अल-काइदाचा प्रमुख अल-जवाहिरी ठार

अल-काइदाचा प्रमुख अल-जवाहिरी ठार

वॉशिंग्टनः अल-काइदा या दहशतवादी संघटनेचा एक प्रमुख अयमान अल-जवाहिरी शनिवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अमेरिकेच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ठार झाला. जवाहिरी हा २००१ साली अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर इमारतीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागचा एक महत्त्वाचा सूत्रधार होता. २०११मध्ये अमेरिकेच्या नेवी सिल्स या विशेष लष्करी कमांडो पथकाने अल-काइदा संस्थापक ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानात अबोटाबाद येथे जाऊन ठार मारले होते, त्यानंतरची जवाहिरीला टिपण्याची ही सर्वात महत्त्वाची घटना आहे. जवाहिरीवर अडीच कोटी डॉलर रकमेचे बक्षिस अमेरिकेने लावले होते.

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी सोमवारी व्हाइट हाउसमध्ये जनतेला संबोधताना शनिवारी जवाहिरीला काबूलस्थित त्याच्या घरातच ठार मारल्याचे सांगितले. जवाहिरीला ठार मारल्याने न्याय मिळाला, आता जगाला दहशतवादाचा धोका नाही असे ते म्हणाले.

७१ वर्षीय जवाहिरी हा इजिप्तचा नागरिक होता. तो ओसामा बिन लादेन याच्या संपर्कात आला व त्यानंतर अल-काइदा विस्तार वाढवण्यात त्याचा हातभार मोठा होता. २०११ साली लादेन मारला गेल्यानंतर जवाहिरीकडे अल-काइदाची सूत्रे होती. २०१४मध्ये जवाहिरीने अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश येथील आपल्या साथीदारांना हाताशी घेऊन भारतीय उपखंडात अल-कायदा गटाची स्थापना केली होती. भारतीय उपखंडात त्याला जिहादच्या माध्यमातून इस्लामी राजवट आणायची होती.

२००० मध्ये एडनच्या आखात अमेरिकेची युद्धनौका यूएसए कोलवर आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याचा सूत्रधार जवाहिरी होता. या हल्ल्यात अमेरिकेचे १७ नौसैनिक मारले गेले होते. त्या आधी १९९८मध्ये केनया व टांझानिया येथील अमेरिकी वकिलातीवर हल्ला करण्याच्या कटामागे जवाहिरी होता.

जवाहिरी तरुण वयापासून इजिप्तमधील कट्टर इस्लामी गटांसोबत काम करत होता. इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादात यांच्या हत्येनंतर इजिप्तमध्ये इस्लामी राजवट आणण्याच्या गटाशी त्याचे निकटचे संबंध होते.

जवाहिरी हा इजिप्तमधील एका प्रतिष्ठित घरातलाही होता. त्याचे आजोबा रबिया अल-जवाहिरी हे कैरोच्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या अल-अझहर विद्यापीठ इमाम होते. जवाहिरीचे एक नातेवाईक अब्देल रहमान आझम अरब लीगमध्ये सचिवपदावर कार्यरत होते.

गेले काही महिने जवाहिरी काबूलमध्ये आपल्या कुटुंबाला भेटायला आला असल्याची माहिती अमेरिकेच्या गुप्तचर खात्याला मिळाली होती. त्यानुसार त्याच्यावर देखरेख चालू झाली होती. शनिवारी तो जवाहिरी आपल्या घराच्या बाल्कनीत आला तेव्हा त्याच्यावर ड्रोनद्वारे एक क्षेपणास्त्र डागण्यात आले. त्यात तो जागीच ठार झाला. या हल्ल्यावेळी जवाहिरी याच्या कुटुंबात अन्य सदस्यही उपस्थित होते पण त्यांना कोणतीही इजा झाली नसल्याचे अमेरिकेच्या लष्करी सूत्रांचा दावा आहे.

अमेरिकेच्या हल्ल्याचा तालिबानकडून निषेध

जवाहिरीच्या घरावर हल्ला करून त्याला ठार मारल्यावरून अफगाणिस्तानातील तालिबान राजवट व अमेरिका यांच्यात तणाव निर्माण झाला. अमेरिकेने असा हल्ला करून आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग केल्याचा आरोप तालिबानने केला. गेले २० वर्षे अमेरिकेकडून अफगाणिस्तानच्या भूभाग हल्ले केले जात आहेत, हा अफगाणिस्तानच्या हिताविरोधात असल्याचा आरोपही तालिबानने केला.

मूळ बातमी

COMMENTS