स्वातंत्र्य, समता, मानवतेचे गीत गाणारा द्रष्टा

स्वातंत्र्य, समता, मानवतेचे गीत गाणारा द्रष्टा

संतांच्या भक्तिसंप्रदायाने बहुजन समाज एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न केला असला तरी धर्माच्या व जातिव्यवस्थेच्या प्रचंड रेट्यापुढे समाजातील अस्पृश्यता संपली नव्हती. त्यासाठी मार्क्सवाद, साम्यवाद, आंबेडकरवादी विचारसरणीचा संगम करून उपेक्षितांचे अंतरंग व बाह्यरंग बदलण्याचा पराकोटीचा प्रयत्न अण्णाभाऊ साठे यांनी सर्वप्रथम केला. हे वर्ष अण्णाभाऊ यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. त्या निमित्ताने विशेष लेख..

‘जग बदल, जाणुनी मार्क्स…’
पक्षांतराचे वारे, नेत्यांचे वातकुक्कुट
आमचे शुभमंगल

साहित्य व साहित्यकार यांचा प्रवास साधारणतः ‘व्यष्टी’ ते ‘समष्टी’ असा म्हणजेच व्यक्तीपासून सुरू होऊन समाजापर्यंत येऊन पोहोचतो. हा प्रवास सामान्य पातळीवरून असामान्यतेकडे पोहोचत असतो. काहीजणांचा हा प्रवास शीतल चांदण्यांच्या पायघडीवरून होतो, तर काही जणांना धगधगते निखारे ‘मस्तकावर’ व पायदळी घेऊनच हा प्रवास करावा लागतो. किंबहुना त्यांना या आगीत ढकलण्याचे काम समाज विनासायास करतो. साहित्यिक भाषेत याला आपण उच्चवर्णीय आणि प्रस्थापित समूह म्हणतात. हा समूह वर्षानुवर्षे एका उपेक्षित, वंचित समाजाला ‘शापित’ म्हणून जगायला भाग पाडतो. याच्या मुळाशी चातुर्वर्ण्यव्यवस्था, धर्मव्यवस्थेचे आंधळे अनुकरण, जातीमुळे हातात आलेली सत्तेची मग्रुरी असे अनेक अदृश्य व दृश्य पैलू काम करत असतात. भारतीय समाजाला लागलेल्या या ‘जातिव्यवस्थेच्या’ भुंग्याने अनेक आयुष्य पोखरून काढली. आपल्या वाट्याला आलेले हे संचित ‘वाणी’ व लेखणीच्या जोरावर बदलण्याचा प्रयत्न अनेक लेखकांनी केला. त्यामध्ये ‘अण्णाभाऊ साठे’ यांचे नाव आदराने घ्यावे लागते.
१ ऑगस्ट १९२० रोजी जन्माला आलेल्या ‘अण्णाभाऊ साठे’ यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. १९२० ते २०२० असा १०० वर्षांचा कालखंड ओलांडून गेला तरीही अण्णाभाऊंच्या साहित्याला लागलेला उपेक्षितांचा शाप अजूनही पुसला जात नाही.
