अवलिया ‘अनिल’ माणूस !

अवलिया ‘अनिल’ माणूस !

लेखक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे २७ जानेवारीला निधन झाले. मुळात डॉक्टर असणाऱ्या अनिल अवचट यांनी पत्रकार, लेखक, कार्यकर्ता, बासरी, ओरिगामी, शिल्पकला, चित्रकला, फोटोग्राफी अशा अनेक क्षेत्रांत वाऱ्यासारखी (अनिल) मुशाफिरी केली. अवलिया म्हणून जगलेल्या अवचट यांनी अनेक सुहृद जमवले. त्यातल्या अनेकांनी त्यांच्याविषयी लिहिलेल्या या आठवणी.

जेडीयूत नेतृत्व बदल; अरुणाचलात भाजपचा धक्का
प्रशांत किशोर, अशोक लवासा यांच्यावरही लक्ष
हरियाणात भाजपला धक्का, दुष्यंत चौटाला किंगमेकरच्या भूमिकेत

लेखक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे २७ जानेवारीला निधन झाले. मुळात डॉक्टर असणाऱ्या अनिल अवचट यांनी पत्रकार, लेखक, कार्यकर्ता, बासरी, ओरिगामी, शिल्पकला, चित्रकला, फोटोग्राफी अशा अनेक क्षेत्रांत वाऱ्यासारखी (अनिल) मुशाफिरी केली. अवलिया म्हणून जगलेल्या अवचट यांनी अनेक सुहृद जमवले. त्यातल्या अनेकांनी त्यांच्याविषयी लिहिलेल्या या आठवणी.

सामाजिक विवेकाचा आवाज – – प्रा. हरी नरके

अनिल अवचट यांचे प्रत्येक पुस्तक वाचनीय, भवताल भेदकपणे उलगडवून दाखवणारे आणि वंचित समाजाबद्दल अपार कळवळ्याने लिहीलेले आहे. त्यांचं ‘माणसं ‘हे पुस्तक तर अत्यन्त श्रेष्ठ प्रतीचे साहित्य म्हणून सर्वकालीन मास्टरपीस ठरावे. अनिलने कितीतरी विषय हाताळले. मध्यमवर्गीय, बुद्धीवादी वाचक वर्गाचा अनिल हा महत्वाचा वाटाडया. भारतीय सामाजिक विवेकाचा अनिल हा बुलंद आवाज होता.

अनेक वर्षं तो डॉ. बाबा आढाव यांच्यासोबत काम करायचा. त्याची पत्नी डॉ. सुनंदा (अनिता) ही हमाल वर्गासाठी अनेक वर्षे विनामूल्य दवाखाना चालवायची. तिनं मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची पायाभरणी केली. ही संस्था त्यांची मुलगी मुक्ता हिनं जपली. वाढवली.

अनिल हा अवलिया होता. मनस्वी. धडपड्या. लिहिणं, फिरणं आणि रसरसीत जगणं यात तो रमायचा. त्यानं आपलं आत्मचरित्र अनेक पुस्तकांमधून  लिहिलं. मी त्याच्या ताज्या स्वकथनपर पुस्तकावर अनिलचं आत्मचरित्र खंड ७३वा असं गमतीनं  लिहिलं तर अनिलनं  त्यालाही लाईक केलेलं. अलीकडच्या काळात त्याची विविध छंदांवरची बरीच पुस्तकं आली. त्यांच्यामध्ये मात्र फारसा दम नव्हता.

सुनंदाचं अकाली जाणं अनिलला जिव्हारी लागलं. तो माझ्यापेक्षा वयानं आणि अनेक बाबतीत मोठा असला तरी मी त्याला अरेतुरे करावं असा त्याचा आदेश. आम्ही नामांतर आंदोलनात ठाणे जेलमध्ये एकाच बराकीत सुमारे महिनाभर होतो. तेव्हा २४ तास एकत्र असायचो. त्याबद्दल स्वतंत्रपणे लिहायला हवे. गेल्या ४५ वर्षांच्या असंख्य आठवणी आहेत. खूप लिहिता येईल. अनिलची दृष्टी चौफेर होती. त्याला शेकडो छंद होते. त्यामुळे तो कायम व्यग्र असायचा. त्याचेही काही विकपॉइंट होते. प्रत्येकाला असतात.

