिच्या तोंडातून रक्त ओघळतांना

आणि तिच्या ड्रेसवर मागच्या बाजूनंही.

लॉराचा होता एक देह / आणि एक नाव होतं तिचं / लॉरा द व्हरमॉन्ट

वय वर्षं १८ / जिचा खून / पुरुषांनी / राज्यसत्तेनं

आणि आमच्या उदासिनतेनं-दुर्लक्षानं केला / शनिवारी.

कल्याणकारी राज्याचा ध्वंस

जगभर सध्या हे असं प्रखर राष्ट्रवादाचं आणि अमानुष विस्तारवादाच्या लालसेचं फलित दिसत आहे. राष्ट्रवाद जेव्हा त्याचं टोकाचं जहाल रूप दाखवतो, तेव्हा त्याचे परिणाम अत्यंत हिंसक आणि धोकादायक असतात. त्यातील अमानुष शोषणाच्या खातरीमुळे तो अनेक विचारवंतांनी नाकारला आहे. रवींद्रनाथ टागोरांनी त्यातले धोके ओळखले होते. स्वातंत्र्य मिळण्याअगोदर पंचवीस वर्षं आधीच १९२१साली टागोरांनी मित्राला लिहिलेल्या पत्रात ‘भारताची कल्पना’ किंवा आयडिया ऑफ इंडिया असा शब्दप्रयोग केला होता. आपल्याच लोकांपासून वेगळेपणाची जाणीव ही संघर्षाला निमंत्रण देणारी असते, त्या भावनेला भारताच्या कल्पनेत थारा नाही. वैविध्य असेल म्हणूनच त्यात सौंदर्य आहे, ते जिवंत आणि सळसळतं आहे, असं टागोर म्हणाले होते. म्हणूनच त्यांनी राष्ट्रवादावर प्रखर हल्ले करणारी ती तीन प्रसिद्ध व्याख्यानं दिली होती. त्यात त्यांनी युरोपीय, जपानी राष्ट्रवादाची प्रारूपं आमच्यासाठी उपयोगाची नाहीत आणि भारताच्या संदर्भात लिहितांनाही ते म्हणतात की आपल्याला आपल्या कल्पनेतल्या भारताची प्राप्ती करायची असेल तर आपल्याला मानवतेच्या मूल्यांपेक्षाही राष्ट्र मोठं असतं या शिकवणुकीविरुद्ध लढावं लागेल. भारतातल्या अनेक समस्यांच्या मुळाशी असलेला मोठा धोका म्हणजे राष्ट्रवाद असं त्यांनी स्पष्टपणे लिहून ठेवलेलं आहे. त्यांची ही तीनही भाषणं वाचतांना लक्षात येतं की टागोर हे राष्ट्रवाद म्हणून जी काही सर्वसाधारण समजूत आहे तीपासून स्वतःला अलग करून शांतता, सुसंवाद आणि लोककल्याण या तत्त्वांशी स्वतःला जोडू पाहात होते.

पंडित नेहरूंनी १४ डिसेंबर १९३२साली आपल्या मुलीला लिहिलेल्या पत्रात स्पष्टपणे लिहिलं होतं, की ”राष्ट्रवादाचा विचार किंवा भावना केवळ त्या विषयापुरती ठीक आहे, पण ती अविश्वसनीय आणि इतिहासलेखनात विक्षेप आणणारी आहे. अनेक घटनांकडे ती डोळेझाक करायला लावते आणि जेव्हा आपल्या स्वतःच्या इतिहासाचा संबंध येतो, तेव्हा या भावनेच्या तीव्रतेमुळे सत्याचाही अपलाप होतो. म्हणूनच भारताचा अलीकडचा इतिहास विचारात घेतांना आपण अत्यंत सावध असले पाहिजे.” आजच्या काळात राष्ट्रवाद आणि भांडवलवाद हे परस्परांशी घट्टपणे संबंधित आहेत. भांडवलशाहीसाठी राष्ट्रवाद हे साधन आहे आणि ते त्याचं फलितदेखील आहे. बाजारी भांडवलशाही आणि राष्ट्रवाद ही हातात हात घातलेलीच भावंडं आहेत.

जगभरात आधी उल्लेख केला त्याप्रमाणे आज भांडवलशाही व्यवस्थांचा वाढत चाललेला जोर आहे त्यात उदारमतवाद आणि खुनशी फाशिस्टवाद बेमालूमपणे मिसळलेला आहे. भांडवली लोकशाहीतल्या संस्था आहेत, पण त्या सर्वंकषवादी सत्तांच्या हातातल्या कळसुत्री बाहुल्या बनल्या आहेत. न्यायालयं, केंद्रीय संस्था, विविध आयोग, पोलीस- सगळ्या संस्थांचं हे झालेलं आहे. लोकशाहीतल्या उदारमतवादाला नष्ट केलं गेलं आहे. कल्याणकारी राज्याची व्यवस्था संपवली गेली आहे.

प्रत्येकाकडे मोबाईल फोन आला आहे तेव्हा तंत्रज्ञान घरोघरी पोहचलं आहे असं आपल्याला वाटतं. पण त्याच साधनांनी व्यवस्था, बाजार आणि कंपन्या तुमच्या प्रत्येक कृतीवर पाळतही ठेऊ शकतात हेही सत्य आहे. तंत्रज्ञानासोबतच विषमता, अस्थिरता आणि असुरक्षितताही निर्माण होते. असुरक्षिततेचा फायदा मूलतत्ववाद्यांना होतो. कारण मग ‘आपण’ आणि ‘ते’ अशी उभी विभागणी करता येते. माहिती, माहितीवरची मक्तेदारी जशी संपते त्याचप्रमाणे माहितीला तर्क आणि तथ्याचा पाया असेलच अशी शाश्वती देता येत नाही.

असहमती दर्शवली किंवा अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या बाजूनं बोललं तर तुम्ही देशद्रोही असा दंडेलशाहीतला संदेश तिन्ही त्रिकाळ ऐकून लोक भयभीत झाले आहेत. विरोधातल्या कोणत्याही मुद्याला राष्ट्रभक्ती आणि देशाच्या सुरक्षेशी जोडलं जात आहे. शेतकरी मरताहेत, लोक रांगांमध्ये मरताहेत, महागाईनं हैराण होताहेत-सगळ्यांवर एकच उत्तर दिलं जातं. देशासाठी, देशभक्तीसाठी एवढं कराच. प्रत्येक गोष्टीचा असा राष्ट्रवादाशी बादरायण संबंध जोडला की सगळ्या अत्याचारांवर पांघरुण घालता येतं.

एक मोठा वर्ग आहे जो दिसत नाही. जो बहुसंख्य आहे आणि त्याची मतं विचारली जात नाहीत आणि ती माध्यमांपर्यंत पोहोचतही नाहीत. तो शहरी झगमगाटापासून दूर आहे. पण तो प्रत्यक्ष या बदललेल्या झगमगाटी खोट्या ‘विकासा’ची झळ पोहोचलेला आहे. तो प्रत्यक्ष पीडित आहे. त्याच्या घरात आत्महत्या झालेल्या आहेत. मुलांना रोजगार नाहीत. त्याच्या गावात वीज, रस्ते नाहीत. त्याच्या जमिनी भांडवलदारांच्या खाणींसाठी, उद्योगांसाठी गिळल्या जात आहेत. बॅंकेसाठी त्याला तालुक्याच्या गावी जावं लागतंय आणि तिथं पोहोचूनही त्याच्या हातात काहीच पडत नाही. बेगडी घोषणांना-जुमलेबाजीला तो ओळखू लागला आहे.

