‘शहांचे बांगलादेशाबद्दलचे ज्ञान मर्यादित’

‘शहांचे बांगलादेशाबद्दलचे ज्ञान मर्यादित’

नवी दिल्ली: बांगलादेशात उपासमार होत असल्याने गरीब बांगलादेशी भारतात घुसखोरी करतात या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानाला बांगलादेशचे परराष्ट्

प्रसिद्ध गायक टीएम कृष्णा, सिद्धार्थसहित ६०० जणांवर गुन्हे
‘दीदी ओ दीदी’
सुशांत सिंह, साना गांगुली, फरहान बोलले; सौरभ, सेहवागचे मौन, मराठी चित्रपटसृष्टी थंड

नवी दिल्ली: बांगलादेशात उपासमार होत असल्याने गरीब बांगलादेशी भारतात घुसखोरी करतात या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानाला बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी आक्षेप घेतला आहे. शहा यांचे बांगलादेशबद्दलचे ज्ञान “फारच मर्यादित” आहे अशी टीका मोमेन यांनी केली.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी चाललेल्या प्रचार दौऱ्यांदरम्यान शहा यांनी आनंद बझार पत्रिका या कोलकातास्थित वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्यामध्ये बांगलादेशात पुरेसे खायला मिळत नसल्याने गरीब बांगलादेशी भारतात शिरतात, असे विधान त्यांनी केले.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील नातेसंबंध सुधारत असताना, शहा यांनी अशी टिप्पणी करणे ‘अस्वीकारार्ह’ आहे असे मोमेन ढाका येथे म्हणाले.

“ज्यांना बघितले तरी दिसत नाही आणि माहीत असले तरी समजत नाही, असे अनेक शहाणे लोक जगात आहेत. मात्र, ते खरोखर असे काही म्हणाले असतील, तर त्यांचे बांगलादेशबद्दलचे ज्ञान फारच मर्यादित आहे असे मी म्हणेन. सध्या आमच्या देशात उपाशी राहून कोणीही मरत नाही. येथे आता ‘मोंगा’ही (बांगलादेशच्या उत्तरेकडील जिल्ह्यांतील हंगामी दारिद्र्य व उपासमारी) उरलेला नाही,” असे मोमेन यांनी नमूद केले.

बांगलादेशात सुशिक्षित नागरिकांसाठी पुरेशा नोकऱ्या नाहीत हे खरे आहे. मात्र कमी कौशल्यांच्या नोकऱ्यांची अजिबात कमतरता नाही. त्यासाठी भारतात जाण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

अनेक निर्देशांकांवर बांगलादेश भारताच्या पुढे आहे याकडे मोमेन यांनी लक्ष वेधले. बांगलादेशातील ९० टक्के जनता उत्तम स्थितीतील शौचालयांचा वापर करते. भारतात हे प्रमाण जेमतेम ५० टक्के आहे, असे ते म्हणाले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच बांगलादेश निर्मितीच्या सुवर्णमहोत्सव सोहळ्यात तसेच शेख मुजीबुर रहमान यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बराच गाजावाजा करत बांगलादेशला भेट देऊन आले असताना, अमित शहा यांनी हे विधान केले आहे. बांगलादेशातील सामाजिक-आर्थिक विकासाबद्दल पंतप्रधान शेख हसिना यांची प्रशंसा करणारी थीम मोदी यांच्या बांगलादेश भेटीसाठी तयार करण्यात आली होती.

दरम्यान, डेली स्टार या बांगलादेशातील सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भारतातील राजकीय नेते ‘बांगलादेश कार्ड’ कसे वापरत आहेत यावर वृत्तांत प्रसिद्ध झाला आहे.

अमित शहा यांनी यापूर्वी बांगलादेशाबद्दल केलेल्या विधानावरही बांगलादेशात चर्चा झाली होती. डिसेंबर २०१९ मध्ये लोकसभेत नागरिकत्व (सुधारणा) विधेयक मांडताना ‘बांगलादेशातील हिंदूंना स्वत:च्या धर्माचे अनुसरण करणे अशक्य झालेले आहे’ असे विधान शहा यांनी केले होते.

शहा यांचे दावे ‘खोटे’ आणि ‘अनावश्यक’ आहेत, असा पवित्रा मोमेन यांनी घेतला आहे. “जर ते काही महिने बांगलादेशात राहिले तर त्यांना आमच्या देशातील धार्मिक सौहार्दाचा अनुभव येईल,” असे मोमेन म्हणाले. त्यापूर्वीही बांगलादेशी स्थलांतरित हे “कसरीसारखे” आहेत अशी टीका शहा यांनी केली होती. यावर बांगलादेश सरकारने अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती पण बांगलादेशातील माध्यमांमध्ये मात्र या विधानावर टीकेची झोड उठली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0