अनिलने माझ्या पिढीची सामाजिक दृष्टी विस्तारली. निवळ केली. ओतूरसारख्या खेड्यातून आलेल्या अनिलने सामाजिक दस्तऐवज या लेखनप्रकारात फार मोठी भर घातली. घरातला टिपिकल मध्यमवर्गीय वारसा नाकारून अनिल वंचितांमध्ये रमला. त्यांचा झाला. त्याचे रिपोर्ताज ह्या वाड्मय प्रकारातले लेखन अनेक पिढयांचे डोळे उघडण्याचे काम करील. श्री. म. माटे, साने गुरुजी यांचा वारसा अनिलने जपला, मोठा केला.

< >

मित्रत्वाचे आणखी एक पर्व संपले! – अरुण खोरे

आज सकाळीच साडे दहाच्या सुमारास डॉ.अनिल अवचट निधन पावल्याची बातमी समजली. मुंबईवरून लक्ष्मण गायकवाड यांचा फोन आला.पुण्यात दत्ता काळेबेरे यांच्याशी बोललो.

दुपारी अर्जुन डांगळे यांचा फोन आला. अर्जुनचे अलीकडेच दलित पॅंथर : अधोरेखित सत्य, हे नवे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. अर्जुनला या पुस्तकाची प्रत अनिलला द्यायची होती पण ते राहून गेल्याची खंत त्यांच्या बोलण्यात होती.

या पुस्तकात साप्ताहिक मनोहरसाठी दलित पँथर फुटीच्या वादासंदर्भात अनिल अवचट यांनी ज्या मुलाखती घेतल्या होत्या, त्याचे संदर्भ अर्जुनने दिले आहेत. त्यामुळे हे पुस्तक त्याला द्यायचे राहून गेले, ही खंत त्याच्या बोलण्यात वारंवार येत होती.

समाजाची खोल बांधीलकी असलेला,समाजातील प्रश्नांवर आणि माणसाच्या जगण्याच्या प्रश्नावर सतत  लिहिणारा एक लेखक आपल्यातून निघून गेला.अनिल आपल्या सर्वांचा मित्र होता…

महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात डॉ. बाबा आढाव यांच्यामुळे एक व्यापक असे सामाजिक आणि वैचारिक स्नेहाचे वर्तुळ निर्माण झाले आहे, या वर्तुळातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे अनिल अवचट…शिवाय मराठी साहित्यातले त्याचे स्थान  इतके वेगळे  की त्याची तुलना नाही करता येणार!

महिन्यापूर्वीच अनिलला त्याच्या घरी जाऊन भेटलो होतो. त्याच्याशी तासभर गप्पा मारल्या होत्या. त्याने त्याचे पुस्तक मला भेट दिले होते आणि मीही त्याला माझे गांधीजींच्या कोटेशनचे पुस्तक दिले होते.

अनिलची आणि माझी प्रत्यक्ष भेट होण्यापूर्वी पूर्णिया, या एका सुंदर पुस्तकातून तो मला भेटला होता. या पुस्तकाला नरहर कुरुंदकर यांची प्रस्तावना होती. या पुस्तकातून अनिलने आम्हाला बिहारमधील एका वेगळ्याच जगात  नेले होते. त्यानंतर तो भेटत राहिला… साधनेचा संपादक होता, मराठीतील विविध दिवाळी अंकात दर्जेदार लेखन करणारा एक फिरता असा लेखक होता.

मी सकाळमध्ये विद्यार्थी बातमीदार म्हणून काम करत असतानाच बाबांच्या नाना पेठेतील कार्यालयात जात असे. तेथे अनिल आणि सुनंदाची भेट झाली आणि मग हे नाते जोडले गेले. सकाळमध्ये असलेले वरिष्ठ सहसंपादक आणि नंतर साप्ताहिक सकाळचे संपादक झालेले सदा डुंबरे हे अनिल आणि सुभाष अवचट यांचे गाववाले मित्र, म्हणजे सर्वजण ओतुरचे.त्यामुळे त्यांचे  सकाळमध्ये येणे-जाणे असायचे. मी नंतर लोकसत्ताला गेल्यावर देखील आणि काही वेगळ्या बातम्याच्या निमित्ताने अनिल भेटायला येत असे.

लोकसत्ता पुणे आवृत्तीचे कार्यालय पुणे कॅम्प भागात असल्यामुळे तो बऱ्याचदा मुक्तांगण केंद्रावरून लोकसत्तेच्या ऑफिसमध्ये येत असे.त्या काळात त्याने मोठ्या प्रमाणात सुनंदासह मुक्तांगण आणि व्यसनमुक्तीसाठी काम केले. त्यांना या  कार्यात पु ल आणि सुनीताबाई देशपांडे यांचे मोठे सहकार्य झाले होते.

