कोरोनाच्या महासंकटात शहांनी फुंकले निवडणुकांचे बिगुल

कोरोनाच्या महासंकटात शहांनी फुंकले निवडणुकांचे बिगुल

कोरोना विषाणू महासाथीला रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सार्वजनिक जीवनात गैरहजर होते. पण गेल्या रविवारी व

चीनचाच भारताला खरा धोकाः रावत
टिकैतः शेतकरी आंदोलनातील दुसरी पिढी
शेतकरी संघटनांनी सरकारचा प्रस्ताव स्वीकारला

कोरोना विषाणू महासाथीला रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सार्वजनिक जीवनात गैरहजर होते. पण गेल्या रविवारी व सोमवारी त्यांनी आपल्या मूळच्या रुपात अवतीर्ण होत बिहार आणि ओदिशात पक्षाने आयोजित केलेल्या व्हर्चुअल रॅलीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांपुढे भाषण दिले.

कोरोनाच्या महासाथीला रोखण्यासाठी ज्या प्रशासकीय कमतरता व चुकीचे निर्णय घेतले गेले त्याने केंद्रातील मोदी सरकारवर चोहोबाजूंनी टीका झाली होती. लॉकडाऊनचा निर्णय हा घाई गडबडीत, कोणत्याही परिणामांची खोलवर चिकित्सा न करता घेण्यात आला. त्यात लॉकडाऊन चारवेळा वाढवूनही कोरोनाचे संक्रमण सरकारला रोखता आले नाही. या काळात देशाची अर्थव्यवस्था पूर्णतः ढेपाळत गेली, लाखोंच्या नोकर्या गेल्या तर कोट्यवधींचे रोजगार गेले. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची तर परिस्थिती नोटबंदी पेक्षा अधिक वाईट झाली आहे. अशात सरकारने जाहीर केलेल्या पाच टप्प्यातील आर्थिक पॅकेजातून समाजातल्या निम्न राहू दे पण आर्थिकदृष्ट्या अतिनिम्नस्तरातील व सामाजिकदृष्ट्या शोषित वर्गाचे फारसे भलेही होण्याची शक्यता दूरवर दिसत नसल्यानंतर सरकारविरोधात जनमत जाऊ लागले. ही भीती लक्षात घेऊन अमित शहांना पुन्हा निवडणुकांच्या मैदानात उतरावे लागले आहे.

एकीकडे देशाची आर्थिक स्थिती अत्यंत डबघाईला आली असताना मोदी सरकार मात्र आपल्या अपयशाचा धनी विरोधकांमध्ये शोधू लागला आहे. या पक्षाने कोरोनाचे महासंकट समोर दिसत असतानाही म. प्रदेशमधील कमलनाथ सरकार बंडखोर काँग्रेस आमदारांच्या मदतीने पाडले. तर आता राज्यसभा निवडणुका जवळ आल्या पाहता गुजरात भाजपने, काँग्रेसचे आमदार फोडण्याचे उद्योग सुरू केले आहेत. गुजरातमधल्या चार राज्यसभा जागांपैकी दोन जागा काँग्रेस सहज जिंकू शकत असताना त्यांच्याच तीन आमदारांनी राजीनामे दिल्याने एक तरी जागा जिंकेल की नाही अशी परिस्थिती गुजरात काँग्रेसपुढे आली आहे.

निवडणूक एके निवडणूक

अमित शहा यांनी या आठवड्यात बिहार व ओदिशात दोन व्हर्च्युअल रॅली केल्या. बिहारला संबोधणार्या रॅलीत त्यांनी हा निवडणुकांचा प्रचार नाही पण बिहारच्या जनतेशी आत्मनिर्भर भारत मोहिमेतून संपर्क साधण्याचा प्रयत्न असल्याचे अमित शहा यांचे म्हणणे आहे. पण असे वक्तव्य करताना त्यांनी नितीश कुमार सरकारचे तोंड भरून कौतुक केले. बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीचे (जी डिसेंबरमध्ये अपेक्षित आहे) त्याचे नेतृत्व नितीश कुमार करतील व त्यांच्याच नेतृत्वाखाली एनडीएला राज्यात दोन तृतीयांश बहुमत मिळेल, असा दावा त्यांनी केला.

अमित शहा यांनी बिहारच्या जनतेला उद्देशून नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीचा मुद्दा मांडण्याचे महत्त्वाचे कारण हे की, बिहारमध्ये लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारला आलेले अपयश प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाकडून सतत जनतेपुढे मांडले जात आहे. राजदने तर अमित शहा यांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर गरीब अधिकार दिवस साजरा करत भांडी वाजवत व शंखनाद केला आणि राज्य सरकारचे वाभाडे काढले.

पण हा विरोध दिसत असतानाही अमित शहा यांनी अत्यंत हुशारीने आपले राज्यकर्ते म्हणून उत्तरदायित्वाची जबाबदारी न स्वीकारताना आलेल्या अपयशला, त्रुटींना विरोधकच जबाबदार असल्याचा आरोप सुरू केला. विरोधक अत्यंत हीन दर्जाचे राजकारण करत असून ते व्हर्चुअल रॅलीच्या अगोदर भांडी वाजवत शंखनाद करत आहेत म्हणजे या विरोधकांना पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाच्या लढ्यात सामील असलेल्यांला कृतज्ञता म्हणून जनतेला केलेले आवाहन पटले असल्याचे विधान त्यांनी केले.