जातीयवादाचे ‘मूळ आणि खूळ’ माणसाचे अस्तित्वच मिटवून टाकते इतपत आपण मान्य करू शकतो. पण त्याचे लेखन, त्याची कला यांवरही जेव्हा जातीयवादाचे सावट येते तेव्हा खऱ्या अर्थाने कलाविश्व अंधारून येते. महाराष्ट्राची भूमी ही जशी ‘संतांची भूमी’ म्हणून ओळखली जाते तशीच ती कष्टकरी, उपेक्षित, जनसामान्यांच्या हुंकार आणि हुंदके यांनी गजबजलेली भूमी म्हणूनही ओळखली जाते. संतांनी आपल्या अभंगातून, विचारातून ‘धर्मनिष्ठेचे बाळकडू’ महाराष्ट्रातील जनतेला पाजले. तर उपेक्षितांनी संघर्ष, वर्णवाद, अन्याय यांच्या ज्वलंत अनुभवाने नटलेले समतेचे, क्रांतीचे गीत गायले. संतांच्या भक्तिसंप्रदायाने बहुजन समाज एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न केला असला तरी धर्माच्या व जातिव्यवस्थेच्या प्रचंड रेट्यापुढे समाजातील अस्पृश्यता संपली नव्हती. त्यासाठी मार्क्सवाद, साम्यवाद, आंबेडकरवादी विचारसरणी या तिन्हींचा संगम करून उपेक्षितांचे अंतरंग व बाह्यरंग बदलण्याचा पराकोटीचा प्रयत्न अण्णाभाऊंनी सर्वप्रथम केला.
लेखकाचे लेखन हे भवतालचा संदर्भ देणारे व त्याच्या समाजाच्या नाळेशी घट्ट नाते जोडणारे असते. अण्णाभाऊंचा जन्मच मुळी उपेक्षितांच्या जगात झाला. हे उपेक्षितांचे जगच अण्णाभाऊंच्या साहित्याचे बलस्थान ठरले व हेच त्यांचे बहिष्काराचे स्थानही ठरले. कारण हा बहिष्कार अण्णाभाऊ ज्या जातीत जन्माला आले त्या जातीवर होता व पर्यायाने त्यांच्या साहित्याच्या वाट्यालाही आला. पण तरीही या विरोधाकडे लक्ष न देता ही उपेक्षितांची रंजली गांजलेली माती अण्णाभाऊंनी मनसोक्तपणे प्रस्थापितांच्या ‘सदाशिवपेठी’ साहित्यात उधळली आणि मराठी वाङ्मयसृष्टीला एक नवे वेगळे वळण मिळाले. या वळणावरील जनताही गोरीगोमटी, स्वच्छ, कल्पनेत रमणारी नसून गावकुसाबाहेरील, सर्वहारा, शोषित, पिढीत होती. त्यांचे जगणेही घुसमटलेले, दबलेले होते. त्यांना पांढरपेशा मध्यमवर्गीय व्यवस्थेत अण्णाभाऊंनी त्रागा व आक्रोश न करता इतक्या अलगदपणे आणून सोडले की प्रस्थापितांमध्ये वैचारिक, सांस्कृतिक खळबळ उडाली. या लोकांना या साहित्यातील ‘अनुभवाला’ नाकारण्याचे किंवा स्वीकारण्याचे ‘संभ्रमित दडपण’ निर्माण करण्याचे काम अण्णाभाऊंनी बेमालूम केले. त्यांच्या मुळाशी मार्क्स, मॅक्झिम गोर्की, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार असले तरी या अनुभवाची मूस ही स्वतः अण्णाभाऊंनी अनुभवली होती.

