गुवाहाटी : आसाममधील नागांव जिल्ह्यातले अखिल भारतीय जमियत उलेमा या संघटनेचे उपाध्यक्ष व धार्मिक गुरु खैरुल इस्लाम यांच्या अंत्यविधीस त्यांचे हजारो समर्
गुवाहाटी : आसाममधील नागांव जिल्ह्यातले अखिल भारतीय जमियत उलेमा या संघटनेचे उपाध्यक्ष व धार्मिक गुरु खैरुल इस्लाम यांच्या अंत्यविधीस त्यांचे हजारो समर्थक जमल्याची घटना २ जुलै रोजी दिसून आल्याने प्रशासनाने कोरोना विषाणू संसर्ग पसरेल या शक्यतेतून ३ गावे सील केली आहेत.
खैरुल इस्लाम हे या परिसरातील प्रभावशाली व्यक्तिमत्व असून त्यांचा मुलगा अमीनुल इस्लाम हे जिल्ह्यातल्या ढींग मतदारसंघाचे आमदार आहेत. २ जुलैला खैरुल इस्लाम यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. त्यांचे दफन त्यांच्या मूळ गावी करण्याचे ठरले होते व ३ जुलै ही तारीख निश्चित झाली होती. पण नंतर ती २ जुलै अशी करण्यात आली. पण खैरुल इस्लाम यांच्या निधनाचे वृत्त पसरल्याने व त्यांचा दफनविधी लगेच होणार असल्याने आसपासच्या गावातून सुमारे १० हजार जणांचा जमाव जमा झाला आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवण्यात आले, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
तर अमीनुल इस्लाम यांनी आपल्या पित्याच्या निधनाची व त्यांच्या दफनविधीची माहिती जिल्हा प्रशासनास दिली होती. माझ्या वडिलांचे समर्थक मोठ्या प्रमाणात असल्याने व ते समाजात लोकप्रिय असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली असा दावा केला.
आपल्या वडिलांच्या दफनविधीस एवढा मोठा जमाव जमा झाल्याची छायाचित्रे खुद्ध अमीनुल इस्लाम यांनी फेसबुकवर प्रसिद्ध केली. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात दोन गुन्हे दाखल केले आहेत पण त्यात कोणत्याही व्यक्तीचे नाव घेण्यात आलेले नाही.
गेल्या एप्रिल महिन्यांत धार्मिक चिथावणी करणारे वक्तव्य केल्या प्रकरणी अमीनुल इस्लाम यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता. दिल्लीतील मरकजमध्ये लोकांना डांबून ठेवले असून प्रकृती
ठणठणीत असलेल्यांना इंजेक्शन देऊन आजारी केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
मूळ बातमी
COMMENTS