आपल्या भाषणात त्यांनी लाखो स्थलांतरित मजुरांच्या घरवापसीचा मुद्द्याला स्पर्शही केला नाही. वास्तविक लाखो स्थलांतरित राज्यात परत आल्याने बिहारच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. पण अमित शहा यांनी स्थलांतरित मजुरांसाठी विरोधकांनी काय पावले उचलली त्यांनी काय मदत केली याचा तपशील मागितला. स्थलांतरित मजुरांसाठी मोदी सरकारने जेवढे प्रयत्न केले आहेत, तेवढे तरी विरोधकांनी केले आहेत का, असा सवाल त्यांचा होता.

ओदिशातील व्हर्चुअल रॅलीत अमित शहा यांनी केंद्राचे अपयश मान्य केले पण ते मान्य करताना विरोधकांच्या जबाबदारीवरही बोट ठेवले.

अमित शहा म्हणाले, ‘दूरदृष्टी नसलेले काही जण, विरोधकातले काही जण यांना मला सांगायचेय की आमच्याकडून काही चुका झाल्या असतील पण आमची बांधिलकी स्पष्ट होती. आमच्याकडून चुका झाल्या असतील किंवा आम्ही कमी पडलो असू, आमच्याकडून काही गोष्टी पूर्ण झाल्या नसतील पण तुम्ही काय करताय? कोणी स्वीडनमधून, कोणी अमेरिकेतून कोरोनाशी कसा लढा द्यायचा हे सांगत असतात. तुम्ही काय करत होता? कोरोनाचे महासंकट आले तेव्हा मोदी सरकारने ६० कोटी लोकांना १,७०००० कोटी रु.चे आर्थिक पॅकेज जाहीर केले. ही मदत देशासाठी होती. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय? मुलाखती घेण्यापलिकडे काँग्रेसने काहीच केले नाही.’

मुद्दे भरकटवण्याचा प्रयत्न

लोकशाहीत एखादा विरोधी पक्ष जे काम करतो ते काम गेले दोन महिने विरोधकांनी केले होते. कोरोनाची आकडेवारी जेव्हा लपवली जात असल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारला कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी काय योजना आखल्या जात आहेत, कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होणार आहे, हे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले होते. विरोधकांच्या दबावामुळेच सरकारला कोविड-१९च्या चाचण्यांची संख्या वाढवावी लागली. स्थलांतरितांना आर्थिक मदत जाहीर करावी लागली.

पण सत्ताधारी भाजपने कोविड-१९ संदर्भात कधीच जनतेपुढे वस्तुस्थिती मांडली नाही. सगळा खेळ लपवण्याचा होता. उलट ज्यांनी मर्मावर बोट ठेवणारी प्रश्न विचारले, सरकार अडकत असल्याचे लक्षात येताच विरोधकांना ड्रामेबाजी करतायेत असा आरोप करून भाजप नेते मोकळे होत.

सरकारच्या अशा युक्ताप्रयुक्त्या बिहार व ओदिशातील शहा यांच्या व्हर्चुअल रॅलीत दिसून आल्या. याचे उदाहरण देता येतील, या रॅलीमध्ये शहा यांनी कोरोनाच्या महासंकटावर विशेष भाष्य न करता ३७० कलम, राम मंदिर, तिहेरी तलाक, सर्जिकल स्ट्राइक, नागरिकत्व दुरुस्ती कायदा असे विषय आपल्या सरकारचे यश असल्याचे पुन्हा अधोरेखित केले.

विरोधकांवर हल्ला करताना सतत हिंदू राष्ट्रवादाचा मुद्दा ठसवत राहायचा ही भाजपची नेहमीची व्यूहरचना आहे. गेले सहा वर्षे मोदी-शहा दुकलीने ही व्यूहरचना ते नेहमी संकटात असताना वापरली आहे. आता कोरोनाच्या महासंकटात त्यांचा अशा प्रकारचा अजेंडा बाजूला दिसत असला तरी या काळात भाजपचे नेते विरोधक आपल्याला प्रश्नच कसे विचारतात यावर हल्ला करण्यास सुरूवात केली.

या महासंकटात देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर व मानवी संकटावर कोणी प्रश्न उपस्थित करताना दिसताच भाजपचे नेते अशा काळात देशात एकता असावी असे म्हणताना दिसत होते. बिहारच्या सभेत शहा यांनी जनतेशी संपर्क सुरू करण्यासाठी ही सभा असल्याचे स्पष्ट केले. कोरोनाच्या महासंकटात लोकांशी संपर्क साधू नये असे तुम्हाला कोणी सांगितले आहे, असा प्रश्न उपस्थित करत शहा यांनी भाजप पक्ष लोकशाहीवर विश्वास ठेवत असल्याचे सांगितले.

शहा यांनी बिहार निवडणुकांचे बिगुल वाजवले आहे हे स्पष्टच आहे पण त्यांनी हे करताना देशाच्या आरोग्य व्यवस्थेतील महासमस्यांकडे सहज दुर्लक्ष केले आहे. कोरोनाचे संकट वाढणार आहेच पण त्यांच्या लेखी निवडणुका महत्त्वाच्या आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0