मांग या अस्पृश्य समजल्या जाणार्या जातीत त्यांचा जन्म झाला. अण्णाभाऊंचे खरे नाव ‘तुकाराम’ होते. संत तुकारामाच्या आयुष्यातील संघर्ष, विद्रोह, परिवर्तनवादी विचाराला झालेला विरोध ‘या’ तुकारामाच्या वाट्यालाही आला. ब्रिटिशांच्या सारख्या झडत्या, अटकसत्र याने कंटाळलेल्या अनेक मांग तरुणांनी मुंबईची वाट धरली. अण्णाभाऊंचे वडीलही मुंबईला मजूर म्हणून इंग्रजांच्या घरी बागकाम करत होते. अकरा वर्षाच्या तुकारामाला आईने शाळेत घातले. एक दिवस काहीही न लिहिता अण्णाभाऊ फक्त मास्तरांकडे पाहात बसले. दुसऱ्या दिवशी सकाळी मास्तरांनी, “तुझी पाटी कोरीच आहे” असे म्हणून छोट्या तुकारामाची बोटे अक्षरशः लाकडी रुळाने चेचून काढली. बोटांची झालेली आग अण्णाभाऊंच्या मस्तकात गेली व तीच आग पुढे अण्णाभाऊंच्या साहित्यात दिसून आली. एक मोठा दगड मास्तरांच्या छातीत मारून तिथून पळ काढून ते घरी आले ते परत शाळेचे तोंड न पाहण्याचा निर्धार करून! अशी अवघ्या दीड दिवस शाळेची पदवी घेतलेल्या याच तुकारामाने पुढे जीवनाच्या विद्यापीठात अनेक पदव्या मिळवल्या. छोट्या तुकारामाला एकीकडे गावातील श्रेष्टी-प्रतिष्ठित धनिकांच्या घरी भरलेली धान्यांची कोठारे दिसत. तर अन्नाचा कणही नसलेली वस्तीतल्या लोकांची रिकामी गाडगीमडगी सुद्धा दिसत होती. या जगण्याच्या विरोधाभासाने त्यांचे कोवळे मन भांबावून जात असे. हीच विषमता आक्रोश न करता त्यांनी साहित्यात मांडली.
जन्माने प्राप्त झालेली परिस्थिती नाकारण्याचे, झिडकारण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे व प्रत्येकजण आपापल्या क्षमतेनुसार व विचारधारेनुसार ते करत असतो. अण्णाभाऊंनीही तेच केले. ‘वाटेगावला’ जन्माला आलेल्या या छोट्याशा मुलाने जेव्हा ‘वाटेगाव’ ते मुंबई हा प्रवास वडिलांबरोबर पायी चालत केला. येतायेता वाटेत बापलेकांनी टाटाच्या पाणीपुरवठा योजनेच्या नळासाठी बोगदे खणण्याचे काम केले.कल्याणच्या रेल्वेवर कोळसा उतरवण्याचे काम केले. नंतर मुंबईत आल्यावर कसलाही आधार नसलेला तरुण जे करतो तेच त्यांनी केले. पोट भरण्यासाठी येथील यंत्राशी जवळीक केली. पण आतील कलाकार काही वेगळेच ‘मंत्र’ त्यांच्या मेंदूत गुणगुणत होता. येथील कामगार चळवळीशी संपर्क आल्यावर हळूहळू ते समतेचे, क्रांतीचे पोवाडे गुणगुणू लागले. येथेच त्यांच्या मानवतावादी व्यक्तिमत्वाचा, परिवर्तनवादी साहित्यकाराचा खऱ्या अर्थाने जन्म झाला व त्यांच्यातील साहित्यिक कलाकार तयार झाला.

