लोक आपला कौल मागे घेतात तेव्हा

लोक आपला कौल मागे घेतात तेव्हा

आम्ही जिवंत आहोत, हेच जनतेने राजकीय वर्गाला शांतपणे जाणवून दिले आहे.

भाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’
या आंदोलनाचा अर्थ काय?
मोठा कट उघड : भाजप पदाधिकाऱ्याला अटक

अनेक राजकीय तज्ज्ञांच्या मते, महाराष्ट्र आणि हरयाणा मधील विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालातून जनतेने केवळ भारतीय जनता पक्षालाच नव्हे तर विरोधी पक्षांनाही एक संदेश दिला आहे. बरोबरच आहे. लोकांना भारतामध्ये लोकशाही राहावी असे वाटते आणि त्यांनी त्याकरिता अवकाश निर्माण केला आहे.

हा केवळ दोन राज्यांमधील निवडणुकांमधून नव्हे तर देशभरातील पोटनिवडणुकांमधून मिळालेला धडा आहे. आम्ही जिवंत आहोत हे जनतेने राजकीय वर्गाला शांतपणे जाणवून दिले आहे. मोडकी, गंजलेली साधने वापरून काम कसे करायचे आम्हाला माहीत आहे. परिपूर्णतेचा ध्यास असलेल्या काहींना अजूनही प्रेषिताच्या आगमनासाठी तयार राहिले पाहिजे असे वाटते, मात्र प्रेषित पृथ्वीवर येण्याचे दिवस संपले आहेत. आता जी काही भौतिक साधनसामग्री आहे ती घेऊनच आपल्याला काम केले पाहिजे. परिपूर्ण काहीच नाही. आपण योग्य पर्याय येईपर्यंत सडत राहू शकत नाही. शेवटी जीवन जगण्यासाठी आहे. मृत्यूपूर्वीच मरून जाण्यात काय अर्थ आहे?

आपले अनेक विश्लेषक सांगतात, विरोधी पक्षांनी नुसतेच तोंड पाडून ट्वीट करत बसू नये तर विरोधी पक्षासारखे वागावे असा संदेश त्यांना या विधानसभांच्या निवडणुकीतून मिळाला आहे. हेही खरे आहे. विरोधी पक्षांनी रस्त्यावर उतरले पाहिजे – पावसात आणि स्वतःच्या घामानेही भिजले पाहिजे. शरद पवारांनी लोकांना सांगितले, तुमच्या खुर्च्यांच्या छत्र्या करा; पण ऊन-वारा-पावसाला तोंड देत मला जनतेशी बोललेच पाहिजे. कधीकधी पावसाचे पाणी तुम्हाला शुद्ध करते, धैर्य देते.

भाजपची घमेंड लोकांनी नाकारली आहे आणि विरोधकांना प्रोत्साहन दिले आहे. पण निवडणुकीतील निकालांनी वेगवेगळ्या वर्गांमधील व्यावसायिकांनाही संदेश दिला आहे. लोक म्हणतात, आमची वेळ होती तेव्हा आम्ही कृती केली. पण त्याचबरोबर ते न्यायव्यवस्था, ईडी, सीबीआय, एनआयए, ताकदवान नोकरशाही, प्रसारमाध्यमे, बुद्धिवादी विचारवंत आणि अगदी लष्कराला विचारत आहेत, तुमचं काय? तुम्ही तुमचं काम केलंत? आमच्याकडे मतदानाचे शस्त्र होते, आणि आम्ही ते वापरले. आमची वेळ आली तेव्हा आम्ही आमचे कर्तव्य बजावले. तुम्ही तुमचे काम योग्य रीतीने केले का? तुम्ही तुमची साधने नैतिकतेने वापरली का?