एकदा अनिल दिवाळीच्या सुमारास आला आणि मी त्याला विचारले, सध्या काय सुरू आहे? त्याने मला त्याच्या शबनम पिशवीतून मोराचे चित्र आणि त्याला जोडलेली कविता अशी शुभेच्छापत्रे दाखवली. दिवाळीसाठी ही शुभेच्छापत्रे लोकांनी विकत घ्यावीत आणि त्यातून मुक्तांगण संस्थेला यांना मदत करावी असे ते आवाहन होते. मग आम्ही ती बातमी छापली.

याबाबत बोलत असताना देखील हातात कागद घेऊन अनिल ओरिगामी चित्र तयार करत होता. त्याचे हे विलक्षण असे सृजनशील हात, आणि त्यात गुंतणारे त्याचे डोके आणि अंत:करण हे काहीतरी वेगळेच रसायन होते!

तो दरवर्षी व्यक्तिचित्रणात्मक असे लेखन मौज दिवाळी अंकात करत असे…

एकदा त्याने ‘पुण्यातील तीन व्यावसायिक’, असा एक लेख लिहिला होता. मौज दिवाळी अंकात तो वाचल्यावर मी चकीत झालो होतो. बुधवार चौकातील रतन टॉकीज समोर गाडी लावणारे, रामचंद्र भगवान नावाचे चिवडेवाले यांच्यावर एक भाग त्यात होता.सकाळमध्ये असताना आठवड्यामध्ये दोन-तीन वेळा तरी मी आणि डुंबरे, कधीतरी साळुंखे असे या भगवान चिवडेवाल्यांकडे आम्ही जात असू. मौज दिवाळी अंकात  वाचल्यावर मी भारावून गेलो आणि मी त्या  चिवडेवाल्याकडे गेलो. रामचंद्र भगवान  चिवडेवाले असे त्यांचे नाव असावे. त्यांना मी या लेखाचे सांगितल्यावर ते मला म्हणाले की, काही दिवसांपूर्वी अवचट येथे येऊन गेले होते. तिथून ते कधीतरी चिवडा पार्सल घेऊन जातात. बोहरी आळीमधल्या एका व्यावसायिकावरही त्यांनी असेच लिहिले होते.

अगदी अलीकडच्या काळात आर्यन खान आणि समीर वानखेडे असा सामना वृत्तवाहिन्यांवर सुरू झाल्यावर मला अनिलच्या एका जुन्या पुस्तकाची आठवण झाली. गर्द हे त्या पुस्तकाचे नाव. पुण्यात कुठे अमली पदार्थ किंवा  ड्रगसारखे पदार्थ मिळतात आणि त्यात तरुण मुले कशी अडकली आहेत, याचा शोध त्यांनी त्या पुस्तकात घेतला होता. हे पुस्तक साधारण १९८०/८२ च्या दरम्यान पुण्यातील श्रीविद्या प्रकाशनचे मधुकाका कुलकर्णी यांनी प्रकाशित केले होते. भविष्यात जी संकटे भारतातील तरुणांपुढे वाढून ठेवली होती, त्याचा दूरगामी दृष्टीने शोध घेणारा अनिल हा लेखक होता आणि त्याचे वेगळेपण आणि दूरदृष्टी या पुस्तकातून हे जाणवते,अगदी आजही!

गेल्या महिन्यात अनिलच्या घरी गेलो. सकाळची वेळ होती. त्याला मी संपादित केलेले गांधीजींच्या मराठी इंग्रजी कोटेशनचे पुस्तक दिल्यावर मला अनिलने तुला माझे एक पुस्तक मी देतो, असे म्हणत तो उठला आणि त्याने समोरच्या पुस्तकांच्या कपाटातील एक पुस्तक शोधून मला दिले.

मी सहज त्या पुस्तकांच्या कपाटाकडे नजर टाकली आणि खरोखर नव्याने थक्क झालो! कितीतरी अनिलची पुस्तके त्यात मला दिसत होती. अमेरिका नावाचे प्रकरण असेल, माणसं आणि अशा अनेक पुस्तकांचा एक मोठा लेखक माझ्यासमोर बसलेला होता आणि आम्ही छान गप्पा मारत होतो.

