नवी दिल्ली : जेएनयूत एमफील करणारी विद्यार्थीनी देवांगना कलिता यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे. गेल्या १० दिवसातील देवांगना कलिता यांची दिल्ली पोलिसां
नवी दिल्ली : जेएनयूत एमफील करणारी विद्यार्थीनी देवांगना कलिता यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे. गेल्या १० दिवसातील देवांगना कलिता यांची दिल्ली पोलिसांनी केलेली ही तिसरी अटक असून दिल्लीतील जाफराबाद मेट्रो स्टेशननजीक सीएए विरोधात निदर्शने केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
गेल्या २३ मे रोजी कलिता व नताशा नरवाल या आणखी एका जेएनयूतील विद्यार्थीनीला सीएएविरोधात निदर्शने केल्याप्रकरणात अटक करण्यात आली होती. पण त्यांना जामीन मिळाला होता. पण दिल्ली पोलिसांनी कलिता यांना दंगल भडकवणे, हत्या व कटकारस्थान रचल्याप्रकरणात २८ मे रोजी पुन्हा अटक केली. तर नताशा नरवाल यांच्यावर बेकायदा प्रतिबंध कायदा (यूएपीए) लावण्यात आला.
पोलिसांनी या दोघांची १४ दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. पण न्यायालयाने यांना केवळ दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली. जेव्हा ही कोठडी संपली तेव्हा कलिता यांना पुन्हा अटक करून त्यांच्यावर तिसरा गुन्हा दाखल करत न्यायालयीन कोठडीत टाकण्यात आले. दिल्ली पोलिसांनी कलिता यांच्यावर तिसरा गुन्हा हा दरयागंज येथे दंगल पेटवल्याप्रकरणाचा लावला आहे.
दरम्यान, देवांगना व नताशा यांच्यावर लावलेले सर्व गुन्हे सूडबुद्धीतून आले असून अधिकारांचा हा सरळसरळ गैरवापर असल्याचा आरोप पिंजरा तोड चळवळीने केला आहे.
नेमके प्रकरण काय?
२२ व २३ फेब्रुवारी रोजी जाफराबाद मेट्रो स्टेशनवर सीएएविरोधात निदर्शने झाली होती व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सुमारे ५०० आंदोलक उपस्थित होते. यातील बहुतांश आंदोलक महिला होत्या. त्यात देवांगना व नताशा उपस्थित होत्या.
जाफराबाद येथील या आंदोलनावरूनच भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी २३ फेब्रुवारी रोजी धार्मिक तेढ वाढवणारे वक्तव्य केले होते. जाफराबादमध्ये ठिय्या मारून बसलेले सीएएविरोधक तीन दिवसात येथून हटले नाही तर आम्ही या आंदोलकांकडे पाहून घेऊ असा इशारा त्यांनी दिल्ली पोलिसांना दिला होता आणि त्याच्या दुसर्या दिवशी ईशान्य दिल्लीत दंगल पेटली होती, ज्यात ५२ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता व शेकडो लोक जखमी झाले होते.
पण आता दिल्ली दंगलीला तीन महिन्यापेक्षा अधिक काळ उलटूनही कपिल मिश्रा यांची चौकशी व्हावी म्हणून त्यांना एकदाही दिल्ली पोलिसांनी बोलावलेले नाही.
कलिता व नरवाल यांच्यासंदर्भातील हे प्रकरण न्यायालयात गेले तेव्हा न्यायालयाने हाती आलेल्या पुराव्यानुसार या दोन विद्यार्थीनी जाफराबाद मेट्रो स्टेशनवर सीएए व एनआरसीविरोधात निदर्शन करण्यासाठी उपस्थित होत्या व त्यांनी पोलिस जो दावा करत आहेत, असा कोणताही विरोध पोलिसांना केलेला नाही किंवा या दोघींनी कोणतीही हिंसा केलेली दिसून आलेली नाही. या विद्यार्थीनींचा उद्देश हा केवळ आंदोलनाचा व विरोधाचा होता. या दोघी विद्यार्थीनींचा सामाजिक वावर अत्यंत चांगला असून त्या उच्चशिक्षित आहे, त्या पोलिसांना सहकार्य करण्यासही तयार आहेत, असे न्यायालयाने सांगितले.
पण २३ मे रोजी जामीन मिळताच दिल्ली पोलिसांनी या दोघींवर हत्या, हत्येचा प्रयत्न व गुन्हेगारीचा कट असे आरोप ठेवून त्यांना परत दोन दिवसांसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याची न्यायालयाकडून परवानगी घेतली.
पण त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचने पुन्हा या दोघींना हत्या, दंगल भडकवणे व कटकारस्थान केल्याचे आरोप ठेवत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी घेतली. पण गेल्या शनिवारी नरवाल यांच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल केले. त्यांच्यावर दरयागंजमध्ये दंगल भडकवण्याचा आरोप केला.
नताशा नरवाल व देवांगना कलिता या जेएनयूच्या विद्यार्थीनी असून नताशा सेंटर फॉर हिस्टोरिकल स्टडीजमध्ये पीएचडी स्नातक असून देवांगना सेंटर फॉप वुमेन स्टडिजच्या एम.फील स्नातक आहेत.
या दोघी ‘पिंजरा तोड’ या सामाजिक चळवळीच्या संस्थापक सदस्य असून त्यांनी २०१५मध्ये ही महिला संघटना स्थापन केली होती. जेएनयूमध्ये वसतीगृहात राहणार्या विद्यार्थ्यांवर सतत लावली जाणारी बंधने, स्त्री-पुरुष असा भेदभाव ठेवणारे कायदे-नियम व कर्फ्यू टाइमच्याविरोधात या संघटनेने आंदोलने केलेली आहेत.
मूळ बातमी
COMMENTS