१ फेब्रुवारीचा संसदेवरचा मोर्चा स्थगित

१ फेब्रुवारीचा संसदेवरचा मोर्चा स्थगित

नवी दिल्लीः प्रजासत्ताक दिनी शेतकरी संघटनांकडून काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाल्यानंतर भविष्यात अनुचित घटना टाळण्याच्या उद्देशाने येत्या

‘ट्रॅक्टर रॅली’ संबंधित निर्णय पोलिसांनी घ्यावेत’
केंद्र सरकारच्या मदतीला अण्णा हजारे
‘सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली’

नवी दिल्लीः प्रजासत्ताक दिनी शेतकरी संघटनांकडून काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाल्यानंतर भविष्यात अनुचित घटना टाळण्याच्या उद्देशाने येत्या १ फेब्रुवारी रोजी संसदेवर काढण्यात येणारा मोर्चा सर्व शेतकरी संघटनांनी स्थगित केला आहे. भारतीय किसान युनियनमधील राजेवाल गटाचे नेते बलबीर एस. राजेवाल यांनी ही घोषणा केली.

१ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मांडला जात असून त्या दिवशी मोदी सरकारने ३ शेती कायदे रद्द करावेत म्हणून शेतकरी संघटनांनी संसदेला घेराव घालण्यासाठी दिल्ली चलो आंदोलनाचा नारा दिला होता. पण या वेळी पुन्हा हिंसाचार होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून हा मोर्चाच रद्द करण्यात आला.

राजेवाल यांच्याबरोबर बुधवारी स्वराज इंडिया अभियानाचे नेते योगेंद्र यादव यांनी संसदेचा मोर्चा रद्द केला जाणार असल्याचे सांगत ३० जानेवारी रोजी शेतकरी आंदोलक म. गांधी पुण्यतिथीनिमित्त उपोषण करतील असे स्पष्ट केले. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारात सरकार समर्थक समाजकंटक सामील होते, त्यांचे फोटो अमित शहा व मोदींबरोबर आहेत, असा आरोप यादव यांनी केला. आमचे आंदोलन शांततापूर्ण सुरू होते, असेही ते म्हणाले.

दोन संघटना आंदोलनातून बाहेर

दरम्यान बुधवारी ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचारावरून दोन शेतकरी संघटनांनी या एकूण आंदोलनातून माघार घेण्याची घोषणा केली. भारतीय किसान युनियन (भानू) व ऑल इंडिया किसान संघर्ष को-ऑर्डिनेशन कमेटी अशी दोन संघटनांची नावे आहेत. भाकियू (भानू)चे अध्यक्ष ठाकूर भानू प्रताप सिंह यांनी प्रजासत्ताक दिनी झालेला हिंसाचार दुःखद घटना असून त्यामुळे आपण आंदोलनातून माघार घेत असल्याचे सांगितले. ही संघटना नोएडा-दिल्ली मार्गावरील चिल्ला सीमेवर आंदोलन करत होती. तर ऑल इंडिया किसान संघर्ष को-ऑर्डिनेशन कमेटीचे अध्यक्ष व्ही. एम. सिंह यांनी या आंदोलनाची दिशाच भरकटत चालल्याचा आरोप करत आंदोलनातून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला.

शेतकरी नेत्यांवर, आंदोलकांवर गुन्हे दाखल

प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर जो गोंधळ घालण्यात आला होता, तोडफोड करून झेंडा लावण्यात आला होता, त्याची गंभीर दखल आपण घेतली आहे, असे दिल्ली पोलिस आयुक्तांनी सांगितले. दिल्ली पोलिसांनी या हिंसाचाराला प्रवृत्त केल्याबद्दल २२ जणांवर फिर्याद दाखल केली आहेत. तर ५० जणांना अटक केली आहे. फिर्याद दाखल करणार्यामध्ये १० शेतकरी नेते आहेत. त्यांत योगेंद्र यादव, राकेश टिकैट यांची नावे आहेत. आंदोलकांना हिंसाचार करण्यास प्रवृत्त करण्यात आले असा आरोप टिकैट यांच्यावर लावण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0