व्हिलेज डायरी – सुरवात….

व्हिलेज डायरी – सुरवात….

ऑन ए सिरीयस नोट. शेतकरी आत्महत्या हा विषय थट्टेचा झालेला आहे, कर्जमाफी हा कुचेष्टेचा. कर्जमाफी शब्द फसवा आहे, चुकीचा आहे. पण त्यामुळे शेतकरी आणि शे

‘प्रधानमंत्री मातृवंदना योजने’चा फज्जा !
मुंबईतील सागरी किनारपट्टीचा रस्ता – एक घोडचूक
चिनी विकासाचे तैवान मॉडेल

ऑन ए सिरीयस नोट.

शेतकरी आत्महत्या हा विषय थट्टेचा झालेला आहे, कर्जमाफी हा कुचेष्टेचा. कर्जमाफी शब्द फसवा आहे, चुकीचा आहे. पण त्यामुळे शेतकरी आणि शेती दोन्ही बदनाम झालेलं आहे. आज लोक लिहितायत, उघड बोलतायत की शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करतो. त्यावर हसून लोटपोट होऊन प्रतिक्रिया येतात. कोणाला जाब विचारायचा अधिकार नाही, माझा किंवा कोणाचाच. पण अजून तरी कुठल्या न्यायालयानं शेतकरी वर्गाला गुन्हेगार ठरवलं नाहीये, निदान तेवढ्याचा मान ठेवून तरी आरोपपत्र शेतकरी वर्गावर ठेवलं जाऊ नये एवढी छोटीशी अपेक्षा. न्यायालयानं ठरवलं शेतकऱ्याला गुन्हेगार, तर आमच्या फडात पेटवा आम्हाला. तोंडातून आवाज न काढता राख होऊ; पण निदान आमचे कान-डोळे-बुद्धी पूर्ण सुन्न होईपर्यंत तरी सबुरी धरा !

आत्महत्या ‘चल, करून बघू’ म्हणून कोणीच कधी करत नाही. त्यासाठी पराकोटीची उद्विग्नता भरलेली असते. उत्तरं संपलेली असतात. स्वतःला गुन्हेगार म्हणून मान्य केलेलं असतं आणि मग त्यातून ती स्वतःला केलेली शिक्षा असते. पोरांचं-बापाचं-बायकोचं-आईचं-बहिणीचं-गुरांचं पोट भरायला अपयशी ठरल्यानंतर त्या पोटांमधून निघणाऱ्या कळा ह्या त्याच्या रोगर पिल्या नंतरच्या किंवा फास घेतल्या नंतरच्या कळांपेक्षा जास्त असतात. त्यामुळं त्या सहन न होऊन तो सोपा मार्ग पकडतो. त्याला सोपा म्हणावं की नाही माहीत नाही.

टॉम टीक्वेरच्या ‘क्लावूड ॲटलास’ मध्ये डेव्हिड मिचेल ची एक क्योट आहे, “आत्महत्या हे नक्कीच फार विचाराअंती उचललेलं पाऊल आहे. लोक म्हणतात हा स्वार्थी निर्णय आहे, धर्मगुरू वगैरे म्हणतात हा भित्रा मार्ग आहे, कदाचित ती सफरिंग-त्रास यातना याबद्दल नसणाऱ्या सहनुभूती मुळे!आत्महत्येला भयानक हिम्मत लागते.”

जगण्याचा मार्ग मरण्यापेक्षा कठीण झाला की आत्महत्या होते. ‘आत्महत्या भ्याड आहे’ म्हणणाऱ्यांनी करून दाखवावी.

दारू पिणं हे काही टॅब्यु नाही; पण तुम्ही दोन अंकी किमतीची पिता की तीन-चार-पाच वगैरे अंकी किंमतीची, त्यावरून त्याची इज्जत ठरते. दोन अंकीवाला बेवडा ठरतो तर इतर वर्ग चिअर्स म्हणणाऱ्या पार्टीतला. मी कधी शिवलं नाही यातल्या कुठल्याच प्रकाराला, त्यामुळं त्यावर मत देऊ शकत नाही; पण जे काबाड कष्ट करणारे पिताना बघतो ते त्यांच्या शरीर आणि मेंदूला हलकं करण्यासाठी असतं. कदाचित भावना शिथिल झाल्यानंतर येत असेल धाडस आत्महत्येचं; पण संपूर्ण शुद्धीत जीव देणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. त्यातून ती भावना किती तीव्र आहे ते समजू शकतं. अर्थात समजून घ्यायचं म्हंटलं तर.

