काबुलः तालीबानने सोमवारी काबूलच्या ईशान्येकडील पंजशीर खोऱ्यातील विरोधकांवर विजय मिळवल्याचा दावा केला. त्याचप्रमाणे या विजयासह अफगाणिस्तान ताब्यात घेण्
काबुलः तालीबानने सोमवारी काबूलच्या ईशान्येकडील पंजशीर खोऱ्यातील विरोधकांवर विजय मिळवल्याचा दावा केला. त्याचप्रमाणे या विजयासह अफगाणिस्तान ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे असा दावाही तालीबानने केला आहे. नवीन सरकारची घोषणा लवकरच केली जाईल, असा वायदाही तालीबानने केला आहे.
तालीबानचे सदस्य पंजशीरच्या प्रादेशिक गव्हर्नरच्या फाटकासमोर उभे आहेत असे दाखवणारी छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. पंजशीरमधील नेते अहमद मसौद यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल रेझिस्टन्स फ्रण्ट ऑफ अफगाणिस्तानशी (एनआरएफए) लढा देऊन तालीबानने हा विजय प्राप्त केला आहे.
“पंजशीर हे निसटून गेलेला शत्रू लपलेले अखेरचे ठिकाण होते आणि ते आता आमच्या ताब्यात आहे,” असे तालीबानचा प्रवक्ता झबिहुल्लाह मुजाहिदने पत्रकार परिषदेत सांगितले.
“या विजयामुळे आमचा देश आता युद्धाच्या धुमश्चक्रीतून बाहेर आला आहे. आता आमची जनता शांतता आणि स्वातंत्र्यातील आनंदी आयुष्य जगू शकेल,” असेही तो म्हणाला.
पंजशीर खोऱ्यातील रहिवासी वांशिकदृष्ट्या पश्तुनांचे वर्चस्व असलेल्या तालिबानींहून वेगळे आहेत. तसेच ते १९९६ ते २००१ या काळात तालीबानविरोधात लढले होते. तरीही त्यांच्याशी भेदभावाची वर्तणूक दिली जाणार नाही, असे आश्वासन तालीबानने पंजशीर खोऱ्यातील जनतेला दिले.
“ते आमचे बंधूच आहेत आणि आम्ही देशाच्या कल्याणासाठी एकत्रितपणे काम करू,” असे मुजाहिद म्हणाला.
अफगाणिस्तानच्या नियमित लष्करातील उरल्यासुरले घटक, विशेष दले आणि स्थानिक जनतेला सोबत घेऊन लढणाऱ्या मसौद यांनी ते सुरक्षित असल्याचे ट्विट केले आहे. मात्र, अधिक तपशील दिले नाहीत. मसौद आणि माजी उपाध्यक्ष अमरुल्लाह सालेह हे शेजारच्या तजाकिस्तानमध्ये निसटल्याचा दावा मुजाहिदने केला आहे.
तालीबानचा विजयाचा दावा खोटा आहे आणि विरोधी दले अद्याप लढत आहेत, असे एनआरएफच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख अली मैसाम नाझारी यांचे म्हणणे आहे. एनआरएफच्या तुकड्या पंजशीर खोऱ्यातील सर्व मोक्याच्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि लढत आहेत, असा दावा त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर केला आहे.
तालीबानमध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्यांचे तालीबान प्रवक्ता मुजाहिदने खंडन केले. नवीन सरकारची घोषणा लवकरच केली जाईल, असे तो म्हणाला. मात्र, त्यासाठीची निश्चित तारीख त्याने सांगितली नाही.
स्त्रिया आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील कामांवर परत आल्या आहेत आणि व्यवस्था स्थापित झाली की अन्य क्षेत्रेही त्यांच्यासाठी खुली केली जातील, असे मुजाहिद म्हणाला.
२० वर्षांच्या युद्धानंतर अमेरिकेने गेल्या महिन्यात अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेतले आणि लगेचच तालीबानने देश काबीज करण्यास सुरुवात केली. तालीबानने १९९६ ते २००१ या काळातील सत्तेदरम्यान स्त्रियांना शिक्षण घेण्यास व काम करण्यास बंदी केली होती. आता मात्र इस्लामी कायद्याच्या मर्यादेत राहून स्त्रियांना महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये काम करण्याची परवानगी देणार असल्याचे तालीबानने जाहीर केले आहे. स्त्रियांच्या हक्कांचेही रक्षण केले जाईल, असा वायदाही केला आहे.
तालीबानने १५ ऑगस्ट रोजी काबूलवर ताबा मिळवला. पाश्चिमात्य राष्ट्रांच्या पाठिंब्याने स्थापन करण्यात आलेले अफगाणिस्तानातील सरकार कोसळले व अध्यक्ष अश्रफ घनी देश सोडून निघून गेले.
पंजशीर हे तालीबानला विरोध करणारे अखेरचे ठाणे होते. हे खोरे नेहमीच ताब्यात घेण्यासाठी कठीण ठरले आहे.
तालीबानशी संवाद साधण्यासाठी तसेच युद्ध व दुष्काळामुळे विस्थापित जनतेला मदत पाठवण्यासाठी तयार असल्याचे पाश्चिमात्य देश म्हणत आहेत. अफगाणिस्तानातील जनतेच्या मदतीसाठी १३ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सहाय्य परिषद बोलावणार असल्याचे संयुक्त राष्ट्रांनीही जाहीर केले आहे.
COMMENTS