अहमदाबादेत मुख्य रस्त्यांवर मांसाहार बंदी

अहमदाबादेत मुख्य रस्त्यांवर मांसाहार बंदी

नवी दिल्लीः अहमदाबाद शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर मांसाहार खाद्य पदार्थांची विक्री करणारे सर्व स्टॉल अहमदाबाद महानगर पालिकेने हटवण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी असा निर्णय राजकोट, बडोदा, भावनगर शहरातील पालिकांनी घेतला होता. या निर्णयासोबत अंड्याचे खाद्यपदार्थ विकणार्याही स्टॉलचा समावेश आहे. पालिका प्रशासनाने धार्मिक ठिकाणी, उद्यान, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालये यांच्यापासून १०० मीटर परिसरातीलही मांसाहारी खाद्यपदार्थाचे स्टॉल उठवण्यास सुरूवात केली आहे.

महत्त्वाची बाब अशी या निर्णयापासून सत्ताधारी भाजपने स्वतःला दूर ठेवले आहे. भाजपच्या काही नेत्यांची ही व्यक्तिगत विनंती होती, त्याचा पक्षाशी संबंध नाही, असा पवित्रा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी घेतला आहे. हा निर्णय पूर्ण राज्यात लागू होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी त्यांचे सरकार शाकाहारी व मांसाहारी असा भेदभाव करत नाही. स्टॉलवर विकले जाणारे पदार्थ खाण्यायोग्य असले पाहिजेत. अशा स्टॉलमुळे शहरातील वाहतूक विस्कळीत होत असेल तर शहर प्रशासन हे स्टॉल हटवू शकते. ज्याला मांसाहार करायचा असेल तर तो करू शकतो, आमची त्याला हरकत नाही, असे स्पष्ट केले.

दरम्यान, मांसाहारी खाद्य पदार्थाच्या स्टॉलमुळे लहान मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो, असा दावा अहमदाबाद पालिका प्रशासनाच्या शहर नियोजन समितीचे प्रमुख देवांग दानी यांनी केला आहे.

शहरात सकाळी फिरणारे व धार्मिक स्थळात जाणार्या अनेक ज्येष्ठ व्यक्तींनी मांसाहारी खाद्य पदार्थाच्या स्टॉलने दुर्गंधी पसरते अशा तक्रारी केल्या होत्या, त्याची आपण दखल घेतली असल्याचे देवांग दानी यांचे म्हणणे आहे.

रस्त्यांवरील मांसाहार खाद्य पदार्थाचे स्टॉल हटवण्याचा निर्णय अतिक्रमण विरोधी मोहिमेंतर्गत घेतल्याचे सांगितले जात असले तरी या निर्णयाला पालिकेतील स्थायी समितीची मंजुरीही मिळालेली नाही, अशी माहिती आहे.

काही दिवसांपूर्वी अहमदाबाद शहराची ओळख व परंपरा याचा हवाला देत पालिकेच्या महसूल समितीचे अध्यक्ष जैनिक वकील यांनी मांसाहारी खाद्य विकणार्या गाड्या हटवाव्यात अशी मागणी करणारे पत्र स्थायी समितीला लिहिले होते. त्यानंतर प्रशासनाने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

स्टॉलधारकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया

अहमदाबाद पालिका प्रशासनाच्या या निर्णयावर अनेक स्टॉलधारकांनी आश्चर्य व संताप व्यक्त केला आहे. आमचे खाद्य पदार्थाचे स्टॉल बंद केल्याने आमचे कुटुंब रस्त्यावर आले असून आम्ही आमचे पोट कसे भरणार असा सवाल त्यांनी केला आहे.

एक विक्रेता राकेश याने हॉटेलमध्ये मांसाहार खाद्यविक्री केली जाते, त्याची दुर्गंधी लोकांना येत नाही का, त्यांच्यावर निर्बंध का नाहीत. आमच्यावरच का असा सवाल केला आहे.

सुंदर या विक्रेत्याचा सँडविच तयार करण्याचा स्टॉल आहे. तो स्टॉलही उभा करण्यास पालिकेने मनाई केली आहे. माझ्या स्टॉलवर अंडे, मांसाहार पदार्थ मिळत नाही पण माझ्यावर ही कारवाई का असा प्रश्न त्याने केला आहे.

मूळ बातमी

COMMENTS