अनिलच्या आवाजात एक कायम प्रेमाचा, जिव्हाळ्याचा ओलावा असायचा आणि त्यामुळे त्याची आपुलकी आपल्या मनाला नेहमीच स्पर्श करणारी असायची.

त्याच्या प्रत्येक कामात आपण बरोबर असले पाहिजे असे आपल्याला वाटायचे आणि त्याचीही तीच भूमिका असायची. त्यामुळेच बाबांच्या कामात आणि नंतर सुनंदाने सुरू केलेल्या त्यांच्या कामात त्याने झोकून देऊन काम केले होते. मराठीमध्ये रिपोर्ताज हा एक लेखन प्रकार गेली काही वर्षे रुळला आहे, त्याचे मोठे श्रेय अनिलला दिले पाहिजे. प्रत्यक्ष जागेवर जाऊन, प्रश्न समजून घेऊन, लोकांशी बोलून लिहिले पाहिजे याची एक अतिशय चांगली वाट त्याने मराठी पत्रकारितेत, मराठी साहित्यात घालून दिली आणि आज त्या वाटेवरून अनेक पत्रकार व  लेखक विनाअडथळा जाताना आपण पाहतो, तेव्हा अनिलच्या  या लेखनाला सलाम केल्याशिवाय राहवत नाही.

गेल्या दोन-तीन वर्षात बाबा आढाव, दत्ता काळेबेरे, शारदा वाडेकर, मुकेश बामणे, मोहन वाडीकर यांच्या अनेक भेटी झाल्या. त्यातून अनिल अवचट यांचीही नवी ओळख किंवा आहे तीच ओळख अधिक समृद्धपणे अधोरेखित झाली.

महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीच्या पन्नास साठ वर्षांच्या काळात अनिलने जे योगदान दिले ते योगदान आपल्याला विसरता येणार नाही. पुरोगामी सत्यशोधक या त्रैमासिकाच्या आरंभीच्या संपादक मंडळात तो होता, कार्यकारी संपादक म्हणूनही तो काम करत होता. शिवाय बाबांच्या बरोबर अनेक सामाजिक चळवळीच्या प्रवासात तो भ्रमंती करत असे.निपाणीतील तंबाखू कामगार महिलांचे  दुःख अंधेरनगरी निपाणी, या लेखात त्याने पुरोगामी सत्यशोधकमधून मांडले होते. असे कितीतरी विषय तो सतत लिहीत राहिला होता. आता परवाच्या २०२१ मौज दिवाळी अंकात त्याने बाबा आढाव यांच्यावरही एक सुंदर लेख लिहिला आहे.

महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील एक मोठे पर्व असलेल्या, एक गाव एक पाणवठा, या पुस्तकाबाबत अनिल अवचट यांनी किती आग्रह केला आणि लिहिण्याचा पाठपुरावा केला होता याचा उल्लेख बाबांनी त्यांच्या या प्रस्तावनेत केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीतील अनिलचे वेगळे योगदानही विसरता येणार नाही.

बाबांची दोन्ही मुले अलीकडेच पुण्यात आली होती. त्यावेळी अंबरने आढाव आणि अवचट कुटुंबीय एकत्र आल्याचे काही फोटो समाज माध्यमावर शेअर केले होते. त्यावेळी बाबांच्या बरोबर असलेला अनिल किती आनंदात दिसत होता!

आज अनिलच्या निधनाच्या बातमीनंतर शेकडो मित्रांनी फेसबुकवर आणि व्हाट्सअपवर फोटोसह आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुक्ता आणि यशोदा या आपल्या दोन्ही लेकींकडे मुक्तांगणची जबाबदारी सोपवून अनिल निघून गेला आहे. अनिलची वेगवेगळी पुस्तके आणि त्याची सामाजिक उत्तरदायित्वाची स्वच्छ अशी भूमिका आणि त्यांनी सुरू केलेले काम यामधूनच त्याची आठवण आपल्या सर्वांना राहणार आहे. अनिलच्या अनेक गोष्टींची आज आठवण येते. फेसबुकवर मधल्या काळात तो त्याच्या आईच्या संबंधात लिहीत होता. काही दिवस तो नियमितपणे कबिराचे दोहे मराठी करून लिहित असे. तेही आपण वाचत असू. सुंदर आणि साधे मराठी, थेट मनाला भिडणारे हे लेखन हेच अनिलचे वेगळेपण होते.

