भारतीय सांस्कृतिक परिघात भीमगीते या नवीन गीतप्रकाराची सुरुवात झाली. दलितांच्या जीवनात लोककला ही परंपरेने आलेली होतीच मात्र त्याला स्वातंत्र्यानंतर दलित नवस्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचं बळ मिळालं आणि नवीन सांस्कृतिक चळवळ सुरू झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती या कोविडच्या संसर्गजन्य काळात आपण साजरी करत आहोत. दलित बहुजन जनसमुदाय जो मूलभूत हक्क आणि अधिकारांपासून हजारो वर्ष दूर ठेवला गेला होता. त्यांना आता त्यांची हक्क अधिकार मिळाले आणि म्हणून ते लाखोंच्या संख्येनं ‘भीम जयंती’ वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी करत असतात.
बाबासाहेबांप्रती आभार प्रकट करण्याच्या हेतूने अभिवादन करण्यासाठी लाखोंचे जत्थे ठिकठिकाणच्या बाबासाहेबांच्या प्रतिमेला आणि पुतळ्यांना पुष्प अर्पण करतात. महत्त्वपूर्ण गोष्ट ही आहे, की आंबेडकरी चळवळ ही केवळ राजकीय नाही, ते ती त्याहून अधिक शक्तिशाली, परिणामकारक आणि परिवर्तनवादी ही सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक आहे. बाबासाहेब एक माणूस किती लोकांपर्यंत आणि कसा पोचला असता? त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर गाव खेड्यातल्या वस्ती तांड्यातल्या अडाणी लोकांना बाबासाहेब कसे कळणार होते. वृत्तपत्र हे एक माध्यम आहे, मात्र दलित साक्षरतेच्या मानाने किती लोक वाचून विचार समजून घेतील हा प्रश्न होताच. आणि म्हणून भीम गीतांना सुरुवात झाली. गावो गावी एक एक भजनी मंडळ तयार झाली आणि जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रबोधनात्मक वैचारिक मंथन म्हणून गाऊ लागली, नवं जीवनावर लिहू लागली, अनेक गायक, गीतकार, संगीतकार, प्रभोधनकार, शाहिरी जलसेकार तयार झाले. आणि भारतीय सांस्कृतिक परिघात भीम गीते या नवीन गीतप्रकाराची सुरुवात झाली. दलितांच्या जीवनात लोककला ही परंपरेने आलेली होतीच मात्र त्याला स्वातंत्र्यानंतर दलित नवस्वातंत्र्यच आणि स्वाभिमानाच बळ मिळालं आणि नवीन सांस्कृतिक चळवळ सुरू झाली. प्रल्हाद शिंदे, विठ्ठल शिंदे, विठ्ठल उमप, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, विष्णू शिंदे, प्रकाश पाठणकर ही अस्सल लोककलेचा बाज असलेली मंडळी स्वयंस्फूर्तीने भीम गीते गाऊ लागली. वामन दादा, प्रताप सिंग, आणि अनेक दलित गीतकारांनी भीमगीते लिहिली आहेत. या पहिल्या पिढीतील कलाकारांनी आपल्या वेदना, पिळवणूक, कष्ट, अस्पृश्यता, भेदभाव, अन्याय, अत्याचार आपल्या गीतातून प्रकर्षाने, निर्भीडपणे व्यक्त केला आहे. बाबासाहेबांचे विचार या भीमगीतांच्या माध्यमातून ऐकून जागृत झालेली आणि पोसलेली एक पिढी तयार झाली आहे. जी आज डीजेच्या गाण्यावर थिरकत आहे. ज्या पद्धतीने आंबेडकरी विचार जनमानसात रुजविण्याचे काम वक्ते, अभ्यासक, विचारवंत, साहित्यिकांनी आपापल्या परीने केले, अगदी तसेच किंबहुना त्याहून जास्त भीम शाहिरांनी, भीमगीतांनी, नोंद घेण्याइतपत भीम जागृती केली आहे. भीमगीतांची महत्त्वपूर्ण खासियत ही की, ते केवळ एका गीत प्रकारात अडकले नाहीत. सुगम गीत प्रकारात शिंदे घराणं प्रसिद्ध आहे, प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, विठ्ठल उमप, नंदेश उमप, विष्णू शिंदे, पुष्म देवी, आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे, अनिरुद्ध वनकर, राहुल साठे, शीतल साठे, अशोक निकाळजे आदींचे योगदान अनन्यसाधारण आहे.