कार्ल मार्क्स हा अण्णाभाऊंचा ‘वैचारिक आदर्श’. त्यामुळे मार्क्सवादी चिंतन गाणारी पात्रे, सम्यक क्रांतीचे पोवाडे गाणारे नायक त्यांनी चितारले. त्यांच्या समग्र साहित्यातील व्यक्तीसमूह हा शहरी किंवा ग्रामीण असला तरी तो ‘कष्टकरी समाज’ होता. वर्गसंघर्षाच्या तत्वज्ञानाबरोबर, भाकरीच्या चतकोर तुकड्यासाठी संघर्ष करणारा, आपलं अस्तित्व टिकवू पाहणारा, स्वातंत्र्य, समता, मानवता यांचे गीत गाणारा व्यक्तीसमूह हा त्यांच्या रांगड्या वृत्ती-प्रवृत्ती, राग-लोभ, मोह-वासना यासकट जशाच्या तसा अण्णाभाऊंनी मांडला.

इतिहासातील होऊन गेलेल्या वीरपुरुषांचे पोवाडे गाणाऱ्या जनतेला त्यांनी मुंबईतील कामगारांसारख्या दुःख, दैन्य वर्गसंघर्षामुळे पिचलेल्या सामान्य माणसाचे पोवाडे गायला भाग पाडले. याचे कारण इतिहासापेक्षा वर्तमानाचे गीत गावूनच सम्यक क्रांती घडवता येईल हे अण्णाभाऊंनी जाणले कारण ते स्वतः उपेक्षित, शापित समूहाचे प्रतिनिधित्व करणारे होते. अण्णाभाऊंनी ३० कादंबऱ्या व जवळजवळ अडीचशे ते तीनशे कथा लिहिल्या. त्यांचे साहित्य हे मराठी भाषेपुरतेच मर्यादित न राहता १४ भारतीय भाषात तसेच जर्मन, इंग्रजी, झेक, रशियन इत्यादी परकीय भाषात त्यांच्या साहित्याची भाषांतरे झाली. काही कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले. अण्णाभाऊंनी विविध साहित्यप्रकार हाताळले. उपेक्षितांचे सारे भोग त्यांनी कथा, कादंबरी, लावण्या, पोवाडे, गीत, छक्कड या विविध प्रकारातून वाचकांपुढे ठेवले. महाराष्ट्रातील ग्रामीण समाजजीवन दर्शनाबरोबरच तळागाळातील उपेक्षित माणूस अण्णाभाऊंनी तळहातावर अलगद घेतला. त्यांचे अगदी जमिनीच्या खाली दाबून टाकलेले हुंकार त्यांनी निर्भीडपणे साहित्यात आणले. त्यामुळे ”उपेक्षितांचे साहित्यकार” असा शिक्का देण्याचं काम समकालीन लेखकांनी शीघ्रतेने केले. खरंतर अण्णाभाऊ जातीयवाद, वर्णवादावर लक्ष केंद्रित करुन लेखन करत नव्हते तर “परिवर्तनवादी सम्यक क्रांतीची” अपेक्षा ठेवून आपले आपले लेखन करत होते. हे कळण्याऐवढा मोठेपणा उच्च, ब्राह्मणवादी दुटप्पी समाजाकडे नव्हता. त्यामुळेच त्यांच्या समाजासारखे त्यांचे साहित्यही ‘अनटचेबल’ ठेवण्याचे काम जाणीवपूर्वक एक ठराविक समूह शांतपणे करत होता.
उपेक्षितांचे शापीत जग रंगवणाऱ्या या कलाकाराला जाणूनबुजून साहित्याच्या मुख्य प्रवाहातून वगळले जात होते. याबाबत एक आठवण सांगितली जाते. कुसुमावती देशपांडे यांनी लिहिलेल्या “मराठी कादंबरी पहिले शतक १८५० ते १९५०” या इतिहासात अण्णाभाऊंच्या एकाही कादंबरीचा उल्लेख केला गेला नाही. हे दुःख त्यांना झोंबले. त्यांनी एके ठिकाणी याबाबत दुःख व्यक्त करतांना म्हटले, ‘एवढा मोठा १०० वर्षांचा इतिहास लिहिला. बरा लिहिला, चांगला लिहिला असं पुण्या-मुंबईकडं विद्वान साहित्यिक बोलतात. पण बाईला माझी एकही कादंबरी दिसली नाही”. हे दुःख त्यांना आतून हलवून टाकत होते. लौकिकार्थाने याचसाठी अण्णाभाऊंना कधी यश मिळाले नाही. निराशेचा गडद अंधार त्यांच्याभोवती वाढू लागला. त्यातूनच व्यसनाकडे वळलेल्या अण्णाभाऊंवर टीका होऊ लागली. त्यात एक समाधान की त्यांच्या कादंबरीवर चित्रपटही झाले. ‘फकिरा’ कादंबरीवर चित्रपट काढतांना आलेले अपयश, कर्जाचे डोंगर यामुळे अण्णाभाऊ प्रचंड ताणातून गेले. आर्थिक चणचण भासू लागली.
वैयक्तिक, सामाजिक,आयुष्यातील अपयशाने ते खचून गेले. अनेक पुस्तके लिहिणारा हा लेखक आर्थिकदृष्ट्या फार भयानक परिस्थितीतून गेला. शेवटी-शेवटी त्यांची कादंबरी केवळ २०० रुपयेंना विकण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. त्यांना उपेक्षित करून शापित ठरवणाऱ्या एका समूहाचे खरंतर हे अप्रत्यक्ष ‘यशच’ होते व एका सच्च्या कलाकाराचे अपयश!!
मात्र ज्या महाराष्ट्रात त्यांनी हालअपेष्टा सहन केल्या, अतिशय संघर्षमय जीवनाचा सामना केला त्या महाराष्ट्रावर नितांत प्रेम करण्याचा निरागस भोबडा भाव त्यांच्या अनेक गीतात दिसतो.

