बुलेट ट्रेनसाठी ५४००० तिवरांची कत्तल

बुलेट ट्रेनसाठी ५४००० तिवरांची कत्तल

सरकारच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ठाणे पालघरच्या पर्यावरणावर कुऱ्हाड चालवली जाणार आहे.

एचके आर्ट्स कॉलेजच्या प्राचार्यांनी राजीनामा का दिला?
अहमदाबादेत मुख्य रस्त्यांवर मांसाहार बंदी
गुजरातमध्ये २ दलित युवकांना बेदम मारहाण

मुंबई: केंद्र व राज्य सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी १३.३६ हेक्टर जमिनीवरील सुमारे ५३ हजार ४६७ तिवरांची (मँग्रुव्ह) कत्तल केली जाणार आहे. तिवरांचा हा पट्‌टा ठाणे व पालघर जिल्ह्यातून जातो. महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेलगत १८.९२ हेक्टर जमिनीवरील तिवरांचे जंगल तोडण्याचा मूळ प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला पूर्ण मंजुरी दिल्यास एकूण १ लाख ५० हजार ७५२ तिवरांची झाडे तोडावी लागणार आहेत.

सोमवारी राज्य परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, ज्या जमिनीवरील तिवरांची जंगले तोडण्यात येणार आहे त्यापेक्षा पाचपट झाडे अन्यत्र लावण्यात येतील व स्थानिकांना झालेली नुकसानभरपाई दिली जाईल.

दरम्यान, ५४ हजार तिवरांच्या कत्तलीला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने तत्वत: हिरवा कंदील दाखवला आहे.

मुबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गासाठी सरकारने १,३७९ हेक्टर जमीन संपादित केली असून ७२४.१३ हेक्टर जमीन गुजरातमधील खासगी मालकीची तर २७०.६५ हेक्टर महाराष्ट्रातील आहे. सध्या पालघर जिल्ह्यातील १८८ हेक्टर खासगी जमीन संपादित करण्याचे काम सुरू असून २.९५ हेक्टर जमीन सरकारने विकत घेतली आहे. यामुळे ३५०० नागरिकांना त्याचे नुकसान होणार आहे.

सरकारने ठाणे जिल्ह्यातील ६,५८० शेतकऱ्यांची ८४.८१ हेक्टर जमीन संपादित केली असून मुंबईतील विक्रोळी भागातील ३९.२५२ चौ.मी. जमीन सरकार विकत घेणार आहे. या जमिनीची किंमत १.१ लाख कोटी रुपये आहे, असे रावते म्हणाले.

तिवरांची जंगले पर्यावरण संरक्षक

समुद्र व खाडी लगतच्या तिवरांच्या जंगलांमुळे पूर येत नाही. म्हणून मुंबईला पुराचा धोका नाही. तिवरांच्या जंगलांमुळे पाण्याला रोखले जाते. जमिनीची धूप कमी होते. तिवराकडून वातावरणातला कार्बन डाय ऑक्साइड पाचपटीने शोषला जातो. एवढे शोषण अन्य जंगलांकडूनही होत नाही. त्यामुळे तिवर हा जागतिक हवामान बदलातील एक महत्त्वाचा घटक आहे. तिवरांची कत्तल जेवढी अधिक होईल तेवढा त्याचा परिणाम हवामान बदलावर होतो असे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग हा ५०८ किमीचा असून महाराष्ट्रात हा मार्ग १५५ किमीचा आहे. त्यामुळे या मार्गावरील ३२ हेक्टर तिवरांच्या जंगलासोबत १३१ हेक्टर जंगल बाधित होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0