गुवाहाटीः वाढती महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्यावतीने सरकार विरोधात शंकर-पार्वतीचे सोंग घेऊन आगळावेगळा निषेध करणाऱ्या एका जोडप्यास आसाम पोलिसांनी शनिवारी अटक केली व त्यांच्यावर धार्मिक भावना छेडल्याचा आरोप ठेवला. या जोडप्याची रविवारी पोलिसांनी सुटका केली.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार नागांव स्थित नोनोई गावात राहणारे सामाजिक कार्यकर्ते बिरिंची बोरा व त्यांच्या पत्नीने शंकर-पार्वतीचे सोंग घेऊन बुलेटवरून महागाईविरोधात निषेध व्यक्त केला. शंकर पार्वती बुलेटवरून जात असताना त्यांच्या बुलेटमधील पेट्रोल संपते, त्यावर पार्वती नाराज होते. पार्वतीला समजवण्यासाठी शंकर पेट्रोलच्या वाढत्या किमतीकडे बोट दाखवत आपण आता टाकीत पेट्रोल भरू शकत नाही अशी असमर्थता व्यक्त करतात. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या निषेधाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे काही कार्यकर्ते संतप्त झाले. हिंदू देवदेवतांचा हा अवमान असून आमच्या धार्मिक भावना दुखावल्या अशी तक्रार या दोघांविरोधात विहिंप व भाजयुमोने पोलिसांत दाखल केली.
या तक्रारीची आसाम पोलिसांनी त्वरित दखल घेत बिरिंची बोरावर आयपीसी कलम २९५ ए अंतर्गत धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप लावत फिर्याद नोंद केली. नागांवच्या पोलिस अधिक्षक लीना डोले यांनी बोरा यांना शनिवारी ताब्यात घेतले. शनिवारची रात्र बोरा यांना पोलिस कोठडीत काढावी लागले नंतर रविवारी त्यांना नोटीस देत सोडण्यात आले. बोरा यांना नंतर पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले.
पोलिस कोठडीतून बाहेर येईपर्यंत बोरा यांच्या शंकर-पार्वतीचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यावर बोलताना बोरा यांनी आपण वाढत्या महागाईकडे सरकारचे लक्ष्य वेधण्याचा आपल्या या नाटकाचा प्रयत्न होता. यात कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. आपल्या छोट्याच्या नाट्यात शंकर-पार्वतीला आणण्याचा मुख्य हेतू हा होता की, देशात एवढी महागाई वाढलेली असताना साक्षात परमेश्वर जरी पृथ्वीवर राहायला आले तरी त्यांना ही महागाई झेपली नसती.
आसाममध्ये नाटकांमध्ये देवदेवतांची रुपे घेण्याची परंपरा आहे, यात नवं असं काहीच नाही, असा खुलासा बोरा यांनी केला.
प्रत्येकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते. इथे हे स्वातंत्र्य काढून घेण्याचा प्रयत्न असून आसाममधील सरकारच्या विरोधात कोणीच काही बोलू शकत नाही, अशी खंत बोरा यांनी व्यक्त केली.
या घटनेनंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी वर्तमान समस्यांवर असे नाट्य तयार करणे हे ईशनिंदा ठरत नाही. या दाम्पत्याने भगवान शंकराची वेषभूषा केली असली तरी तो गुन्हा नाही. नागांवर पोलिसांना योग्य ते आदेश केले असल्याचे ट्विट सरमा यांनी केले.
मूळ बातमी
COMMENTS