एके ठिकाणी ते म्हणतात-

महाराष्ट्र मायभू आमची
मराठी भाषिकांची,
संतमहंतांची
ज्ञानवंताना जन्म देणार,
नवरत्नाचे दिव्य भांडार
समरधिर घेत अवतार,
मराठा मानी दिलदार.

खरा कलावंत हा निरागस, राग-लोभ-द्वेषाच्या पलीकडे विचार करतो म्हणूनच त्याच्या हातून अजरामर कलाकृती घडतात. अण्णाभाऊंच्या आयुष्यातील दुःख, संघर्षाने अण्णाभाऊ उग्र, आक्रोशी झाले नाहीत. उलट याच दुःखाला पाठीशी घेऊन त्यांनी शब्दरूपी तलवार वर्गसंघर्षावर चालवण्याचा प्रयत्न केला. शांततेची मशाल त्यांनी हाती घेतली. म्हणूनच त्यांच्या गीतांमध्ये मुंबईच्या मायानगरीला मोहून गेलेला तरुण दिसत नाही तर विषमता आणि शोषणावर प्रहार करणारा तरुण दिसतो. तो तरुण आपल्याला ठणकावून म्हणतो…

लाल झेंडा घेऊनी हाती
करावयाला क्रांती, मजुरांची पिढी
नवी पाऊले टाकती.

हा वर्णसंघर्ष व वर्गसंघर्षाविरुद्धचा आशावाद अण्णाभाऊंच्या साहित्याला नक्कीच एका वेगळ्या वाटेने घेऊन जातो. मुक्ती व परिवर्तनवाद या दोनच सूत्रात मानवी जीवन अतिशय संयमीपणे अण्णाभाऊंनी गुंफले. मार्क्सवादी तत्वज्ञानाला मूळ स्वरूपात प्रकट करणारे एकमेव नाटक म्हणजे अण्णाभाऊंनी लिहिलेले ‘ईनामदार’ हे नाटक होय. मार्क्सवादी तत्वचिंतन आणि साताऱ्याकडील दऱ्याखोऱ्यात आढळणारी अस्सल मराठी माणसाची जिवंत कथा या दोनोंचा मिलाफ करून आपले आवडते तत्वज्ञान जिवंत ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न अण्णाभाऊनंतर क्वचितच कुणी केला असेल. सावकार, कर्ज, व्याज, ब्राह्मणांचा धर्मश्रद्धावाद यावर अतिशय मार्मिकपणे भाष्य या नाटकामध्ये आढळते. “तू गुलाम नाहीस तर वास्तव जगाचा निर्माता आहेस” हे तळागाळातील माणसाला आत्मविश्वासपूर्ण भाषेत सांगण्याचे कामच अण्णाभाऊंनी केले नाही तर तो आत्मविश्वास अनेक कामगार, कष्टकरी जनतेने आपल्या उरात साठवून ठेवला. हेच अण्णाभाऊंच्या साहित्याचे यश आहे. त्वेषापेक्षा, द्वेषापेक्षा, ‘होष ‘ ठेवून लढा देता येतो हे अण्णाभाऊंनी आपल्या साहित्याद्वारे दाखवून दिले.
बहुसंख्य, उच्च समाजाच्या दुटप्पी, दांभिक, धार्मिक धोरणामुळे एक मोठाच्या मोठा समूह मुका, आंधळा आणि बहिरा झाला. या सगळ्यांना ‘कायावाचा मनसैंद्रियाने’ समाजापुढे अस्सल रुपात आणण्याचे काम सर्वप्रथम अण्णाभाऊंनी केले. त्यानंतर अनेक लेखकांनी उपेक्षितांचे अंतरंग साहित्यात निर्भीडपणे मांडले. पण याची मुहूर्तमेढ अण्णाभाऊंसारख्या एका मनस्वी माणसाने रोवली. यासारखी अवर्णनीय घटना मराठी साहित्यविश्वात दुसरी नाही.

