राजकारणासोबत, राजकारणानादी नव्हे.
शेती आणि शेतकरी हितासाठी झटणारे अजित नरदे यांचं जयसिंगपूर या त्यांच्याच रहात्या गावी निघन झालं. एका मोटार सायकलनं त्याना उडवलं.
त्यांच्या निधनाची बातमी कळल्यावर फार लोक स्तब्ध झाले. ज्या दिवशी त्यांना मोटारसायकलनं उडवलं त्याच दिवशी त्यांचं शेती प्रश्नावर मुंबईत भाषण व्हायचं होतं.
नरदे यांना ओळखणाऱ्या माणसांकडं त्यांचं वर्णन करण्याची आवश्यकता नाही. कारण संपर्कात एकादं माणूस आलं की नरदे त्या माणसाला सोडत नसत, मागं लागून त्या माणसाला कामाला लावत, त्यांच्यासोबत काम करत. काहीशा अनाकर्षक पद्धतीनं बोलत बोलत ते त्यांचा विषय मांडत. आपणहून ते लोकांकडं जात, कोणाच्या आमंत्रणाची वाट पहात नसत. त्यांनी कधी कोणाकडं काही मागितलं नाही, मागितलं असेल तर एकच म्हणजे त्यांच्या कामात सहभाग.
नरदे शेती स्वतः करत असत. शेतीत येणारे प्रश्न समजून घेऊन त्यातून मार्ग काढण्याची त्यांची खटपट होती. त्यासाठीच ते अभ्यास करत, बोलत, लिहत.
शेती प्रश्नावर लोकांना संघटित करायचं म्हणजे बोलावं लागतंच. नरदे बोलत, पण ते पुढाऱ्यासारखं नसे. ते बहुतांशी अनाकर्षक असे, कर्कश्श नसे. सभा हा त्यांचा विषय नव्हता, एक दोघांशी किंवा छोट्या गटाशी बोलायला त्याना आवडे, नव्हे तोच त्यांचा स्वभाव होता. त्यामुळं शेतकरी संघटनेत ते खंदे कार्यकर्ते झाले पण राजू शेट्टी झाले नाहीत.
नरदे पेपरात लिहीत. अगदी सुरवातीच्या काळात त्यांनी दिनांक साप्ताहिकात लेख लिहिले. लेखामधे तत्कालीन राजकारणातले पुढारी, रत्नाप्पा कुंभार, यांच्या भ्रष्ट सहकारी वागण्यावर हल्ला असे. त्या काळातले पुढारी त्यांच्यावर रागावत. त्यांचे लेख वाचणाऱ्या मुंबईकरांना लेख वाचून मौज वाटे पण कोल्हापूर-सांगलीतल्या वाचकांना त्यांचा खूप राग येत असे.
लिखाणाचा रोख राजकारणापेक्षा शेतीची दैना या विषयावर असे. त्या काळातला सहकार हा राजकीय भ्रष्ट व्यवहार होता, त्यात शेतीचा विचार नसे, त्यात शेती आणि शेतकऱ्याचं शोषण होत असे, असं ते लिहीत. राजकारणात त्यांनी खूप शत्रू ओढवून घेतले. चिडलेली माणसं कोण आहे हा माणूस अशा रागात नरदेना भेटत तेव्हां थंड होत. इतका अनाग्रही आणि राजकीय स्वार्थ नसलेला माणूस त्यांनी पाहिलेला नसे. राजकीय स्मार्टपणा त्यांच्या दिसण्यावागण्यात नव्हता, त्यांचा चष्मा आणि शर्ट उपयोगापुरताच असे, त्यात लोकांना आकर्षून घेण्यासारखं काहीही नसे.
साखर डायरी त्यांनी काढली. त्या काळात डायरी हा एक लोकांना आवडणारा फॉर्म होता. लोकं डायरी लिहीत नसत पण एक डायरी टेबलावर असे असं लोकांना वाटे. त्यामुळं राजकीय पक्षही आपल्या नावानं डायऱ्या काढत. नरदे यांनी काढलेल्या डायरीत साखर व्यवसायातली त्या वर्षापर्यंतची अद्यावत माहिती असे. पत्रकार जे करत नाहीत ते त्यांना करायला लावण्याची, म्हणजे त्याना वाचायला लावण्याची, खटपट या डायरीवाटे, नरदे करत होते. डायरीचं संपादन ते स्वतः करत असत.