अनिलसारखा माणूस खूप मोठा असतो, त्याचा सगळाच अवकाश आपल्याला गवसतो असे नाही! जगन्नियंता, काही साचे असे बनवतो; की ते पुन्हा निर्माण होत नाहीत! अनिल अशा दुर्मिळ वर्गातला होता!

< >

बहुआयामी अनिल – हेमंत देसाई

दीड-दोन महिन्यांपूर्वीच पुण्यात दीप बंगला चौकाजवळ अचानकपणे अनिल अवचट यांची गाठ पडली. ते कारमध्ये होते. कार थांबलेली होती आणि त्यांचा ड्रायव्हर काहीतरी खरेदी करण्यासाठी जवळच्या दुकानात गेला होता. बरेच दिवसांनी गाठ पडल्यामुळे त्यांनी माझा हात हातात घेतला आणि घरी केव्हा येणार, असे विचारले. मी आणि माझी पत्नी दोघेही होतो आणि लवकरच येऊ, असे त्यांना सांगितले. मात्र त्यांना बघून त्यांची प्रकृती ठीक आहे की नाही, असे वाटले… सुमारे पस्तीस- सदतीस वर्षांपूर्वी  मुंबईत ते आमच्या घरी आले होते आणि त्यांनी आवडीने पिठलेभात खाल्ला होता. पुढे केव्हाही भेटले, तरी ते त्या पिठलेभाताची आठवण काढायचे आणि अगदी परवादेखील त्यांनी तीच आठवण पत्नीपाशी काढली. त्यांच्या घरी जेव्हा जेव्हा पूर्वी गप्पा मारण्यासाठी गेलो होतो, तेव्हादेखील त्यांचे बासरीवादन ऐकता आले. हत्तीची चित्रेही त्यांनी काढून दाखवली होती. सुमारे सतरा-अठरा वर्षांपूर्वी मुंबईला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये माझे एक व्याख्यान होते आणि तिथेच दुसर्‍या ठिकाणी अनिल यांचा लहान मुलांबरोबरचा कार्यक्रम होता. मुलात मूल होऊन ते ज्या पद्धतीने रंगले होते ते बघून, मीदेखील तिथे पंधरा-वीस मिनिटं बसलो होतो… मुले तर अनिलकाकांवर जामच खूष होती! पन्नासेक वर्षांपूर्वी ते रोज पुण्याच्या टिळक रस्त्यावर जाता-येताना दिसत. माझे वडील वसंतराव देसाई यांचे फर्निचरचे वर्कशॉप होते. लाकडाची खेळणी बनवण्यासाठी किंवा अन्य काही कलावस्तूंसाठी अनिलना विशिष्ट आकाराचे लाकडाचे ठोकळे लागत. माझ्या वडिलांचाही कलेकडे ओढा असल्यामुळे त्यांचे आणि अनिलचे उत्तम संबंध होते आणि त्यांच्याकडून अनिल वेगवेगळ्या आकाराचे लाकडी ठोकळे घेत असत. मी जेव्हा ‘मनोहर’ साप्ताहिकात लिहीत असे, तेव्हा अनिल हे तेथे लिहिणारे सर्वात महत्त्वाचे लेखक होते. त्यांच्या लेखनामुळे ‘मनोहर’चा दबदबा वाढला होता. अनिल हे ‘साधना’तही होते. हमीद दलवाई यांच्यासमवेत अनिल ‘पुरोगामी सत्यशोधक’चा अंक काढत. एकेक अंक अव्वल दर्जाचा होता. मराठीमध्ये रिपोर्ताज पद्धतीचे लेखन त्यांनीच प्रथम सुरू केले. समाजातील नाकारल्या गेलेल्या लोकांना त्यांनी आपल्या लेखनातून आवाज दिला. साधे, सोपे आणि अनलंकृत लिखाण कसे करावे, याचा अनिल अवचट हे आदर्श होते. अनिल यांच्या लिखाणास प्रत्यक्ष सामाजिक कार्याचीही( हमाल पंचायत, मुस्लिम सत्यशोधक मंडळ, मुक्तांगण) जोड होती, हे महत्त्वाचे. पुण्यात रोज संध्याकाळी चित्तरंजन वाटिकेत ते उमा कुलकर्णी आणि विरूपाक्ष कुलकर्णी फिरायला जात असत, तेथेही त्यांची गाठ पडली आहे. ‘साप्ताहिक सकाळ’ मध्ये अनिलने केलेले लिखाण अप्रतिम होते. महाराष्ट्रात बहुआयामी किंवा अष्टपैलू अशी व्यक्तिमत्त्वे खूप कमी आहेत. उदाहरणार्थ आचार्य अत्रे, पु ल देशपांडे वगैरे. चित्रकला, शिल्पकला, संगीत, ओरिगामी, लेखन, सामाजिक कार्य असे अनेक कंगोरे अनिल अवचट यांच्या व्यक्तिमत्त्वाला होते. त्यांच्यासारखा माणूस साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला नाही, म्हणून काहीही बिघडले नाही! मुख्यतः अनिल अवचट यांचेच काही बिघडले नाही… त्यांना ते नकोच होते.  आणि त्यामुळे त्यांचे मोठेपण कोणत्याही अर्थाने उणे ठरत नाही. एवढा गुणी आणि बुद्धिमान माणूस इतका साधा, सरळ, निगर्वी नि प्रांजळ कसा असू शकतो? ‘माणसं’ अशीही असू शकतात! अनिल अवचट यांना आदरांजली.