‘अनटचेबल’ असणाऱ्या एका व्यक्तीने एवढे ‘टचिंग रायटिंग’ करणे हाही तत्कालीन समाजाला ‘धक्का’ होता. पण या विरोधातही आपले अस्तित्व टिकवणाऱ्या या लढवय्याला मानाची जागा मराठी साहित्यात जाणीवपूर्वक दिली गेली नाही. कित्येक पिढ्या निरक्षर असलेल्या, अक्षरांशी संबंधही नसलेल्या जगात जन्म घेऊनही अक्षरांवर, शब्दांवर एवढा मालकी हक्क सांगणाऱ्या या अवलियांनेच तमाशाकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलवला व त्याचे ‘लोकनाट्य’ असे नामकरण केले व या कलेकडे बघण्याचा लोकांचा तुच्छ भाव बदलवून टाकला.
‘हजार दिवस मेंढर होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगूया, पायांच्या टाचांवर लढुया’, ही प्रेरणा त्यांनी संपूर्ण साहित्यातून उभी केली. ‘आम्हाला भूमीच’ नाही तर आम्ही विशाल लेणी खोदायची कुठे?’ हा अप्रत्यक्ष पण वास्तव सवाल समग्र वाचकांना विचारण्याचा आग्रह त्यांच्या साहित्यातून नेहमीच होत राहिला व त्याचे उत्तर शोधण्याची जबाबदारी अन्यायग्रस्त आणि अन्याय करणारे या दोघांवरही सोपवण्याचे ‘कसब’ त्यांच्या संपूर्ण साहित्यामध्ये ताकदीने आजही उभे आहे.

भुकेला कोंडा निजेला धोंडा
बदल ही दुनिया सारी
ही तुझीच धरतीमाता तूच विश्वाचा निर्माता
परी होऊनी तू भिकारी झुरशी अंतरी
उठ वाजवीत रणभेरी बदल ही दुनिया सारी.