पेपरात वेळोवेळी लेख लिहिणं, डायरी संपादित करणं, लोकांना व्यक्तिगतरीत्या भेटून शेतीचा प्रश्न समजून सांगणं अशी अव्याहत खटपट करणारा माणूस शरद जोशींच्या संपर्कात न येणं असंभव. आपणहून नरदे जोशींकडं पोचले, चळवळीतले कार्यकर्ते म्हणून. चळवळीतला कार्यकर्ता पण तरी स्वयंप्रज्ञेनं आपलं म्हणणं लोकांना सांगत ते फिरू लागले. शेती प्रश्नाची आर्थिक बाजू या निमित्तानं त्यांनी त्यांच्या मनी पक्की केली.
शेतीला सरकारी कचाट्यातून म्हणजे समाजवादातून सोडवलं पाहिजे या मताला ते आले आणि त्यांनी मुक्त बाजारपेठेचा विषय मांडायला सुरवात केली. खरं म्हणजे नरदे मुळातले समाजवादी, तो विचार त्यांना घरी लहानपणापासून कानावर पडत असे. पण शेतीचा अभ्यास करता करता त्याना समाजवादाचा फोलपणा जाणवला आणि ते मुक्त बाजारवादी झाले.
ते ज्या लोकांशी, शेतकऱ्यांशी बोलत त्याना त्यांची शेतीविषयीची तळमळ आणि विचार कळे पण ही समाजवाद आणि बाजारवाद नावाची जड भानगड त्यांच्या डोक्यापलीकडची असे. नरदे ती भानगड समजून देण्याचा आटोकाट प्रयत्न करत. तसं पाहिलं तर समाजवाद-मुक्त बाजार हे विचार अजून भल्याभल्यांनाही नीटसे उमगललेले नाहीत. जगातली परिस्थिती इतकी वेगानं बदलतेय आणि खूप नवनवी माहिती समोर येतेय की कोणतीही राजकीय विचारसरणी त्या वास्तवाचा नीट अर्थ सांगायला असमर्थ ठरते आहे. नरदे यांना याची जाणीव होती आणि तरीही ते त्यांच्या परीनं मुक्त बाजार आणि शेती या विषयावर अभ्यास वर्ग आयोजित करत.
कधी कधी या अभ्यास वर्गात बोलणारी माणसं इतकं कठीण आणि किचकट बोलत की जांभया देता देता लोकांचे जबडे फाटत मेंदू थिजत.पण नरदे अभ्यास वर्ग बंद करत नसत.
मुक्त बाजार, समाजवादी विचारांचा फोलपणा सांगण्यासाठीच त्यांनी लवासा या वादग्रस्त प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी सभा घेतल्या, अभ्यासवर्ग घेतले. लोकांच्या शिव्या खाल्ल्या. लवासाचं अर्थकारण, राजकारण, लवासावर त्यांच्या पूर्वाश्रमीच्या समाजवाद्यांनी उठवलेली झोड याबद्दल ते चिंतीत नव्हते. आर्थिक व्यवहार खाजगी क्षेत्रात झाले पाहिजेत, शहर निर्मिती खाजगी कंपनीनं केली पाहिजे हा त्यांचा विचार होता. ना ते लवासाच्या मालकांशी संबंधित होते ना शरद पवारांशी. स्वतंत्रपणे त्यांनी लवासाचा विचार लोकांसमोर मांडायची खटपट केली आणि लोकांचा रोष ओढवून घेतला.
शेतीच्या सर्व अंगांमधे रस असल्यानं नरदे प्रयोग परिवाराच्या दाभोलकरांकडं पोचले. दाभोलकर शेतीचं विज्ञान सांगत. ज्ञानाचं विरहस्यीकरण, डीमिस्टिफिकेशन हा दाभोलकरांचा विषय होता. शेण आणि गोमूत्र यामधे ज्या रासायनीक गोष्टी असतात त्याच रासायनिक खतांमधे असतात, जैविक शेती आणि रासायनीक शेती असा फरक करणं बरोबर नाही, रासायनिक शेती काळजीपूर्वक केली, योग्य त्या नैसर्गिक वेळेवर आणि अगदी काटेकोर योग्य प्रमाणात रासायनीक खतं दिली तर त्यातून उत्तम उत्पादन निघेल असं ते सांगत. त्यांचा हा संदेश द्राक्ष शेतकऱ्यांनी अमलात आणला आणि ते श्रीमंत झाले. ज्वारी पिकवणाऱ्यांनी तो अमलात आणला नाही आणि ते गरीब राहिले.