माझ्यातली उद्विग्नता बाहेर काढायला मी लिहितो. ती आग पोटात जिरवायला मी बुद्धाच्या अनकॉन्सिअसपर्यंत पोहोचलेलो नाही किंवा तुक्याच्या अफाट तत्वज्ञानाच्या सोप्या उकलीपर्यंत गेलेलो नाही. त्यामुळं ती तडफड बाहेर काढायला आणि त्या अदिम तडफडीतून रोगर ते दोरखंड हा मार्ग माझ्यापासून दूर करण्यासाठी शब्दांतून ओकतो.

...

“१६ पायलीचं पोतं (११०-११५ किलो) क्विंटलच्या भावात विकत घेऊनही लोकं वर दोन शेर घालायला लावतात.
आई ते हसत हसत घालते.
गव्हाला कापताना, पेंढ्या बांधताना जेवढा घाम गाळला तेवढ्या लिटरचं फिल्टरचं पाणीही त्यातून येत नाही.
ती हसत हसत त्यांनी आणलेला, आतून ठोकलेला शेर दोन्ही हातांची ओंजळ बाजूला उदंड वाहणारी धरत माप घालते.
१६ पायल्याच्या मापात पायलीभर जास्तच असतं.
पोटालाच खाणारायत की असं उत्तर असतं रडकुंडीला आलेल्या माझं तोंड बघितल्यावर तिचं.
पोती नेताना गंडवून जास्त घेतल्याचं समाधान त्यांच्या तोंडावर असतं.
पैसे देताना नोटेत एखादी नोट तुकडा पडलेली घालून त्यांनी बोनसही मिळवलेला असतो.
मी त्या संध्याकाळी पेटवून दिलंय गव्हाचं उरलेलं भुस्काट त्या सर्वांच्या नावानं पाडव्याला शिमगा करत…”

“मशीनवाला फायद्यात
व्यापारी फायद्यात
बियाणंवाला फायद्यात
खतंवाला फायद्यात
मजुरंवाली फायद्यात
खाणारा आख्खा उर्वरित वर्ग फायद्यात
आम्ही शेतकरी तेवढे नुसकानीत !!
साला लै मोठा झोलाय हा..
१०-१० दिवस चेक मिळायची आणि २०-२० दिवस तो वटायची वाट बघायची.
हे वरचे सगळे आधी पैसे घेऊन नामानिराळे.
यांना पैसे द्यायला काढलेल्या पैशाचं व्याज द्यायचं शिल्लकच राहतं शेवटी मालाची पट्टी आल्यावर !
खाणारी तोंड कमी झाल्यावर हे परवडेल हा प्रतिवाद भरल्या पोटी भरल्या खिशातनं येतो.
शेवटी सगळेच भविष्यकाळात बोलतात, आम्ही झगडतोय वर्तमानातलं आमचं अस्तित्व टिकवायला.
झगडत होतो आणि झगडत राहू.
तुमचं भविष्य आमच्या वर्तमानाइतकं विद्रूप होईपर्यंत…”

