गोव्यात एक पुढारी आहेत बाबुश माँसेरात. ते काँग्रेसमधे होते. नंतर त्यांनी आपला एक खाजगी पक्ष स्थापन केला. नंतर ते काँग्रेसमधे गेले. नंतर ते भाजपात गेले. सेवा करण्याचं व्रत त्यांनी घेतलंय, सेवा हा त्यांचा श्वास आहे, सेवा हा त्यांचा प्राण आहे. त्यामुळं त्यांना सतत पक्ष बदलत रहावे लागतात.
अश्वनी कुमारनी काँग्रेस सोडली. ते चाळीस वर्षं काँग्रेसमधे होते, काही काळ मंत्री होते. ते पंजाबी आहेत. पंजाबमधून ते राज्यसभेवर निवडून येत असत. पंजाबमधे निवडणुकीचा मोसम असताना त्यानी राजीनामा दिलाय. त्यांच्या काँग्रेस पक्षाला पंजाबात उतरती कळा लागल्याची पार्श्वभूमी पक्षत्यागाला आहे.
काही दिवस आधी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पक्ष सोडलाय आणि एक स्वतंत्र पक्ष स्थापन केलाय. १९८४ साली अमरिंदरनी काँग्रेस सोडली होती, एक वेगळा अकाली दल पक्ष स्थापन केला होता. नंतर यथावकाश त्यांनी त्यांचा अकाली दल काँग्रेसमधे मिसळला आणि ते काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले होते. आता पुन्हा एकदा ते काँग्रेसबाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापन करते झालेत.
दोघांचंही म्हणणं आहे की काँग्रेस पक्ष जनतेपासून तुटला असल्यानं त्या पक्षात रहाण्यात काही गंमत नाही. दोघांनाही जनतेची सेवा करायची आहे आणि काँग्रेसमधे राहून ती सेवा त्यांना करता येणार नाहीये. कारण काँग्रेसकडं सत्ता नाहीये, सत्ता येण्याची शक्यता नाहीये. म्हणजे सत्ता नसेल तर सेवा करता येत नाहीये.
गोव्यात एक पुढारी आहेत बाबुश माँसेरात. ते काँग्रेसमधे होते. नंतर त्यांनी आपला एक खाजगी पक्ष स्थापन केला. नंतर ते काँग्रेसमधे गेले. नंतर ते भाजपात गेले. सेवा करण्याचं व्रत त्यांनी घेतलंय, सेवा हा त्यांचा श्वास आहे, सेवा हा त्यांचा प्राण आहे. त्यामुळं त्यांना सतत पक्ष बदलत रहावे लागतात.
तसंच अश्वनी कुमार आणि अमरिंदर सिंग यांचं.
सध्या त्यांना भाजपनं अंगणात ठेवलंय, घरात प्रवेश दिलेला नाही. परिस्थिती अनुकूल झाल्यावर त्यांना पडवीत किंवा माजघरात किंवा अंतःपुरात प्रवेश दिला जाईल.
काँग्रेसला पंजाबात उतरती कळा का लागली?
या बाबत वेगवेगळी मतं आहेत. प्रियांका गांधी यांना वाटतं की अमरिंदर सिंग आतून भाजपला सामिल होते, भ्रष्ट होते. काँग्रेसमधल्या कित्येकांचं तसं मत आहे.
लोकांना काय वाटतं?
गेली दोन वर्षं पंजाबात शेतकऱ्यांचं आंदोलन चाललं होतं. हमी भाव आणि मार्केट कमिट्या या दोन गोष्टी शिल्लक रहाव्यात असं शेतकऱ्यांचं मत होतं. मोदीशहा यांचं मत होतं की मार्केट कमीट्या मोडाव्यात, हमी भाव काढून टाकावा आणि शेतकऱ्यांना बाजारात सोडावं. मोदीशहांनी शेतकऱ्यांना न समजून घेता कायदे केले. शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. आंदोलन इतकं कडेकोट होतं की शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली.
आंदोलनाच्या काळात काँग्रेस कुंपणावर होती. काँग्रेसनं शेतकऱ्यांना विरोध केला नाही पण शेतकऱ्यांच्या बाजूनं पक्ष पातळीवर काँग्रेस उभी राहिली नाही. हा भाजपचा सापळा होता. काँग्रेसनं पाठिंबा दिला असता तर आंदोलनावर पक्षीय असल्याचा आरोप झाला असता, आंदोलनाचं नुकसान झालं असतं. या विचारानं शेतकऱ्यांनीही काँग्रेसला दूर ठेवलं आणि काँग्रेसही आंदोलनापासून दूर राहिली.
भाजपनं आंदोलनाला विरोध करताना शेतकऱ्यांवर ते खालिस्तानी आहेत, जातीयवादी शिख आहेत, हिंदुविरोधी आहेत, पाकिस्तानवादी आहेत, दहशतवादी आहेत असे आरोप केले. हे आरोप अगदीच निर्बुद्द आणि मूर्खपणाचे होते. सत्तेला हपापलेल्या मोदीशहांची बुद्धी ठिकाणावर राहिलेली नाहीये याचं ते चिन्ह होतं. अख्ख्या शिख समाजालाच मोदीशहा बदनाम करत होते, व्यापक प्रवाहातून दूर लोटत होते.
नेमकी हीच चूक काँग्रेसनं १९८४मधे केली होती. इंदिरा गांधींचा खून करणारे मारेकरी शिख होते. काँग्रेसनं अख्ख्या शिख समाजाला वेठीस धरलं, दिल्लीत त्यांचा संहार केला. शिख विरुद्ध इतर अशी फूट पाडायचा प्रयत्न काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी केला. सुदैवानं त्यांच्या या कारवायांना उरलेला देश बळी पडला नाही. खुद्द शिख समाजानंही समजुतीनं घेतलं. काँग्रेस पक्षाला धडा शिकवला पण जातीयवादी झाले नाही, फुटीरतेकडे गेले नाहीत.
नेमकं तेच आता पंजाबमधे घडतय. शिख माणसं भाजपला धडा शिकवत आहेत. त्यांनी हिंदूंच्या विरोधात आघाडी उघडली नाहीये, त्यांनी भाजपला फटके घालायचं ठरवलंय. भाजप म्हणजे हिंदू, हिंदू म्हणजे भाजप हा संघभाजपचा समज आपल्याला मान्य नाही असं पंजाबातले शिख म्हणत आहेत. ते जातीय होत नाहीयेत, ते राजकीय पक्षाला धडा शिकवत आहेत. त्यामुळंच मोदी यांच्या सभेला माणसं जात नाहीत, बळेबळे माणसं गोळा करावी लागत आहेत.
मोदी हिंदू आहेत म्हणून पंजाबी त्यांना नाकारत नाहीयेत. मोदी भयानक आहेत म्हणून त्यांना पंजाबी मतदार-नागरीक नाकारत आहेत. याचा राजकीय फटका भाजपला बसत असल्यानं बारगीर गोळा करण्याच्या खटपटीत मोदीशहा आहेत, फाटक उघडून त्यांनी अमरिंदर-अश्वनी इत्यादींना अंगणात घेतलंय.
पण दुर्दैवानं शेतकरी आणि नागरिकांना काय हवंय ते काँग्रेसलाही समजलं नाहीये. धर्म आणि पंथ या गोष्टी नागरिकांच्या मनात असतात, त्या गेलेल्या नाहीत. परंतू त्याच बरोबर नागरिकांना सुखानं जगायचंही असतं. धर्म आणि पंथ या घटकांचा वापर करून आपली राजकीय-आर्थिक अपयशं भाजप लपवतंय, लोकांना भुलवतंय. याचा अर्थ काँग्रेसला कळत नाहीये. काँग्रेस जनांना वाटतंय की भाजपच्याच वाटेनं गेलं तर सत्ता मिळेल.
काय गंमत आहे पहा. काँग्रेसच्या वाटेनं भाजप गेला; आता भाजपच्या वाटेनं काँग्रेस जाऊ पहातेय.
अश्वनी कुमार आणि अमरिंदर सिंग यांचं पक्ष सोडणं वरील प्रवाहाचा भाग आहे.
काँग्रेसला मतं मिळत नाहीत, भाजपला मिळतायत म्हणून अश्वनी कुमार आणि कंपनी भाजपकडं निघालीय.
१९५१ साली पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला ७४ टक्के मतं मिळाली होती. नव्यानंच जन्मलेल्या जनसंघाला ३ टक्के मिळाली होती.२०१९ सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत कांग्रेसला १९ टक्के मतं मिळाली आणि भाजपला ३१ टक्के मतं मिळाली आहेत. म्हणूनच माँसेरात आणि अश्वनी कुमार भाजपकडं निघालेत.
एकेकाळी काँग्रेसला ७४ टक्के मतं मिळाली होती. त्यांचा टक्का १९ वर आलाय. काँग्रेसची गेलेली ५५ टक्के मतं भाजपला मिळालेली नाहीत. ती सर्व भाजपला मिळाली असती तर भाजपची टक्केवारी ३१ अधिक ५५ म्हणजे ८६ टक्के झाली असती. तसं झालं नाही, भाजपचा टक्का ३ वरून ३१ वर गेला म्हणजे त्यांना काँग्रेसकडं जाउ शकणारी २८ टक्के मतं मिळाली, बाकीची मतं काँग्रेसमधील फाटाफुटीमुळं काँग्रेससारख्याच पक्षांना मिळाली. म्हणजे ममता बानर्जी, शरद पवार, जनगमनोहन रेड्डी, केजरीवाल इत्यादींना मिळाली.
हे ग्यानबाचं गणित अश्वनी कुमार यांना समजलं नसल्यानं ते भाजपकडं निघालेत. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत अश्वनी कुमार म्हणाले की कोणताही पक्ष त्यांना वर्ज्य नाही. म्हणजे भाजपात ते जाऊ शकतात. मुलाखतीत ते म्हणाले की प्रत्येक पक्षात सक्षम नेते आहेत आणि वाईट परिस्थितीला केवळ एका माणसाला जबाबदार धरणं योग्य नाही. म्हणजे मोदी यांचं नेतृत्व सक्षम आहे आणि देशातल्या खराब आर्थिक स्थितीला मोदीनाच जबाबदार धरणं योग्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे.
पुढं काय काय होतंय ते पहायचं.
असो.
निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.
COMMENTS