< >

अवलिया मित्राची एक्झिट – डॉ. कुमार सप्तर्षी

जगावेगळा हे विशेषण आपण सर्रास वापरत असलो तरी काही मोजकीच माणसं जगावेगळी असतात. त्यांच्यातलं हे वेगळेपण, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं प्रमुख अंग असतं. अनिलच्याबाबतीत तेच होतं. मनात येईल त्या गोष्टीत मग्न होऊन जाणं हा त्याचा स्वभावपिंड होता. जबाबदार्‍या त्याला गद्य वाटायच्या. साधी राहणीं हे त्याचं जीवनसूत्र होतं. कारण अत्यंत निरपेक्ष मनानं तो आयुष्य जगला. किंबहुना त्याची ती फिलॉसॉफीच बनली, की माणसानं स्वच्छंदी जगावं. प्रत्येक क्षण जीवंत जगायचा असं त्याचं तत्त्वज्ञान होतं. कुतुहल हा अनिलचा सर्वांत मोठा प्लस पॉईंट होता. यातूनच त्याच्या लेखनकलेला बहर येण्यास वाव मिळाला. त्याची लेखनशैली सोपी, सुटसुटीत असली तरी अंतर्मुख करायला लावणारी होती. जगण्यातील गुंतागुंत दर्शवणारी होती.

डॉ. अनिल अवचट हा माझा गेल्या ५० वर्षांपासूनचा मित्र. आम्हा दोघांचेही वडील डॉक्टर. अनिल माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान. १९६२ मध्ये आम्ही बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून अनिल अवचट आणि कुमार सप्तर्षी ही जोडी लोकांच्या मनात ठसली. आमचं स्वतंत्र नाव घेतलंच जायचं नाही इतकी ही मैत्रीची वीण घट्ट होती. त्यावेळी सायकल हेच मुख्य वाहन असायचं. स्कुटर अजून बाजारात आली नव्हती. त्यामुळं सायकलवर बसून तो मला सोडायला यायचा, मी त्याला सोडायला जायचो असा तो काळ. अनिलची पत्नी सुनंदा हीदेखील माझी वर्गमैत्रीण. आम्हा सर्वांचा त्यावेळी एक ग्रुपच होता. आम्ही तिथूनच एमबीबीएस झालो. पुढं युवक क्रांती दलाच्या स्थापनेमध्येही आम्ही साथीदार होतो. युक्रांदचा कलात्मक भाग अनिलचा होता; तर वैचारिक भाग माझा होता. १९७२ पर्यंत अनिल युक्रांदमध्ये सक्रिय होता. त्यानंतर त्यानं मला एकदा सांगितलं, की मला युक्रांदचे नैतिक परिणाम, विचारधारा आदी सर्व गोष्टी मान्य आहेत; पण त्यातून निर्माण होणारी जी जबाबदारी आहे, संघटना, माणसं…यामध्ये माझं मन रमत नाहीये. यावर मीही ठीक आहे म्हणून त्याला मुक्त केलं. युक्रांदमधून बाजूला झाला असला तरी आमच्यात अंतर कधीच आलं नाही. ‘युक्रांद’च्या चळवळीची पार्श्वभूमी त्याला सामाजिक विषयांवर लेखन करण्यासाठी उपयोगी पडली. कारण या चळवळीत काम करत असताना त्याला तळगाळातल्या समूहांचे दर्शन घडले. त्याच्या लेखनामध्ये या चळवळीच्या प्रेरणा आहेत, हे विसरुन चालणार नाही.