१००-११०-१५० % पाऊस पडला तरीही पिकाला भाव मिळाल्याशिवाय वर्षभर जगता येईल एवढं मिळत नसतं. ९६% पाऊस पडणार म्हणल्यावर लोकं म्हणायला लागले शेतकरी सुखी झाला.
मग तो पुन्हा आळशी होईल, त्यामुळं त्यानं सुखी होऊ नये. त्याला फटके द्यावेत रोज ९६.
फक्त पाण्यावर शेती होते का भाऊ?
पिकवलेलं मातीमोल दरात या वर्षी गेलं सलग तीन वर्षाच्या दुष्काळानंतर भरपूर उत्पन्न येऊनही.
९६% पाऊस पडणार आहे, नाचा.
शेतकरी सुखी होणाराय ७० वर्षानंतर, नाचा.
९६% पाऊस पिऊन शेतकरी पाण्यावर जगणार आहे; मेला तर तो हरामी आहे.
९६% पाऊस पडणार आहे पुढे आणि तरीही तो आज परवडलं नाही उत्पन्न म्हणतो म्हणजे ?
९६% पाऊस पडणार आहे ना, कशाला पाहिजे भाव ? पाऊस दिला की. बस नाही का तो ?
पोटात-अंगावर-पाठीवर-ताटात-पोराच्या दप्तरात- कर्जाच्या हफ्त्यात- लाईटबिलाच्या बदल्यात- कॉलेजच्या फी मधी- हॉस्पिटलच्या खर्चात- रोजच्या तेलमीठगॅसस्टोसाठी- ट्रॅक्टरवाल्याच्या भाड्यापासून ते मजुरांच्या मजुरीपर्यंत- बीबियाणंखतं औषधंफवारण्या पाईपंमोटाराऔजारं खुरपी ते न्हाव्याच्या दुकानात- किराण्याच्या बदल्यात सगळीकडे ९६% पाऊस वाटा.
शेतकऱ्यांनो, भाव मागितलात पिकाला तर तुम्ही नालायक आहात.

शेतकरी माणूस म्हणून मान्यता गमावून बसला आहे हे समजतंय मला.
पण श्वास चालू आहे, आम्ही बोलतो,
काम करतो- रडतो- ओरडतो- तडपडतो- धडपडतो,
बाप-भाऊ-पोराला अग्नी देतो किंवा मातीत गाडतो अश्रू गिळून.
म्हणजे आम्ही खरंच माणसं आहोत अजून.
I know it’s not acceptable for you and society but we are still humans. (or we are also)
मी कमकुवत आहे, थट्टा करणाऱ्या विचार-व्यक्ती-प्रवृत्तींना उत्तर देण्याची ताकद माझ्यात नाही.
आणि मी का द्यावं उत्तर?
लढायला माझी फार युद्धं रखडलीयत, या दलिंदर विचारांच्या डोसात मला अजिबात रस नाही.
वाचवतं त्याने वाचावं, नाही वाचवत त्यांनी जावं.
मी लेखक नाही ना विचारवंत ना आर्टिस्ट ना कोणी और.
मी फक्त शेतकरी आहे.
निवेदन समाप्त.

...

“मातीवर चित्रं काढणारा
तो मीच वावरात राबणारा
कैक हजार वर्षांपासून..
भिरभिरणाऱ्या गिधाडाच्या भुकेल्या नजरेतला घास
वाळलेल्या शेवऱ्या येली बाभळीचा इतिहास
तो मीच रोगरची कोल्डड्रिंक उध्वस्त शिवारात पिणारा
कैक दशकं बदलणाऱ्या सरकारांपासून…
धोतरातला-इजारीतला-पटक्या-टोपी अन आता पॅंटीतला
ज्ञान्याचा-नाम्याचा-एकनाथ-तुक्याचा-सोपान काकाचा अन निवृत्तीनाथाचा
तो मीच कैक मैल पाय तोडत ईट्टलापुढं शरण येणारा
अट्टाईस युगांपासून…
यार्डातला यष्टीतला पिकाप ट्रॅक्टरमधला
तलाठी-मॅनेजर-सावकार अन आडत्याचं पाय धरलेला
आमदार खासदाराच्या आश्वासनात बळी गेल्याला
उजनी-माळढोक-एमआयडीसी अन माणसं समद्यासाठी जमीन सोडल्याला
आरं तो मीच अवकाळीला पुरून नुसकान गिळुन उपाशी राहून तुमची पोटं भरणारा
तुमच्या आत्म्याला ईचारा किती वर्षापासून…
लिहू द्या मला माझी कथा
मिटण्याआधी लिपी अक्षरं, मोडण्याआधी प्रथा…”

 

आकाश शिवदास चटके सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकरी आहेत. लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0