बाबासाहेबांचा असा कोणताही जीवन प्रसंग नाही की जो भीमगीतात व्यक्त झाला नाही. माता रमाई, भिमाई, पिता रामजी यांचे आभार भीमगीतात आले आहेत. बाबासाहेबांच्या प्रत्येक कठीण प्रसंगात ते कसे धीराने झुंजले, सत्याग्रही राहून लढले, कसे विजयी होत राहिले, किती अभ्यास केला, रमाईचे कष्ट, रामजी बाबाची अभिलाषा, आणि भीम कसा झाला भारताचा घटनाकार. आंबेडकरी गीतात तत्कालीन राजकारण आणि समाजकारण अगदी तटस्थतेने पाहायला मिळते, महात्मा गांधी आणि नेहरू, कस्तुरबा गांधी, जिना आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांची नावे संदर्भाने येतात. रवीश कुमार यांनी शाहीर संभाजी भगतांची मुलाखत घेत असता, आपलं मत व्यक्त केलं होत. ‘ज्याप्रमाणे भीमगीते मानव मुक्तीचा मोकळा श्वास घ्यायला शिकवतात, त्याप्रमाणेच ते बाबासाहेबांप्रती आभार प्रकट करतात. एक प्रकारचा भीमगीतांनी संगीत क्षेत्रात ‘आभार रस’ निर्माण केला आहे. आंबेडकरी प्रबोधनात्मक गीतात समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता ही मूल्ये ठिकठिकाणी जाणवतात, स्वाभिमान, अभिमान, जाणीव, जागृती, विद्या, करुणा ही जीवन मूल्ये अंगिकारायला शिकवतात. तर गुलामी, सलामी, मुजरे, चाखरी सोडायला प्रवृत्त करतात. आंबेडकरी कलावंतांची ही झुंड आत्ता काउंटर कल्चर प्रभावशाली आणि परिणामकारकतेने करत आहे.
भीमाला ही जनता आपला बाप मानते, कारण या समूहाची स्थिती होती, काखेत लेकरू, हातात झाडू, डोईवर शेणाची पाटी, कपडा ना लत्ता, खरखंट भत्ता, फजिती होती माय मोठी, अन माया भीमानं…भीमानं माय सोन्यानं भरली ओठी- आंबेडकरी गायिका कडुबाई खरात हे गीत वायरल झाल्याने त्या प्रसिद्धी झोतात आल्या आहेत. आज त्यांच्या कार्यक्रमाला लाखोंचा जनसमुदाय गर्दी करतो.
प्रसिद्ध शाहीर बाबासाहेब देशमुख यांनी बाबासाहेबांचा पोवाडा गायला आहे. विठ्ठल उमप, बापू पवार, किशोर सासवडे, प्रेम धंदे, आदर्श शिंदे आणि आनंद शिंदेंचे नातू आल्हाद शिंदेपर्यंत आंबेडकरी पोवाडा गायला आहे, पोवाडा हा शूरवीरांच्या गाथा सांगणारा कला प्रकार मात्र भीम शाहिरांनी विषमतेला शत्रू मानून पोवाड्याची रचना केली, इतकाच नाही तर पुरुषांची मक्तेदारी असणारा कलाप्रकार शिवभीम शाहीर सीमा पाटील यांनी ही गायला आहे. यूटुबवर लाखो लोकांनी तो पहिला ऐकला आहे. पोवाडा, पाळणा, भूपाळी, गझल, कव्वाली, भजन, जलसा, रॅप सुगम आणि शास्त्रीय संगीताच्या आणि लोकगीतांच्या अनेक फॉर्ममधून भीम गीते विविध गायकांनी गायली लिहिली आहेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथील पी. एच. डी स्कॉलर आणि डॉक्युमेंटरी फिल्ममेकर सोमनाथ वाघमारे हे आंबेडकरी संगीताचा हा वारसा संग्रहीत करण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहेत.
भीम गीत प्रकारामध्ये ‘पाळणा‘ हा गीत प्रकार ही गायला जातो. यात बाबासाहेबांच्या जन्मोत्सवाचे वर्णन प्रकर्षाने गायले जाते. छगन चौगुले, यांनी गायलेला पाळणा कॅसेट ‘जयंती भीमरायाची’ दीप्ती शिंदे यांचा ‘बाळ भीमाचा पाळणा‘ त्याकाळी या कॅसेट प्रसिद्ध झाल्या होत्या. जालिंदर ससाणे आणि आनंद शिंदे यांनी ही भीम पाळणा गायला आहे.
भूपाळी हा एक लोककला प्रकार आहे. प्रामुख्याने सकाळी सकाळी ही गीते गायली जायची, जात्यावर धान्य दळतेवेळी बायका ‘जात्यावरची ओवी’ आणि ‘भूपाळी’ गायली जायची. पहिली भीम भूपाळी सत्यशोधकी जलसाकार हरी भाऊ तोरणे यांनी १९३३ मध्ये लिहिली आणि ‘जनता’मध्ये छापली होती, विशेष म्हणजे बाबासाहेबांना दाखवली होती. सपनाताई खरात या भीम भूपाळी गायिका प्रसिद्ध आहेत.
महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा आणि गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा वारसा आहे. या भक्ती संप्रदायांची स्वतंत्र भजनी मंडळ आहेत. आत्तापर्यंत ही भजनी मंडळ आंबेडकरी गीते गात नव्हती मात्र सध्या ही भजनी मंडळ भीम गीते गाताना दिसत आहे. विशेष असे की त्यांना ऐकणारी जनता ही दलितेत्तर आहे. म्हणजे बहुजन समाजात बाबासाहेबांचा विचार आता बहुजन लोक कलावंत पोचवत आहेत. ही मंडळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा यांच्या विचारासोबतच फुले शाहू आंबेडकरी विचार मांडताना दिसत आहेत. सत्यपाल महाराज स्वतंत्र कलावंत सप्त खंजिरी वादक, प्रबोधनकार म्हणून प्रसिद्ध आहेत.
गझल हा काव्यातील काव्य. अतिशय प्रगल्भ प्रतिभेचा कवीच गझल काव्याला हाताळतो. मात्र भीम शाहिरांनी गझल या काव्यप्रकाराला ही वंचित नाही ठेवलं, आनंद शिंदे यांनी गझल ‘जय भीमवाला आगे आगे बढता है’ ही गझल सुरेख गायली आहे. आंबेडकरी विचार गझलेतून प्रसारीत करण्यात कवी, गझलकार सुरेश भट्ट, रमेश सरकाटे, रवींद्र जाधव, शरद काळे आणि वामन दादा यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. गझल आणि कव्वालीचा आंबेडकरी संगीतावर सुफी संगीताचा परिणाम दिसून येतो. भीम कव्वाली आनंद शिंदे यांनी गायलेली कव्वाली ‘मै तो भीम का दिवाण हू’ पावणे सहा कोटी लोकांनी युट्युबवर पहिली ऐकली आहे. भीम कव्वाली राहुल साठे यांनी ‘भले भले ते पुढारी करतात भीमाला सलामी‘ युट्युबवर सव्वा कोटी जणांनी पाहिली आहे.
बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी महात्मा फुलेंनी ‘सत्यशोधकी जलसा‘ या स्टँडिंग परफॉर्मन्स कलाप्रकाराची सुरुवात केली. मात्र बाबासाहेबांचे कार्यकर्ते एन. टी. बनसोडे यांनी पहिला आंबेडकरी जलसा पुण्यातून सुरुवात केला, तत्पूर्वी सत्यशोधकी जलस्यामध्ये बाबासाहेबांवर गीते गायला सुरुवात हरी भाऊ तोरणे यांनी भीम भूपाळी लिहून आणि गाऊन केली होती. जलशांचे स्वरूप असे होते की, चार ते बारा (स्त्री पुरुष भेद नाही) कलाकारांचा ताफा टाळ, डोलकी, तंतूंना, डफ, खंजिरी, हार्मोनियम, आणि हलगी सुरुवातीला भीम बुद्ध वंदना गीत, सवाल जवाब, कथाकथन, चिकित्सा, आणि बोध. आंबेडकरी जलसा आंबेडकरी समाजात खूप लोकप्रिय आहे, ही जलसाकार मंडळी उच्च शिक्षित आणि प्रामुख्याने तरुण मंडळी आहेत. समकालीन जलसाकार शाहिरी जोडपं शीतल साठे आणि सचिन माळी आज ही महाराष्ट्रभर आपली कला जलासाच्या माध्यमातून सादर करत आहेत. त्यांचे नवयान जलसा नावाने युट्युबवर चॅनल लोकप्रिय आहे. जलसाकार मंडळी जणजागृती दीक्षाभूमी, चैत्यभूमी, आणि भीमजयंतीला अनेक शहरांमध्ये तत्परतेने करत आहेत. बुद्धाचा समतेचा संदेश जनमानसात रुजविणे फुलेंचा सत्यशोधनाचा मार्ग आणि बाबासाहेबांचा विद्यावान होण्याचा संदेश ही जलसाकार मंडळी करत आहेत. संभाजी भगतांचे शाहिरी जलासासाठी वेगळं महत्व आहे. जो तो भीमाचा बछडा आपापल्या कुवतीने समता स्थापित करण्याच्या मार्गावर चालत आहे. आंबेडकरी चळवळ ही मी अगोदर म्हणालो त्याप्रमाणे केवळ राजकीय नव्हे तर, अधिकांशी ही सामाजिक आणि सांस्कृतिक आहे. दलित साहित्य, नाटके, जलसे, भीम गीते, प्रबोधनात्मक कार्यक्रम ही या चळवळीची अविभाज्य अंग आहेत, नव्हेत ते ती एका जाळ्याचे अनेक दोर आहेत.