युक्रांदची स्थापना होण्यापूर्वी आम्ही साप्ताहिक दवाखाने चालवायचो. त्यासाठी सुनंदा आणि अनिल यांना नांदेडसारख्या भागात आम्ही पाठवायचो. त्यातूनच त्यांच्यातलं प्रेम जुळलं आणि पुढं ते एकमेकांचे जीवनसाथी बनले.

अनिलच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की त्याला जबाबदारी फार गद्य वाटायची. त्या-त्या क्षणाला ज्यामध्ये मग्न व्हावंसं वाटतंय त्यात समरसून जायचं हा त्याचा स्वभावपिंड होता. ही बाब उमगल्यानंतर त्याला आम्ही सांगितलं, की तुला जे आवडतं ते तू कर. विशेषतः यामध्ये सुनंदाचा वाटा फार मोठा होता. तिनं त्याला सांगितलं की तुला ज्यामध्ये मग्न व्हायचं आहे त्यात तू मग्न राहा. बाकी आर्थिक, कौटुंबिक जबाबदार्‍या मी सांभाळते. मग त्यानं शिल्पकला, चित्रकला, ओरीगामी या आधीपासूनच त्याच्यात असणार्‍या कलांना नवं आकाश दिलं आणि त्या बहरत गेल्या. चौकटी फोडून आकाशात उडणारा पक्षी हा युवक क्रांती दलाचा सिम्बॉल अनिलनंच तयार केलला आहे. आजही आमच्या पत्रकांवर तो आम्ही वापरतो.

अनिलचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही गोष्ट मग्न होऊन, मनापासून ओतून देऊन करायची. त्यामुळंच त्याच्या लेखणीलाही तेज होतं. यदुनाथ थत्ते ‘साधना’चे संपादक असताना त्यांनी आम्हाला युक्रांदतर्फे एक सदर चालवा असं सांगितलं होतं. ‘वेध’ नावाचं हे सदर अनिलच चालवायचा. यातून आमच्या विचारांचा प्रसारही होत असे. १९६८ ते ६९ अशी वर्षभर ही लेखमाला चालली. भवताली दिसणार्‍या छोट्या छोट्या विषयांवर तो लिहायचा. त्याचं लिखाण दुर्बोध नव्हतं. सोप्या शैलीत लिहायचा; पण थेट काळजाला हात घालणारी शैली हे त्यातलं वेगळेपण होतं. मला आठवतंय ‘वेध’ मधला पहिला लेख ‘स्वच्छ पुणे की सुंदर पुणे’ हा होता. त्यावरुन बरीच चर्चाही झाली होती. पुढं जाऊन अनिल ‘साधना’चा संपादकही बनला. पण राजा ढाले यांचा एक लेख ‘साधना’मध्ये प्रकाशित झाला आणि त्यातील काही मुद्दयांवरुन वादंग निर्माण झालं. साधनेवर मोर्चे काढले गेले. या सर्वांमुळे तो या परिघाबाहेर गेला. पण या प्रसंगामुळं त्याच्या लक्षात आलं की माणसांचा खेळ फार अवघड आहे. म्हणून आपल्याला जे वाटतं ते करायचं. किंबहुना त्याची ती फिलॉसॉफीच बनली, की माणसानं स्वच्छंदी जगावं. प्रत्येक क्षण जीवंत जगायचा असं त्याचं तत्त्वज्ञान होतं. एखाद्या भाषणाला जरी तो गेला तरी चित्रं काढत बसायचा, ओरीगामी करत राहायचा. या छंदांमधून, कलागुणांमधूनच त्याला परदेश दौर्‍यांची संधी मिळाली आणि या कलांना व्यापकत्त्व आलं.

