२५ वर्षे समाजासाठी खस्ता, मते फक्त १,२२४ मते?

२५ वर्षे समाजासाठी खस्ता, मते फक्त १,२२४ मते?

‘मी कम्युनिस्ट आहे. वयाच्या २३ व्या वर्षी मी कम्युनिस्ट मॅनिफेस्टो वाचला. आता मी ५८ वर्षांचा झालोय. सगळं बदललंय. लोकांना कम्युनिझम म्हणजे स्वप्नाचा चुराडा वाटतोय. पण मी क्रांतीवर विश्वास ठेवतोय. तीच माझ्या आयुष्याच्या दृष्टीने एक आशा आहे. - नटवर देसाई

ट्रम्प अहमदाबाद भेट : ४५ कुटुंबांना झोपड्या खाली करण्याचे आदेश
२००२ मधील गुजरात दंगलींचा निवडणुकांशी संबंध?
अहमदाबादेतील व्हेंटिलेटरचे गौडबंगाल आणि भाजपचे लागेबांधे

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा (सीपीआय) एक नेता नटवर देसाईसोबत मी होते. गुजरातमधील अहमदाबादनजीकच्या अमराईवाडी विधानसभा पोटनिवडणुकीत ते सीपाआयकडून उमेदवार म्हणून उभे होते. अहमदाबादच्या एका झोपडीत ते एका खोलीत राहतात. सामान्य कम्युनिस्ट कार्यकर्ता जसा राहतो तसे देसाई जगतात.

ते गरीब आहेत. गेली २५ वर्षे ते दंगलग्रस्त, स्थलांतरीत, दलित, कष्टकरी, मजूर यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी धडपडत आहेत. जेव्हा साबरमती नदीचा भाग मोकळा करण्यासाठी या नदीच्या किनारी असलेली प्रचंड झोपडपट्‌टी सरकारने हटवण्यासाठी सुरूवात केली होती तेव्हा देसाई या झोपडपट्‌टीवाल्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरले होते. त्यांनी सरकारच्या विरोधात गुजरात उच्च न्यायालयात अनेक खटले दाखल केले आहेत. ते माहिती अधिकार कार्यकर्तेही आहेत. जातव्यवस्थेच्या विरोधात ठामपणे उभे राहणारे, सामाजिक न्यायाच्या बाजूने सतत आवाज उठवणारे नटवर देसाई हे एक लोकप्रिय नेते आहेत.

गेली २५ वर्षे सार्वजनिक जीवनात काढल्याने त्यांची प्रतिमा पारदर्शी असली तरी मतांसाठी केलेल्या राजकारणात ते अपयशी ठरतात. नुकत्याच झालेल्या अमराईवाडी विधानसभा पोटनिवडणुकीत नटवर देसाई यांना केवळ १,२२४ मते तर भाजपचे नेते जगदीश पटेल यांना ४८,६५७ मते पडली.

अमराईवाडी मतदारसंघ हा तसा ‘लेबर बेल्ट’ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात गिरणी कामगार, दलित व अन्य जातींचा कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि येथील बहुसंख्य मतदार हा भाजप सरकारच्या कारभारावर पूर्णपणे नाराज आहे. आर्थिक मंदी व नोटबंदीने गुजरातमधील कारखानदारीवर मोठा आघात केला आहे. त्यात लघु उद्योगांची अवस्था अत्यंत दयनीय अशी आहे. गुजरातमधील बहुसंख्य मतदारांमध्ये राज्य सरकारविषयी प्रचंड असंतोष आहे. पण असे चित्र असूनही दुर्दैवाने अमराईवाडीमध्ये भाजपचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आला. तर ज्याला लोकनेता म्हटले जात होते त्या नटवर देसाई यांना जेमतेम हजाराच्यावर मते मिळाली.

सीपीआयला हे अपयश का मिळाले? या पक्षाला तळागाळातल्या समाजाला आपलेसे करताना काय प्रश्न भेडसावत होते? हा पक्ष केरळ व बंगालच्या बाहेर आपला का विस्तार करू शकत नाही?  असे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न भारतातील डाव्यांनी आता मनावर घेतले पाहिजेत.

नटवर देसाई हे काही कम्युनिस्ट विचारवंत नाहीत. पण व्यापारी वृत्तीच्या एका राज्यात मानवी विकासाच्या दृष्टीकोनातून सामान्यांच्या हितासाठी झगडणारा तो कट्‌टर मार्क्सवादी कार्यकर्ता आहे. भांडवलशाहीच्या घोडदौडीला रोखण्याचा प्रयत्न करणारा तो एक नेता आहे. कम्युनिस्ट विचारसरणीने समाजपरिवर्तन होईल यावर विश्वास ठेवणारा तो कार्यकर्ता आहे. नटवर देसाई यांनी सुरुवातीला सफदर हाश्मींसोबत काम केले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे लाभ सर्व सामान्यांपर्यंत पोहचावे म्हणून त्यांचा संघर्ष सुरू झाला. तो आजही आहे.

आपल्याला निवडून द्यावे यासाठी देसाई यांनी तीनवेळा मतदारांची घरोघरी जाऊन गाठभेट घेतली होती. पण त्याचे मतात रुपांतर झाले नाही.

‘वयाच्या २३ व्या वर्षी मी कम्युनिस्ट पार्टीचा सदस्य झालो’, असे नटवर देसाई उत्साहात सांगतात.