रॅप हा गीतप्रकार मुळाचा आफ्रिकन देशांचा आहे. ती एक अशी पद्धती जी एकाद्या सांगितिक वाद्यांसोबत कथा लयबद्धपणे सांगणे. वेगाने होणाऱ्या जागतिकीकरणामुळे सांस्कृतिक देवाण घेवाण ओघानेच होत राहिली. आणि रॅप साँग कलाप्रकार जगभर लोकप्रिय झाला. त्याचा वापर राजकीय सत्येच्या विरोधात झाला, निषेध, राग, नाराजी, विरोध व्यक्त करण्यासाठी चुकांवर निर्देश करण्यासाठी प्रामुख्याने होतो आहे. अनेक आंबेडकरी नवीन कलावंत भीम रॅप गाताना दिसत आहेत. ‘शॅडो ऑन द मिक बॉय’ नावाचे राहुल यांचे युट्युब चॅनल केवळ भीम रॅपसाठी प्रसिद्ध आहे. ‘भीमशाही’ आणि ‘पोरगा भीमाचा हाय’ या भीम रॅपला लाखो दर्शकानी पाहिलं आहे. रोहित मगरचा रॅप ‘मी मुंबईकर मला जयभीम कर’ आर एम रॅपर या नावाने युट्युब चॅनलवर आहे. विपीन तातड यांचे ‘सोन्यानं भरली ओठी’ रॅप टोळी या चॅनलवर प्रसिद्ध आहे. पंजाबची गिन्हही माहीने आंबेडकरी रॅपसहित भीम गीतांचा नवा ट्रेंड उत्तर भारतात निर्माण केला आहे. सुमित सोमस हा जेएनयूचा विद्यार्थी आत्ता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत शिक्षण घेतोय हा इंग्लिश आंबेडकरी रॅपर खूप प्रसिद्ध आहे. त्यासोबतच तामिळ दिग्दर्शक पा. रंजित यांचा कॅस्टलेस कॉलेक्टिव्ह नावाचा म्युझिक बँड आंबेडकरी चळवळीला अधिक समृद्ध करत आहेत.
शास्त्रीय संगीत हा प्रामुख्याने ब्राह्मणवादी वर्चस्व असणारा कला प्रांत. लोककला जोपासली पिढ्यानपिढ्या वृद्धिंगत केली आणि आजही बहुजन समाज करत आहे. शास्त्रीय संगीत ही साधनेची आणि रियाजाअंती सध्या होणारी कला आहे. हा प्रांत दलित सोडा बहुजनांसाठी ही असाध्य राहिला आहे. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये जे विद्वान आहेत, गायक, वादक, हे त्यांच्या घराणा परंपरेवरून लक्षात येतात. तर त्याची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ओरंगाबाद येथील संगीत शास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय मोहड यांनी केली आहे. बाबासाहेबांच्या १२५व्या जयंतीच्या निमित्ताने विद्यापीठाने ‘गीत भीमायन’ या शास्त्रीय संगीताची निर्मिती केली आहे. या संकल्पनेचे संकल्पक आणि बंदिशी निर्माते डॉ. संजय मोहड आहेत. संगीत संयोजक नरेंद्र भिडे आणि ही गीते गायली आहेत, कविता कृष्णमुर्ती, हरिहरन, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, रघुनंदन पणशीकर, साधना सरगम, बेला शेंडे या प्रसिद्ध कलावंतानी. आणि ही सगळी गीते वामन दादा कर्डक यांची आहेत. जिज्ञासू विद्यापीठाच्या संकेत स्थळावरील ही गीते ऐकू शकतात. नुकतीच ‘मूकनायक’ पाक्षिकाची शतकपूर्ती झाली. तेव्हा शास्त्रीय गायिका सावनी शिंडे यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम विद्यापीठाने आयोजित केला होता. डॉ. संजय मोहड म्हणाले की बाबासाहेब हा शास्त्रीय गायनाचा विषय आहे. विद्यापीठाच्या संकेत स्थळावर अनेक त्यांनी निर्माण केलेल्या आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायकांनी गायलेल्या अनेक बंदिशी उपलब्ध आहेत. डॉ. संजय मोहड हे पहिले कलावंत आहेत जे भीमाचा विचार शास्त्रीय संगीतातून लोकांपर्यंत पोचवत आहेत. त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. स्टेज कार्यक्रमध्ये अंशतः शास्त्रीय मिलाफ करणाऱ्या आणि भीम गीते गाणाऱ्या जाधव सिस्टर्स प्रसिद्ध आहेत.
चंद्रकांत कांबळे, हे सिंबायोसिस इंटरनॅशन युनिव्हर्सिटी पुणे येथे वरिष्ठ संशोधक आहेत.
(लेखाचे छायाचित्र प्रतिनिधीक स्वरूपाचे )
COMMENTS