एकदा मी त्याला विचारलं की, तुझ्या नेतृत्त्वाखाली मी जर एखादा सत्याग्रह सुरू केला आणि त्याच दिवशी जर भीमसेन जोशींचा गाण्याचा कार्यक्रम असेल तर तू काय करशील? तो पटकन म्हणाला, मी गाणं ऐकायला जाईन! साहजिकच संघटनेमध्ये असं चालत नाही. म्हणून मग आम्ही आनंदानं वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण आमची मनं सदैव जोडलेलीच राहिली. मध्यंतरी माझ्या मुलाचं लग्न झालं. त्यासाठी त्याला निमंत्रण दिलं होतं; पण तो आला नाही. दुसर्‍या दिवशी आला आणि माझ्या सूनबाईंना बासरी वाजवून दाखवली, चित्रं काढून दाखवली. असं त्याचं आगळंवेगळं व्यक्तिमत्त्व होतं आणि मी ते स्वीकारलं होतं. त्यानंही माझं व्यक्तिमत्त्व स्वीकारलेलं होतं. माझं चित्र तो रोमन सैनिक म्हणून काढायचा.

आणखी एक प्रसंग मला सांगावासा वाटतो. ज्याचा अनिलच्या लेखनावर दूरगामी परिणाम झाला. एस. एम. जोशींनी मला एकदा विचारलं, की बिहारमधील अत्यंत मागासलेला असलेल्या पूर्णिया जिल्ह्यामध्ये भूमीमुक्ती आंदोलनासाठी जायचं आहे, कुणाला पाठवशील? त्यावेळी मी अनिलला जायला सांगितलं. तिथल्या विदारक, दाहक वास्तवानं तो हादरून गेला. पुण्याला परतल्यानंतर त्यानं बर्‍याच दिवसांनी तिथले अनुभव लिहायला घेतले. ‘माणूस’मध्ये ते छापून आले. त्यावरुन ‘पूर्णिया’ हे त्याचं पहिलं पुस्तक आकाराला आलं. सोपी भाषा, सुटसुटीत वाक्यं, फोटोग्राफिक मेमरीनं ते अनिलनं लिहिलं. बाबा आढाव यांच्या ‘एक गाव एक पाणवठा’ चळवळीत त्यानं सहभाग घेतला होता. हमाल पंचायतीच्या कामात सहभागी झाल्यानंतर त्यानं हमालांवर एक फार सुंदर लेख लिहिला. तो वाचून हमाल त्यांचे प्रश्न घेऊन अनिलला भेटायला गेले. तेव्हा त्यानं सांगितलं की, मी आता तिखट कांडप करणार्‍या महिलांच्या क्लेशाबद्दल लिहितो आहे. असा हा अवलिया. त्याच्या नशीबानं त्याला त्या-त्या क्षणी जे वाटतं ते करायला मिळालं ! भवतालच्या आर्थिक, भौतिक जबाबदार्‍या कुणी ना कुणी पहात गेलं ! यामुळं त्याला आपलं एक वेगळं व्यक्तिमत्त्व आकारता आलं आणि वेगवेगळ्या कलांमधून ते फुलत गेलं. या सर्वाचा केंद्रबिंदू म्हणजे त्याचं साधं राहणं. त्याच्या अपेक्षा काहीच नसायच्या. सच्चा निरपेक्ष म्हणून त्याची ओळख होती. अनिलचा भाऊ सुभाष अवचट हा देखील भावाच्या पावलावर पाऊल टाकत चित्रकलेमध्ये आला; पण तो कमर्शिअल आहे. अनिलला कलेची प्रेरणा घरातून मिळाली. त्याची आई मोठमोठ्या रांगोळ्या काढायची.

कुतुहल हा अनिलचा सर्वांत मोठा प्लस पॉईंट होता. यातूनच त्याच्या लेखनकलेला बहर येण्यास वाव मिळाला. पूर्णिया, माणसं, कोंडमारा, धागे आडवे उभे, प्रश्न आणि प्रश्न, संभ्रम, धार्मिक अशी जवळपास ३८ पुस्तकं अनिलनं लिहिली. लेखनातून तो सर्वांचा लाडका झाला. कारण ही सर्वच पुस्तकं नुसती वाचनीय नव्हती तर अंतर्मुख करायला लावणारी होती. जगण्यातील गुंतागुंत दर्शवणारी होती.

साधारण महिन्याभरापूर्वी अनिलचं आणि माझं बोलणं झालं होतं. फोनवर तो म्हणाला होता, “अरे आपण आता अशा टप्प्यावर आहोत की कधीही निरोप घ्यावा लागू शकतो. तेव्हा आपण भेटलं पाहिजे.” मीही तात्काळ सांगितलं की, अरे नक्कीच ! पण मला तुझ्याकडचे जिने चढता येत नाहीत.’ यावर तो म्हणाला, ‘अरे मग मी येतो’. पण ती भेट झालीच नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0