वरील पोवाड्यातील परिस्थिती आजही तशीच आहे, यासारखे भयाण वास्तव ‘आत्मनिर्भर’ बनू पहाणाऱ्या तरुणांनी लक्षात घ्यावे व खऱ्या अर्थाने अण्णाभाऊंच्या तळमळीला व चळवळीला दिशा द्यावी. अण्णाभाऊंच्या पोवाडा व लावणी यासारख्या लोककलेच्या साहित्यप्रकारामुळे अण्णाभाऊ घराघरात पोहचले.
“माझी मैना गावाकडे राहिली” हे गीत लिहिणारे अण्णाभाऊ एवढीच अल्प व दुर्दैवी ओळख नवीन पिढीला आहे यात आनंद मानायचा की खेद हा प्रश्न आहे
खरंतर कथा, कादंबरी, पोवाडे यांच्या विषयाला मर्यादा असतात. मात्र अण्णाभाऊंचे साहित्य काळावर मात करून दिमाखाने उभे आहे. पण काही विशिष्ट वर्गाने आजही या दिमाखाच्या झगमगाटाने आपले डोळे बंद केले आहेत. गावकुसाबाहेरील माणूस कुंपणाच्या आत आला तरी आपल्या मेंदूभोवतीचे कुंपण काही विशिष्ट वर्ग आजही मजबूत करून आहे. म्हणूनच ‘फकिरा’ या केवळ एका कादंबरीला पुरस्कार मिळाला पण बाकी साहित्याकडे केवळ वाचक म्हणून बघावे एवढीही अपेक्षा त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकली नाही.
श्रेष्ठ व सकस साहित्य म्हणजे काय? हे कोणी ठरवावे? याचा अधिकारही जातीबद्ध झाला व अण्णाभाऊंसारखे अनेक उपेक्षित साहित्यकार शापित झाले. साहित्याला साहित्यकारापासून वेगळे करणे जातीच्या गुलामांना जमले नाही. खरंतर प्रस्थापितांनी माणसाला देव व दानव याच रुपात मांडले. पण अण्णाभाऊंनी माणसातील दडपून टाकलेले ‘मनुष्यत्व’ मांडले. ‘स्त्री’लाही त्यांनी लिंगभेदभावापासून वेगळे करून माणूस म्हणून नायिकेच्या रुपात उभे केले. पारंपरिक साहित्यात स्त्रीला भोगदासी अथवा त्यागाची देवी बनवलेल्या समकालीन साहित्यिकांनाही संघर्ष करणारी, करारी, लढाऊ, स्वयंभू स्त्री नवीन होती. त्यांच्या अनेक कथांमधील स्त्री ही जीवनाच्या विविध पातळ्यांवरील संघर्ष एकाकीपणे लढते. या लढाईत लौकीक अर्थाने ती हरली तरी मानसिकदृष्ट्या खंबीर स्त्री अण्णाभाऊंना उभी करणे आवश्यक वाटली.
मराठी साहित्याची वाटचाल पाहता एक गोष्ट लक्षात येते की साहित्यलेखन व वाचकप्रक्रियेत प्रामुख्याने लेखक-वाचक यांवर शहरी प्रभाव जास्त आहे. त्यामुळे लेखनाचा केंद्रबिंदू नेहमीच शहरी राहतो. अण्णाभाऊंचा साहित्यिक समाज मात्र तळागाळातील वंचित समाज राहिला. त्यामुळे त्याला एकप्रकारे खरेपणाचा पक्का रंग चढत गेला. काळ्या रंगाचा पक्केपणा साहित्यातही दिसून आला. हा काळा रंग विषमतेचा, अन्यायाचा होता. यावर अतिशय संयतपणे त्यांनी आपली शब्दरूपी तलवार चालविली. आपल्या चाकोरीबाहेरच्या लेखकाला उपेक्षेने, उपहासाने मारण्याच्या कलेला दुर्दैवाने ‘समीक्षक’ असे म्हणतात. (मराठीत किती समीक्षक तटस्थ आहेत किंवा गटबाजी करणारे नाहीत हा प्रश्न आहेच.) या समीक्षकमंडळींनी उपेक्षितांच्या साहित्यावर ‘नावडते’ हा शिक्का मारण्याचे काम यशस्वीपणे केले. ज्यावर फार काही समीक्षक लिहीत नाहीत ते पुरस्कारप्राप्त लेखन नव्हे हा पारंपरिक भ्रम या समीक्षकांनी जाणीवपूर्वक सांभाळला व एका श्रेष्ठ साहित्यकाराचे साहित्य खरोखरच श्रेष्ठ साहित्य होण्याच्या प्रक्रियेवर हेतुपूर्वक दुर्लक्ष केले गेले. समीक्षक हा लेखक व वाचक यातील दुवा असतो. हा दुवाच कापला गेला. त्यामुळे लेखनाच्या २०-२२ वर्षाच्या कालखंडात उपेक्षा, मान-अपमान, अवहेलना या चक्रात अण्णाभाऊ गोल-गोल फिरत राहिले. खऱ्याखोट्याची परीक्षा न करता आल्यामुळे माणसं ओळखण्यात अण्णाभाऊंना अपयश आले.

अण्णाभाऊंचा दुर्देवी अंत सांगताना एके ठिकाणी श्रेष्ठ कवी नारायण सुर्वेंनी सांगितलेली आठवण तर भयावह आहे .
‘अवघे एकोणपन्नास वर्षे आयुष्य व मरताना घरात अंगावर घालायला चादरही शेजारच्या बाईने आणलेली, साक्षीला भकास चेहऱ्याने बघणारा मॅक्झिम गोर्कीचा पुतळा बस! एवढेच मृत्यूचे साक्षीदार.’
एखाद्या शापित राजकुमाराप्रमाणे या लेखकाचा करूण अंत मन हेलावून सोडतो.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: