नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या प्रचारात भाजपने पुन्हा आक्रमक हिंदुत्वाचा आधार घेतला असून शाहीन बागमध्ये सुरू असलेले नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या व
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या प्रचारात भाजपने पुन्हा आक्रमक हिंदुत्वाचा आधार घेतला असून शाहीन बागमध्ये सुरू असलेले नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधातले आंदोलन भाजपच्या सर्व बड्या नेत्यांच्या निशाण्यावर असल्याचे दोन दिवसांतील घडामोडींवर स्पष्ट झाले आहे.
रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबरपूर विधानसभा मतदारसंघातील एका रॅलीत मतदारांना आव्हान करताना ‘यावेळी कमळाच्या चिन्हावर इतक्या संतापाने बटन दाबा की हे बटन बाबरपूरमध्ये दाबल्यास त्याचा करंट शाहीन बागमध्ये दिसला पाहिजे’, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून गदारोळ उडाला असताना सोमवारी केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी रिठाला विधानसभा मतदारसंघात एका जाहीर सभेत ‘गद्दारांना गोळी मारा’ या जमावाला भडकवणाऱ्या घोषणेचा आधार घेतला. अनुराग ठाकूर मंचावरून ‘देश के गद्दारोंको’ असा नारा देत होते व त्याला उपस्थित भाजप कार्यकर्ते ‘गोली मारो सालों को’, असे उत्तर देत होते. आपल्या आवाहनाला उपस्थितांनी अधिक जोरदार प्रतिसाद द्यावा यासाठी अनुराग ठाकूर यांनी मंचावर बसलेले आणखी एक केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांना ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात घोषणा द्या, असेही उपस्थित कार्यकर्त्यांना उद्युक्त करताना दिसत होते.
अनुराग ठाकूर यांच्या या कथित वादग्रस्त प्रचारशैलीला आम आदमी पार्टी व काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. भाजपचे नेते दिल्लीतील शांतता व सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रचारसमितीचे एक नेते कीर्ती आझाद यांनी केला आहे.
तर जेष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी अशा मंत्र्याची जागा कॅबिनेट नव्हे तर जेलमध्ये हवी होती अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपचे उमेदवार कपिल मिश्रा यांनी, येत्या ८ फेब्रुवारी रोजी दिल्लीत भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना असल्याचे वादग्रस्त ट्विट केले होते. या ट्विटची दिल्ली पोलिसांनी दखल घेत त्यांना ट्विट काढायला लावले तर निवडणूक आयोगाने त्यांना दोन दिवस प्रचारासाठी बंदी घातली होती.
COMMENTS