आमचे ज्येष्ठ कवीमित्र विजय कुमार यांनी हाना आरेन्ट या विदुषीवर लिहिलेली नोंद वाचण्यात आली. त्यांच्यामुळे चिकित्सक विचारवंतांविषयी नव्या गोष्टी कळत असतात. हाना आरेन्ट या तत्त्वज्ञ विदुषीनं साठ वर्षांपूर्वी अॅडॉल्फ आईख्मन या नाझी अधिकाऱ्यावर जेरुसलेममध्ये झालेल्या खटल्यावर एक ग्रंथच लिहिला होता. त्याचं उपशीर्षक होतं- ‘दुष्कृत्यांच्या सामान्यीकरणाचा अहवाल’. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान या आईख्मननं चार लाख ज्यूंना गॅस चेंबर्समध्ये पाठवलं होतं. आणि तरीही खटल्यादरम्यान त्याला काहीही पश्चाताप झालेला दिसत नव्हता. उलट ते कृत्य केवळ आदेशापोटी केलेली एक सामान्य घटना आहे हेच तो सांगत राहिला. त्यावर हाना आरेन्टनं जे म्हटलं आहे ते आजच्या काळालाही लागू होतं. ती म्हणते, ‘”सर्वंकषवादानं जाणिवेचं बधिरीकरण अशा हद्दीपर्यंत पोहचलं की घोर अपराध आणि विकृत हिंसेनं केलेली कृतीही एरवीच्या सामान्य क्रियांएवढीच साधारण वाटू लागली.” पराकोटीच्या दुष्कृत्यांच्या अशा दैनंदिन कृतीसारखं होत जाण्याला हॅना आरेन्ट यांनी दुष्कृत्याचं सामान्यीकरण (बेनलिटी ऑफ इव्हिल) असं म्हटलं होतं.

आधुनिक हुकूमशाहीचा प्रारंभ या ग्रंथात त्यांनी निरिक्षण मांडलेलं आहे की, “प्रगत होत जाणाऱ्या तंत्रज्ञानाबरोबरच माणसं एकेकटी होत जातात. एकेकट्या माणसांचा एकमेकांना अनोळखी असा समाज झालेला असतो. आपल्याच समुदायापासून असं वेगळं पडणं पुन्हा एका बधिरपणाला आणि संवेदनाहीनतेला जन्म देतं. अशा वेळी हुकूमशाही सत्ता आपल्या यंत्रणेद्वारा दररोज होणारे अन्याय अत्याचार योग्य ठरवत असते. त्यासाठी नवनव्या कल्पना लढवणारे कारखाने काढून सगळीकडे आपला अंमल बसवणं हेच त्यांचं उद्दिष्ट बनतं. अशा सैतानी सत्ता निश्चित अजेंडा घेऊन आणि नवी चलनी रूपकं वापरून अंकूश ठेवतात. अशाप्रकारच्या यंत्रणा या आधुनिक काळातल्या भयानक दहशतीची नवी रूपं आहेत.”

आज आपण हेच चित्र प्रत्यक्षात पाहात आहोत.

तुम्ही निगराणीखाली आहात

रस्त्या-रस्त्यावर, ऑफिसेसमध्ये, दुकानांमध्ये-मॉल्समध्ये, बसस्थानकांवर, रेल्वे स्थानकांवर किंवा विमानतळांवर छुपे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात. काही वेळेला ते ‘यु आर अंडर सर्व्हेलन्स` असं उघडपणे सांगतही असतात. सरकारी-खाजगी कार्यालयांमध्ये-कॉलेजा-विद्यापीठांमध्ये-कंपन्या-फॅक्टऱ्यांमध्ये येता-जाता आता बायोमेट्रिक यंत्रात बोटांचा ठसा उमटवावा लागतो. या गोष्टी वरवर साध्या आणि दैनंदिन गोष्टींमध्ये सूसुत्रता आणणाऱ्या आहेत असं वाटतं. बऱ्याच अंशी ते खरंही आहे. पण तुमच्यावर सतत नजर आहे, तुम्ही कुठे आहात, काय करता आहात, किती वाजता आला-गेला, काय लिहित आहात हे नोंदवलं जातंय अशी एके काळी केवळ फिक्शनमध्ये आढळणारी गोष्ट आता प्रत्यक्षात सगळीकडे दिसत आहे. आजच्या समाजाचं हे रूप सत्तेचं विश्लेषण करताना मिशेल फुकोनं आधीच सांगितलं होतं. सत्ता-विशेषतः हुकूमशाही-भांडवलशाही सत्ता प्रत्येक नागरिकावर सतत दरक्षणी नजर ठेऊन असते. आपण ते आता स्वीकारत चाललो आहोत. कारण लोकशाहीवरचे आपले विश्वास आपणच घालवून हे संकट स्वीकारायला सज्ज झालो आहोत.

या दृश्य वास्तवापलीकडे जे तंत्रज्ञानानं वास्तव निर्माण केलेलं आहे ते अधिक भयानक आहे. व्यावसायिक कंपन्या, सरकारी संस्था यांच्याकडे सर्वसामान्य नागरिकांची माहिती ज्या प्रमाणावर साठवली जाते त्याप्रमाणात माहितीच्या आधारे सुपरपॉवर बनताहेत. एक मोबाईल फोनधारक म्हणजेच एक क्रयवस्तू झालेला आहे. त्याला त्याच्यासाठी एक बबल करून त्याच्यातच बंदिस्त केल्यामुळे त्याच्या विचाराबाहेरचं जग तर बेदखल होतंच, पण तो स्वतः मात्र नकळत विचाराबाहेरच्या मता-प्रचाराचा वाहक होतो. ते त्याला कळतही नाही. यालाच डिजिटल हुकूमशाही असं म्हटलं गेलं आहे. आधारकार्डाचे उपयोग आणि आवश्यकता हा विषय निराळा आहे पण त्यातली त्या व्यक्तीची माहिती- त्याचा वैचारिक कल, त्याची जात, धर्मविषयक मतं, त्याचे आजार, त्याचे नातेवाईक-आप्त, तो कुठे राहातो, काय वाचतो, पाहातो, कुठे काय जेवतो, किती पैसे कमावतो आणि खर्च करतो, किती पैसे करात भरतो ही सगळी माहिती यंत्रणेतल्या वापरकर्त्याच्या सोयीप्रमाणे त्याला सहज उपलब्ध असतेच. म्हणजे त्याच्यावर अंकूश ठेवायलाही ती वापरली जाऊ शकते. मध्यंतरी स्पायवेअर वापरून पाळत ठेवली गेल्याच्या, संगणकांमध्ये माहिती घुसवून मग गुन्हेगारीचे आरोप ठेवले गेल्याच्या किती बातम्या आल्या. ते कशासाठी विकत घेतलं याचं स्पष्टीकरण सरकारनं नीट दिलेलं नाहीच. हे प्रकार जगभर वाढत आहेत. आता यात मेटाव्हर्सची भर पडली आहे. मेटाव्हर्समध्ये आभासी चष्मा लावून गेल्यावर एका स्त्रीवर इंग्लंडमध्ये आभासी बलात्कार झाल्याची घटना नुकतीच समोर आली. मूलतत्त्ववादी संघटना याचा किती गैरवापर करतील याचा विचारच करवत नाही.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि विवेक