दाभोलकर वैज्ञानिक शेती करत असताना उत्साहानं अनेक भरड आर्थिक विधानं करत. अर्थशास्त्र आणि अर्थव्यवहार हे दाभोलकरांचं क्षेत्रं नसल्यानं त्यांची विधानं कच्ची असत. त्यावर नरदे रागावत. दाभोलकर जैवीक शेतीची भलामण करून शेती आणि शेतकऱ्यांचं नुकसान करत आहेत असं नरदे मांडत. जैवीक शेती हे प्रकरण आर्थिक दृष्ट्या अगदीच तोट्याचं आहे हे नरदे अभ्यासपूर्वक मांडत. ऑर्गॅनिक शेती ही फॅशन आहे, फॅशनमधे एकादा शर्ट एक लाख रुपयांना विकला जाऊ शकतो पण तसे शर्ट उत्पादून उद्योजकाचा चरितार्थ चालू शकत नाही असं नरदे सांगत.
हिंदुत्व परिवारातल्या संघटना, जैविक शेती म्हणजे शेण आणि गोमुत्र, या पवित्र गोष्टीकडं आकर्षित झाले होते. त्यांनी रासायनिक खताना विरोध सुरु केला होता, संकरीत बियाणांना विरोध सुरु केला होता. नरदे त्याना भिडले. त्यांचे अभ्यासवर्ग घेऊ लागले. जगाची वाढती लोकसंख्या आणि शेतकऱ्याचं जगणं या दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर रासायनिक खतं आणि संकरीत बियाणं अत्यावश्यक आहे असं ते सांगत होते. कापसाच्या संकरीत वाणामुळं भारतातल्या शेतीचं आणि शेतकऱ्याचं कसं कल्याण झालंय ते नरदे उदाहरणं देऊन सांगत होते.
परंतू हिंदुत्व परिवाराचा अजेंडाच वेगळा होता. राजकीय कारणांसाठी त्यांचा परदेशी खत निर्मिती करणाऱ्यांना विरोध होता, त्यांचं गायीचं प्रेम राजकीय होतं, वैज्ञानिक नव्हतं. नरदे हिंदुत्व परिवाराच्या राजकीय विरोधात नव्हते. हिंदुत्ववाल्यांचं राज्य येवो की आणखी कोणाचं याच्याशी त्याना देणंघेणं नव्हतं. त्यांना चिंता होती ती शेती आणि शेतकऱ्याची. परिणाम असा की हिदुत्ववादीही त्यांच्यावर नाराज झाले.
समाजवादी, काँग्रेस, राजू शेट्टींची शेतकरी संघटना (जोशींची नव्हे), हिंदुत्ववादी संघटना अशी सगळीच राजकीय मंडळी त्यांच्यापासून फटकून राहिली.
शेती आणि शेतकरी मुक्त असला पाहिजे. औद्योगीक उत्पादक आणि बाबू वर्ग यांना जे स्वातंत्र्य असतं ते शेतकऱ्याना असलं पाहिेजे असं त्यांचं गणित होतं. अर्थव्यवस्था मोकळी करायची असेल तर शेवटी निर्णय सरकारच घेणार म्हटल्यावर राजकीय पक्षांना भूमिका पटवून दिली पाहिजे असं नरदे यांचं म्हणणं होतं. त्यासाठीच ते चळवळ, संघर्ष, अभ्यासवर्ग, पत्रकारी हे उद्योग करत होते. राजकीय पक्षांशी संबंध असला पाहिजे पण त्यांच्या नादी लागता कामा नये असं त्यांचं धोरण होतं. त्या धोरणानुसारच ते वागत राहिले.
इतकी वैचारिक स्पष्टता आणि विचारांशी सुसंगत जीवन ही गोष्ट विरळीच.
निळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेत.
COMMENTS