‘रशियन राज्यक्रांतीच्या घोषणा, समता सांगणारी मार्क्सवादी विचारसरणी व कम्युनिस्टांची साधी राहणी याकडे मी आत्कृष्ट झालो. मी आठवीपर्यंत शिकलो. पण तरीही मी स्थलांतरीत कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक वर्ग घेण्यासाठी रोज माझ्या घरापासून सायकलने १८ किमी अंतर कापायचो.  अमराईवाडी ते हेबातपूर या रस्त्यावरची फेरी ३६ किमी होत असे. नंतर एका एनजीओने मुलांसाठी शाळा उघडल्यानंतर माझे काम थांबले. पण जातपात, धर्म न पाहता लोकांच्या हिताचे काम करणे त्यांचे प्रश्न सोडवणे, याला मी प्राधान्य देत गेलो.”

‘मग तुम्ही एवढे लोकप्रिय होता तर त्या लोकप्रियतेचे रुपांतर मतांमध्ये का झालं नाही?’ हा माझा प्रश्न मला स्वस्थ बसू देत नव्हता.

देसाई हसतात व सांगतात,‘माझ्या पराभवाला अनेक कारणे आहेत. सर्वात पहिले कारण म्हणजे पैसा. भाजपने या मतदारसंघात तीन कोटी रु. खर्च केला तेवढाच काँग्रेसच्या उमेदवाराने. मी फक्त एक लाख ६० हजार रु. खर्च करू शकलो. पक्षाच्या गुजरात शाखेने मला २० हजार रु. दिले. बाकी काही पैसे माझ्या मित्रांनी उभे केले. तीन कोटींशी मी कसा सामना करू शकतो?’

‘दुसरे कारण म्हणजे भाजपने निवडणुकीदरम्यान जात व धर्माचे राजकारण सुरू केलं. या मतदारसंघात सौराष्ट्र, मेहसाण्यातील पटेल समाजाचे नेते आपल्या नातेवाईकांना येऊन भेटू लागले. अशा तऱ्हेने पटेल अस्मितेचे राजकारण सुरू झाले. मी दलित आहे. पण मी मार्क्सवादी असल्याने मी जातीचे कार्ड निवडणुकांत वापरू शकत नाही. जर मी ते वापरायचं ठरवलं तर मनुवादी व मार्क्सवादी यात फरक काय राहिला?’

“तिसरे कारण म्हणजे येथे धुव्रीकरणही सुरू झाले. धुव्रीकरण झालेल्या समाजात वर्गजाणीवा उभ्या करणे अत्यंत कठीण असते. हा माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असल्याने डाव्या पक्षांच्या नेत्यांनी या प्रश्नाकडे पाहिले पाहिजे. समाजात श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी वेगाने वाढत असताना डावे पक्ष लोकांमध्ये आपले जाळे बांधण्यास अपयशी ठरत आहेत. पक्षाकडे लोकांच्या हिताचे मुद्दे असतात, आमच्याकडे दिल्लीत नेतेही आहेत.’

‘पण डाव्यांची देशव्यापी मोहीम, चळवळ नाही. आम्हाला प्रत्येक खेड्यात एक नेता तयार करावा लागेल. त्याला लोकांमध्ये काम करावे लागेल, कष्टकरी, शेतकरी, मजुरांची आंदोलने उभी करावी लागतील, त्यांच्यामध्ये वर्गजाणीवा निर्माण कराव्या लागतील. पण ही प्रक्रिया प्रदीर्घ स्वरुपाची आहे. पण ही सुरू करावी लागेल.’ असे देसाई सांगतात.

नटवर देसाई यांच्या बोलण्यात कुठेही पराभवाचे शल्य नाही. ते लोकांचे राजकारण करण्यासाठी अजूनही तयार आहेत. ते काम सुरूच आहे. भूक-गरीबीचे राजकारण एक दिवस धर्म व जातीच्या राजकारणापेक्षा वरचढ ठरेल असा विश्वास त्यांच्या बोलण्यातून जाणवतो.

मी त्यांच्याशी बोलून निघाले असताना त्यांनी माझ्या हातात एक माहितीपत्रक ठेवले. ते पक्षाचे पत्रक होते. त्यावर बालीकोयत्याचे पक्षचिन्ह होते. ‘आमचे पक्षचिन्ह पाहा, किती सुंदर आहे..’ नटवर देसाई यांच्या डोळ्यात एक प्रचंड आशावाद होता. माझ्या आयुष्यात मी एखादा कार्यकर्ता त्याचे पक्षचिन्ह पाहून आशावादी राहतो हे कधी पाहिले नव्हते.

‘हे चिन्ह माझ्या आयुष्यासोबत आहे. ते हृदयात आहे. आम्ही पुन्हा येऊ, हिंमत हरलेली नाही,’ असे सांगत नटवर देसाई यांनी मला लाल सलाम केला.

२५ वर्षे समाजासाठी खस्ता खाणाऱ्या माणसाला फक्त १,२२४ मते पडतात हा प्रश्न मला सतावत होता.

कन्हैया हा आणखी एक डाव्यांच्या नेता. तो मीडियाला माहितेय पण अहमदाबादच्या बाहेर नटवर देसाई कोणाला माहिती नाहीत. पण नटवर देसाई हे एक अद्भूत रसायन होते. अत्यंत खंबीर व तत्वांशी प्रामाणिक असलेला एक कट्‌टर कम्युनिस्ट कार्यकर्ता.

सुधा मेनन ,या नेदरलँडमधील आंतरराष्ट्रीय मजूर संशोधन व सल्लागार संस्था ‘प्रोफूंड’मध्ये कार्यरत आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0