ज्ञानप्रसाराच्या काळात विज्ञानच श्रेष्ठ होऊन बसलं. बुद्धी, विवेक आणि तर्कानं(च) जग जाणता येतं असं म्हटलं गेलं. तंत्र विकसित होऊ लागली. ज्ञानाची पुनर्व्याख्या झाली. नीतीशास्त्रीय कल्पनांचं महत्त्व कमी होत गेलं. ‘ज्ञानाच्या क्षेत्रात विज्ञान श्रेष्ठ, विश्वात मानव श्रेष्ठ, तोच विश्वाचा अधिपती` हा विचार बळावला. सृष्टीत जे-जे काही आहे, प्राणी-पशू-हवा-पाणी-खनिजं, ते-ते सगळं  आपल्या उपभोगासाठीच आहे अशी आक्रमक मग्रुरी यातून आली. कारण विवेक, बुद्धी आणि तर्क असलेला मानवच मालक मानला गेला. नंतर पुढच्या दोन शतकात ही मग्रुरी उजागरच झाली होती. त्यातही उतरंड होती. युरोपीय मानव ग्रेट. बाकी पौर्वात्य ज्ञान असेल किंवा मेसापोटेमिया, इजिप्त आणि आफ्रिकेतल्या टोळ्याचं जे ज्ञान असेल ते त्यांच्या लेखी बिनमहत्त्वाचं होतं. बेमुर्वतखोरपणानं असंही म्हटलं गेलं, की ‘हे सगळं चार-दोन ओळीत मावेल किंवा फार तर अख्ख्या पौर्वात्त्य संस्कृतीचं एकत्रित ज्ञान युरोपातल्या एखाद्या प्रचंड ग्रंथालयातल्या एका कपाटातल्या एका शेल्फवर फार तर मावेल.` ही खरंतर साम्राज्यशाहीची अरेरावी होती. पौर्वात्त्य ज्ञानाविषयीचं औद्धत्त्य होतं. साम्राज्यशाहीचं समर्थन करण्यातला माज होता.

विज्ञान हे तंत्रज्ञानाचं साधन मात्र बनून राहिलं. त्याची परिणती पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात आपण पाहिली. संहारक शस्त्रं, ज्यातून खंडांतर करून बॉम्ब टाकून परत येता येईल अशी वेगवान बॉम्बर विमानं, युद्धनौका, विषारी तोफा यातून संहारासाठीचं तंत्रज्ञान वापरलं गेलं. नकाशाशास्त्रातली प्रगती, भूगोलाचा अभ्यास याचा वापर नवनवे प्रदेश जिंकण्यासाठी केला गेला. त्यातून युरोपात वाढलेली लोकसंख्या जिरू शकली, युरोपातल्या गरिबीवर उत्तर शोधता आलं. साम्राज्यवादाच्या मुळाशी मरिनर्स कंपास या यंत्राचा शोध आहे. नकाशाशास्त्राचा शोध आहे. छपाईचा शोध आहे. या तंत्रज्ञानानं साम्राज्यविस्ताराची नशा वाढवत नेली. हिटलरसाठी फेबर कंपनीनं झायक्लोन-बी नावाचं केमिकल मोठ्या प्रमाणावर तयार केलं. ते फवारलं आणि त्यातून तात्काळ ज्यूंना मारण्याची तजवीज केली. हीसुद्धा तंत्रज्ञानाची किमया होती हे आपल्याला विसरता येणार नाही. आजच्या काळात झायक्लोन-बीची गरज नाही ते काम ओटीटीवरची अव्याहत चालणारी चॅनल्स, चार-चार लेन्सचे कॅमेरा फोन्स आणि खिशाला परवडणारा डेटापॅक एवढ्या विषात भागतंय.

विवेकाच्या कौतुकाच्या नादात, तत्त्वज्ञानाचं महत्त्व कमी करून नफाकेंद्री, लढाईकेंद्री राक्षसी महत्त्वाकांक्षेसाठीचं तंत्रज्ञान निर्माण झालं. ज्ञानप्रसारानंतर आलेल्या विज्ञानाची जागा पहिल्या महायुद्धापर्यंत तंत्रज्ञानानं घेतली. यालाच टेक्नॉलॉजिकल रॅशनॅलिटी असं म्हटलं गेलं. विवेकाचं रुपांतर पिग्मी रुपात केलं गेलं. जो वड म्हणून वाढू शकत होता त्याचं या टेक्नॉलॉजिकल रॅशनॅलिटीनं विषारी झुडुपात रुपांतर केलं.

तंत्रज्ञानाला सपाटीकरण पाहिजे असतं. जगभर जागतिकीकरणाच्या सोयीसाठी एकच भाषा असणं आवश्यक ठरतं. व्यापार, उद्योग, नफ्यासाठी ते सोयीचं असतं. म्हणून हजारो भाषा संपवण्याचं पद्धतशीर कारस्थान यातून रचलं जातं. सुरुवातीला अंक इंग्रजीत शिकण्याचा आग्रह धरला जातो. मग स्थानिक भाषेत इंग्रजी शब्द वापरात वाढवत नेण्याच्या पद्धती अंमलात येतात. तशा जाहिराती लिहिल्या जातात. अख्ख्या वाक्यात एखाद-दुसराच स्थानिक शब्द वापरण्याची सवय लावली जाते. मग जगण्याची शैलीपण तशीच होऊन जाते. भाषेचं हे क्रिओलायझेशन-हळूहळू ती भाषा नष्ट करत नेतं. स्वैपाकघरातले, शेतीतले, ग्रामीण संस्कृतीतले स्थानिक भाषेतले शब्द कमी-कमी होत जातात. संवादातले स्थानिक भाषांमधले शब्द कमी होत जातात. संवादाचा अवकाशही कमी कमी होत जातो. कारण भोगलोलुप व्यक्तिवादी समाजात टीव्ही-इलेक्ट्रॉनिक माध्यमं-चंगळीचे विविध मार्ग यांमुळे त्याचा संकोच होत गेलेलाच असतो. यात आज, सत्य-असत्य, न्याय-अन्याय, वाटा चुकीच्या लोकांकडे जाईल की समान वाटपाचा आग्रह करावा हा मूल्यविवेक ओळखणं गरजेचं आहे.

हे सगळं दुःस्वप्नकारक चित्र मी मांडत आहे असं वाटेल. पण आजचा काळ आणि त्यातले पेच समजून घेण्यासाठी ते ओळखणंही गरजेचं आहे कारण अंतिमतः तळातला माणूस त्यानं भरडला जाणार आहे. भांडवली बाजार यंत्रणा, सांस्कृतिक राष्ट्रवाद, तंत्रज्ञानाचं प्रस्थ यांमुळे निर्माण झालेल्या विषमतेच्या, दुजेपणाच्या खाईत सामान्य माणूस वंचित, वर्जित आणि विकल होत चाललेला आहे.

विद्रोहाची गरज

यासाठी आपल्याला विद्रोह करावा लागेल. प्रस्थापित किंवा प्रतिष्ठापना केल्या गेलेल्या असत्याला सत्यानं ललकारणं, आव्हान देणं, प्रश्न विचारणं म्हणजे विद्रोह. असा विद्रोह ज्ञानेश्वरांनी केला होता, तुकोबांनी, बसवेश्वरांनी, जनाबाईंनी, कोपर्निकसनं, गॅलिलिओनं आणि अनेकांनी केला होता. सॉक्रेटिसनं केलेला विद्रोह आणि त्याच्या संघर्षाचं आज अगत्यानं स्मरण करावं असा काळ आलेला आहे. ज्ञानदेवांनी देशी लोकांच्या भाषेत लिहिणं हे एक बंडच होतं. आणि मराठीची थोरवी मांडतांना ते अभिमानानं म्हटले होते,

दावूं वेल्हाळ देशी नवी। जे साहित्यांत बोजावी।

अमृतातें चुकी ठेवी। गोंडसपणे ।। ११-९

तरुणांना प्रश्न विचारायला शिकवतो, रुढी प्रथा कशा चुकीच्या आहेत ते सांगतो आणि विवेक आणि तर्काच्या बाता मारत असतो असा ठपका ठेऊन सॉक्रेटिसला विषाचा पेला देऊन मारलं होतं. संत बसवेश्वरांनी परंपरेशी संघर्ष करीत नवी परंपरा निर्माण करतांना तिला ऊर्जा दिली. सामाजिक किंवा लिंगभात्मक भेदभावांना, रुढी-प्रथांना-अंधश्रद्धांना त्यांनी थारा दिला नाही.

विद्रोहाचं नातं सत्याशी असतं. सत्तेद्वारे जेव्हा असत्याची प्रतिष्ठापना होते, ते प्रस्थापित होतं, त्यावेळी सत्य त्याला आव्हान देतं. असत्य हे दमनासाठी वापरलं जाणारं विखारी साधन आहे. सत्यानं असत्याला ललकारणं, आव्हान देणं म्हणजे विद्रोह.

अविनाश मिश्र या तरुण हिंदी कवीनं विद्रोहाविषयी अगदी थोडक्या ओळींमध्ये जे मांडलं आहे ते पटण्यासारखं आहे. त्याच्या ओळींचा मराठी तर्जुमा असा आहेः

या दुनियेत माणसाला जर

विद्रोहाशिवायच जगता आलं असतं

तर शक्य आहे हे साक्षात वर्तमान

आणखी सार्थ आणि सुंदर होऊ शकलं असतं

विद्रोह या संकल्पनेचा जन्मच

मुळात दमनाच्या पीडेतून झाला असावा.

अविवेकाचा प्रादुर्भाव

विवेकाची पुन्हा आठवण करून देण्यासाठी आपल्याला विद्रोहाची कास धरावी लागते. गेल्या ऑगस्टमध्ये एजाज़ अहमद यांचं एक व्याख्यान झालं होतं. त्यात त्यांनी आजच्या काळाचं सार्थपणे वर्णन करतांना म्हटलं होतं, “विवेकी भाषा आणि अविवेकी भाषा यातली सीमारेषा पुसून गेली आहे. सत्य भाषा आणि असत्य भाषा यातली रेषा पुसली आहे. कोण बोलतो यावर सत्य ठरतं. गेल्या २०० वर्षात तराजूचा काटा विवेकाच्या विरुद्ध आणि अविवेकाच्या बाजूनं प्रथमच ढळला आहे. राजकारण, धर्म, मास मीडिया अशा सर्वच क्षेत्रात…आधुनिक समाजाला असलेल्या ३-४ मोठ्या धोक्यांमध्ये मीडियाचा समावेश होतो. वास्तव, सत्य यावर आधारलेली मानके मोडली आहेत. सरकार, मिडिया, वकील, पोलीस हे उदाहरणार्थ मुस्लिमांचे कसे चित्र रेखाटतात, पहा. डोळ्यांना दिसतं त्याहून विपरीत समज सत्ताधारी निर्माण करतात आणि उदारमतवादी लोकशाहीच्या संस्था ते विनातक्रार स्वीकारतात, हे अनाकलनीय आहे. सर्वत्र दैनंदिन क्रौर्याचं साम्राज्य पसरलं आहे.”

अविवेकाचा प्रादुर्भाव आता केवळ उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीयांपुरताच सीमित राहिलेला नसून तो इतर जातींमधल्या वर्गापर्यंतही पोहोचलेला आहे. या बहुजन जातीतलेही आता अविवेकाचे समर्थक झाल्याचे दिसते. प्रगतीशील म्हणवले जाणारे वेगवेगळे समूह चिरफाळलेले आहेत. कम्युनिस्ट, समाजवादी, दलित या सगळ्यांच्या अस्मिता टोकदार झाल्यानं जोतिबा फुल्यांच्या कल्पनेतला एकमय लोक कसा निर्माण होणार? त्यामुळे गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली असून त्या मूलतत्त्ववाद्यांनी लावलेले सापळे, दाखवलेली आमिषं आणि विषारी प्रचारांनी भरवलेली डोकी कारणीभूत आहे. हे मूलतत्त्ववाद्याचं, जमातवाद्याचं यश आहे. जमातवाद्यांनी आता त्यांना जी अपकृत्यं करवून घ्यायची आहेत, जो अनाचार करायचा आहे, त्यासाठीचं माध्यम म्हणून त्यांनी बहुजनांमधलेल्यांनाच चलाखीनं कामाला लावलं आहे.

घराघरात, नात्यांमध्ये, सोबत्यांमध्ये दऱ्या निर्माण झाल्या आहेत. कुटुंबांच्या व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये सर्वंकषवादातली विषारी मेख समजणारे आणि ती बोलून दाखवायचा प्रयत्न करणारे एकटे पडत आहेत, हद्दपार केले जात आहेत. ह्या प्रकारचा विचार करणारे कवी, लेखक, रंगकर्मी, चित्रपटलेखक बाजूला फेकले जात आहेत. आणि द्वेष पसरवणारे सिनेमे बनवणारे राजाश्रय, पुरस्कार मिळवून बसले आहेत.

बहुजनांच्या सशक्त संस्कृतीचा विकल्प

अश्या परिस्थितीत काय करायचं? महात्मा जोतिबा फुले यांच्यापासून वि. रा. शिंदे., डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कॉ. शरद पाटलांपर्यंत अनेकांनी आपल्याला यावरचा उतारा सुचवलेला आहे आणि तो आजही प्रस्तुत आहे. जोतिबा फुले म्हणतात त्याप्रमाणे शूद्रातिशूद्र, स्त्री आणि आदिवासी अशा सर्व समुदायांचं अब्राह्मणी तत्वज्ञानाने प्रबोधन करणे हाच त्यावरचा इलाज आहे. हे करतांना त्यात एक अशा धर्मनिरपेक्षतेची आपल्याला आवश्यकता आहे जी वर्गविरोधी तर असेलच, पण ती भारतीय संदर्भात मुख्यतः जातविरोधी आणि स्त्रियांच्या हक्काचा हिरीरीनं विचार करणारीही असेल. म. जोतिबा फुलेंच्या आयुष्यभराच्या कामाचा जो मोठा प्रकल्प होता तो प्रस्थापित, शोषक, असहिष्णू आणि अन्याय्य अशा संस्कृतीला बहुजनांच्या समांतर आणि सशक्त संस्कृतीनं विकल्प देणं. जोतिबा फुलेंनी इथल्या समाजातल्या हिणाचं, अन्यायाचं मर्म ओळखलं होतं. सगळ्या प्रश्नांचा समग्रतेनं विचार करून त्यांनी या प्रस्थापित संस्कृतीला पर्याय उभा करण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्यासाठी ते संघर्ष करीत राहिले. अब्राह्मणी प्रबोधनातून अब्राह्मणी संघर्ष उभा करणं, त्यासाठी व्यापक चळवळ उभी करणं या त्यांच्या विलक्षण विचाराची आणि त्यातून ते जे ‘एकमय नेशन’ची कल्पना मांडतात ती आजच्या काळात पुन्हा निष्ठेनं अनुसरण्याची अत्यंत गरज आहे. सध्याच्या जमातवादाला, मूलतत्त्ववादाशी भिडण्यासाठी त्याची आवश्यकता आहे.

सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांवर जोतिबांनी आपला रोख निश्चित केलेला होता आणि या दोन्ही गोष्टींत त्यांना आमूल परिवर्तन अपेक्षित होतं. सामाजिक प्रतिष्ठा मिळावी, सामाजिक अधिकार मिळावेत यांसाठी ते निव्वळ मागणी करत नव्हते तर तो त्यांचा आग्रह होता. ही डिमांडेड दॅट. एकोणिसाव्या शतकात स्थिरावलेल्या ब्राह्मणी संस्कृतीच्या वसाहतवादाला घालवण्याचे त्यांचे प्रयत्न होते. कारण समाजाची संस्कृती एकजिनसी, एकरंगी नसते हे ते जाणत होते. म्हणूनच बहुलतावादाला, समतेला, बंधुतेला ते प्रक्षेपित करीत राहिले. त्यांचं आकलन समग्रतेनं असल्यानं त्यांची बंधुतेची कल्पनाही विश्वबंधुत्वाची होती. ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणासी ।। धरावे पोटाशी ।। बंधूपरी ।। असे ते सर्वांना बंधुभावाने कवटाळू पाहात होते.

आजच्या सांस्कतिक राष्ट्रवादाच्या उन्मादी अतिरेकाच्या काळात जोतिबांनी वापरलेल्या साधनांचाही आपल्याला विचार करावा लागेल. फुल्यांनी परंपरेतले अभंग, पोवाडे, जलसे, प्रश्नोत्तरांचे रूपबंध आपल्या खास श्रमिकांच्या भाषेत घडवून स्वभाषेचा जोरकस ठसा उमटवला. त्यांच्या भाषेत संस्कृत-फारशी-गुजराती-हिंदी वाक्यरचना आणि म्हणी येतात. इंग्रजी पद्धतीच्या मराठी वाक्यांत खास गावठी मराठी लयीतले शब्द डोकावतात. लोकसमूहांनुसार त्या त्या लोकांसाठीची बोली ते वापरतांना दिसतात. त्यांनी वापरलेली ठेवणीतली विशेषणं आणि खास शिव्यांचा तर स्वतंत्र अभ्यास होणं आवश्यक आहे. त्यांचं लेखन वाचतांना आपल्याला लक्षात येतं की तत्कालीन जागतिक सांस्कृतिक घडामोडींची अद्यावत माहिती ते ठेवत होते, होमर, शेक्सपिअर आणि मुस्लीम-ख्रिश्चनांचे धर्मग्रंथ, मराठी-हिंदी संतकाव्यं, जैन-इस्लामची तत्त्वज्ञानं, समकालीनांचं साहित्य तसेच इतिहास आणि भारतविद्येचे ग्रंथ यांचं त्यांनी सूक्ष्म वाचन केलेलं होतं. त्यातून आपली धारदार भाषा घडवली होती आणि ती त्यांनी आपल्या कार्यात त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर-लोकहितार्थ आणि शेतकऱ्यांच्या बचावासाठी वापरली. भाषेबद्दल जोतिबा किती जागरूक होते आणि भाषेमागचं राजकारण त्यांनी किती बारकाईनं समजून घेतलं होतं हे कळल्यावर असं वाटतं की ते विसाव्या शतकात असते तर भाषाशुद्धीसारख्या विभेदनवादी प्रकाराची त्यांनी कठोरपणे चिकित्सा केली असती. ब्राह्मण्याची त्यांनी केलेली चिकित्सा ही त्यांना सामाजिक गुलामगिरीविरुद्ध विद्रोह करणारा पहिला क्रांतिकारक विचारवंत ठरवते. ब्राह्मण्याविरुद्ध युद्ध पुकारलेले असतांनाही त्यांचा शत्रूमित्र विवेक ते विसरत नाहीत कारण त्यांना मोठ्या शत्रूचं स्पष्ट आकलन झालेलं होतं. डोंगरी तुरुंगातून टिळक-आगरकरांची सुटका झाल्यावर त्यांचा ते सत्कार करतांना दिसतात तसेच दयानंद सरस्वतींच्या सत्कारप्रसंगी उद्भवलेल्या अरिष्टाला आपल्या फौजेनिशी मदत करायला न्यायमूर्ती  रानडेंच्या मदतीलाही धावून जातात.

फुलेंनी एकूण सामाजिक व्यवस्थेचा समग्रतेनं विचार केला होता. भांडवलशाही आणि धर्मव्यवस्था या किती शोषणव्यवस्थांना जन्म देतात हे नेमकं ओळखलं होतं. तत्कालीन सुधारकांपैकी अनेकांनी प्रामाणिक प्रयत्न केले असले तरी त्यांच्या उदारमतवादाचा परीघ ब्राह्मण व उच्चवर्गीयचांपर्यंतच होता. धर्मविषयक त्यांनी वापरलेल्या संज्ञाही (हिंदू, आर्य इ.) ढिसाळ असल्याने त्या विसाव्या शतकातल्या हिंदुत्त्ववाद्यांच्या पथ्यावर पडल्या. हिंदू आणि ख्रिश्चन,  हिंदू आणि मुसलमान अशा प्रकारे विचार झाल्यानं त्याचा फायदा केवळ उच्चवर्णीयांना झाला आणि त्यातच त्यांचा मतलबही होता. त्यांनी मांडलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादातच दुहीची बीजं होती. याउलट जोतिबा जे द्वैत मांडतात त्याचा त्यांनी साकल्यानं विचार केलेला दिसतो. अभिजन आणि बहुजन किंवा ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असा भेद करतांना त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या होणाऱ्या पिळवणूकीला लक्ष्य केलं होतं. त्यांनी ज्यांचा उल्लेख वारंवार केलेला आहे ती नावं म्हणजे शिवाजी, महंमद, येशू ख्रिस्त, बुद्ध, बळी, बृहस्पती. जोतिबांनी निर्माण केलेली ही मिथकं आजही मूलतत्ववाद्यांना अडचणीची वाटतात, त्यावरून आजच्या संघर्षात फुल्यांनी दिलेली दिशा किती महत्त्वाची होती हे लक्षात येईल. प्रस्थापित सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विरोधात ते  त्यांच्या कार्यातून, लेखनातून आणि प्रतीकं-मिथकातून नवी जीवनदृष्टीच देत होते. आज आपण भयंकराच्या दारात येऊन उभे राहिलो असतांना ती आपल्याला पुन्हा दिशादर्शक ठरू शकते. मूलतत्त्ववादी विचारांमध्ये स्त्री ही सर्वात शोषित असते. जोतिबांनी समतेचा विचार मांडतांना सर्व वर्ण-वर्गातल्या स्त्रीला सुद्धा विचारात घेतलं होतं. विषमतेला नकार देतांना जोतिबा स्त्री-पुरुष सर्वांचा एक घटक म्हणून विचार करतात. ते समाजाचा एक भाग म्हणून विचार करण्याअगोदर एकेका व्यक्तीला समतेची संधी मिळायला हवी असा आग्रह धरतात. फाशिस्ट, हुकूमशाही व्यवस्थेत नेमकं याउलट असतं. झुंडी आणि समूह म्हणून ओळखी उरलेल्या असतात. आजच्या काळात हाही फरक लक्षात ठेवायला पाहिजे.

जोतिबांनी आपला वैकल्पिक संस्कृती उभारणीचा प्रकल्प मांडला त्या आधुनिक विचारात परंपरेतील सत्वशील तत्त्वं आणि नवतेचा स्वीकार केलेला दिसतो. त्यांच्या या अब्राह्मणी आधुनिकतेचा विचार म्हणूनच आजच्या काळातही तितकाच प्रस्तुत आणि सार्थ आहे. जमातवाद हा जातीय आणि धार्मिक अस्मितेला खतपाणी घालून आपला मतलब साधतो हे त्यांनी जाणलेलं होतं. त्यामुळे आजच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाला तोंड देण्यासाठी त्यांनी जे नेमकं सर्वसमावेशक पर्यायी ठोस प्रारूप उपलब्ध करून दिलेलं आहे, त्यावरूनच आपल्याला आपल्या संघर्षाची दिशा ठरवावी लागणार आहे. फक्त त्याच्यासाठी परस्परांतील कलह, जाती-जातीच्या टोकदार अस्मिता, फालतू अहंगंड, विसरून, वेगवेगळ्या दिशेला झालेली तोंडं सामोरी करून खुलेपणा स्वीकारला पाहिजे. प्रगतीशील समूह जाती-जातींच्या अस्मितांनी चिरफाळले गेले आहेत. असहमतीतून सहानुभाव, परिवर्तनशीलता आपण अंगिकारणं गरजेचं आहे. सद्यकालीन मोठे धोके ओळखून कॉ. पानसरेंनी सांगितलेल्या शत्रुमित्र विवेकाचं भान ठेऊन आपल्याला साथीनं उभं राहाणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या काटेकोरपणे एक कार्यक्रम ठरवणं, या नव्या दृष्टीनं त्याची तातडी पटवून देणं करावं लागेल. आता अटीतटीची, कडेलोटाची वेळ आलेली आहे. आता आलेलं संकट सभ्यतेवरचं संकट आहे. ते ओळखलं तरच आपण जागे झालो असं म्हणता येईल. संकट जागतिक आहे. माणूस हा केंद्र धरून केलेल्या विवेकी विचारांनी वर्चस्ववादाला प्रतिवर्चस्ववादी चळवळीचा कार्यक्रम आखूनच मुकाबला करता येणार आहे. त्यासाठी भपकेदार इव्हेन्ट्स, उत्सवी बाजार टाळून लहान लहान आणि सुट्या सुट्या सातत्यपूर्ण कार्यक्रमांची गरज आहे. प्रगतीशील विचारांतल्या अस्मितेच्या मुद्यांवरून चिरफाळलेल्या समूहांनी एकत्र येऊनच हा विचार करावा लागेल. अन्यथा नंतर अस्तित्वाच्या कडेलोटाची वेळ येईल.

मानवी सभ्यतेवरचं अरिष्ट आणि संस्कृतीची लोकशाहीवादी बीजं

जगभरच्या सामाजिक-राजकीय घडामोडी पाहाता आपल्या मानव म्हणून असलेल्या सभ्यतेवरच जमातवादाचं, मूलतत्त्ववादाचं, वंशवादाचं अरिष्ट आलेलं दिसत आहे. तिकडं कृष्णवर्णीय लोकांशी श्वेतवर्णीयांचं वर्तंन अत्यंत अमानुष झालेलं आहे. अलीकडे जॉर्ज फ्लॉईड याला पोलिसांनी  त्याच्या गळ्यावर गुडघा दाबून ठार मारलं.  त्याचा श्वास कोंडला होता. दहा मिनिटं तो ’आय कान्ट ब्रीद,’ असं म्हणत राहिला. अन्यायी, राक्षसी आणि अमानुष व्यवस्था वंचितांना, वर्जितांना विकल बनवू पाहाताहेत. मूक करू पाहाताहेत. संपवू पाहाताहेत. ही मानवी सभ्यता नाही.

संस्कृती ही कधीही एकसाची, एकरंगी अशी व्यवस्था नसते. ती तिच्या पोटातल्या विविध मताचं-रूपांचं-वादविवादांचं, वितंडांचं, असहमतींचं, सुसंवादांचं सरमिसळ झालेलं रूप असतं. अनेक लोक, अनेक मतं, विचार, वंश, भाषा, धर्म अशा अनेक संस्कृती मिळून भारताची सभ्यता निर्माण झालेली आहे. प्राचीन काळात सुमेरिअन, इजिप्शिअन वगैरे ज्या मोठ्या सभ्यता निर्माण झाल्या, त्यात भारताची सभ्यता ही महत्त्वाची आहे. इथं मराठवाड्यात किती धर्म आणि संप्रदाय आणि चळवळी झाल्या. कोणत्याही धर्मात हिंसेला, अत्याचारांना परवानगी दिलेली नाही. भक्ती चळवळ आणि इथला सूफी संप्रदाय हे आपलं सांस्कृतिक संचित आहे, वारसा आहे. आपल्या संस्कृतीच्या समृध्दीत त्यांनी मोलाचा वाटा उचललेला आहे. इथल्या भक्ती चळवळीतूनच उत्तरेतल्या संतकवींनी प्रेरणा घेतली. मंडन-खंडन-वितंडा अशी आपली वादविवादाची परंपरा होती. तित इतरांच्या वेगळ्या विचाराला, टीकेला जागा होती. संस्कृतीतच कलांची, साहित्याची, विचारांची, ज्ञान आणि तत्त्वज्ञानांची, सहमती-असहमतींची  आणि  विरोधांची असंख्य रूपं निर्माण होत असतांनाच ती संस्कृतीला संपन्न करीत असतात. एकच एक विचार, एकाच पद्धतीचा आहार, एकाच पद्धतीची भाषा, जीवनदृष्टी असं काही संस्कृती स्वीकारत नाही. संस्कृतीतच लोकशाहीची बीजं असतात. कारण याच संस्कृतीत संतांनी, धुरीणांनी, विचारवंतांनी, संतांनी सवाल करण्यासाठीचे पायंडे पाडून ठेवलेले आहेत. सगळे प्रवाह स्वीकारत लोकशाहीची तत्त्वं सामावून घेत बहुलतावादी रूपातच संस्कृतीचं चरित्र घडत असतं. त्याचं सद्यपरिस्थितीत कधीही विस्मरण होऊ न देणं ही आपली जबाबदारी आहे. कर्तव्य आहे. भक्ती आणि सूफी चळवळींनी आपल्याला दिलेला संदेश आणि छत्रपती शिवाजी महाराज, जोतिबा फुले, वि. रा. शिंदे, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांनी आपल्याला दिलेली प्रश्न विचारण्याची, चिकित्सा करण्याची, समतेची, करूणेची आणि न्यायाची शिकवण आज कधी नव्हे ती निष्ठेनं अंमलात आणण्याची गरज आहे. कारण तो मानुषतेचा संदेश आहे. कारण तो लोकतंत्राचा पायाभूत विचार आहे.

मित्रहो, समकालाविषयी बोलतांना मी खूपच दुःस्वप्नकारक गोष्टींचे दाखले दिले ते त्यामुळे निराश आणि हतबल होण्यासाठी नव्हे, तर मूळात रोग काय आहे याचं निदान तुमचं तुम्हाला करता यावं म्हणून दिलेले आहेत. लेखकासाठी आजचा काळ अनेक स्वातंत्र्याचे संकोच झाल्याचा काळ आहे. पण लेखकाला अस्वस्थ वाटत राहाणं ही त्याच्या लेखक असण्याची मूळ अटही असते. मुनीर नियाजी नावाचा शायर म्हणतो तसं,

बेचैन बहुत फिरना, घबराये हुए रहना

इक आग़ सी जज़्बों की दहकाये हुए रहना

हे केल्याशिवाय लिहित्या लेखक-कवीला इलाज नसतो. ‘जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची । तया भोजनाची रूचि प्राप्त कैची’ असं स्वतः प्रत्यक्ष वास्तवाचा उलगडा होऊन अस्वस्थ व्हायचं आणि इतरांनाही अस्वस्थ करीत राहायचं हे लेखकाचं काम असतं. नोबेल पुरस्कार स्वीकारतांना ग्युंटर ग्रास या थोर जर्मन लेखकानं सांगितलं होतं, “भूतकाळात सुखानं राहू द्यायचं नाही हे लेखकपणाच्या (कलावंत असण्याच्या) व्याख्येत अनुस्युत असतं. सतत भूतकाळाविषयी बोलणारे हे लोक बुजलेल्या जखमा उघड्या करतात. बंद दारांतून आत डोकावतात. कपाटांत दडवलेले सांगाडे शोधतात. सगळ्यात वाईट म्हणजे ते विजयी बाजूच्या मतांशी जोडून घ्यायचं नाकारतात. ते विजयांवर प्रश्नचिन्हं उमटवत राहतात.” हे लक्षात ठेवायला हवं.

भारतात प्रादेशिक भाषांचा एकूण व्यवहार फार मोठा नसतो. मराठी भाषेचंही आपलं साहित्यिक व्यवहाराचं जे जग आहे. तेही लहानसं आहे. तिथले बहुतेक व्यवहार ओळखी-पाळखींवर चाललेले असतात. मोठ्या कळीच्या प्रश्नांवर सहसा इथं मौन पाळलं जातं. १९९२, २००२, २००७ सारख्या घटना घडतात. त्यावर फारसे तरंग मराठी साहित्यात उमटत नाहीत. तिकडं हिंदी जगतात याच विषयावरच्या कवितांचे मलयश्री हाशमी दोन खंड प्रकाशित करतात. मिया कवितेचं आंदोलन होतं. असमी-बंगाली भाषेतले कवी-कलावंत-चित्रपट-नाट्य कलावंत त्यावर आपापल्या माध्यमातून अभिव्यक्त होतात. ‘कागज़ नहीं दिखाएंगे’ अशी घोषणा त्यांच्या व्यक्त होण्यातून दिसते. मराठीत थंडगार शांतता असते. लेखकांच्या तीन-चार पिढ्या एकाचवेळी मराठीत असतांना फारसे आवाज न उठता मौन अबाधित राहातं. मुक्तिबोध म्हणतात तसं,

सब चुप, साहित्यिक चुप और कविजन निर्वाक् 

चिंतक, शिल्पकार और नर्तक चुप हैं

याच कवितेत मुक्तिबोध मध्यम वर्गाचं– जो तथाकथित बौद्धिक वर्ग आहे त्याचं वर्णन क्रीतदास असं करतात. क्रीतदास म्हणजे विकला गेलेला गुलाम. जो ७० वर्षांतल्या कल्याणकारी राज्यातल्या फायद्यांची फळं चाखून स्थिरस्थावर होऊन आता वर डोळे लावून खालच्या वर्गातल्या लोकांचा द्वेष करीत आणि सर्वंकषवादी सत्तेचा आंधळा, विखारी विद्वेष पसरवण्यात अतिशय सक्रीय आहे. यांना ब्राह्मणेतरांतील वर्ग आणि दलितांमधीलदेखील काही वर्ग सामील आहेत. यांच्याच खांद्यावर बंदुका ठेऊन प्रस्थापित व्यवस्थेला त्यांची दुष्कृत्यं करवून घेता येत असतात.

त्याचबरोबर जे कोणी सत्तेशी सलगी करत राहिलेले विद्वान, विचारवंत, कवी, समीक्षक अशा लोकांनाच उद्देशून बहुधा मुक्तिबोधांनी लिहून ठेवलेलं आहेः

अब तक क्या किया,

जीवन क्या जिया,

ज़्यादा लिया और दिया बहुत-बहुत कम 

मर गया देश, अरे, जीवित रह गए तुम।”  

बैंड के लोगों के चेहरे 

मिलते हैं मेरे देखे हुओं से 

लगता है उनमें कई प्रतिष्ठित पत्रकार 

इसी नगर के !!

बड़े- बड़े नाम अरे, कैसे शामिल हो गए !!

उनके पीछे चल रहा 

संगीन नोकों का चमकता जंगल,

चेहरे वे मेरे जाने बूझे से लगते 

उनके चित्र समाचार पत्रों में छपे थे,

उनके लेख देखे थे,

यहाँ तक कि कविताएँ पढ़ी थीं 

भई वाह !

उनमें कई प्रकांड आलोचक, विचारक, जगमगाते कविगण 

मंत्री भी, उद्योगपति और विद्वान 

यहाँ तक कि शहर का हत्यारा 

डोमाजी उस्ताद। 

(मुक्तिबोध रचनावली-२, पृ. ३२८-३०)

अशा प्रकारचे मौन पाळत राहाणारे आणि पाळतखोर सत्तेला भिऊन असणारे जे लोक आहेत ते वास्तवाला केवळ कॅमेऱ्याच्या निर्ढावलेल्या भिंगासारखे आहेत. वास्तवाचं पृथःकरण न करताच आहे तसं प्रतिबिंबित करणारे आहेत.

मला इथं मला अरुण कोलटकरांची ‘क्यामेरा’ ही कविता आठवते. त्यात ते कॅमेऱ्याला भिंग घाश्या संबोधत म्हणतात,

तुझ्यात दोन गोष्टी नाहीत। स्मृती।आदल्या चौकटीची। आणि अश्रुग्रंथी।कितीही दुःख पाहिलं तरी तुझं भिंग पाणावत नाही। दुःख पाहून तू द्रवत नाहीस। पण दुसऱ्याच्या डोळ्यातला अश्रू कसा टिपावा । तो न पुसता न खाली पडू देता। हे तुला चांगलं माहीत आहे।

कोलटकरांची ही कविता वेगळ्या व्यथेची आणि वेदनेची कविता असली तरी ती प्रतिमांच्या सृष्टीतले आपण कॅमेऱ्यासारखे निर्जीव अलिप्त असे झालेल्या बघ्यांनाही लागू होते. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला फ्रान्समध्ये सैन्यातल्या देफ्रस नावाच्या ज्यू अधिकाऱ्याला न केलेल्याही गुन्ह्यासाठी राष्ट्रद्रोही, धर्मद्रोही, राजद्रोही वगैरे ठरवून टाकून, तसा गुप्तपणे खटला चालवून त्याला गुन्हेगार जाहीर केलं गेलं होतं. तिथले लेखक, कवी, शिक्षक, पत्रकार वगैरेंनी एका सूरात त्याचा निषेध केला. सैन्याचा आणि सरकारचा धि:कार केला. न्याय, समता या गोष्टी धर्मनिरपेक्षतेनं सर्वांना मिळायला हव्यात हा त्यांचा आग्रह होता. एमिल झोलानं तेव्हाच ती प्रसिद्ध पुस्तिका लिहिली-ज्यक्यूज़ (मी आरोप करतो की-). या रेट्यामुळे देफ्रसची मुक्तता झाली. कारण तेव्हाचे लेखक डोळस, बोलू शकणारे आणि एकूणेक आवाज ऐकता येतील एवढ्या तीक्ष्ण कानांचे होते. कारण ते मौन बाळगणारे नव्हते. त्याचसाठी मीर तक़ी मीर कवींना उद्देशून जो एक इशारा देतो,

शायर हो, मत चुपके रहो, अब चुप में जानें जाती हैं.

आणि हा इशारा समजून त्याला प्रतिसाद देणारेही काही लोक आहेत. बरेच असे लोक आहेत जे अजुन मुके झालेले नाही. बरेच असे लोक आहेत जे बोलत आहेत. सकारात्मक उन्मेषांची कितीतरी उदाहरणं आहेत जी या परिस्थितीतही हिंमत देत आहेत. महामारीच्या काळात पंजाबमधल्या शीख-स्त्री-पुरुष शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर वर्षभर उन्हा-पावसात-कडाक्याच्या गारठ्यात जे आंदोलन केलं ते इतिहासातलं इतका काळ लांबलेलं लोकशाही अहिंसक आंदोलनाचं विलक्षण उदाहरण होतं. उत्तर भारतात विद्यार्थांनी बेरोजगारी आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या अव्यवस्थेविरुद्ध जो संघर्ष उभा केला होता तो प्रश्न पडू पाहाणाऱ्यांसाठी उत्साहवर्धक होता. सीएए-एनआरसी विरोधात दिल्लीतल्या शाहीनबागमधला  निकराचा लढा भारतभर प्रेरणा देणारा ठरला. असंख्य ठिकाणी शाहीनबाग आंदोलनाला पाठिंबा देणारी त्याच धर्तीची आंदोलनं झालेली दिसून आली. देशभर त्यांना समर्थन देणाऱ्यांची संख्या प्रचंड होती जी माध्यमांमधून दिसत नव्हती. अहिंसेनं, ठामपणे, संविधानाला सर्वोपरी मानून हा जो संघर्ष होता तो संवेदनशील नागरीकांच्या आदराला पात्र ठरला होता. त्यानं विवेक, सत्यावरची निष्ठा आणि विद्रोहातलं सौंदर्यही दाखवलं. त्या दरम्यान लोककलेचे, दृककलेचे कितीतरी प्रकार सार्वजनिक पातळीवर राबवले गेले होते. अशी कला आपल्या काळाशी जोडलेली आणि भिडलेली असते. ग्राफिटी, घोषणा, पोस्टर, गाणी आंदोलनाच्या जागी केलेली वैविध्यपूर्ण सजावट, चित्रं, कविता ह्यातून अनेकानेक प्रकारे समाजानं सत्तेला प्रश्न विचारले. पण ते प्रश्न कायम लोकशाहीवादी मार्गांनी विचारले. हजारो लोक एकत्र असताना तिरंगा, राष्ट्रगीत आणि एकत्र पंगतीत जेवणे असे नवेच प्रकार आपण गेल्या दोन वर्षात पहिले. असंख्य तरुणांची अस्वस्थता दिसत नाही, पण ती आहे. कारण विरोधाचा कोणताही स्वर ऐकू-दिसू द्यायचा नाही अशा व्यवस्थेत या तरुणांना भविष्य दिसतंय, जे अनिश्चित, बेभरवशी आहे. ते आपापल्या पातळीवर आणि आपापल्या प्रकारे व्यक्त होत आहेत आणि व्यक्त होत राहाणार आहेत.

मित्रांनो,

समकाळ अतिशय क्रूर आहे. पण तरीही मला एक स्वप्नलोक खुणावत असतो. मी आणि किंवा कोणताही भानावर असलेला कवी हा सत्तेच्या समोरचा अस्वस्थ नागरिक असतो. सतत विरोधातल्या पहिल्या रांगेत असतो. कारण मला दुर्लक्षित राहिलेले, अन्याय झालेले स्त्री पुरुष दिसत असतात. काळ असा आहे की सामान्य नागरीकाचं अस्तित्व प्रश्नांकित झालं आहे. कुणीही कधीही झुंडीनं येईल याचं संकट वाटत राहण्याचा काळ आहे. कशातही तुम्हाला अडकवलं-फसवलं जाईल  अशी परिस्थिती आहे. विवेक हरवलेला, नागरीकांच्याच मुळावर उठलेला हा काळ आहे. तो पुस्तकांचा शत्रू आहे, ज्ञानाचा शत्रू आहे. समता, स्वातंत्र्य, इतिहास, सत्य यांचा वैरी आहे. आपण हातोहात लुबाडले गेलो आहोत असं वाटतं. आजची सत्ता वंचितांच्या, वर्जितांच्या, दलितांच्या, बुद्धिवंतांच्या विरुद्ध असलेली सत्ता आहे. तिला भाषा, साहित्य, तत्वज्ञान, कला, परंपरेतलं धवल सौंदर्य यांचं वावडं आहे. त्यामुळे जागं राहणं गरजेचं वाटतं. कारण माणुसकीची पुन्हा पुन्हा स्मरण करून देणं हेच कवीचं आणि कोणत्याही कलावंतांचं आणि भान असलेल्या नागरिकाचं कर्तंव्य असतं. ते आपण केलं पाहिजे. कवी जे बोलू पाहातो ते शांत, दुखऱ्या स्वरात. ते सांगतो की अमानुष हुकूमशहांच्या सावल्या मोठ्या होत होत जिवंतपणाच्या, स्वातंत्र्याच्या, भलेपणाच्या अस्तित्वाला झाकोळून टाकताहेत. सत्य हाच द्रोह मानला जात असेल तर कवी आणखीनच ठामपणे सत्य की जय म्हणणार आहे. त्याच्या स्वरात आपले सगळे लोक, आपला देश वाचवण्याची काळजी आहे. कविता लिहिणं हे सत्याचा उच्चार करणंच आहे.

अखेरीला माझे मित्र उदय प्रकाश यांची एक लहानशी कविता वाचतो आणि माझं हे भाषण संपवतो. आपल्याला आज आपली संस्कृती, आपलं संविधान आणि मानवी सभ्यतेतली मौलिक अशी मूल्यं टिकवायची असतील तर आपल्याला माणूस म्हणून आपण जिवंत आहोत हे सिद्ध करावं लागेल. माणूस म्हणून प्रिय असलेलं स्वातंत्र्य, समता, करूणा, न्याय यांच्यासाठी मौन सोडून बोलावं लागेल. फैज़ म्हणतो तसं ये थोड़ा वक़्त बहुत है। बोल, बोल के लब आज़ाद है तेरे।

उदय प्रकाशसुद्धा आपल्या जिवंतपणाची आठवण करून देण्यासाठी म्हणतातः

आदमी
मरने के बाद
कुछ नहीं सोचता.

आदमी
मरने के बाद
कुछ नहीं बोलता.

कुछ नहीं सोचने
और कुछ नहीं बोलने पर
आदमी
मर जाता है.

हे आपण लक्षात ठेऊ. आणि तसं वागण्याचा कसोशीनं प्रयत्न करू.

धन्यवाद.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0