लोकशाहीचे दुर्दैव असे, की एकदा मत दिल्यानंतर लोक दुबळे बनतात. त्यांनी दिलेला कौल त्यांच्यापासून हिरावला जातो, तो त्यांच्या नियंत्रणामध्ये राहत नाही. लोकांच्या कल्याणाच्या बुरख्याआड स्वतःचे हित साधणाऱ्या श्रीमंतांकडे स्वतःची शक्ती नसते. म्हणून मग ज्या माणसाला त्याच्या गैरवर्तणुकीकरिता त्यांनी फटकारायला हवे होते, त्याच्या समोर टाटा आणि नारायणमूर्ती लोटांगण घालत आहेत. एवढेच नाही तर सध्याच्या नेतृत्वाने ३०० वर्षात देशाने पाहिले नाही इतके आर्थिक चमत्कार केले असल्याची धडधडीत खोटी प्रशंसा करताना दिसत आहेत.

हे लोक इतर वर्गांनी धैर्य आणि विश्वास राखावा असे सांगत आहेत. त्यांच्या उद्योगांवर विश्वास.

पण राष्ट्रीय सुरक्षेच्या नावावर काश्मीरींचे स्वातंत्र्य लांबणीवर टाकणे योग्य होते का? माजी अर्थमंत्री चिदंबरम यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलले जाणे योग्य होते असे का वाटले? राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीसाठी इतकी घाई का करण्यात आली?

त्यांना सत्याचा का विसर पडला आणि त्यांना सत्तेशी हातमिळवणी करण्यात धन्यता का मानली? हे सर्व काही जनतेकरिता आहे हे ते कसे विसरले? सगळे नियम आणि कायदे हे सर्व माणसांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी असतात, हुकूमशहांची सेवा करण्यासाठी नव्हे. तर मग या कायद्यांचे रक्षक त्यांचे मालक कसे बनले?हे कायदे जनतेच्या विरोधातच कसे आणि का वापरले जाऊ लागले?

आत्ताच्या विधानसभेचे निकाल हे चुकलेल्या मार्गावरून पुन्हा योग्य दिशा पकडली जाण्याचे निर्देशक आहेत. देशाच्या नावावर दिल्या जाणाऱ्या धमक्यांना भीक घालू नका. निदान सामान्य, बहुतांश अशिक्षित असलेल्या मतदात्यांनी तरी दाखवून दिले आहे की ते अतिरेकी राष्ट्रवादाचा सामना करू शकतात.

अगदी उघडपणे मुस्लिम समाजातील लोकांचा द्वेष केला जाण्याच्या या काळात ११ मुस्लिमांना समाजाने निवडून दिले आहे.

“आपापल्या राम किंवा रहीमचे नाव घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे,” सुरेंदर, एक टॅक्सीचालक मला म्हणाला. तो रोहतकजवळच्या त्याच्या गावात मतदान करून परत आला होता. तो गुडगावमध्ये राहतो आणि मुस्लिमांना खुल्या, रिकाम्या जागांमध्ये नमाज पढू दिला जात नाही हे त्याला अजिबात आवडले नव्हते. “ते ती जमीन हडप करत आहेत का? लोकांचा असा अपमान करणे योग्य नाही, पाप आहे,” तो म्हणाला. सुरेंदर सर्वार्थाने हिंदू आहे. त्याची सद्सद्विवेकबुद्धी वाईटाशी लढा देत आहे. पण मग उच्चभ्रू लोकांनी वाईटाबरोबर तडजोड का बरे केली आहे?

निवडणुकीच्या निकालांचे अनेक अर्थ काढले जाऊ शकतात. हो, विरोधी पक्षांनी आपली जबाबदारी घेतलीच पाहिजे. पण आपल्या सर्वांचीही काही भूमिका आहे: स्वतःशी प्रामाणिक राहणे आणि योग्य वेळ कधी येते याची वाट पाहत न बसणे. आपल्याला इतर लोकांना मदत करायची असेल तर काय न्याय्य आहे ते ठरवा, जे योग्य आहे असे आपल्याला वाटते त्याबद्दल बोला आणि लिहा. आपले कर्तव्य आपण बजावले तरच आपण लोकशाही वाचवू शकतो.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0